लेखांक 3
आता दुसर्या वाक्याचाअर्थ समजावून घेऊ.
रामं रमेशं भजे।
रामम् राम अकारान्त पु. द्वि. ए. व.
रमेश ह्याचा संधीविच्छेद
रमा+ईश
र्+अ+म्+आ+ई+श्+अ असा होतो.
येथे 2 स्वर आ आणि ई ह्यांची संधी झाली आहे.
भजे भज् धातू प्रार्थना करणे सन्मान करणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी उ. पु. ए. व.
भजे हे उत्तम पुरूषातील रूप असल्याने अहम् म्हणजे मी हे अध्यारूत आहे.
रमा म्हणजे लक्ष्मी. तिचा ईश म्हणजे लक्ष्मीपती.
आता आपण संधी विषयी जाणून घेऊ. दोन लगतच्या वर्णांचे संयोजन किंवा एकीकरण केले असता जो बदल दिसून येतो त्याला संधी असे म्हणतात.
आपल्या वर्णमालेत 13 स्वर आणि 33 व्यंजने दिसून येतात. त्यांच्या परस्पर संयोजनानुसार संधीच्या प्रकारांचे वर्गीकरण केले आहे.
सुरुवातीला आपण स्वरसंधींचे प्रकार पाहू. स्वर संधींचे 8 प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे
1. सवर्णदीर्घ यामध्ये एकाच र्हस्व आणि दीर्घ स्वरांचे संयोजन झालेले दिसून येते.
अ+अ=आ परम+अर्थः=परमार्थः
आ+आ=आ विद्या+आलय=विद्यालय
इ+इ=ई कवि+इन्द्र =कवींन्द्र
ई+ई=ई मही+ईशः=महीशः
उ+उ=ऊ भानु+उदय=भानूदय
ऊ +ऊ=ऊ
वधू+ऊत्साहः =वधूत्साहः
ऋ+ऋ=ऋ (दीर्घ) पितृ+ऋणम् =पितृणम्
2. गुण संधी जेव्हा अ आणि आ ह्या स्वरांचे इतर स्वरांशी संयोजन होते तेव्हा नवीन रूप तयार होते त्याला गुणसंधी असे म्हणतात.
अ/आ +इ / ई=ए देव+इन्द्र=देवेन्द्र
अ/आ +उ /ऊ =ओ
सूर्य +उदयः=सूर्योदयः
अ/आ +ऋ /ऋ =अर्थ सप्त+ऋषयः=सप्तर्षयः
अ/आ +लृ =अल्
तव+लृकारः=तवल्कारः
अशा प्रकारे गुणसंधी 8 आणि सवर्णदीर्घसंधी 16 दिसून येतात.
संहिता हा शब्द सम्-उपसर्गपूर्वक धा-धातूला क्त-प्रत्यय लागून बनलेला आहे. व्युत्पत्तीनुसार या शब्दाचा अर्थ ‘एकत्र ठेवणे’ असा होतो.
महर्षी पाणिनींनी अष्टाध्यायीमध्ये संहितेचे लक्षण केले आहे -‘परः संनिकर्षः संहिता।’. वर्णांमधील आत्यंतिक सांनिध्य म्हणजे संहिता होय. संहिता ही बंधनकारक असते तर विराम वक्त्याच्या इच्छेवर अवलंबून असतो. यासंबंधीची कारिका पुढीलप्रमाणे – संहितैकपदे नित्या नित्या धातूपसर्गयोः। नित्या समासे वाक्ये तु सा विवक्षामपेक्षते।।.
संहिता एक पदे नित्या नित्या धातू उपसर्गयोः।
नित्या समासे वाक्ये तु सा विवक्षाम अपेक्षते ।।
एक पद, धातू आणि उपसर्ग तसेच समास यांमध्ये संहिता नित्य मानलेली आहे. तर वाक्यामध्ये पदांचा जोडून उच्चार करणे अथवा न करणे हे विवक्षेवर म्हणजे वक्त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे.
1. जेव्हा एखाद्या वाक्यात एखादे पद हे अक्षरांच्या संयोगानेच निर्माण होते जसे किम्+चित्=किञ्चित् (नपु), कः+चित् =कश्चित् (पु) त्यावेळेस संहिता अपरिहार्य असते.
2. धातूला, उपसर्ग जोडला असता धातू मध्ये गुणप्रक्रिया घडते हे आपण आधीच्या लेखात वाचले, येथे सुद्धा संहिता अपरिहार्य असते.
3. याचप्रमाणे दोन पूरक शब्द एकत्र आले असता जे नवीन शब्द तयार होतात त्यांना समास असे म्हणतात. येथे सुद्धा संहिता अपरिहार्य असते.
4. आता राहिला 4था प्रकार विवक्षा म्हणजे वक्तुम इच्छा, वच् धातू बोलणे तुमुन प्रत्यय. संधी वाचण्याची इच्छा असलेला. वाक्य बोलत असताना संधीसकट म्हणायचे की विराम घेऊन, हे विवक्षेवर अवलंबून असते.
वर्णांमध्ये संहिता असल्यास संधिकार्य होतेच. त्यामुळे बालेन (बाल + इन), क्षीरौदनः (क्षीर + ओदनः), परीक्षते (परि + ईक्षते) येथे संहिता बंधनकारक असल्याने विशिष्ट संधिनियमही प्रवृत्त झालेले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा