रविवार, १९ मार्च, २०२३

श्रीमद्भगवद्गीता 14 वा अध्याय

 श्रीमद्भगवद्गीतेच्या 14 व्या अध्यायाचे नाव गुणत्रयविभागयोगः असे असून त्यामध्ये 27 श्लोक आहेत.

श्रीभगवानुवाच

परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् ।

यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः।। 14.1।।

श्रीभगवानुवाच - ज्ञानानाम्‌ उत्तमम्‌ परम्‌ ज्ञानम्‌ भूयः प्रवक्ष्यामि यत्‌ ज्ञात्वा सर्वे मुनयः इतः पराम्‌ सिद्धिम्‌ गताः।

श्रीभगवान श्रीमत भगवत् प्र ए. व.

उवाच ब्रू धातू बोलणे लिट लकार प्र. पु. ए. व.

 ज्ञानानाम्‌ सर्व प्रकारच्या ज्ञानामधे ज्ञान नपु. ष. ब. व.

उत्तमम्‌ उत्तम नपु. द्वि. ए. व.

परम्‌ श्रेष्ठ पर वि. नपु. द्वि. ए. व.

ज्ञानम्‌ ज्ञान नपु. द्वि. ए. व.

भूयः पुन्हा अव्यय

प्रवक्ष्यामि (मी) सांगतो प्र +वच् धातू लृट लकार उ. पु. ए. व.

यत्‌ जे यद् नपु. द्वि. ए. व.

ज्ञात्वा जाणून ज्ञा धातू क्त्वा प्रत्यय

सर्वे सर्व प्र. ब. व.

मुनयः मुनि पु. प्र. ब. व.

इतः ह्या जगातून अव्यय

पराम्‌ परा स्त्री. द्वि. ए. व.

सिद्धिम्‌ सिद्धि स्त्री द्वि. ए. व.

गताः प्राप्त केले गम् धातू जाणे क्त प्रत्यय

आधीच्या अध्यायात आपण सांख्य दर्शनाची प्राथमिक माहिती वाचली. प्रकृति विविध गुणवैशिष्ट्यांनी संपन्न आहे हे सुद्धा वाचले. विविध गुणांचे तीन भागांत वर्गीकरण केले आहे, जसे सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण. प्रकृति पासून निर्माण झालेल्या शरीर, मन आणि बुद्धी मधे हे तीन गुण सामावलेले असतात. ह्या संबंधी अधिक माहिती ह्या अध्यायात आपण वाचणार आहोत.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

श्रीभगवानकृष्ण म्हणाले आता मी तुला पुन्हा श्रेष्ठ ज्ञानाबद्दल सांगेन जे सर्व ज्ञानांमधे श्रेष्ठ आहे आणि जे जाणून घेतल्याने महान ऋषींना परम सिद्धि प्राप्त झाली.

इदम्‌ ज्ञानम्‌ उपाश्रित्य मम साधर्म्यम्‌ आगताः, सर्गे न उपजायन्ते, प्रलये अपि च न व्यथन्ति।।14.2।।

इदम्‌ हे नपु. द्वि. ए. व.

ज्ञानम्‌ ज्ञान नपु द्वि. ए. व.

उपाश्रित्य आश्रय घेऊन उप +आ+श्रि धातू सेवा करणे ल्यप प्रत्यय

मम माझ्या अस्मद् ष. ए. व.

साधर्म्यम्‌ साधर्म्य नपु द्वि ए. व.

आगताः, प्राप्त करून आ+गम् धातू जाणे क्त प्रत्यय प्र. ब. व.

सर्गे सृष्टित ससर्ग पु. स. ब. व.

न उपजायन्ते, जन्म घेत नाही उप +जन् धातू उत्पन्न करणे, लट लकार प्र.पु.ब.व.

प्रलये प्रलय नपु. स. ए. व.

अपि च

न व्यथन्ति व्यथ् धातू घाबरणे क्षुब्ध होणे लट लकार प्र.पु.ब.व.

ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्तीमार्गचा अवलंब करावा असे श्रीभगवानकृष्णांनी 12 व्या अध्यायात सांगितले आहेच. ज्ञान प्राप्त झाले की आपोआपच अहंकार, लालसा, द्वेष नष्ट होतो म्हणजेच एक आदर्श व्यक्तीमत्व तयार होते. ह्यालाच दैवत्व प्राप्त होणे असेही म्हणता येईल. देवत्व जरी प्राप्त झाले तरी सर्व अधिकार प्राप्त होत नाहीत पण सामर्थ्य नक्कीच प्राप्त होते.

म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की ह्या ज्ञानाचा आश्रय घेऊन जे माझी दिव्य दृष्टि प्राप्त करतात ते सृष्टिच्या उत्पत्ती मुळे जन्म घेत नाहीत प्रलया मुळे अस्थिर होत नाहीत.

मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहम्।

संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत।।14.3।।

हे भारत ! महत्‌ ब्रह्म मम योनिः। अहम्‌ तस्मिन्‌ गर्भम्‌ दधामि; ततः सर्व-भूतानाम्‌ सम्भवः भवति।

हे भारत ! विशेष नाम

महत्‌ ब्रह्म सर्व भौतिक सार

महत्‌ महत् नपु. प्र. ए. व.

ब्रह्म ब्रह्मन् नपु. प्र. ए. व.

 मम माझे अस्मद् सर्व. ष. ए. व.

योनिः जन्मस्त्रोत योनि स्त्री. प्र. ए. व.

अहम्‌ मी अस्मद् सर्व प्र. ए. व.

तस्मिन्‌ त्यामध्ये तद् पु. स. ए. व.

गर्भम्‌ गर्भ पु. द्वि. ए. व.

दधामि; उत्पन्न करतो धा धातू धारण करणे लट लकार उ. पु. ए. व.

ततः त्यानंतर अव्यय

सर्व-भूतानाम्‌ सर्व जीवांचा सर्वाणि भूतानि ष. ब. व.

सम्भवः सम्भव पु. प्र. ए. व.

भवति होतो भू धातू लट लकार प्र.पु.ए.व

ह्या श्लोकातील योनी ह्या शब्दाचे विविध अर्थ आहेत जसे शक्तीचे प्रतिक, असलेली देवी जी स्त्री शक्तीचे प्रतिनिधीत्व करते, शिवाची पत्नी म्हणजे पार्वती आणि अर्थातच उत्पत्ती चे स्थान.

आधीच्या अध्यायात आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ संबंधी माहिती समजावून घेतली.

मुण्डकोपनिषदातील पहिल्या मुण्डकात जीव कसे उत्पन्न होतात ह्या संबंधी विवेचन दिले आहे. त्याला ब्रह्म असे म्हटले आहे.

अणोरणीयान् महतो महीयान्

आत्मा गुहायां निहितोऽस्य जन्तोः॥ - श्वेताश्वतरोपनिषत् 3.20।।

तो सूक्ष्म पेक्षा ही अती सूक्ष्म आणि सर्वात मोठा, परमात्मा ह्या जीवाच्या हृदयरूपी गुहेत वसला आहे. पुरूष आणि प्रकृति ह्या पासून सृष्टी निर्माण झाली हा झाला सांख्यवाद. ह्यातील प्रकृति म्हणजे पंचमहाभूते ज्याला महद्ब्रह्म असे म्हटले आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की हे भारत ब्रह्म नामक पूर्ण भौतिक तत्व हे सर्वांच्या जन्माचे मूळ आहे, ह्या ब्रह्म ला मी गर्भस्थ करतो आणि सर्व जीवांचा जन्म शक्य होतो.

सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः।

तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता।।14.4।।

हे कौन्तेय! सर्व-योनिषु याः मूर्तयः सम्भवन्ति महत्‌ ब्रह्म तासाम्‌ योनिः, अहम्‌ बीज-प्रदः पिता ।

हे कौन्तेय कुन्त्याः अपत्यं पुमान् सं. ए. व.

सर्व-योनिषु सर्व योनींमधे सर्वाः योनयः स. ब. व.

याः ज्या यद् स्त्री. प्र. ब. व.

मूर्तयः मूर्त रूप मूर्ति स्त्री. प्र. ब. व.

सम्भवन्ति प्रकट होतात सम+भू धातू लट लकार प्र.पु.ब.व.

महत्‌ महत् स्त्री. प्र. ए. व.

ब्रह्म ब्रह्मन् नपु. प्र. ए. व.

तासाम्‌ त्या सर्व तद् स्त्री. ष. ब. व.

योनिः, योनि स्त्री. प्र. ए. व.

अहम्‌ मी अस्मद् सर्व प्र. ए. व.

बीज-प्रदः बीज प्रदान करणारा बीजं प्रददाति प्र. ए. व.

पिता पितृ पु. प्र. ए. व.

जरायुज (सस्तन प्राणी) अण्डज (अण्ड्यातून उत्पन्न होणारे ) स्वेदज, उद्भिज्ज (जमीनीतून उत्पन्न होणारे ) सम्पूर्ण जीवांच्या उत्पत्तीचे हे चार प्रकार.

गर्भ आणि आधान ह्या दोन शब्दांपासून तयार झालेल्या गर्भाधान ह्या शब्दाचे विविध अर्थ सापडतात. महर्षी व्यासांनी सांगितलेल्या 16 संस्कारांपैकी पहिला संस्कार. शाक्त तत्वज्ञानाप्रमाणे तर दीक्षा घेण्यापूर्वी करण्यात येणार्‍या 11 संस्कारांपैकी एक.

जन्मना जायते शुद्रऽसंस्काराद्द्विज उच्यते।

अर्थात: जन्माच्या वेळी सर्वच शूद्र असतात आणि संस्कारांच्या साह्याने व्यक्ती द्विज होते.

स्मृतीमध्ये लिहिले आहे की

निषेकाद् बैजिकं चैनो गार्भिकं चापमृज्यते।क्षेत्रसंस्कारसिद्धिश्च गर्भाधानफलं स्मृतम्।।

विधिपूर्वक संस्कारांनी युक्त अशा गर्भाधान मुळे सुयोग्य संतान उत्पन्न होते.

 ह्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे श्रीभगवानकृष्ण स्वतः प्रकृति सोबत गर्भाधान करण्यास सज्ज झाले आहेत.

दैवात्क्षुभितधर्मिण्यां स्वस्यां योनौ पर:पुमान्। आधत्त वीर्यं सासूत महत्तत्त्वं हिरण्मयम्।।(श्रीमद्भागवतम्-3.26.19)

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे कौन्तेय समस्त योनींमधे (84 लक्ष) जितकी मूर्त स्वरूप शरीरे निर्माण होतात, त्या सर्वांचे मूळ (महान योनी) प्रकृति आणि बीज देणारा पिता मी आहे.

सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः। निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्।।14.5।।

हे महा-बाहो ! सत्त्वम्‌ रजः तमः इति प्रकृति-सम्भवाः गुणाः अव्ययम्‌ देहिनम्‌ देहे निबध्नन्ति।

हे महा-बाहो ! महान्तौ बाहू यस्य सः

सत्त्वम्‌ सत्त्व नपु प्र ए. व.

रजः रजस् नपु प्र ए. व.

तमः तम नपु प्र ए. व.

इति

प्रकृति-सम्भवाः प्रकृती पासून उत्पन्न झालेले

प्रकृतिसंभवः प्र. ब. व.

प्रकृत्याः सम्भवः येषां ते

गुणाः गुण पु. प्र. ब. व.

अव्ययम्‌ शाश्वत अव्यय द्वि. ए. व.

देहिनम्‌ जीव देहिन् पु. द्वि. ए. व.

देहे देहामधे देह पु. स. ए. व.

निबध्नन्ति बद्ध होतात नि +बन्ध् धातू बांधणे लट लकार प्र.पु.ब.व.

परमेश्वर निर्गुण, त्रिगुणातीत असे आहेत. सजीव मात्र त्रिगुणांनी प्रभावित आहेत ह्याचे कारण आपल्यावर असणारे माया, मोह लालसा अहंकार ह्यांचे आवरण. 5व्या अध्यायात ज्ञान हे अविद्या आणि अज्ञानाने झाकोळून गेले आहे असे वाचले आहे.

 माता अनसूया च्या पोटी जन्माला आलेल्या दत्त जन्माची कहाणी ह्याच साठी समजून घेणे आवश्यक आहे. अन-असूय= असूया नसलेला/ली. दत्त म्हणजे दिलेला. आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा पुत्र.

अ त्रि म्हणजे जे तीन गोष्टींच्या च्या पलिकडे आहेत असे ते.

तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, वगैरे.

ऋषींनी सांगितल्याप्रमाणे अनसूयेने त्यांना नग्नावस्थेत भोजन वाढायला गेल्यावर तिला ते ऋषी बालकांच्या रूपात दिसले आणि त्यानंतर ते त्रिमुखी स्वरूपात एकत्रित दिसू लागले. नग्नावस्था म्हणजे सर्वसंगविरहित शुद्ध आणि त्रिगुणातीत अवस्था ! आपल्या आत्म्यावर आणि देहांवर अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष आणि आनंदमय कोष यांचे आवरण असते. हे आवरण नाहीसे झाल्यावर प्राप्त होते ती त्रिगुणातीत अवस्था.

शिवापराधक्षमापन स्तोत्रात श्रीमद् आदिशंकराचार्यसुद्धा म्हणतात,

नग्नो निःसङ्गशुद्धस्त्रिगुणविरहितो ध्वस्तमोहान्धकारो

नासाग्रे न्यस्तदृष्टिर्विदितभवगुणो नैव दृष्टः कदाचित् ।

उन्मन्याऽवस्थया त्वां विगतकलिमलं शङ्करं न स्मरामि

क्षन्तव्यो मेऽपराधः शिव शिव शिव भो श्री महादेव शम्भो ॥ १०।।

नग्न निःसङ्ग शुध्द त्रिगुण विरहित मोह अन्धकाराने ध्वस्त नासिकेच्या अग्रावर दृष्टी स्थिर ठेवून आपल्या गुणांना जाणून घेऊन सुद्धा मी आपले कधी दर्शन घेतले नाही आणि उन्मनि अवस्थेत तुमच्या स्वरूपाचे स्मरण ही केले नाही. हे महादेव शंभो माझ्या अपराधांसाठी मला क्षमा करा.

आधीच्या श्लोकात स्वतः श्रीभगवानकृष्ण बीज देणारे पिता आहेत असे सांगितल्यानंतर ह्या श्लोकात निरनिराळ्या मूर्त रूपात मात्र त्रिगुणांचा प्रभाव दिसून येतो असे सांगितले आहे.

प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम । ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥ ॥गीताई 14.5।।

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे महाबाहो, प्रकृति सत्व, रज आणि तम गुणांची बनली आहे. शाश्वत अशा आत्म्याला हे तीन गुण जखडून टाकतात.

तत्र सत्त्वं निर्मलत्वात्प्रकाशकमनामयम्।

सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघ।।14.6।।

अनघ! तत्र सत्त्वम्‌ निर्मलत्वात्‌ प्रकाशकम्‌ अनामयम्‌ सुख-सङ्गेन ज्ञान-सङ्गेन च बध्नाति।

हे अनघ! निष्पाप अ नघ (पापी

तत्र अव्यय

सत्त्वम्‌ सत्त्व नपु द्वि ए. व.

निर्मलत्वात्‌ मलीन नसलेला (शुद्ध) निर्मलत्व वि. पं. ए. व.

प्रकाशकम्‌ प्रकाशमान प्रकाशक प्रकाश करोति द्वि. ए. व.

अनामयम्‌ निरोगी

न आमयम् (व्याधी) द्वि. ए. व.

सुख-सङ्गेन सुखाची आसक्ती सुखस्य सड्गः तृ. ए. व.

ज्ञान-सङ्गेन ज्ञानाची आसक्ती ज्ञानस्य सड्गः तृ. ए. व.

बध्नाति बद्ध करतो बन्ध् धातू लट लकार प्र.पु.ए.व.

आता इथून पुढील श्लोकात तीन गुणांची माहिती विस्ताराने देण्यास सुरुवात झाली आहे.

आपल्या संस्कृतीमध्ये निरनिराळ्या देवतांना निरनिराळ्या वैशिष्ट्यांनुसार ओळखले जाते आणि तशी फलप्राप्ती होण्यासाठी पूजले सुद्धा जाते. जसे विद्येची देवता सरस्वती, धनाची देवता लक्ष्मी. महाकाली हे शक्तीचे रूप मानले जाते. प्रत्येक व्यक्तिची जशी जशी कामना, इच्छा त्याप्रमाणे तो त्या त्या देवतेला पूजतो. गीतेच्या 7व्या अध्यायातील 21 व्या श्लोकात असेच म्हटले आहे. आपापल्या श्रदधेनुसार भक्त भक्ती करत असतो.

पण ह्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे तो परमात्मा.

तीन गुणों की भक्ति में, भूल पड़ो संसार ।कहे कबीर निज नाम बिना, कैसे उतरे पार।।

तीन गुणांचे स्वामी सतोगुण - विष्णु, रजोगुण - ब्रह्मा आणि तमोगुण - शिव ह्यांनाच सर्वश्रेष्ठ मानून पूजले जाते, मग खरे सुख कसे मिळावे?

ह्या श्लोकात सत्त्वगुणाचे वर्णन केले आहे.

 मलरहीत हे विशेषण मनाची अवस्था दर्शविणारे, म्हणजेच मनात कोणतेही वाईट विचार नसणारे, शुद्ध सात्विक असे मन जे प्रकाशमान आहे म्हणजे अंधकार दूर करणारे, योग्य दिशा दाखवणारे, निरोगी म्हणजे सर्व विकाररहीत. असे मन सुख आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. येथे भौतिक सुख अपेक्षित नाही तर आत्मिक सुख. आणि सर्वश्रेष्ठ ज्ञान अपेक्षित आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की

हे निष्पाप सत्त्वगुण हा निर्मळ, प्रकाशदायी, सर्व विकार रहीत आहे आणि तो सुख आणि ज्ञानाच्या वृत्तीने बद्ध आहे.

रजो रागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम्।

तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्।।14.7।

हे कौन्तेय! रजः राग-आत्मकम्‌ तृष्णा-सङ्ग-समुद्भवम्‌ विद्धि। तत्‌ देहिनम्‌ कर्म-सङ्गेन निबध्नाति।

हे कौन्तेय!

रजः रजस् नपु द्वि. ए. व.

रागात्मकम्‌ रागात्मक वि. द्वि. ए. व.

राग रञ्ज् धातू रंगणे

तृष्णा-सङ्ग-समुद्भवम्‌ महत्त्वाकांक्षेतून निर्माण झालेला तृष्णासङ्गयोः समुद्भवः यस्य तत्

तृष्णा च सड्गः च

विद्धि जाण विद् धातू माहीत करुन घेणे लोट लकार म. पु. ए. व.

तत्‌ तो तद् नपु. प्र. ए. वह

देहिनम्‌ देहधारी देहिन् पु. द्वि. ए. व.

कर्म-सङ्गेन कर्माच्या संगतीने कर्मणः सड्गः तृ. ए. व.

निबध्नाति बद्ध करतो नि +बंध् लट लकार प्र.पु.ए.व.

ह्या श्लोकात रजोगुणाचे वर्णन करताना रागात्मक असा शब्द वापरला आहे. त्याचा नेमका अर्थ समजून घ्यायला हवा.

विश्वस्मा इत्स्वर्दृशे साधारणं रजस्तुरम् । गोपामृतस्य विर्भरत् ॥ऋग्वेद ।9।48।4

ज्या प्रकारे प्रकृतीच्या तीन गुणांपैकी रजोगुण प्रमुख आहे. अर्थात रजोगुण, सत्त्वगुण व तमोगुणाला धारण करून असतो. त्याच प्रकारे परमात्म्याच्या सत्, चित्, आनंद या तीन गुणांमधून चित् प्रमुख असते. अर्थात चित् च सत् व आनंदचा प्रकाशक आहे. याच प्रकारे परमात्म्याच्या तेजोमय गुणाला मुख्य समजून त्याला उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऋग्वेद ।9।48।4

दासबोधातील दुसर्‍या दशकातील पाचव्या समासात एकूण 42 श्लोका द्वारे रजोगुणाचे वर्णन केले आहे. रजोगुण हा चल (क्रियाशील) व उपष्टम्भक (प्रेरक) असे म्हटले आहे.

काम ईहा मदस्तृष्णा स्तम्भ आशीर्भिदा सुखम् ।

मदोत्साहो यश:प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यम: ॥ श्रीमद्भागवतम् 11।25।3॥

भौतिक इच्छा, महान् उद्योग, मद, मत्सर , मिथ्या अभिमान, भौतिक उन्नति ची कामना , गर्व , इन्द्रियतृप्ति,लढाऊ वृत्ती ,स्तुती करून घेणारा, दुसर्‍यांना हीन लेखणारा, आपल्या शक्तिचा वृथा अभिमान ही सर्व रजोगुणाची लक्षणे आहेत.

संस्कृत मधे राग शब्दाचा अर्थ रंगून गेलेला. इतक्या सर्व गुणविशेषांनी युक्त असा रजोगुणी व्यक्ती हा सर्व कर्मांशी जोडला गेला आहे.

म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की

हे कौन्तेय! अनेक कामना आणि लालसा असलेल्या रजोगुणांच्या रंगछटा तू जाणून घे ज्या देहधारी जीवात्म्याला आसक्ती मुळे कर्मांमधे जखडून टाकतात.

तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम्।

प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत।।14.8।।

हे भारत! सर्व-देहिनाम्‌ मोहनम्‌ तमः तु अज्ञानजम्‌ विद्धि। तत्‌ प्रमाद-आलस्य-निद्राभिः निबध्नाति।

हे भारत! भरतकुलोत्पन्नः इति सं. ए. व.

सर्व-देहिनाम्‌ सर्व देहधारी जीवांच्या सर्वे देहिनः ष. ब. व.

मोहनम्‌ मोह मोहयति इति मोहनः द्वि. ए. व.

तमः तमस् नपु. द्वि. ए. व.

तु अव्यय

अज्ञानजम्‌ अज्ञानातून उत्पन्न झालेला

अज्ञानात् जायते अज्ञानजः द्वि. ए. व.

विद्धि जाण विद् धातू माहीत करुन घेणे लोट लकार म. पु. ए. व.

तत्‌ तो तद् नपु. प्र. ए. व.

प्रमादआलस्यनिद्राभिः प्रमादआलस्यनिद्राः तृ. ब. व.

प्र√मद्+घञ् प्रत्यय हयगय (दुर्लक्ष)

 प्रमादं च आलस्यं च निद्रा च

निबध्नाति बद्ध करतो नि +बन्ध् धातू लट लकार प्र.पु.ए.व

तम म्हणजे अंधार. तमोगुण याचा अर्थ अज्ञानामुळे निर्माण झालेला अंधकार.

क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याच्ञा दम्भ: क्लम: कलि: ।

शोकमोहौ विषादार्ती निद्राशा भीरनुद्यम: ॥श्रीमद्भागवतम् 11.25.4 ॥

असह्य क्रोध, कंजूसपणा , निराधार टीका , कमालीची घृणा, परावलंबित्व , दिखाऊपणा , निरूत्साह , कलह, शोक, मोह, दुख, उदासी, अत्यधिक निद्रा, खोटी आशा, भय आलस ही सर्व तमोगुणाची लक्षण आहेत.

दासबोधातील 2रे दशक 6व्या समासातील 41 श्लोकांमधे तमोगुणाचे वर्णन केले आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की

हे भारत! परन्तु सर्व देह धारण करणार्‍या जीवांना अज्ञानामुळे मोहात पडणार्‍या तमोगुणाला तू समजून घे. हलगर्जीपणा, आळस आणि अती निद्रा ह्यातच सर्व जीव जखडून गेलेले असतात.

सत्त्वं सुखे सञ्जयति रजः कर्मणि भारत। ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सञ्जयत्युत।।14.9।।

हे भारत! सत्त्वम्‌ सुखे सञ्जयति, रजः कर्मणि, तमः तु ज्ञानम्‌ आवृत्य प्रमादे उत सञ्जयति।

हे भारत!

सत्त्वम्‌ सत्त्व नपु. प्र. ए. व.

सुखे सुख नपु. स. ए. व.

सञ्जयति, सम+जि धातू उत्कर्ष होणे, जिंकणे लट लकार प्र.पु.ए.व

रजः रजस् नपु. प्र. ए. व.

कर्मणि, कर्मन् नपु. स. ए. व.

तमः तमस् नपु. प्र. ए. व.

तु अव्यय

ज्ञानम्‌ ज्ञान नपु. द्वि. ए. व.

आवृत्य वृ धातू आच्छादन करणे ल्यप प्रत्यय

प्रमादे प्रमाद पु. स. ए. व.

उत अव्यय

सञ्जयति सम+जि धातू लट लकार प्र.पु.ए.व.

6व्या श्लोकात सत्त्व गुण ज्ञान आणि सुखाने बद्ध असतात असे म्हटले आहे. आता ह्या श्लोकात सत्त्व गुणाने सुखाची वृद्धि होते असे म्हटले आहे म्हणजेच ज्ञान प्राप्त झाले की सुख मिळते असे म्हटले आहे. रजोगुणी व्यक्तीला निरनिराळी कर्मे करावीशी वाटतात. तमोगुणी व्यक्तीच्या ज्ञानावर मात्र पडदा पडलेला असल्याने त्याच्याकडून प्रमाद घडतात.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे भारत! सत्त्व गुणाने संसारीक सुखांचा उत्कर्ष होतो. रजोगुणांमुळे सकाम कर्मांची वृद्धि होते तर तमोगुणांमुळे ज्ञान झाकोळून गेल्यामुळे भ्रमिष्ट वृत्ती निर्माण होते.

रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत। रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा।।14.10।।

हे भारत ! रजः तमः च अभिभूय सत्त्वम्‌ भवति। रजः, सत्त्वम्‌ तमः। तथा एव तमः, सत्त्वम्‌ रजः च ।

हे भारत !

रजः रजस् नपु. द्वि. ए. व.

तमः तमस् नपु. द्वि. ए. व.

अभिभूय अभि+भू धातू होणे

अभि +भू धातू जिंकणे ल्यप प्रत्यय

सत्त्वम्‌ सत्त्व नपु. प्र . ए. व.

भवति होतो भू धातू लट लकार प्र.पु.ए.व

रजः रजस् नपु. प्र . ए. व.

सत्त्वम्‌ सत्त्व नपु द्वि . ए. व.

तमः तमस् नपु. द्वि. ए. व.

तथा याप्रमाणे

एव त्या प्रमाणे

तमः तमस् नपु. प्र . ए. व.

सत्त्वम्‌ सत्त्व नपु. द्वि. ए. व.

रजः रजस् नपु द्वि. ए. व.

च सुद्धा

ह्या श्लोकात बराच गर्भित अर्थ दडलेला आहे असे वाटते जर ह्याचा अर्थ आपण आजच्या पिढीत लोकांवर होत असलेले संस्कार आणि सध्याच्या काळात होत असणारी धर्मावरील टीका, आणि जातीयवाद ह्यांच्या अनुशंगाने लावता येईल. गीतेमध्येच सांगितल्याप्रमाणे श्रीभगवानकृष्णांनी वर्ण व्यवस्था निर्माण केली. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे काम करण्याची सर्वांना मुभा दिली होती. कालांतराने पिढीजात व्यवसायाची कल्पना रुजली गेली आणि जातीयवादाची सुरवात झाली. व्यक्तीव्यक्तींमधे श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव निर्माण झाला. ह्या सर्व पेचांवर समर्पक उत्तर देणारा हा श्लोक.

प्रत्येक व्यक्ति मधे कमीअधिक प्रमाणात सर्वच गुण आणि दोष दडलेले असतात. एखाद्या प्रसंगी एखादा माणूस कसा व्यक्त होईल त्याप्रमाणे आपण त्याच्या स्वभावाचे वर्णन करतो.

ज्ञानी माणसाला पुस्तक पाहून आनंद वाटेल तर एखाद्या उनाड मुलास पुस्तक वाचावयास सांगितले तर राग येईल. तेच पूर्ण अडाणी माणसास पुस्तक पाहून संभ्रम निर्माण होईल. अशा व्यक्ती सापेक्ष रूपाचे वर्णन सांख्यकारीकेत वाचायला मिळते.

 प्रीत्यप्रीतिविषादात्मका: प्रकाशप्रवृत्तिनियमार्था: । अन्योन्याभिभवाश्रयजननमिथुनवृत्तयश्च गुणा: ॥ (सांख्यकारिका १२)

प्रीती (सत्त्व गुण), अप्रीती (रजोगुण), विषाद (तमोगुण)

प्रकाश (सत्त्व गुण), प्रवृत्ति (रजोगुण), नियमन म्हणजे आवरण (तमोगुण) असे तीन गुणांचे वर्णन केले आहे.

आपण आपल्या इन्द्रियांव्दारे ज्ञान ग्रहण करतो. आपल्या डोळ्यांनी आपण रस्ता बघतो (सत्त्व गुण),आणि त्यावरून चालायला लागतो (रजोगुण), चालून चालून दमल्यामुळे आपण झोपी जातो. निद्रावस्थेत आपण कोणतेही ज्ञान ग्रहण करू शकत नाही. (तमोगुण) कोणतीही कृती करू शकत नाही. म्हणजेच अन्योन्य अभिभव. एका गुणाच्या प्रभावामुळे इतर गुण प्रभावहीन ठरतात. अन्योन्याभिभवाश्रयजननमिथुनवृत्तयश्च गुणा: ॥

पण हे गुण एकमेकांना सहाय्य (आश्रय) करतात. जसे अती श्रम केल्यानंतर निद्रा आवश्यकच. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी हाताने घास उचलून तोंडात घालणे आवश्यकच.

एक गुण आपोआपच दुसर्‍या गुणाला वाट मोकळी करून देतो (जनन) एकाच गुणाचे प्राबल्य कायम राहू शकत नाही. म्हणूनच हे तीन गुण एकत्रित राहतात (मिथुन)

असे सर्व जरी असले तरी आपल्या वरच्या संस्कारांमुळे आणि आपल्या मधे असलेल्या शिस्तीमुळे कोणता गुण किती वेळ आपल्या मध्ये राहू द्यायचा हे आपणच ठरवत असतो.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे भारत! सत्त्वगुण, रज आणि तम गुणांना जिंकून प्रबळ होतो, तर कधी रजोगुण, सत्त्व आणि तम गुणांच्या वरचढ ठरतो तर कधी तमोगुण, सत्त्व आणि रजोगुणापेक्षा प्रभावी असतो.

सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्प्रकाश उपजायते। ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत।।14.11।।

यदा अस्मिन्‌ देहे सर्व-द्वारेषु प्रकाशः उत ज्ञानम्‌ उपजायते, तदा सत्त्वम्‌ विवृद्धम्‌ इति विद्यात्‌।

यदा जेव्हा अव्यय

अस्मिन्‌ ह्या अस्मद् सर्व. स. ए. व.

देहे देहात देह पु. स. ए. व.

सर्व-द्वारेषु सर्व दारातून सर्वाणि द्वाराणि स. ब. व.

प्रकाशः प्रकाश पु. प्र. ए. व.

उत अव्यय

ज्ञानम्‌ ज्ञान नपु. प्र. ए. व.

उपजायते, उत्पन्न होते उप+जन् धातू उत्पन्न करणे लट लकार प्र.पु.ए.व

तदा तेव्हा अव्यय

सत्त्वम्‌ सत्त्व नपु. द्वि. ए. व.

विवृद्धम्‌ वृद्धिंगत होते वि+वृध् धातू वृद्धि होणे क्त प्रत्यय द्वि. ए. व.

इति अव्यय

विद्यात्‌ जाण विद् धातू माहीत करुन घेणे विधिलिडः लकार प्र.पु.ए.व.

आता पुढील तीन श्लोकात तीन गुणांची लक्षणे कशी समजून घ्यायची ह्याचे वर्णन केले आहे. सत्त्वगुणी व्यक्ति सुख आणि ज्ञानाच्या वृत्तीने बद्ध आहेत असे 6व्या श्लोकात वाचले. ज्ञान प्राप्त झाले की सुखाची वृद्धि होते असे 9व्या श्लोकात सांगितले आहे. आपली 5 ज्ञानेन्द्रिये, डोळे, कान नाक जीभ आणि त्वचा. त्वचेच्या साह्याने वेदना, तापमान आणि स्पर्शज्ञान होते तर इतर इन्द्रियांव्दारे रंग आकार ध्वनी वास आणि चव ह्यांचे आकलन होते. ज्ञानप्राप्ती चा सर्वात मोठा फायदा म्हणजे चूक आणि बरोबर ह्यामधील भेद समजून घेणे शक्य होते. चांगले आणि वाईट ह्यामधे फरक करता येतो. ह्याचा अर्थातच आपल्या मनातील विचारांवर परीणाम होऊन एक चांगले व्यक्तीमत्व तयार होते. दासबोधातील 2र्या दशकातील 7व्या समासात सत्त्वगुण लक्षणांचे वर्णन केले आहे. सात्विक माणसाच्या अंगीं आढळणारे गुण त्याला संसार सागरातून तरून जाण्यास उपयुक्त ठरतात.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जेव्हा ह्या देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशमय होतात तेव्हा सत्त्व गुणांच्या अस्तित्वाचा अनुभव येऊ शकतो.

लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा। रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ।।14.12।।

हे भरतर्षभ! रजसि विवृद्धे लोभः, प्रवृत्तिः, कर्मणाम्‌ आरम्भः, अशमः, स्पृहा एतानि जायन्ते।

हे भरतर्षभ!

रजसि रजस् नपु. स. ए. व.

विवृद्धे वृद्धिंगत वि+वृध् धातू वृद्धि होणे क्त प्रत्यय नपु. स. ए. व.

लोभः, लोभ पु. प्र. ए. व.

प्रवृत्तिः, प्रवृत्ति स्त्री. प्र. ए. व.

कर्मणाम्‌ कर्मांमधे कर्मन् नपु. ष. ब. व.

आरम्भः, आरम्भ पु. प्र. ए. व.

अशमः, अनियंत्रित अशम पु. प्र. ए. व.

न शमः शम् धातू शमन करणे

स्पृहा इच्छा स्पृहा स्त्री प्र. ए. व.

एतानि हे सर्व एतद् नपु. प्र. ब. व.

जायन्ते उत्पन्न होतात जन् धातू उत्पन्न करणे लट लकार प्र. पु. ब. व.

ह्या श्लोकात रजोगुणाचा जरूरी पेक्षा जास्त प्रभाव असेल तर काय दिसू शकते ह्याचे वर्णन केले आहे. गरज आणि लालसा ह्यामधे खूपच पुसटशी रेषा दिसून येते. त्यामधील फरक ज्याचा त्यानेच समजून घ्यावा. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या प्राथमिक गरजा, पण त्याचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याची सुरुवात कधी होते तेच आपल्याला समजत नाही. व्यापारवृदधि किंवा शेतीचा विकास ह्याला लालसा म्हणता येईल का? आपले शरीर हेच एक दोषरहित परीपूर्ण असे यंत्र आहे ज्याच्या द्वारे अनेक कामे करता येतात. असे असले तरी यंत्रांचा वापर अनिवार्य असतो. यंत्राचा वापर किती प्रमाणात करायचा ते आपल्यालाच ठरवावे लागते. एखाद्याने किती पैसे कमवायचे हे निश्चितपणे सांगता येत नाही पण त्यामागील हेतू महत्त्वाचा. निष्काम कर्म हा तर गीतेचा गाभा.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की

हे भरतर्षभ! जेव्हा रजोगुणाचे प्राबल्य असते त्यावेळी लालसा, अधिकाधिक सुखासाठी धडपड, असमाधानी वृत्ती आणि महत्वाकांक्षा अशी लक्षणे दिसून येतात.

अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च। तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन।।14.13।।

हे कुरु-नन्दन ! तमसि विवृद्धे च अप्रकाशः, अप्रवृत्तिः, प्रमादः, मोहः च एतानि एव जायन्ते।

हे कुरु-नन्दन ! करुन नन्दयति सं. ए. व.

तमसि तमस् नपु. स. ए. व.

विवृद्धे वृद्धिंगत होते वि+वृध् धातू वृद्धि होणे क्त प्रत्यय नपु. स. ए. व.

च सुद्धा

अप्रकाशः अंधकार न प्रकाशः प्र. ए. व.

अप्रवृत्तिः, निष्क्रियता न प्रवृति प्र. ए. व.

प्रमादः, प्रमाद पु. प्र ए. व.

मोहः मोह पु. प्र. ए. व.

च अव्यय

एतानि ही एतद् नपु. प्र. ब. व.

एव अव्यय

जायन्ते प्रकट होतात जन् धातू उत्पन्न करणे लट लकार प्र.पु.ब.व.

11व्या श्लोकात आपण ज्ञान प्राप्त करून देणारी 5 ज्ञानेन्द्रिये आणि त्यांचे कार्य बघितले. आता त्याची नेमकी उलट परिस्थिती तमोगुणात दिसून येते. अंधकार म्हणजे घोर अज्ञान. रंग वास चव आकार स्पर्श श्रवण ह्या सर्वच बाबतीत अज्ञान असेल तर किती भीषण परिस्थिती असेल. निद्रावस्थेत आपली ज्ञानेन्द्रिये काम करू शकत नाहीत. ह्याचाच अर्थ 24 तासातील किती तास झोपण्यात घालवायचे हे ठरवायला हवे. तसे आता ते माहित झाले आहे. सध्याच्या काळात ज्ञान मिळवण्याच्या साधनांचा योग्य वापर होतो आहे की नाही हे ठरवायला हवे. जसे मोबाईल आणि आंतरजालाचा योग्य वापर. निद्रावस्थे प्रमाणे मादक पदार्थांच्या अंमलाखाली आपली ज्ञानेन्द्रिये काम करू शकत नाहीत. ह्या सर्वांच्या संभाव्य परिणामांचे वर्णन म्हणजे हा श्लोक. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे की

हे कुरु-नन्दन! तमोगुणाची वृद्धि झाली की अज्ञान, कार्यशून्यता, हलगर्जीपणा अविवेक असे गुण उत्पन्न होतात.

यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्। तदोत्तमविदां लोकानमलान्प्रतिपद्यते।।14.14।।

सत्त्वे प्रवृद्धे यदा देह-भृत्‌ प्रलयम्‌ याति तदा तु उत्तम-विदाम्‌ अमलान्‌ लोकान्‌ प्रतिपद्यते।

रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते। तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते।।14.15।।

रजसि प्रलयम्‌ गत्वा कर्म-सङ्गिषु जायते। तथा तमसि प्रलीनः मूढ-योनिषु जायते।

सत्त्वे सत्त्व नपु. स. ए. व.

प्रवृद्धे प्र +वृध् धातू वृद्धि होणे क्त प्रत्यय नपु. स. ए. व.

यदा जेव्हा अव्यय

देह-भृत्‌ देहधारी देहभृत्‌ पु. प्र. ए. व.

भृ धातू धारण करणे, भरण पोषण करणे क्त प्रत्यय.

प्रलयम्‌ प्रलय पु. द्वि. ए. व.

याति जातो या धातू लट लकार प्र.पु.ए.व

तदा तेव्हा अव्यय

तु परन्तु अव्यय

उत्तम-विदाम्‌ उत्तमं वेत्ति ष. ब. व. विद् धातू विद्यमान होणे

अमलान्‌ पवित्र अमल वि. पु. द्वि. ब. व.

लोकान्‌ लोक पु. द्वि. ब. व.

प्रतिपद्यते प्राप्त होतो प्रति +पद् धातू जाणे लट लकार प्र.पु.ए.व.

रजसि रजस् नपु. स. ए. व.

प्रलयम्‌ प्रलय पु. द्वि. ए. व.

गत्वा जात असता गम धातू जाणे क्त्वा प्रत्यय

कर्म-सङ्गिषु कर्मा शी संलग्न अशा कर्मसङ्गिन् पु. स. ब. व.

कर्मणः सड्गः कर्मसंगः करोति

जायते जन्म घेतात जन धातू लट लकार प्र.पु.ए.व.

तथा अव्यय

तमसि

प्रलीनः प्रलयकाळी प्र +ली धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

मूढ-योनिषु दुय्यम योनी मूढानां योनिः स. ब. व.

जायते जन्म घेतात जन धातू लट लकार प्र.पु.ए.व.

हिंदू धर्मातील समजुतीनुसार एकूण 14 लोक आहेत. त्यांचे वर्गीकरण सूर्य, चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर आणि इतर ग्रहांची स्थाने ह्यावरून केले आहे. पृथ्वी पासून सुरवात केल्यास भूर्लोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक आणि ब्रह्मलोक वरच्या दिशेने तर अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल खालच्या दिशेने. ह्या श्लोकात उत्तम-विदाम् असा शब्द वापरला आहे. म्हणजे उत्तम, थोर व्यक्तींचा वास असलेले ठिकाण. त्याच बरोबर अमलान् असा शब्द वापरला आहे. मलीन नसलेले म्हणजे शुद्ध आणि पवित्र ठिकाण. भगवद्गीता एक तत्वज्ञान म्हणून अतिशय उच्च ग्रंथ आहेच. असे ग्रंथ आपोआपच न्यायसंस्था म्हणून सुद्धा भूमिका बजावत असतात. स्वर्गलोक आणि पाताळ ही अशीच एक कल्पना. वागणूक चांगली असेल तर स्वर्गप्राप्ती नाहीतर पाताळात रवानगी. लोकांनी आपले आचरण शुद्ध ठेवावे हीच त्यामागची भूमिका.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जर मरण समयी सत्वगुणाचे प्राबल्य असेल तर अशा देहधारी जीवांना उत्तम कर्म करणार्‍या (महर्षी) पवित्र अशा लोकाची प्राप्ती होते.

रजोगुणाचे प्राबल्य असेल तर कर्मांमधे आसक्ती असणाऱ्या व्यक्तींमध्ये जन्म घेतो आणि तमोगुणाचे प्राबल्य असेल तर कनिष्ठ /पशु योनी मधे जन्म घेतो.

कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम्। रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम्।।14.16।।

सुकृतस्य कर्मणः तु फलम्‌ सात्त्विकम्‌ निर्मलम्‌ आहुः। रजसः फलम्‌ दुःखम्‌, तमसः फलम्‌ अज्ञानम्‌ ।

सुकृतस्य पुण्ण्य सुकृत नपु. ष. ए. व.

कर्मणः कर्माचे कर्मन् नपु. ष. ए. व.

तु परन्तु अव्यय

फलम्‌ फल नपु. द्वि. ए. व.

सात्त्विकम्‌ सात्विक नपु. द्वि. ए. व.

निर्मलम्‌ निर्मल नपु. द्वि. ए. व.

आहुः म्हटले आहे ब्रू धातू बोलणे लट लकार प्र.पु.ब.व.

रजसः रजस् नपु. ष. ए. व.

फलम्‌ फल नपु. द्वि. ए. व.

दुःखम्‌, दुःख नपु. द्वि. ए. व.

तमसः तमस् नपु. ष. ए. व.

फलम्‌ फल नपु द्वि. ए. व.

अज्ञानम्‌ अज्ञान नपु. द्वि. ए. व.

असे म्हटले जाते की सत्त्व गुणांच्या पुण्ण्य कर्मांचे फळ निर्मळ, शुद्ध असते परन्तु रजोगुणामधे केलेल्या कर्माचे फळ दुःख देते तर तमोगुणांचे फळ अज्ञान आहे.

सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं रजसो लोभ एव च। प्रमादमोहौ तमसो भवतोऽज्ञानमेव च।।14.17।।

सत्त्वात्‌ ज्ञानम्‌ सञ्जायते, रजसः च लोभः एव, तमसः प्रमाद-मोहौ भवतः, अज्ञानम्‌ एव च ।

सत्त्वात्‌ सत्त्व गुणांपासून सत्त्व नपु. पं. ए. व.

ज्ञानम्‌ ज्ञान नपु प्र. ए. व.

सञ्जायते, उत्पन्न होते स+जन धातू लट लकार प्र.पु.ए.व.

रजसः रजोगुणापासून रजस् नपु. पं. ए. व.

लोभः लोभ पु. प्र. ए. व.

एव, आणि

तमसः तमोगुणापासून तमस् नपु. पं. ए. व.

प्रमाद-मोहौ प्रमादः च मोहः च प्र. द्वि. व.

भवतः,उत्पन्न होतो भू धातू लट लकार प्र.पु.द्वि.व.

अज्ञानम्‌ अज्ञान नपु. प्र. ए. व.

एव

 च सुद्धा

ह्या श्लोकात आतापर्यंत आपण वाचलेल्या तीन गुणांच्या वैशिष्ट्यांची उजळणी केली आहे.

श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की सत्त्वगुणांपासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ आणि तमोगुणापासून अज्ञान, प्रमाद आणि भ्रम उत्पन्न होतो.

ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः।जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः।।14.18।।

सत्त्वस्थाः ऊर्ध्वम्‌ गच्छन्ति, राजसाः मध्ये तिष्ठन्ति, जघन्य-गुण-वृत्तिस्थाः तामसाः अधः गच्छन्ति।

सत्त्वस्थाः सत्त्वस्था प्र ब. व. सत्त्वे तिष्ठति

ऊर्ध्वम्‌ अव्यय

गच्छन्ति, गम् धातू लट लकार प्र.पु.ब.व.

राजसाः राजस पु. प्र. ब. व.

मध्ये अव्यय

तिष्ठन्ति, स्था धातू लट लकार प्र.पु.ब.व.

जघन्य-गुण-वृत्तिस्थाः जघन्यगुणवृत्तिस्था प्र. ब. व.

जघन्य अती निंदनीय

जघन+यत् प्रत्यय, हन् धातू मारणे

तामसाः तामस पु. प्र. ब. व.

अधः अव्यय

गच्छन्ति गम् धातू लट लकार प्र.पु.ब.व.

वेदिक काळात न्यायसंस्था कशाप्रकारे अस्तित्वात होती ह्या संबंधी फारशी माहिती नाही. धर्मग्रंथांचा उपयोग लोकांनी कसे वागावे, चांगले आणि वाईट ह्यामधील फरक कसा ओळखावा ह्यासाठी होतोच. धर्मग्रंथ साधारणपणे जन्म-मृत्यू, पाप-पुण्य, पुनर्जन्म ह्यावर भाष्य करताना दिसतात. सर्वांनाच मोक्ष मिळवणे शक्य नाही आणि तसे अपेक्षित सुद्धा नाही, कारण ही जगरहाटी चालूच राहीली पाहिजे आणि त्यात शांतता सुव्यवस्था सुद्धा प्रस्थापित झाली पाहिजे. लोकांनी चांगले वागावे ह्यासाठी काही अमिष दाखवणे पण आवश्यक आहेच. असेच काहीसे ह्या श्लोकात सांगितले आहे असे वाटते. कारण प्रत्येक गुणवैशिष्ट्ये असणार्‍या कर्मांची फळे काय असतात ते ह्या श्लोकात सांगितले आहे.

सत्त्वे प्रलीनाः स्वर्यान्ति नरलोकं रजोलयाः। तमोलयास्तु निरयं यान्ति मामेव निर्गुणाः।।

(श्रीमद्भागवतम्-11.25.22)

जे लोक सत्त्व गुणयुक्त असताना प्राण सोडतात ते स्वर्गलोकात जातात. रजोगुणातील व्यक्ती मनुष्यलोकांतच राहतात आणि तमोगुणातील व्यक्ती नरक लोकात जातात आणि जे निर्गुण असतात ते माझ्या कडे येतात.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

सत्त्वगुणात स्थित असलेली माणसे वरच्या लोकांत रजोगुणात स्थित असलेली माणसे मनुष्यलोकांत आणि तमोगुणात स्थित असलेली माणसे अधोगतीला जातात.

नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति। गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति।।14.19।।

यदा द्रष्टा गुणेभ्यः न अन्यम्‌ कर्तारम्‌ अनुपश्यति, गुणेभ्यः परम्‌ वेत्ति च, सः मत्‌-भावम्‌ अधिगच्छति।

यदा जेव्हा

द्रष्टा द्रष्टृ पु. प्र. ए. व.

न गुणेभ्यः गुणांशिवाय गुण पु. पं. ब. व.

अन्यम्‌ अन्य पु. द्वि. ए. व.

कर्तारम्‌ कर्ता कर्तृ पु. द्वि. ए. व.

अनुपश्यति, योग्य रीतीने पाहतो अनु +दृश् धातू लट लकार प्र.पु.ए.व.

गुणेभ्यः गुणांपासून गुण पु. पं. ब. व.

परम्‌ श्रेष्ठ पर पु. द्वि. ए. व.

वेत्ति जाणतो विद् धातू माहीत करुन घेणे लट लकार प्र.पु.ए.व.

च,

सः तो तद् पु. प्र. ए. व.

मत्‌-भावम्‌ माझ्या स्वभावाला मम भावः द्वि. ए. व.

अधिगच्छति प्राप्त होतो अधि+गम् धातू जाणे लट लकार प्र.पु.ए.व.

आतापर्यंत आपण त्रिगुणांची वैशिष्ट्ये जाणून घेतली. त्यापैकी सत्त्वगुण हा सर्वश्रेष्ठ गुण, हे सुद्धा समजून घेतले. आत्मिक उन्नति च्या प्रवासात आपल्याला इथेच थांबून चालणार नाही. ह्या त्रिगुणांच्या पलिकडची स्थिति प्राप्त करायची आहे. त्रिगुणातीत व्हायचे आहे. प्रकृति पासून निर्माण झालेले हे गुण कमी जास्त प्रमाणात व्यक्तींमध्ये दिसून ती त्यांच्या कर्मांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. ज्ञानी माणसाला प्रकृति आणि त्रिगुण ह्याची जाणीव होते, हे त्रिगुणच विविध कर्मांचे उगम स्थान आहे हे सुद्धा समजते. ज्ञानी माणसाचे लक्ष्य मात्र ह्या सर्व गोष्टींच्या पलिकडे जाण्याचे असते.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

जेव्हा द्रष्ट्या पुरूषाला त्रिगुण हाच कर्ता असे समजते आणि त्याच्या पलीकडचे श्रेष्ठत्व त्याने जाणलेले असते तेव्हा त्याने परमात्म्याला प्राप्त केलेले असते.

गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान्।जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते।।14.20।।

देही देह-समुद्भवान्‌ एतान्‌ त्रीन्‌ गुणान्‌ अतीत्य, जन्म-मृत्यु-जरा-दुःखैः विमुक्तः अमृतम्‌ अश्नुते।

देही देहधारी देहिन् पु. प्र. ए. व.

देह-समुद्भवान्‌ शरीरात उत्पन्न झालेले

देहात समुद्भवः यस्य सः

एतान्‌ सर्व एतद् पु. द्वि. ब. व.

त्रीन्‌ तीन त्रि द्वि. ब. व.

गुणान्‌ गुण पु द्वि. ब. व.

अतीत्य, पलिकडे जाऊन अति+इ धातू जाणे ल्यप प्रत्यय

अति+इ अतीक्रमण करणे

जन्म-मृत्यु-जरा-दुःखैः जन्म मृत्यू वार्धक्य आणि दुःख

जन्मः च मृत्युः च जरा च दुःखानि च

विमुक्तः मुक्त होऊन वि+मुच् धातू मुक्त करणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

अमृतम्‌ अमृत नपु. द्वि. ए. व.

अश्नुते भोगतो अश् धातू जमा करणे लट लकार प्र.पु.ए.व.

आतापर्यंतच्या श्लोकांत समजून घेतल्याप्रमाणे जीवात्म्याने शरीर धारण केले की त्याच्या मधे त्रिगुणांचा कमीजास्त प्रमाणात प्रभाव आहेच. मात्र आपले अंतिम लक्ष्य ह्या त्रिगुणांच्या पलिकडे जाण्याचे असायला हवे जे ज्याला समजले तो खरा ज्ञानी. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे मार्ग सुद्धा सांगितले जसे भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानयोग. पतंजली ऋषींनी योगसूत्रांच्या माध्यमातून हेच सांगितले. गौतम बुद्धांनी सुद्धा सर्व दुःखांपासून मुक्ती असा विचार मांडला.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

हे देहधारी पुरूष देहात उत्पन्न झालेल्या त्रिगुणांच्या पलिकडे जाऊन जन्म मृत्यू वार्धक्य आणि दुःख ह्यापासून मुक्त होऊन अमरत्व प्राप्त करतात.

अर्जुन उवाच

कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतानतीतो भवति प्रभो। किमाचारः कथं चैतांस्त्रीन्गुणानतिवर्तते।।14.21।।

अर्जुन उवाच - हे प्रभो ! कैः लिङ्गैः एतान्‌ त्रीन्‌ गुणान्‌ अतीतः भवति? किमाचारः कथम्‌ च एतान्‌ त्रीन्‌ गुणान्‌ अतिवर्तते ?

अर्जुन

उवाच म्हणाला ब्रू धातू बोलणे लिट लकार प्र.पु.ए.व.

हे प्रभो !

कैः कोणती किम् नपु. तृ. ब. व.

लिङ्गैः लक्षणे लिङ्गै नपु. तृ. ब. व.

एतान्‌ ही एतद् पु द्वि. ब. वह

त्रीन्‌ तीन त्रि पु. द्वि. ब. व.

गुणान्‌ गुण गुण पु द्वि. ब. व.

अतीतः श्रेष्ठत्व मिळते अति+इ धातू जाणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

भवति आहे भू धातू होणे लट लकार प्र.पु.ए.व.

किमाचारः कसे आचरण किम +आचारः आचार पु. प्र. ए. व.

कथम्‌ च कसे सुद्धा अव्यय

एतान्‌ एतद् पु. द्वि. ब. व.

त्रीन्‌ त्रि पु. द्वि. ब. व.

गुणान्‌ गुण पु. द्वि.ब.व.

अतिवर्तते पलिकडे जातात अति+वृत् धातू प्रवृत्त करणे लट लकार प्र.पु.ए.व.

अति+वृत् अतीक्रमण करणे

लिङ्ग शब्दाचा अर्थ प्रतिक किंवा चिन्ह. लिङ्ग धातू चा अर्थ जाणे. (आलिंगन) शिवलिंग म्हणजे शिवाचे प्रतिक. ह्या श्लोकात अर्जुनाने अतिशय महत्त्वाचे प्रश्न श्रीभगवानकृष्णांना विचारले आहेत. अगदी आजच्या काळातही हे प्रश्न लागू होतात. भगवे वस्त्र परिधान केलेले कितीतरी जण असतात पण त्यातील खरे योगी ओळखायचे कसे? सध्याच्या काळात काही जण त्यांच्या संप्रदायाच्या नावाने ओळखले जातात. जसे नाथ पंथीय. काही जण ते बाळगत असलेल्या शस्त्रांमुळे ओळखले जातात जसे त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे चिमटा, त्रिशूल सारखी शस्त्रे बाळगण्याची परवानगी असते. शीख धर्मीयांकडे तलवार, कृपाण असते. काही जण त्यांच्या नावापुढे पदवी लावतात जसे परमहंस, जगद्गुरू वगैरे. आधीच्या श्लोकात आत्मिक उन्नति च्या मार्गाने जात असताना त्रिगुणातीत व्हायचे आहे असे आपण वाचले.

ह्या श्लोकात अर्जुन श्रीभगवानकृष्णांना असे प्रश्न विचारत आहे की हे प्रभो! हे जे तीन गुणांच्या पलिकडे गेलेले असतात त्यांची लक्षणे काय असतात? त्यांचे आचरण कसे असते? आणि ते त्रिगुणातीत होतात तरी कसे?

श्री भगवानुवाच

प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहमेव च पाण्डव। न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति।।14.22।।

श्रीभगवानुवाच - हे पाण्डव ! प्रकाशम्‌ च प्रवृत्तिम्‌ मोहम्‌ एव च सम्प्रवृत्तानि न द्वेष्टि न च, निवृत्तानि काङ्क्षति।

श्रीभगवान

उवाच ब्रू धातू बोलणे लिट लकार प्र.पु.ए.व

हे पाण्डव पाण्डोः अपत्यं पुमान्

प्रकाशम्‌ प्रकाश पु. द्वि. ए. व.

काश् धातू चमकणे

च अव्यय

प्रवृत्तिम्‌ आसक्ती प्रवृत्ति स्त्री. द्वि. ए. व.

मोहम्‌ मोह पु. द्वि. ए. व.

एव च अव्यय

सम्प्रवृत्तानि विकसित झाले तरी सं +प्र+वृत् धातू प्रवृत्त होणे

सम्प्रवृत्त क्त प्रत्यय नपु. प्र. ब. व.

न द्वेष्टि द्विष् धातू द्वेष करणे लट लकार प्र.पु.ए.व

न च, अव्यय

निवृत्तानि अप्रकट होणे नि+वृत् धातू प्रवृत्त होणे क्त प्रत्यय नपु प्र. ब. व.

काङ्क्षति इच्छा करतो काङ्क्ष् धातू इच्छा करणे लट लकार प्र.पु.ए.व.

आता इथून पुढील चार श्लोकात अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची श्रीभगवानकृष्ण उत्तरे देत आहेत.

प्रकाश म्हणजे ज्ञान. अंधकारापासून मुक्ती. जे सत्त्वगुणाचे लक्षण आहे. रजोगुणामधे क्रियाशीलता दिसून येते. त्याच बरोबर लालसा आणि असमाधान. तमोगुणामधे अज्ञान कार्यशून्यता आणि हलगर्जीपणा. ह्या सर्वांच्या पलिकडे जायचे आहे. पतंजली ऋषींनी हे एका शब्दात सांगून टाकले आहे 'योगश्चितवृत्तिर्निरोध'.

अशाच अर्थाचा श्लोक,

सात्त्विक: कारकोऽसङ्गी रागान्धो राजस: स्मृत: ।तामस: स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रय: ॥ श्रीमद्भागवतम् 11.25. 26॥

आसक्तिरहित कर्ता सात्विक असतो. स्वार्थापायी अंधत्व आलेला रजोगुणी तर अज्ञानामुळे चांगल्या वाईटातील फरक न समजणारा तमोगुणी. परन्तु जो मला शरण आलेला असतो तो ह्या प्राकृतिक गुणांच्या पलिकडे गेलेला असे म्हणतात.

हा श्लोक वाचल्यानंतर पुन्हा एकदा भक्तीयोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यास योग वाचून नवीन अर्थ शोधता येईल.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

श्री भगवान् म्हणाले, हे पाण्डुपुत्र अर्जुन !प्रकाश प्रवृत्ती आणि मोह ह्यांचा प्रादुर्भाव असला तरी गुणातीत व्यक्ती त्याचा तिरस्कार करत नाही आणि हे सर्व लोप पावले तर त्याची इच्छा धरत नाही.

उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते। गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते।।14.23।।

यः उदासीनवत्‌ आसीनः गुणैः न विचाल्यते, यः गुणाः एव वर्तन्ते इति अवतिष्ठति, न इङ्गते।

यः जो यद् पु. प्र. ए. व.

उदासीनवत्‌ निरपेक्षत्व उदासीन+मतुप प्रत्यय

आसीनः स्थित आस् धातू शानच प्रत्यय प्र. ए. व.

गुणैः गुणांमुळे गुण पु. तृ. ब. व.

विचाल्यते विचलित होणे वि+चल धातू णिच लट लकार प्र.पु.ए.व.

यः जो यद् पु. प्र. ए. व.

गुणाः गुण पु. प्र. ब. व.

एव अव्यय

वर्तन्ते कार्यान्वित असतात वृत धातू लट लकार प्र.पु.ब.व.

इति अव्यय

अवतिष्ठति स्थित राहतात अव +स्था धातू लट लकार प्र.पु.ए.व

इङ्गते इङ्ग धातू जाणे लट लकार प्र.पु.ए.व.

उदासीन ह्या संस्कृत मधील शब्दाचा अर्थ मराठी प्रमाणे दुःखी असा नसून निरपेक्ष असा आहे. उत् आसीन. म्हणजे जे काही चालले आहे त्यापासून लांब असणे. ना खंत ना खेद.

हा श्लोक वाचताना अथर्व ह्या शब्दाची आठवण येते. थर्व धातू म्हणजे हलणे, विचलित होणे. अथर्व म्हणजे स्थिर,निश्चल.

अपरिवर्तनीय, निश्चल अशा परमात्म्याचे ज्ञान देणारा अथर्ववेद. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला गुणातीत व्यक्तीचे लक्षण सांगताना असे म्हणतात की

जो निरपेक्ष राहून, गुणांमुळे विचलित होत नाही. प्रकृतीमध्ये सर्व गुण सक्रिय असतातच हे माहीत असूनही त्याच्या बरोबर वहावत जात नाही.

समदुःखसुखः स्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः।तुल्यप्रियाप्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः।।14.24।।

स्वस्थः, सम-दुःख-सुखः, सम-लोष्ट-अश्म-काञ्चनः, धीरः, तुल्य-प्रिय-अप्रियः, तुल्य-निन्दा-आत्म-संस्तुतिः।

स्वस्थः, आत्मस्थित स्वे तिष्ठति

सम-दुःख-सुखः, दुःखं च सुखं च समं अस्ति यस्य सः

 सम-लोष्ट-अश्म-काञ्चनः, माती दगड सोने

लोष्टः च अश्मा च काञ्चनं च समं अस्ति यस्य सः

धीरः, धीर पु. प्र. ए. व.

तुल्य-प्रिय-अप्रियः, प्रियं च अप्रियं च तुल्ये अस्ति यस्य सः

तुल्यप्रियाप्रियः प्र. ए. व. तुल्य-निन्दा-आत्म-संस्तुतिः निंदा आणि स्वतः ची स्तुती

निन्दा च आत्मसंस्तुतिः च तुल्या अस्ति

समतोल आणि सम-दृष्टी म्हणजे काय ह्याचे यथार्थ वर्णन ह्या श्लोकात केले आहे.

12 व्या अध्यायातील 18, 19 व्या श्लोकात प्रिय भक्ताचे गुण सांगताना अशाच स्थिर बुद्धि आणि समतोल वृत्तीचे वर्णन केले आहे. दुसर्‍या अध्यायातील 48 व्या श्लोकात समभाव योगाचे वर्णन केले आहे. त्यामध्ये सफलता आणि असफलता ह्या दोन्हीचा विचार न करता कर्तव्यपालन करावे असे सांगितले आहे. दुसर्‍या अध्यायातील 45 व्या श्लोकात त्रिगुणांचा उल्लेख करून त्यासर्वांपासून स्वतः ला मुक्त केले पाहिजे असे सांगितले आहे.

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि श्रिताः। अथ मोऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समश्नुते ।।

(कठोपनिषद्-2.3.14)

जो आपल्या मनातून स्वार्थी विचारांना उखडून टाकतो, तेव्हा तो जन्म आणि मृत्यू च्या बंधनातून मुक्त होतो आणि मग तो स्वतः च ब्रह्म होतो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण गुणातीत व्यक्तीचे लक्षण सांगताना अर्जुनाला असे म्हणतात की

आत्मस्थित व्यक्ती सुख-दुःखाला समान मानतो, मातीचे ढेकुळ, दगड आणि सोने त्याच्या दृष्टीने सारखेच. प्रिय आणि अप्रिय गोष्टींना सारखेच तोलून, धीरोदात्त पणे स्वतः बद्दल ची निंदा आणि प्रशंसा ह्या कडे पण समभाव राखतो.

मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः।सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते।।14.25।।

मान-अपमानयोः तुल्यः, मित्र-अरि-पक्षयोः तुल्यः, सर्व-आरम्भ-परित्यागी सः गुणातीतः उच्यते।

मान-अपमानयोः मानः च अपमानः च ष. द्वि. व.

तुल्यः, तुल्य पु. प्र. ए. व.

मित्र-अरि-पक्षयोः मित्र आणि शत्रू मित्रः च अरिः च पक्षौ ष. द्वि. व.

तुल्यः, तुल्य पु. प्र. ए. व.

सर्व-आरम्भ-परित्यागी (स्वतःसाठी) कार्याचा आरंभ न करणारा

सर्वाः आरम्भाः परित्यक्तुं

सः तो तद् पु. प्र. ए. व.

गुणातीतः गुणांच्या पलिकडे जाणे गुणान् अतीतः

अति+इ धातू जाणे क्त प्रत्यय

उच्यते म्हणतात ब्रू धातू बोलणे लट लकार प्र.पु.ए.व.

गुणातीत व्यक्तीचे आणखी वर्णन करताना श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

ज्याला स्वतः चा मान आणि अपमान सारखेच वाटतात. जो मित्र आणि शत्रू ह्यांच्याशी समभावाने वागतो. कोणतेही कर्म तो स्वतः च्या स्वार्थासाठी करत नाही त्याला गुणांच्या पलिकडे गेला आहे असे म्हटले जाते.

मां च योऽव्यभिचारेण भक्ितयोगेन सेवते। स गुणान्समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते।।14.26।।

यः अव्यभिचारेण भक्ति-योगेन माम्‌ सेवते, सः च एतान्‌ गुणान्‌ समतीत्य, ब्रह्म-भूयाय कल्पते।

यः जो यद् पु. प्र. ए. व.

अव्यभिचारेण एकरूप होऊन

 न व्यभिचारः तृ. ए. व.

व्यभिचार पथभ्रष्ट

वि + अभि + चर धातू चालणे + घञ् प्रत्यय

भक्ति-योगेन भक्ती द्वारे भक्त्याः योगः तृ. ए. व.

माम्‌ माझी अस्मद् सर्व. द्वि. ए. व.

सेवते, सेव धातू सेवा करणे लट लकार प्र.पु.ए.व.

सः तो तद् पु. प्र. ए. व.

च अव्यय

एतान्‌ हे सर्व एतद् पु. द्वि. ब. व.

गुणान्‌ गुण पु. द्वि.ब.व.

समतीत्य, पलिकडे जाऊन सं+अति+इ धातू जाणे प्रत्यय

ब्रह्म-भूयाय ब्रह्म सारखे ब्रहमभूय नपु. च. ए. व.

कल्पते होतो कृप धातू समर्थ होणे लट लकार प्र.पु.ए.व.

ह्या श्लोकात अव्यभिचारी आणि भक्तीयोग असे शब्द वापरले आहेत. म्हणजे भक्ती मार्गावर सरळ नाकासमोर चालणारा. ह्यामधे ज्ञानमार्ग आणि कर्मयोग अपेक्षित नाही. 12 व्या अध्यायात ज्ञान प्राप्त करून झाल्यावर भक्ती मार्गाचा अवलंब करावा असेच सांगितले आहे. म्हणजेच परमात्म्याचे रूप जाणून घेऊन, समजून उमजून भक्ती करणे अपेक्षित आहे.

नास्ति तृष्णासमं दुःखं नास्ति त्यागसमं सुखम्।

सर्वान् कामान् परित्यज्य ब्रह्माभूयाय कल्पते।।

तृष्णा असण्यासारखे दुःख नाही. त्यागासारखे सुख नाही. सर्व प्रकार च्या इच्छांचा त्याग करूनच मनुष्याला ब्रह्माभाव प्राप्त होतो.

ह्या श्लोकातील ब्रह्मभूय हा शब्द महत्त्वाचा. ब्रह्मभूय होणे असे सांगणारे इतर श्लोक.

बदरं बदरीनाथं बद्रीकां बद्रिकाश्रमम् ।

बद्रीबीजं वदन् मर्त्यो ब्रह्मभूयाय जायते ॥ 4.5.98॥ लक्ष्मीनारायण संहिता।।

केवळ बद्री ह्या शब्दाचा जप केल्याने ब्रह्मभाव प्राप्त होतो.

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम् ।विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥भगवद्गीता 18.53।।

ह्या श्लोकात सुद्धा आपल्या मधील सर्व वाईट भावनांचा त्याग करून भगवंतांना शरण जाण्याची कल्पना मांडली आहे.

वेदशास्त्रार्थतत्त्वज्ञो यत्र तत्राश्रमे वसन् । इहैव लोके तिष्ठन् स ब्रह्मभूयाय कल्पते ॥ मनुस्मृति 12.102॥ आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर ज्याला वेदांचा खरा अर्थ समजला त्याला ह्या जगातच ब्रह्मभाव प्राप्त होतो.

सर्वोपाधिविनिर्मुक्तं स्वात्मानं भावयेत्सुधीः। एवं यो वेद तत्त्वेन ब्रह्मभूयाय कल्पते ॥कठरुद्रोपनिषद्।। 46।।

स्वयं मृत्वा स्वयं भूत्वा स्वयमेवावशिष्यते ॥ इत्युपनिषत् ॥कठरुद्रोपनिषद् 47 ॥

म्हणून हे बुद्धिमान् पुरुष, मी वेदान्त मधील सर्वसिद्धान्तांचे सार यथार्थ सांगितले आहे. जो हे सर्व तत्त्वतः समजून घेईल, त्याला ब्रह्मत्व प्राप्त होईल. आपल्याच कर्मांनी जीव स्वयं उत्पन्न होतात आणि स्वयं मृत्यु पावतात. आणि स्वयं अवशिष्ट रूपात राहतात. हा सर्व आत्म्याचाच तर खेळ आहे. आत्म्याशिवाय दुसरे काहीच नाही. हेच ह्या उपनिषदाचे सार आहे ॥कठरुद्रोपनिषद् ४६-४७॥

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की जो मनुष्य एकरूप होऊन माझी भक्ती मार्गाने सेवा करतो तो सर्व गुणांना पार करून ब्रह्मभाव प्राप्त करतो.

ब्रह्मणो हि प्रतिष्ठाऽहममृतस्याव्ययस्य च।

शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च।।14.27।।

अहम्‌ हि ब्रह्मणः अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य धर्मस्य च एकान्तिकस्य सुखस्य च प्रतिष्ठा ।

अहम्‌ मी अस्मद् सर्व. प्र. ए. व.

हि अव्यय

ब्रह्मणः ब्रह्म चे ब्रह्मन् पु. ष. ए. व.

अमृतस्य अमर्त्य अमृत नपु. ष. ए. व.

अव्ययस्य अविनाशी अव्यय पु. ष. ए. व.

च अव्यय

शाश्वतस्य शाश्वत पु. ष. ए. व.

धर्मस्य धर्म पु. ष. ए. व.

एकान्तिकस्य एकमेव एकान्तिक नपु. ष. ए. व.

सुखस्य सुख नपु. ष. ए. व.

प्रतिष्ठा आश्रयस्थान स्त्री. प्र. ए. व.

प्रति+स्था धातू +अङ्+टाप् प्रत्यय

आधीच्या श्लोकात ब्रह्मभूय होणे ह्याबद्दल सांगितले आहे. ब्रह्म म्हणजे कोण ते ह्या श्लोकात सांगितले आहे. ह्या श्लोकात एकान्तिक हा शब्द आला आहे. ते वैष्णव संप्रदायाचे प्राचीन नाव सुद्धा आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की मीच त्या ब्रह्म चा आधार आहे जो अमर अविनाशी शाश्वत धर्म स्वरूप एकमेव परम आनंदस्वरूप असा आहे.

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु

ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे

गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥

----------------🙏🙏🙏🙏---------------------