जय बर्फानि बाबा!
गर्दीचा सोहळा
अमरनाथ यात्रा दोन बाजूंनी करता येते. एक पहलगाम वरून आणि दुसरा मार्ग बालताल वरून.
मी बालताल चा मार्ग निवडला होता.
आपल्या घरातूनच सर्व काही ठरवायला सुरवात होते जसे आपले वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांना पाठवून तारीख आधीच ठरवून घ्यायची असते.
श्रीनगर पासून आपण जसजसे आत जाऊ लागतो तसतसे CRPF चे जवान आपल्याला दर 50 मी अंतरावर दिसतात. जणू काही त्यांचेच राज्य चालू आहे. फार अस्वस्थ वाटते मनातून. अगदी हायवे वर सुद्धा दोन दोन जवान उभे असतात. वाईट वाटते त्यांना असे पाहून. सोनमर्ग ला रिकामा वेळ होता तेव्हा मुद्दाम त्यांच्याशी बोलले. हे सर्व यात्रे च्या तीन महिन्याचा कालावधीत करावेच लागते कारण अतिरेक्यांची भीती. त्यांच्या आॅफीस मधून दुपारी जेवण पाठवतात. रात्री मात्र ते परत जातात.
बालताल म्हणजे यात्रेकरूंसाठी मोठी छावणी आहे. हजारो तंबू ठोकून राहण्याची सोय केली आहे. विशेष म्हणजे तितक्याच प्रमाणात स्वच्छतागृहे असल्याने स्वच्छतेचा सुखद अनुभव येतो. शिवाय अंघोळीसाठी गरम पाणी सुद्धा विकत मिळते.
एकदा तिकडे जाऊन पोहोचलो की आपल्या सामानाचे scanning होते त्यात नेल कटर सुद्धा चालत नाही. पण हातातल्या पर्स मध्ये ठेवले तर चालते... लॉजिक तेच जाणो.
नंतर आपल्याला RFID घ्यावे लागते. अक्षरशः 3 मिनिटात काम झाले. RFID मुळे ते आपल्याला ट्रॅक करू शकतात आणि आपली सुरक्षा अबाधित असते.
घोडा किंवा पालखी करणार असाल तर ठरलेले फिक्स्ड रेट, शिवाय घोडेवाल्यांचे नाव मोबाईल नंबर सर्व काही आपल्याला मिळते. अतिशय परफेक्ट सिस्टीम.
तिकडे अनेक संस्थांनी लंगर लावलेले आहेत, आपल्या खाण्यापिण्याचे छान लाड करून घ्यायचे आणि यात्रा सुरू करायची.
माझ्या अंदाजाने रोज 2500 लोक येत असावेत.. स्पेस च्या दृष्टीने मला जरा हे भीतीदायक वाटले. पण 140 करोड (मुलांना आणि अती वृद्धांना वगळून) संख्येमुळे हा आकडा ठरवला असावा.
तसे स्थानिक प्रशासन आणि CRPF जम्मू श्रीनगर हायवे पासूनच पाय ओढायचे प्रयत्न करत असतात. ठिकठिकाणी ट्रॅफिक शेडिंग..ठिकठिकाणी लंगर मध्ये राहण्याची व्यवस्था असते. पण विचार करा स्थानिक माणसाला ह्याचा किती त्रास होत असावा. (ते ह्या लंगर मधे मुळीच जात नाहीत)
कित्येक यात्री गर्दी आणि अती थंडी मुळे यात्रा न करताच परत फिरतात, काही आजारी पडतात, काही वैष्णोदेवी ला जातात. कधीकधी पावसामुळे यात्रा थांबवली जाते.. म्हणून म्हंटले 2500 ऐवजी 1000 लोकांनाच परवानगी द्यावी.
जम्मू श्रीनगर जेमतेम 300 किमी अंतर, पण वेळ लागतो साधारण 10 तास.
स्थानिक लोक पूर्णपणे ह्या रस्त्यावर अवलंबून आहेत. विचार करा, मुले वृध्द कसे इतका वेळ प्रवास करत असावे. शिवाय शासकीय बससेवेची बोंब आहे. ते बस सुटण्याची वेळ सुद्धा धड सांगत नाहीत. पता नहीं उपरसे कब आयेगी बस? म्हटले फोन करके पूछो.. वो हमारा काम नही है.
मग टॅक्सीवाले जोरात. 1000 ते 1500 रूपये फक्त 300 किमी साठी.. तसे त्यांचे ही बरोबरच आहे. त्यांचा व्यवसाय 10 तासांच्या वेळेने निम्माच होतोय. परत येताना अतिशय व्यथित करणारा अनुभव.. मी एकटी होते आणि बाकी सर्व स्थानिक... कोणीही कुरकुरत नव्हते... यह सब ऐसाही है...
मलाच कंटाळा आला होता किती वेळ थांबवून ठेवले आहे..
आता तर त्यांना लोकप्रतिनिधी सुद्धा नाहीत, निवडणूक पण नाहीत...
फक्त टॅक्सी ड्रायव्हर एकदा म्हणाला, कभी कभी घुस्से से पथराव हो जाता है..
आम्ही साधारण दुपारी बालताल ला पोहोचलो. एका तंबूत रहायची सोय झाली. त्याचे नाममात्र शुल्क आकारले जाते. आपल्यासाठी अंघोळीसाठी गरम पाणी पुरवले जाते. उत्साही तंबू मालक आपल्याला घोडेवाला शोधून त्याची पावती सुद्धा काढून देतात. बोलता बोलता आधी सांगितले रात्री एक वाजता नंबर लावायला जायला हवे.. नंतर हळूहळू 3 चे चार झाले. आधीच ट्रेक करून आल्याने परत 18 +18 =36 किमी चालण्याची अजिबात इच्छा नव्हती. तो निर्णय योग्यच होता असे नंतर वाटले.
तर मी अन्वर च्या घोड्यावरून निघाले, पण ते इतके सोपे नव्हते.. आपला नंबर लावण्यासाठी लोक 12 वाजल्यापासून उभे असतात. केवळ अन्वर च्या सूचनांमुळे मला पटकन पुढे जाता आले आणि लवकर नंबर लागला. सर्वांना अन्वर भेटो.. अजून काय
मग सुरू झाली यात्रा, मिट्ट काळोख आणि जीवघेणी थंडी. दिदी आरामसे बैठना डरना मत, वगैरे झाले.. मी म्हटलं तू चल बिनधास्त, मला नाही भीती वाटत.
रात्रभर झोप नसल्याने मला घोड्यावर बसून सुद्धा डुलक्या यायला लागल्या.
पाचव्या वेळेस मी जरा जोरात आपटले तेव्हा मात्र अन्वर वैतागला. इतनी लापरवाही ठीक नहीं.
घोडा चढ़ाई कर रहा है तो आप आगे झुकीये, ढलान पे आप पीछे झुकना..
ठिक है ठिक है
तोपर्यंत उजाडले सुद्धा होते आणि हेलिकॉप्टर ची ये, जा सुरू झाली होती.
बालताल पासून एक मोठा पहाड पूर्ण पार करून दुसऱ्या पहाडावर जायचे असा साधारण रस्ता आहे.
हे दोन पहाड जेथे एकमेकात जोडले गेले आहेत तेथे प्रचंड उतार आणि चढ आहे. तो भाग आपल्याला स्वतःच चालून जावे लागते.
जवळपास 2 तास थंडीत घोड्यावर बसून अंग आखडून गेले होते..
अरे माताजी को आगे ले जाव. असे म्हटल्यावर अंगात झाशीची राणी संचारली.
मग मीच त्यांना सांगितले इथे लाकडी काठी ठेवा म्हणजे लोकांना नीट चालता येईल.
काठी वापरणे अजिबात कमीपणाचे नाही. आपला तो तिसरा पायच असतो. खूप आधार मिळतो चालताना.
थोडे अंतर चालून पुन्हा घोड्यावरचा प्रवास सुरू झाला की एक ठिकाण असे येते, तेथे पहलगाम वरून येणारे यात्री आपल्याला भेटतात. अजूनच गर्दी होते.
लांबून पवित्र गुंफा तर दिसते आहे पण कधी पोहोचणार कोण जाणे?
ह्या ठिकाणचे तीन भागात विभाजन करता येईल.
प्रत्यक्ष गुंफा, पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 25-30 पायर्या आहेत.
गुंफा च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी 50-60 पायर्या चढून जावे लागते.
त्यापूर्वी क्लोक रूम ची व्यवस्था केली आहे, तेथे आपल्या मोबाईल सकट सर्व सामान जमा करायचे. त्यासाठी मोठी रांग लागते.
त्याआधी साधारण 2 किमी अंतरावर घोडेवाला आपल्याला सोडून देतो. तेवढे अंतर आपण चालत जायचे. पालखीवाले मात्र गुंफा च्या पायथ्यापर्यंत जातात. ज्यांना 25 पायर्या चढणे शक्य नाही त्यांना (80-90 किलोची माणसे) हेच पालखीवाले उचलून मंदिरात सुद्धा घेऊन जातात. अतिशय प्रेमाने.
काय विलक्षण दृश्य असते ते. मला ह्या माणसांची हिंदुत्वाची मते ऐकायला आवडेल. असो.
तर नियमानुसार अन्वरने मला घोड्यावरून उतरवले, मोठी बॅग मी त्याच्याच कडे दिली आणि चालायला सुरुवात केली.
अरूंद बर्फाळ रस्ता, दोन्ही बाजूंनी पालखीवाले येताहेत.. अतिशय जपून चालावे लागते ते 2किमी अंतर.
मग क्लोक रूम मध्ये मोबाईल ठेवण्यासाठी रांगेत उभे रहायचे साधारण तासभर.. मोबाईल परत घेण्यासाठी अजून तासभर उभे रहायचे.. त्यापेक्षा मी अन्वर वर विश्वास ठेवायचा असे ठरवले. त्याला फोन करून सांगितले, इकडे ये आणि माझा मोबाईल ठेवून घे.
दिदी मै आपका मोबाइल कैसे रख लू?
तुम आ जाओ बस्स..
झाले.. 10 मिनिटात तो आला, मी पुढे जायला सुरुवात केली.
गेल्या काही वर्षांत माझी थोडी थोडी अध्यात्मिक प्रगती होते आहे. नर्मदा परिक्रमा केल्यापासून त्याची सुरुवात झाली. मूळ सायन्स ची विद्यार्थीनी असल्याने कोणतेही शास्त्रीय समर्थन देता येत नाही तरीही मनात त्या दिव्यत्वाची ओढ लागते. नर्मदा मैय्या ची अखंड पाखर जाणवते. तिचे पिताश्री श्रीशंकर भगवान..
विलक्षण मनःस्थितीत मी पायर्या चढायला सुरवात केली. डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या.. मागायचे तर काहीच नव्हते.. कृपादृष्टी कायम असू दे असे जेमतेम म्हटले आणि परत निघाले.
अन्वर लक्ष ठेवून होताच माझी वाट पहात. ताबडतोब परत निघालो.
परत येईपर्यंत साधारण एक वाजला असता. बालताल पासून बाहेर पडण्यासाठी 2 वाजेपर्यंत जाता येते त्यानंतर रस्ता बंद. मी तंबू च्या मालकाला फोन करून सांगितले मला 2 वाजायच्या आत परत जायला आवडेल.. तो म्हणाला काही काळजी करु नका, मी तुमची बॅग बस स्टँड वर आणून पोहोचवतो.. अन्वर तुम्हाला बस स्टँड वर सोडेल.. हे सर्व आधी काहीही न ठरवता आणि जास्तीचे पैसे न मागता न घडले.
ठरल्या प्रमाणे बस स्टँड वर आले खरी. सर्व बस निघून गेल्या होत्या. एकच शेयर टॅक्सी आणि एक सीट रिकामी, जणू माझ्या साठी च थांबली होती. त्यात बसून निघालो. चेक पोस्ट वर 2 वाजून 3 मिनिटे झाली होती.. टॅक्सी अडवली.. रस्ता बंद.. थोड्या फार विनवणी केली पण काहीच उपयोग नाही. परत फिरलो. टॅक्सी वाल्याने बस स्टँड समोरच्या लंगर मध्ये जाऊन रहायला सांगितले, उद्या सकाळी 4 वाजेपर्यंत..
ही यात्रा CRPF च्या जवानांच्या अविरत कष्टांमुळे व्यवस्थित चालू आहे. यामागे किती लोकांचे कष्ट आणि पैसे खर्च होत असावे ते RIT खाली माहीत करून घ्यायला हवे.
त्यानंतर स्थानिक लोकांचा सहभाग, ह्याचा विशेष उल्लेख करावा लागेल. जितके यात्रेकरू, त्यांच्या अधिक पटीने स्थानिक लोक ह्या मध्ये सहभागी होतात. ते फक्त सर्विस देणारे नाहीत तर अतिशय प्रेमाने सर्व काही करतात. पालखीवाले तर रोज मंदिराचे दर्शन घेऊन अखंड पुण्ण्य कमावतात. त्यानंतर नंबर येतो लंगर चालवणार्यांचा.
दुपारी 2 नंतर मी ज्या लंगर मध्ये थांबले होते तो एक आश्चर्यकारक अनुभव होता.
4वा पाणीपुरी, सामोसे, 8वाजता जेवण? रात्री गरम दूध आणि झोपण्यासाठी ब्लॅन्केट. मधल्या वेळात श्रीशंकर पार्वती च्या विवाहाची कथा, नाटक रूपात सादर.. मग आम्ही सर्व बाराती खास यूपी स्टाईल मधे नाचतोय.. खरेच उत्सव साजरे करावे ते उत्तरेतील लोकांनी.. मराठी लोकांनी फक्त चुका शोधाव्या, किरकिर करत रहावे.
मला स्वतःला काश्मीर मध्ये अजिबात परके वाटले नाही. अन्वर सारखा मनापासून काळजी करणारा, बिचार्याने दोन तासांनी आठवणीने फोन केला होता, ठिकठाक पहुंचे ना.. त्याला काय सांगू कप्पाळ.. इथेच अडकून पडले आहे म्हणून... असो एकंदरीत हा इतक्या वेगवेगळ्या पातळीवरच्या निरनिराळ्या माणसांचा अविस्मरणीय सोहळा पार पडला.
--------------------🙏🙏🙏🙏🙏--------------------