गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

श्रीमद्भगवद्गीता 12 वा अध्याय

 

श्रीमद्भगवद्गीता 12 वा अध्याय

12व्या अध्यायाचे नाव भक्तियोग असून त्यात एकूण 20 श्लोक आहेत.

अर्जुन उवाच

एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते।

येचाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः।।12.1।।

अर्जुन उवाच - ये भक्ताः एवम्‌ सतत-युक्ताः त्वाम्‌ (पर्युपासते), ये च अक्षरम्‌ अव्यक्तम्‌ अपि पर्युपासते तेषाम्‌ के योग-वित्तमाः?

 

अर्जुन उवाच -अर्जुन म्हणाला

ये जे यद् पु. प्र. ब. व.

भक्ताः भक्त पु. प्र. ब.व.

एवम्‌ अशाप्रकारे

सतत-युक्ताः निरंतर आपल्याशी जोडले गेलेले

सततं युक्तः प्र. ब. व.

त्वाम्‌ आपली  युष्मद् द्वि. ए. व.

ये जे यद् पु. प्र. ब. व.

च आणि

अक्षरम्‌ अविनाशी

न क्षरः अक्षर द्वि. ए. व.

अव्यक्तम्‌ निर्गुण अव्यक्त द्वि. ए. व.

अपि. सुद्धा

पर्युपासते उपासना करतात

परि +उप +आस धातू बसणे लट लकार प्र. पु. ए. व.

तेषाम्‌ त्यापैकी तद् पु. षष्ठी ब. व.

के कोण? किम् पु. प्र. ब. व.

योग-वित्तमाः   उत्तम योगी

योगवित्तमः (विशेषण) पु. प्र. ब. व.

योगविद् इति योगं वेत्ति

योगविद् +तम   योगवित्सु उत्तमः

 

ह्या श्लोकात अर्जुनाने खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे असे वाटते. ह्या प्रश्नाचे जे काही उत्तर मिळणार आहे त्यामुळे एकंदरीतच आपण करत असलेली कर्मकांड आणि काहीजण पूर्णपणे कर्मकांड टाळून करत असणारी भक्ती ह्या विषयावर चर्चा होऊन आपल्या विचारांना काही दिशा मिळेल असे वाटते आहे.

जो प्रश्न अर्जुनाने विचारला आहे त्याचे संक्षिप्त उत्तर 6व्या अध्यायातील 47 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी आपल्याला दिले आहेच.

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना।

श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः।।6.47।।

सर्व योगी मध्ये जो श्रद्धावान् भक्त माझ्यात तल्लीन होऊन मनापासून मला भजतो तो माझ्या मते सर्वश्रेष्ठ योगी आहे.

 

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

अशाप्रकारे (11 व्या अध्यायाप्रमाणे) (अनन्य भक्तिने) कायम परमेश्वराशी (सगुण रूपाशी) जोडले गेलेले आणि जे निराकार निर्गुण रूपाची उपासना करतात, त्या दोघांमध्ये उत्तम (श्रेष्ठ) योग जाणणारा असे कोणाला म्हणता येईल?

श्री भगवानुवाच

मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते।

श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः।।12.2।।

श्रीभगवानुवाच - मयि मनः आवेश्य नित्य-युक्ताः परया श्रद्धया उपेताः ये माम्‌ उपासते, ते युक्ततमाः मे मताः।

 

श्रीभगवानुवाच -

मयि माझ्यात अस्मद् स. ए. व.

मनः. मनाला मनस् द्वि. ए. व.

आवेश्य स्थिर करून

आ+विश् धातू प्रवेश करणे णिच ल्यप प्रत्यय

नित्य-युक्ताः निरंतर मग्न होऊन नित्यं युक्ताः प्र. ब. व.

परया परम परा स्त्री. तृ. ए. व.

श्रद्धया श्रद्धेने श्रद्धा तृ. ए. व.

उपेताः संपन्न होऊन

उप +इ धातू जाणे क्त प्रत्यय प्र. ब. व.

ये जे यद् पु. प्र. ब. व.

माम्‌ माझी

अस्मद् सर्व. द्वि. ए. व.

उपासते, उपासना करतात उप+आस् धातू लट लकार प्र. पु. ब. व.

ते ते तद् पु. प्र.ब.व.

युक्ततमाः सर्वोत्तम योगी

युक्ततमः प्र.ब.व.

मे माझ्या अस्मद् सर्व. ष. ए. व.

मताः मते मन् धातू क्त. पु. प्र. ब. व.

प्रत्येक जण आपल्या शरीर, मन आणि बुद्धीच्या क्षमतेनुसार भक्ती चा मार्ग निवडतो. ह्या श्लोकात भक्तीमार्गाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. त्यापैकी तीन महत्त्वाचे शब्द म्हणजे परम श्रद्धा, एकाग्रता आणि निरंतरता. मन एकाग्र कसे करायचे, ह्या संबंधी माहिती 6व्या अध्यायात आहेच.  श्रद्धा आणि सबुरी हे परवलीचे शब्द आपल्याला माहीत आहेतच.  परमेश्वरावर श्रद्धा असेल तर त्याचे चिरंतन स्मरण करता येणे शक्य आहे.

सात्त्विक्याध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी ।

तामस्यधर्मे या श्रद्धा मत्सेवायां तु निर्गुणा ॥ २७ ॥ श्रीमद्भागवतम् 11.25.27

अध्यात्मिक श्रद्धा सात्त्विक आहे, कर्मावरील श्रद्धा राजस आहे तर अधर्मावरील श्रद्धा तामस आहे. माझ्या वरील श्रद्धा अलौकिक आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की माझ्या मते ते सर्व श्रेष्ठ योगी आहेत जे श्रद्धा पूर्वक उपासना करण्यात निरंतर मग्न असतात, त्यांच्या मनात कायम माझेच विचार असतात.

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते।

सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्।।12.3।।

ये तु अचिन्त्यम्‌, सर्वत्रगम्‌, अनिर्देश्यम्‌, कूटस्थम्‌, ध्रुवम्‌, अचलम्‌, अव्यक्तम्‌, अक्षरम्‌ च पर्युपासते।

 

संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः।

ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः।।12.4।।

ते सर्व-भूत-हिते रताः सर्वत्र सम-बुद्धयः सन्नियम्य इन्द्रिय-ग्रामम् माम्‌ एव प्राप्नुवन्ति।

 

ये जे यद् पु. प्र. ब. व.

तु परन्तु

अचिन्त्यम्‌ अकल्पनीय न चिन्त्यं द्वि. ए. व.

सर्वत्रगम्‌ सर्वव्यापक

सर्वत्र गच्छति द्वि. ए. व.

गम् धातू जाणे

अनिर्देश्यम्‌ न दिसणारे अनिर्देश्य द्वि. ए. व.

दृश् धातू पाहणे. निर्देश म्हणजे दाखवणे

कूटस्थम्‌, अपरिवर्तित कूटे तिष्ठति द्वि. ए. व.

ध्रुवम्‌, शाश्वत ध्रुव नपु. द्वि. ए. व.

अचलम्‌, स्थिर अचल द्वि. ए. व.

अव्यक्तम्‌, अप्रकट अव्यक्त द्वि. ए. व.

अक्षरम्‌ अक्षर द्वि. ए. व.

क्षर धातू वाहणे (कमी होणे)

पर्युपासते उपासना करतात परि+उप+आस् धातू बसणे लट लकार प्र. पु. ब. व.

 

ते ते तद् (सर्व) पु. प्र. ब. व.

सर्व-भूतहिते समस्त जीवांच्या हिताचे

सर्वाणि भूतानि सर्वभूतानां हितं

सर्वभूतहित स. ए. व.

रताः तल्लीन

रम् धातू क्त पु. प्र. ब. व.

सर्वत्र

सम-बुद्धयः समदर्शी

समबुद्धिः प्र. ब. व.

इन्द्रियग्रामम् इन्द्रियांचा समूह इन्द्रियाणां ग्रामम् द्वि. ए. व.

सन्नियम्य  सम+नि+यम् धातू नियंत्रण ठेवणे ल्यप प्रत्यय

माम्‌ मला अस्मद् द्वि. ए. व.

एव

प्राप्नुवन्ति प्राप्त होतात

प्र+आप धातू व्यापणे, प्राप्त होणे लट लकार प्र. पु. ब. व.

3रा आणि 4 था श्लोक अर्थासाठी सलग वाचावा लागेल.

भारतीय दर्शनातील योग, न्याय, वैशेषिक अशा दर्शनांमधे परमेश्वराच्या सगुण रूपाला फारसे महत्त्व नाही.

सांख्य दर्शन, ज्यामध्ये प्रकृति आणि पुरूष ह्या दोन्ही मध्ये असणार्‍या 25 तत्त्वांना मानले गेले आहे ते तत्वज्ञान श्रीमद्भगवद्गीता लिहिण्यापूर्वी अस्तित्वात होतेच.

परमेश्वराच्या निर्गुण निराकार रूपाची वैशिष्ट्ये ह्या श्लोकात सांगितली आहेत.

त्यापैकी पहिले वैशिष्ट्य म्हणजे अचिन्त्यः. ज्या रूपाचे चिंतन (कल्पना) करू शकत नाही असे.

सर्वत्रगम् म्हणजे चराचरांत व्यापून राहिलेला.

अनिर्देश्यम् म्हणजे ज्याची व्याख्या होऊ शकत नाही असा.

आपल्या भुवयांच्या मध्ये असणार्‍या आज्ञा चक्र ला कूटस्थ असेही म्हणतात. सांख्य दर्शन तत्वज्ञानाप्रमाणे पुरूष, कूट आहे म्हणजेच अपरिवर्तनीय आणि प्रकृति परिवर्तनीय.

ध्रुवम् म्हणजे दृढता, निश्चितता. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च।असा श्लोक 2र्या अध्यायात येऊन गेला आहे.

अचलम् म्हणजे स्थिर..

वेदांमध्ये ब्रह्मा साठी अव्यक्त शब्द वापरला आहे. अव्यक म्हणजे आपल्या इन्द्रियांव्दारा आपण जे अनुभव करू शकत नाही.

अक्षर म्हणजे न संपणारा आणि शब्द. पाणिनी म्हणतात

अक्षरं नक्षरं विद्यादश्नोतेर्वा सरोऽक्षरं वर्णं वाऽऽहुः ।(महाभाष्य १.१.२)

आकाशवायुप्रभवः शरीरात्समुच्चरन् वक्त्रमुपैति नादः।

स्थानान्तरेषु प्रविभज्यमानो वर्णत्वमागच्छति यः स शब्दः॥1.1आपिशलशिक्षा।।

ह्या दोन श्लोकांचा थोडक्यात अर्थ असा की

परन्तु जे स्वतःच्या इन्द्रियांवर ताबा ठेऊन, सारासार विवेक बुदधिने सर्व प्राणीमात्रांच्या हिताचाच विचार करतात आणि अकल्पनीय, सर्वव्यापी, अदृश्य, अपरिवर्तनीय, स्थिर, शाश्वत, अप्रकट आणि नश्वर ची उपासना करतात ते मला प्राप्त होतात.

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्।

अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते।।12.5।।

तेषाम्‌ अव्यक्त-आसक्त-चेतसाम्‌ क्लेशः अधिकतरः हि देहवद्भिः अव्यक्ता गतिः दुःखम्‌ अवाप्यते ।

तेषाम्‌ त्यांना तद् पु. ष. ब. व.

अव्यक्त.   अव्यक्तात

आसक्त-चेतसाम्‌  आसक्त मन असलेल्या

अव्यक्ते आसक्तं अव्यक्तासक्तचेतसाः ष. ब. व.

क्लेशः  कष्ट क्लेश पु. प्र. ए. व.

अधिकतरः अधिक जास्त ( वि) प्र. ए. व.

हि

देहवद्भिः देहधारी, देहाभिमानी देहवत् देह+मतुप प्रत्यय तृ. ब. व.

अव्यक्ता न व्यक्त प्र. ए. व.

गतिः गति प्र. ए. व.

दुःखम्‌ दुःख

अवाप्यते प्राप्त केली जाते अव+आप धातू व्यापणे लट लकार प्र. पु. ए. व.

 

ह्या श्लोकात निर्गुण आणि सगुण भक्ती मधला फरक सांगितला आहे. आपल्या सर्वांच्याच मनात प्रत्येक देवाबद्दल विशेष स्थान असते, त्यामधे परमेश्वराच्या सगुण रूपाचा खूप मोठा वाटा असतो. जसे कोणाला गणपती बाप्पा वर जास्त श्रद्धा तर काहींच्या मनात श्रीकृष्णाप्रती विशेष प्रेम. तर काहींच्या मनात काली माते विषयी आदरयुक्त भीती. निर्गुण भक्तिमार्गाचा अवलंब करताना डोळ्यासमोर परमेश्वराचे कोणतेच रूप नाही. मग प्रेम कोणावर करायचे? फक्त विश्वास आणि श्रद्धा ह्यांचा आधार घेऊन भक्ती साध्य होणार. एका विवेचनात ह्याचे वर्णन मर्कट किशोर भक्ती असे केले आहे. जसे माकडाच्या पिल्लाने त्याच्या आईला घट्ट धरून ठेवलेले असते आणि ते आपल्या आईवरच्या दृढ विश्वासाने सगळी कडे फिरत असते, तेच मांजरीच्या पिल्लांना मात्र मानेला पकडून पुढे न्यावे लागते. निर्गुण भक्ती साधारण अशीच, केवळ मनात विश्वास आणि अपार श्रद्धा. ह्यांनाच ज्ञानयोगी असे म्हणतात. आणि सगुण भक्तीला अर्च-विग्रह असे म्हणतात.

ज्ञानयोगी होण्याचा मार्ग तसा फारच खडतर. सुरवातीच्या काळात अशा योगीला फक्त सगुण रूपाबद्दल अनास्था वाटते म्हणून आसक्त-चेतसाम्‌ असे म्हणले आहे.

'देहाभिमानिनी सर्वे दोषाः प्रादुर्भवन्ति’ ।

स्वतः बद्दल चा वृथा अभिमान हाच सर्वात मोठा अडथळा. ह्या उक्तीप्रमाणे निर्गुण तत्त्वात प्रविष्ट होण्यासाठी शरण जाणे हे अती आवश्यक.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

अव्यक्त ब्रह्माचे (सगुण रूपाची) आसक्ति ने चिंतन करणार्‍या साधकांना जास्त कष्ट पडतात. अशा देहाभिमानी साधकांना अव्यक्ता विषयी गती प्राप्त होताना त्रास होतोच.

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः।

अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते।।12.6।।

ये तु मत्‌-पराः सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य, अनन्येन योगेन माम्‌ एव ध्यायन्तः उपासते।

 

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्।

भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम्।।12.7।।

हे पार्थ ! मयि आवेशित-चेतसाम्‌ तेषाम्‌ अहम्‌ न चिरात्‌ मृत्यु-संसार-सागरात्‌ समुद्धर्ता भवामि।

 

ये जे यद् पु. प्र. ब. व.

तु परन्तु

मत्‌-पराः मला सर्वश्रेष्ठ मानणारा मत्पराः अहं परः प्र. ब. व.

सर्वाणि संपूर्ण सर्व नपु. प्र. ब. व.

कर्माणि कर्मांना कर्मन् नपु. प्र. ब. व.

मयि मला अस्मद् स. ए. व.

संन्यस्य, आपले नाही असे सं+नि+अस् धातू असणे ल्यप प्रत्यय

अनन्येन एकमात्र अनन्य पु. तृ. ए. व.

योगेन योगः पु. प्र. ए. व.

माम्‌ एव माझे च

अस्मद् द्वि. ए. व.

 ध्यायन्तः ध्यान करीत ध्यै धातू ध्यान करणे ध्यायत् शतृ प्रत्यय प्र. ब. व.

उपासते उपासना करतात उप +आस् धातू बसणे लट लकार प्र. पु. ब. व.

 

हे पार्थ !

मयि माझ्यात अस्मद् स. ए. व.

आवेशित-चेतसाम्‌ (माझ्यातच) चित्त एकाग्र असलेला

आ+विश् धातू  प्रवेश करणे णिच् क्त प्रत्यय

आवेशितानि चेतांसि आवेशितचेतसः ष. ब. व.

तेषाम्‌ त्या (भक्तांचा) तद् पु. ष. ब. व.

अहम्‌ मी अस्मद् सर्व. प्र. ए. व.

नचिरात्‌ लवकरच नचिर् पं. ए. व.

मृत्यु-संसार मृत्यूरूप संसार मृत्यूयुक्तः संसारः मृत्यूसंसारः

मृत्यूसंसार इव सागरः

सागरात्‌ सागर पं. ए. व.

समुद्धर्ता उद्धार करणारा

सं +उद् +धृ तृच् प्रत्यय प्र. ए. व.

भवामि होतो भू धातू लट लकार उ. पु.ए.व.

11व्या अध्यायातील 55 व्या श्लोकात मत्परः चे विवेचन दिले आहेच. तसेच मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा। असे 3र्या अध्यायातील 30 व्या श्लोकात म्हटले आहेच.

मृत्यु एक अटळ सत्य आहे हे सांगताना मृत्यूसंसार असा शब्द वापरला आहे. ह्या जगातील सर्व सजीव क्षणाक्षणाला मृत्यू च्या दिशेने जात असतात.

जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला असे कवीने म्हटले आहेच.

ह्या दोन्ही श्लोकांचा थोडक्यात अर्थ असा की

परन्तु जे सर्व कर्मांना मला अर्पण करून मला सर्वश्रेष्ठ मानतात, माझेच ध्यान करून माझी उपासना करतात, हे पार्थ, माझ्यातच रममाण झालेल्या भक्तांचा ह्या मृत्यूरूपी समुद्रसंसारातून उद्धार करणारा मीच असतो.

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय।

निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः।।12.8।।

मयि मनः आधत्स्व मयि एव बुद्धिम्‌ निवेशय, अतः ऊर्ध्वम्‌ मयि एव निवसिष्यसि, न संशयः ।

 

मयि माझ्यात अस्मद् सर्व स. ए. व.

मनः मनाला मनस् नपु. द्वि. ए. व.

आधत्स्व स्थिर आ+धा धातू धारण करणे लोट लकार म. पु. ए. व.

मयि एव माझ्यातच अस्मद् सर्व स. ए. व.

बुद्धिम्‌ बुद्धि स्त्री. द्वि. ए. व.

निवेशय, समर्पित कर नि +विश् धातू प्रवेश करणे णिच लोट लकार म. पु. ए. व.

अतः त्या

ऊर्ध्वम्‌ नंतर

मयि एव माझ्यातचअस्मद् स. ए. व.

निवसिष्यसि वास करशील नि +वस् धातू वास करणे लृट लकार म. पु. ए. व.

संशयः संशय पु. प्र. ए. व.

 

मन म्हणजे विविध प्रकारच्या भावना. मन म्हणजे संवेदना, सुखदुःखाची जाणीव. इंद्रिय व बुद्धीच्या मध्ये मन असते असे ज्ञानदेव सांगतात, "जे इंद्रिया आणि बुद्धी। माझारिलिये संधी|" याचा अर्थ तोच. म्हणजे प्रेरणा देणारी बुद्धी आणि ते प्रेरणा प्रत्यक्षात आणणारी इंद्रिये यामध्ये मन असते. मनाचे आरोग्य फार महत्वाचे. बुद्धि चे अनेक कंगोरे आहेत त्यापैकी एक महत्वाचे अंग म्हणजे तर्कशुद्ध ज्ञान मिळवण्याची क्षमता.

 

चेतः खल्वस्य बन्धाय मुक्तये चात्मनो मतम्।

गुणेषु सक्तं बन्धाय रतं वा पुंसि मुक्तये ।।

(श्रीमदभागवतम्-3.25.15)

माया च्या बंधनात रहायचे की मायामुक्त रहायचे हे मनच ठरवत असते.

ह्या श्लोकात परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी मन आणि बुद्धी  दोन्ही पातळ्यांवर एकरूप होण्याची गरज आहे असे श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. भक्ताचे मन आणि बुद्धी इतकी परमेश्वराशी एकरूप झाले आहेत की भगवान श्रीकृष्ण त्याच्या ठायी ठायी वसले आहेत.

भक्त श्रीभगवानकृष्णांना भोग लावूनच अन्न ग्रहण करतो, कारण त्याच्या मनात असा विचार येत नाही, देव कुठे प्रसाद खात असतात?

म्हणूनच ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि बुद्धि सुद्धा. अशा रीतीने तू निःसंदेह सदैव माझ्यातच वास करशील.

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्।

अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय।।12.9।।

अथ मयि चित्तम्‌ स्थिरम्‌ समाधातुम्‌ न शक्नोषि ततः, हे धनञ्जय ! अभ्यास-योगेन माम्‌ आप्तुम्‌ इच्छ।

 

अथ अव्यय जर

मयि माझ्यावर अस्मद् स. ए. व.

चित्तम्‌ मन चित्त नपु. द्वि ए. व.

स्थिरम्‌ एकाग्र करणे स्थिर (वि) द्वि. ए. व.

समाधातुम्‌  स्थिर करणे सम +आ+धा धातू धारण करणे तुमुन् प्रत्यय

न शक्नोषि शक्य नसेल शक् धातू शकणे लट लकार म. पु. ए. व.

ततः, तर

हे धनञ्जय ! सं. ए. वह

अभ्यास-योगेन अभ्यासयोगाच्या साह्याने अभ्यासः एव योगः तृ. ए. व.

माम्‌ माझ्या अस्मद् द्वि. ए. व.

आप्तुम्‌ प्राप्तीची आप् धातू तुमुन् प्रत्यय

इच्छ अपेक्षा कर इष् धातू इच्छा करणे लोट लकार म. पु. ए. व.

ह्या श्लोकात अभ्यासयोग असा शब्दप्रयोग आहे, 8व्या अध्यायातील 8 व्या श्लोकात हा शब्द आपण वाचलेला आहेच. त्याचा नेमका अर्थ जाणून घ्यायला हवा.

योग म्हणजे काय ते आपण जाणतोच.

परमेश्वराला जोडून घेण्याची प्रक्रिया सोपी नाही, त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला हवेत. परमेश्वराला जोडून घ्यायचे म्हणजे आपणच देव व्हायचे, म्हणजेच सर्व परमेश्वरी गुण आपल्यात आणायचे. प्रयत्नांती परमेश्वर.

आदी शंकराचार्य जींनी अहम् ब्रह्मास्मि म्हणण्यापूर्वी किती साधना केली असेल?

ह्या अध्यायाचे नाव भक्तीयोग आहे त्यामुळे ह्या श्लोकाचा त्या अनुषंगाने अर्थ पहावा लागेल. परमेश्वराचे सतत चिंतन करावे असा विचार 10 व्या अध्यायातील 10 व्या श्लोकात सुद्धा मांडला आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला हेच सांगत आहेत.

हे धनञ्जय, जर तू निश्चयपूर्वक तुझे मन माझ्याठायी स्थिर करू शकत नसशील तर भक्तीयोगाचा अभ्यास करून मला प्राप्त करण्याची इच्छा कर.

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव।

मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि।।12.10।।

अभ्यासे अपि असमर्थः असि, मत्‌-कर्म-परमः भव, मत्‌-अर्थम्‌ कर्माणि कुर्वन्‌ अपि सिद्धिम्‌ अवाप्स्यसि।

 

अभ्यासे अभ्यास पु स. ए. व.

अपि सुद्धा

असमर्थो असमर्थः पु प्र. ए. व.

असि असशील अस् धातू लट लकार म. पु. ए. व.

मत्‌-कर्म, माझे कर्म

मह्यं कर्म

परमः परायण

मत्कर्म परमं यस्य सः

भव हो  भू धातू लोट लकार म. पु. ए. व.

मदर्थ  माझ्या करता

मत्‌-अर्थम्‌

कर्माणि कर्मे कर्मन् नपु. द्वि. ए. व.

कुर्वन्‌ करून कृ धातू शतृ प्रत्यय प्र. ए. व.

अपि सुद्धा

सिद्धिम्‌ सिद्धि स्त्री द्वि. ए. व.

अवाप्स्यसि प्राप्त करशील अव+आप धातू मिळवणे, व्याप्त होणे लृट लकार म. पु. ए. व.

ह्या अध्यायातील 8 व्या श्लोकात अर्जुनाला श्रीभगवानकृष्णांनी मन आणि बुद्धी अर्पण करावयास सांगितले. 9व्या श्लोकात अभ्यासयोगाचा उल्लेख केला.

त्याच श्लोकाचा संदर्भ घेऊन ह्या श्लोकाचा अर्थ समजून घ्यायला हवा. भक्तीचे एकूण 9 प्रकार सांगितले आहेत आणि तशा प्रकारची भक्ती करणारे भक्त सुद्धा आपल्याला माहीत आहेत. जसे

1. श्रवण भक्ती परीक्षीत

2. कीर्तन भक्ती शुकाचार्य

3. स्मरण भक्ती प्रल्हाद

4. पादसेवन भक्ती लक्ष्मी

5. अर्चन भक्ती पृथू राजा

6. वंदन भक्ती अक्रूर

7. दास्य भक्ती हनुमान

8. सख्य भक्ती अर्जुन

9. आत्मनिवेदन भक्ती बली

अभ्यासयोगाची प्रक्रिया तशी अवघड. त्यासाठी मन आणि बुद्धी दोन्ही पणाला लावून परमेश्वराला जोडून घ्यावे लागते. पण ज्यांच्यासाठी हे कष्टदायक आहे त्यांनी फक्त आपली नित्यकर्म करावी आणि ती परमेश्वराला अर्पण करावी. ह्याबद्दल ची विस्तृत माहिती 11व्या अध्यायातील 55 व्या श्लोकात दिलेली आहेच..

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की (श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की)

जर अभ्यासयोग करण्यास तू असमर्थ असशील तर केवळ माझ्या करता तू कर्म कर. अशी माझ्या करता कर्म केल्याने सुद्धा तुला सिद्धी प्राप्त होईल.

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।

सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्।।12.11।।

अथ मत्‌-योगम्‌ आश्रितः एतत्‌ कर्तुम्‌ अपि अशक्तः असि ततः यत-आत्मवान्‌ सर्व-कर्म-फल-त्यागम्‌ कुरु।

 

अथ जर

मद्योगं  माझ्याशी जोडले जाताना (भक्ती करताना) मत्‌-योगम्‌ ष. तत्पुरुष द्वि. ए. व.

आश्रितः निर्भर आ+श्रि धातू सेवा करणे क्त प्रत्यय प्र. ए. व.

एतत्‌ हे एतद् नपु. प्र. ए. व.

कर्तुम्‌ करण्यासाठी कृ धातू करणे तुमुन् प्रत्यय

अपि सुद्धा

अशक्तः असमर्थ

न शक्तः शक् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

असि आहेस अस् धातू लट लकार म. पु. ए. व.

ततः तर अव्यय

यत-आत्मवान्‌ आत्मनियंत्रण

यतः आत्मा यस्य सः वत् प्रत्यय प्र. ए. व. सर्व-कर्म-फल-त्यागम्‌

कर्मणः फलम् कर्मफलं

सर्वाणि कर्माणि सर्वकर्माणि

सर्वाणिकर्मफलानि

सर्वकर्मफलानां त्यागः

कुरु कर कृ धातू लोट लकार म. पु. ए. व.

रोजच्या जीवनात आपल्याला अनेक लोक संपत्ती मिळवण्यासाठी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबताना दिसतात आणि त्याच बरोबर मनोभावे पूजाअर्चा सुद्धा करताना दिसतात. काहींना स्वतः च्या कर्माचे उचित श्रेय हवे असते. असेही दिसून येते की लोक भक्तीमार्गचा अवलंब करत असताना आपली कर्मे, जबाबदार्‍या ह्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांसाठी हा श्लोक योग्य दिशा दाखवणारा ठरावा. कर्म करणे आवश्यक आहे हे आपण 6व्या अध्यायात जाणून घेतले आहेच.

मग कर्म करण्यास प्राधान्य द्यायचे की परमेश्वराची भक्ती करायची असा विचार करण्याची जर परीस्थिती निर्माण झाली तर ह्या श्लोक मार्गदर्शक ठरावा.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की (आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन)

जर तू माझ्यासाठी कर्म (भक्ती) करण्यास (भक्तीमार्गचा अवलंब करण्यास) असमर्थ असशील तर केवळ (स्वतः ची कर्म करत रहा) आत्मनियंत्रण  (मोह, माया, श्रेय) करून सर्व कर्मफलांचा त्याग  कर.

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्धयानं विशिष्यते ।

ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥12.12॥

अभ्यासात्‌ ज्ञानम्‌ हि श्रेयः, ज्ञानात्‌ ध्यानम्‌ विशिष्यते, ध्यानात्‌ कर्म-फल-त्यागः, त्यागात्‌  अनन्तरम्‌ शान्तिः।

 

अभ्यासात्‌ अभ्यासापेक्षा अभ्यास पु. पं. ए. व.

ज्ञानम्‌ ज्ञान नपु. प्र. ए. व.

हि अव्यय

श्रेयः, श्रेष्ठ श्रेयस् नपु. प्र. ए. व.

ज्ञानात्‌ ज्ञानापेक्षा ज्ञान नपु. पं. ए. व.

ध्यानम्‌ ध्यान नपु. प्र. ए. व.

विशिष्यते,श्रेष्ठ आहे

वि +शिष् धातू वैशिष्ट्य दाखवणे कर्मणि लट लकार प्र. पु. ए. व.

ध्यानात्‌ ध्यानापेक्षा ध्यान नपु. पं. ए. व.

कर्म-फल-त्यागः, कर्मफलांचा त्याग

कर्मणः फलं कर्मफलं

कर्मफलस्य त्यागः प्र. ए. व.

त्यागात्‌  त्याग पु. पं. ए. व.

अनन्तरम्‌ त्यानंतर अव्यय

शान्तिः शान्ति स्त्री. प्र. ए. व.

8व्या श्लोकापासून परमेश्वराला जोडून घेण्याचे निरनिराळे प्रकार सांगून झाल्यावर आता त्याचा सारांश ह्या श्लोकात सांगितला आहे. सुरवातीला मन आणि बुद्धी दोन्ही पातळ्यांवर एकरूप होऊन, निःसंशयपणे भक्तीमार्गाचा अवलंब करण्यास सांगितले. केवळ भक्ती करणे शक्य नसेल तर अभ्यासयोग म्हणजे ज्ञानमार्ग सांगितला. ज्ञान कसले मिळवायचे? अहम् ब्रह्मास्मि? ही तर सर्वात शेवटची पायरी झाली. गौतमबुद्धांनी बोधीवृक्षाखाली 14 वर्ष तप केले. त्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाले. तप आणि ध्यान करता करता, मी कोण? किंवा मी कोणीच नाही अशा अनुभवाची प्रचीती येत असावी. 6व्या अध्यायातील 18-20 ह्या श्लोकात ध्यानयोगाचे वर्णन केले आहे. ध्यानामुळे योगीला इतकी शांती प्राप्त होते की त्याची तुलना न हलणाऱ्या दिव्याच्या ज्योतीशी केली आहे. जेव्हा साधकाचे चित्त पूर्णपणे परमेश्वरापाशी स्थिर होते तेव्हा तो कामनारहीत होतो. मनामध्ये कसलीही स्पंदने नाहीत.

मी पण संपून गेले म्हणजेच आपला अहंकार नष्ट झाला. सर्व गोष्टी घडवून आणणारा फक्त तोच म्हणजे ब्रह्मा आहे हे समजल्यावर आपल्या कर्माचे श्रेय तरी कशाला हवे?

म्हणूनच ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की अभ्यासापेक्षा (भक्ती पेक्षा) ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ,आणि ध्यानापेक्षा कर्मफलांचा त्याग. असा त्याग केल्याने लगेचच शांती प्राप्त होते.

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।

निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी।।12.13।।

सर्व-भूतानां अद्वेष्टा, मैत्रः, करुणः एव च निर्ममः, निरहङ्कारः, सम-दुःख-सुखः, क्षमी।

 

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः।

मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः।।12.14।।

यः सततम्‌ सन्तुष्टः, यत-आत्मा, दृढ-निश्चयः, योगी, मयि अर्पित-मनः-बुद्धिः, सः एव मत्‌-भक्तः मे प्रियः।।

 

सर्व-भूतानां सर्व सजीवांमधे सर्वभूतानि ष. ब. व. सर्वाणि भूतानि

अद्वेष्टा, द्वेषरहीत

द्वेष्टा  प्रातिपदिक द्वेष्टृ (द्विष् धातु + तृच् प्रत्यय)

द्विष् धातू शत्रूत्व करणे द्वेष्ट पु. प्र. ए. व.

न द्वेष्टा

मैत्रः, मैत्र पु. प्र. ए. व.

करुणः करूण पु. प्र. ए. व.

एव अव्यय

च अव्यय

निर्ममः  ममतारहीत प्र. ए. व. निर्गतं ममत्वं यस्मात सः

निरहङ्कारः अहंकाररहीत प्र. ए. व. निर्गतः अहंकारः यस्य सः

सम-दुःख-सुखः  दुःख आणि सुख समतेने पाहणारा

दुःखं च सुखं च

समानि दुःखसुखानि यस्य सः

क्षमी क्षमाशील क्षमिन् पु. प्र. ए. व.

 

यः जो तद् पु. प्र. ए. व.

सततम्‌ निरंतर अव्यय

सन्तुष्टः सं +तुष् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

यत-आत्मा, आत्मनियंत्रित यतः आत्मा यस्य सः

दृढ-निश्चयः, दृढः निश्चयः यस्य सः

योगी योगिन् पु. प्र. ए. व.

मयि माझ्यात अस्मद् स. ए. व.

अर्पितमनोबुद्धिः मन आणि बुद्धी अर्पण केलेला

मनः च बुद्धिः च मनोबुदधि

अर्पिते मनोबुदधि येन सः

स सः तद् पु. प्र. ए. व.

मत्‌-भक्तः माझा भक्त मम भक्तः प्र. ए. व.

मे मला अस्मद् सर्व च. ए. व.

प्रियः प्रिय प्र. ए. व.

परमेश्वराशी जोडून घेण्याच्या प्रक्रियेत सामान्य माणसाच्या वागण्याबोलण्यात काय काय बदल होत असतात म्हणजेच योगी होण्याच्या प्रक्रियेचे वर्णन ह्या श्लोकात केले आहे. हि सर्व गुणवैशिष्ट्ये भक्तीयोगाच्या अनुषंगाने सांगितली आहेत. 13 व्या श्लोकात साधकाचे दुसर्‍याप्रती वर्तन कसे असावे ह्याचे वर्णन, त्याच बरोबर स्वतः मधे होणारे बदल ह्याचे वर्णन केले आहे.

एकेक गुणाचा जर मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून पहायचे ठरवले तर एक गुणसंपन्न व्यक्ती होण्याची प्रक्रियाच समोर येईल.

सर्वात पहिला गुणविशेष म्हणजे सर्व जीवांचा कधीही द्वेष न करणे. आपल्या मनात दुसर्‍याबददल तेव्हाच द्वेष उत्पन्न होतो जेव्हा आपल्याला स्वतः बद्दल खात्री नसते. किंवा आपल्या अवाजवी अपेक्षांची पूर्तता होणे शक्य नसते. दुसर्‍या बाजूने सांगायचे झाले तर ज्याला स्वतःच्या कार्यक्षमतेबद्दल आत्मविश्वास असतो त्याच्या मनात दुसर्‍या बद्दल द्वेषभाव असण्याचे कारण नाही. असेच लोक सर्वांशी मैत्री करू शकतात. ते दुसर्‍यांना मदत करायला कायम तत्पर असतात. त्यांच्या मनात दुसर्‍याबददल करूणा असते.

आता पुढचा शब्द निर्मम म्हणजे ममतारहीत, थोडा बुचकळ्यात टाकणारा आहे. इथे स्वतःबद्दल ममतारहीत असणे असे अपेक्षित आहे. ज्याचे फक्त स्वतःवर प्रेम असते तो दुसर्‍याच्या भल्याचा विचार करूच शकत नाही. तीच गोष्ट अहंकाराची. अहंकार तर दोन माणसांमधील सुसंवाद घडू न देणारा सर्वात मोठा अडथळा. इथे ममतारहीत म्हणजे स्वतःच्या शरीरावर, सौंदर्यावर प्रेम नसणारा असाही घेता येईल कारण अहंकार हा मन आणि बुद्धी शी निगडित आहे. अशा अहंकार आणि ममता विरहित साधकासाठी सुख आणि दुःख दोन्ही सारखेच. त्यानंतर चा सर्वात मोठा गुण म्हणजे क्षमाशीलता. विरोध करण्याची क्षमता नसताना गप्प बसून सहन करणे वेगळे आणि दुसर्‍याच्या चुका, त्यांच्या कडून झालेले अपराध आणि अपमान, माफ करणे वेगळे. ज्याच्या मनात दुसर्‍याबददल करूणा आहे तोच असे करू शकतो. संतुष्टी म्हणजे समाधान. स्वतःवर फाजील प्रेम नाही पण आत्मसंतुष्टी आहे अशी व्यक्तीच सर्व जगाचा व्यापक विचार करू शकते. त्यापुढे जाऊन भगवंतांनी आत्मनियंत्रित आणि दृढनिश्चयी म्हटले आहे. आता भक्तीयोगाचा व्यापक अर्थ लक्षात येतो. भक्ती म्हणजे केवळ भजन किर्तन असा मर्यादित अर्थ नसून इतके सर्व गुणविशेष अंगिकारल्यानंतर मनाने आणि बुद्धीने स्वतःला परमेश्वराच्या ठायी समर्पित करायचे..

ह्या श्लोकाचा आता थोडक्यात अर्थ असा की जो साधक द्वेष, ममता अहंकार विरहित आहे, ज्याच्या मनात सर्व जीवांबददल करूणा, मैत्री आहे, जो सुखदुःखांकडे सम दृष्टिने पाहतो, जो संतुष्ट, आत्मनियंत्रित, दृढनिश्चयी असून मनाने आणि बुद्धीने मला समर्पित आहे असा योगी मला प्रिय आहे.

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः।

हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः।।12.15।।

यस्मात्‌ लोकः न उद्विजते, यः च लोकात्‌ न उद्विजते, च यः हर्ष-आमर्ष-भय-उद्वेगैः मुक्तः, सः मे प्रियः ।

 

यस्मात्‌ ज्यामुळे यद् पु. पं. ए. व.

लोकः लोक पु. प्र. ए. व.

उद्विजते, उद्विग्न होतो

उत् +विज् धातू घाबरणे लट लकार प्र. पु. ए. व.

यः जो यद् पु. प्र. ए. व.

लोकात्‌ लोकांमुळे

लोक पु. पं. ए. व.

उद्विजते उद्विग्न होतो

उत् +विज् धातू घाबरणे लट लकार प्र. पु. ए. व.

यः जो यद् पु. प्र. ए. व.

हर्ष-आमर्ष-भय-उद्वेगैः  आनंद, राग, भीती, उद्वेग

हर्षः च आमर्षः च भयं च उद्वेगः च

मुक्तः मुच् धातू सोडून देणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

सः तो तद् पु. प्र. ए. व.

मे अस्मद् सर्वनाम च. ए. व.

प्रियः प्रिय विशेषण पु. प्र. ए. व.

ह्या श्लोकाचा निरनिराळ्या बाजूंनी अर्थ लावता येईल जसे एका माणसाचे दुसर्‍या माणसाप्रती व्यक्त होणारे प्रेम, आदर, आपुलकी आणि त्याला सामाजिक व्यवहारात पाळावी लागणारी मूल्ये जसे समता, न्यायप्रियता.

आदरणीय व्यक्ती हि नेहमीच आपल्या वागण्याचा आदर्श घालून देत असते. अशीच काही अपेक्षा भगवंतांनी आपल्या भक्तांकडून केली आहे.

यस्यास्ति भक्तिर्भगवत्यकिश्चना सर्वैर्गुणेस्तत्र समासते सुराः।

हरावभक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेनासति धावतो बहिः।।

(श्रीमद्भागवतम्-5.18.12)

जे भक्त परमात्म्याच्या भक्तीमधे तल्लीन झालेले असतात त्यांच्या ठायी समस्त देवदेवतांचे गुण दिसून येतात. पण ज्यांचे मन इतर विषयांत भरकटत असते त्यांच्या मधे असे महापुरुषांचे गुण नसतात.

ज्यांचे मन आणि बुद्धी परमेश्वराशी एकरूप झाले आहे ते इतरांना कधी त्रास देऊच शकणार नाहीत. ह्या श्लोकाचा अर्थ आधीच्या श्लोकाच्या अर्थासकट वाचला तर जास्त चांगल्या प्रकारे उमजेल.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

ज्याच्यामुळे इतरजण उद्विग्न होत नाहीत आणि जो इतरांमुळे उद्विग्न होत नाही, जो आनंद, दुःख, भय आणि निराशा ह्यापासून मुक्त आहे तो मला प्रिय आहे.

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः।

सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः।।12.16।।

यः अनपेक्षः, शुचिः, दक्षः, उदासीनः, गत-व्यथः, सर्व-आरम्भ-परित्यागी, मत्‌-भक्तः सः मे प्रियः।

 

यः जो यद् पु. प्र. ए. व.

अनपेक्षः अपेक्षारहीत

अनपेक्ष वि. पु. प्र. ए. व.

ईक्ष धातू पाहणे

अप + ईक्ष  अपेक्षा करणे

शुचिः पवित्र शुचि वि. पु. प्र. ए. व.

शुच् धातू शुद्ध होणे

दक्षः  सावध दक्ष वि. पु. प्र. ए. व.

दक्ष् धातू चतुर होणे

उदासीनः  तटस्थ

उद् +आस धातू बसणे शतृ प्रत्यय  पु. प्र. ए. व.

गत-व्यथः व्यथारहीत

गताः व्यथा यस्य सः सर्व-आरम्भ-परित्यागी, (सुखासाठी) नवीन गोष्टींचा आरंभ न करणारा

सर्वे आरम्भाः सर्वारम्भाः

सर्वरम्भस्य परित्यागं ष. तत्पुरुष

मत्‌-भक्तः माझा भक्त

मम भक्तः

सः तो तद् पु. प्र. ए. व.

मे मला अस्मद् सर्व. च. ए. व.

प्रियः वि. पु. प्र. ए. व.

 

आधीच्या दोन श्लोकांत आपण भक्तांचे 13 गुण पाहिले. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी भक्तांचे अजून सहा गुण सांगितले आहेत.

ह्या श्लोकांमधे एक विशेष मुद्दा नमूद करावासा वाटतो की भक्तांचे गुण सांगताना कुठेही पाप, पुण्य अशा शब्दांचा उल्लेख नाही. उलट निरपेक्ष अशा शब्दाचा उपयोग करून, योग्य तो अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. निरपेक्षता अशी की पुण्ण्याची सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही. शुद्धता ही अर्थात केवळ शारीरिक पातळीवर अपेक्षित नसून आंतरीक पवित्रता. दक्ष म्हणजे सावध, चतुर हा शब्द वापरून काय सुचवायचे आहे? भक्ती ही जाणीवपूर्वकच करायची आहे. स्वतःमध्ये इतके सर्व गुण अंगिकारल्यानंतर मनात जागृत झालेली समर्पणाची भावना म्हणजेच भक्तीयोग. असा साधू जो सुखदुःखांकडे तटस्थपणे पाहू शकतो, जो अजिबात विचलित होत नाही. ज्याच्या मनात सुख मिळवण्यासंबंधी काही आशाआकांक्षाच शिल्लक नाहीत तो आरंभशूर नाही पण दक्ष आहे.

अशा सात्विक भक्तांप्रती श्रीभगवानकृष्णांच्या मनात किती आदरभाव असतो हे सांगणारा एक श्लोक,

निरेपक्षं मुनिं शान्तं निर्वैरं समदर्शनम्।अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यङ्घ्रिरेणुभिः।।                                                       (श्रीमद्भागवतम् 11। 14। 16)

जे निरपेक्ष भावनेने, समदृष्टीने, शांतीपूर्वक, शत्रुत्व न ठेवता माझी भक्ती करतात अशा भक्तांच्या चरणांच्या धूळीने ह्या जगाला शुद्ध ठेवतो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जो (भक्त) अपेक्षारहीत, पवित्र, दक्ष, सुखदुःखांकडे तटस्थपणे पाहणारा, विचलित न होणारा आणि नवीन गोष्टींचा प्रारंभ न करणारा असा आहे तो मला प्रिय आहे.

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति।

शुभाशुभपरित्यागी भक्ितमान्यः स मे प्रियः।।12.17।।

यः न हृष्यति, न द्वेष्टि, न शोचति, न काङ्क्षति, यः शुभ-अशुभ-परित्यागी, भक्तिमान्‌ सः मे प्रियः ।

 

यः जो यद् पु. प्र. ए. व.

न हृष्यति, हर्षित होत नाही हृष् धातू लट लकार प्र.पु.ए.व

न द्वेष्टि, द्वेष करत नाही द्विष् धातू लट लकार प्र.पु.ए.व

न शोचति, शोक करत नाही शुच् धातू लट लकार प्र.पु.ए.व

न काङ्क्षति, कामना करत नाही कांक्ष् धातू लट लकार प्र.पु.ए.व

यः जो यद् पु. प्र. ए. व.

शुभ-अशुभ,

शुभं च अशुभं च

शुभाशुभे परित्यागी

परित्यागी पु. प्र. ए. व.

भक्तिमान्‌ भक्तिमत् वि. भक्ति +मतुप् प्रत्यय प्र. ए. व.

सः तो तद् पु. प्र. ए. व.

मे मला अस्मद् सर्व. च. ए. व.

प्रियः प्रिय पु. प्र. ए. व.

 

आपल्या सर्वांच्याच मनात शुभ, अशुभ च्या कल्पना अगदी खोलवर रूतून बसल्या आहेत. एखादा दिवस, एखादा रंग, एखादा प्राणी आणि एखाद्या व्यक्तीचे दर्शन सुद्धा शुभ, अशुभ मानले जाते. बरे ह्याला शास्त्रीय आधार मुळीच नाही. भक्तांची गुणवैशिष्ट्ये सांगण्याच्या निमित्ताने महर्षी व्यासांनी द्रष्टेपणा दाखवला आहे असे आवर्जून म्हणावेसे वाटते.

आधीच्या श्लोकात अनपेक्षः उदासीनः अशी गुणवैशिष्ट्ये सांगितल्यानंतर ह्या श्लोकात 'शुभाशुभपरित्यागी' हा गुण मुद्दाम सांगण्यासाठी हा श्लोक आहे. इतर गुणवैशिष्ट्ये ही 'शुभाशुभपरित्यागी' ह्या शब्दाला जोडून वाचल्यावर त्याचा अर्थ स्पष्ट होतो. ते केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवून  पुढे जात राहतात.

अशाच अर्थाचा आणखी एक श्लोक

यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति, न शोचति, न द्वेष्टि, न रमते, नोत्साही भवति ।। (नारद भक्ति सूत्र-5)

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

जे (एखादी गोष्ट प्राप्त झाली म्हणून) आनंदी होत नाहीत, किंवा (एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही म्हणून) दुःखी होत नाहीत. त्यांच्या कडे त्याची लालसा नसते ते इतरांचा द्वेष करत नाहीत. भक्तीभावाने परीपूर्ण असे, शुभ अशुभ अशा कल्पनांचा त्याग केलेले असे, मला प्रिय असतात.

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः।

शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः।।12.18।।

शत्रौ मित्रे च मान-अपमानयोः समः, शीत-उष्ण-सुख-दुःखेषु च समः, तथा सङ्ग-विवर्जितः।

 

शत्रौ शत्रु पु. स. ए. व.

मित्रे मित्र नपु स. ए. व.

 

मान-अपमानयोः

मानः च अपमानः च

समः, सम पु. प्र. ए. व.

शीत-उष्ण शीतं च उष्णं च

सुख-दुःखेषु च सुखं च दुःखं च

समः, सम पु. प्र. ए. व.

तथा अव्यय

सङ्ग-विवर्जितः आसक्तिरहीत

विवर्जितः वि+वृज धातू वर्जित करणे क्त प्रत्यय

विवर्जितः सडः येन सः

 

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येनकेनचित्।

अनिकेतः स्थिरमतिर्भक्ितमान्मे प्रियो नरः।।12.19।।

तुल्य-निन्दा-स्तुतिः, मौनी, येन केनचित्‌ सन्तुष्टः, अनिकेतः, स्थिर-मतिः, भक्तिमान्‌ नरः मे प्रियः।

 

तुल्य-निन्दा-स्तुतिः, निन्दा आणि स्तुती समान मानणारा

निन्दा च स्तुतिः च निन्दास्तुती

तुल्ये निन्दास्तुती यस्य सः

मौनी, मनन करणारा मौनिन् वि. पु. प्र. ए. व.

येन ज्या यद् पु. तृ. ए. व.

केनचित्‌ कोणत्याही प्रकारे अव्यय

सन्तुष्टः, सम +तुष् धातू संतुष्ट होणे क्त प्रत्यय प्र. ए. व.

अनिकेतः, निवास स्थान नसलेला न निकेतः विद्यते

स्थिर-मतिः, स्थिर बुद्धि, विचलित न होणारा

स्थिरा मतिः यस्य सः

भक्तिमान्‌ भक्तिमत् भक्ती मतुप प्रत्यय

नरः नर पु. प्र. ए. व.

मे मला अस्मद् च. ए. व.

प्रियो प्रियः वि. पु. प्र. ए. व.

 

आपल्या जीवनात आपण एकमेकांशी कसे वागतो त्यावरून त्या समाजाची मानसिकता समजते. आपल्या वागण्याबोलण्यात वर्षानुवर्षे चालत आलेल्या रूढी आणि परंपरा ह्यांचा खूप मोठा प्रभाव असतो. आपली न्यायव्यवस्था जे काही सर्वसामान्यांना मान्य असते, ज्यामुळे आपले आयुष्य सुलभ आणि सुखकर होईल असेच कायदे तयार करत असते.  ह्या प्रक्रियेत काही रूढी परंपरा पूर्णपणे बंद कराव्या लागतात,  त्याचे प्रमुख उदाहरण म्हणजे सतीची परंपरा. काही कायद्यांमधे काळानुरूप बदल होतात आणि मग काही परंपरा मागे पडतात. असे सर्व करताना कोणावरही अन्याय होऊ नये ह्याची पूर्ण खबरदारी घेतलेली असते.

जेव्हा दोन व्यक्तींमधे काही वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात त्यावेळी आपण कायद्याचा आधार घेतो, त्याही पुढे जाऊन आपण संविधानाचा आधार घेऊन त्यात सांगितलेल्या तरतूदींचा अभ्यास करतो. आपल्या संविधानाचा पायाच मुळी सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर आधारित आहे तो म्हणजे समता.

नेमका हाच मुद्दा भगवद्गीतेच्या ह्या दोन श्लोकांत नेटकेपणाने सांगितला आहे. फक्त तो वैयक्तिक पातळीवर सांगितला आहे. अशी समतोल वृत्ती सर्वांकडे असेल तर अटीतटीचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता कमीच.

ह्या श्लोकांत दोन्ही अंगांनी कसे वागायचे याचे विवेचन केले आहे म्हणजे आपल्याशी इतर लोक कसेही वागले तरी आपली त्यावर प्रतिक्रिया काय असेल आणि आपण स्वतः मित्र आणि शत्रू शी एकाच न्यायाने वागले पाहिजे हे दोन मुद्दे . आता प्रश्न असा येतो की चांगल्या गुणी माणसाला सुद्धा शत्रू असू शकतात का? अर्थात त्याचे उत्तर 'हो'असेच येते आहे. मात्र त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. येथे आदि शंकराचार्य आणि मंडन मिश्रा ह्यांच्या मध्ये घडलेला तात्विक वाद आणि त्या वादाचा निर्णय शंकराचार्यजींच्या बाजूने करणारी मिश्राजींची पत्नी हे उदाहरण देता येईल. हीच ती समता आणि न्यायप्रियता. अशाच वर्तनाची अपेक्षा ह्या श्लोकात केली आहे.

ज्याची बुद्धि समतोल त्याच्यासाठी साठी आप्त आणि शत्रू सारखेच. दुसर्‍या अध्यायातील 44 आणि 55 व्या श्लोकात स्थिरबुद्धिचे चांगले विवेचन केले आहे. स्थिरबुद्धि आणि आसक्ति ह्या दोन्ही भावना परस्पर विरोधी. येथे तर स्वतःच्या निवासस्थानाप्रती सुद्धा उदासीन वृत्ती सांगितली आहे. अशा व्यक्तीसाठी मान आणि अपमान, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख सारखेच आहेत, तो आसक्ती विरहित आहे, ज्याच्या साठी निंदा आणि स्तुती सुद्धा सारखेच आहे. त्यामुळे तो विचलित होत नाही तर सतत परमेश्वराचे चिंतन, मनन करत असतो. वासुदेवः सर्वम् (गीता 7.19) म्हणजे सर्व काही परमेश्वरच आहे.

 

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे सांगत आहेत की

ज्याचा साठी मित्र आणि शत्रू, मान आणि अपमान, शीत आणि उष्ण, सुख आणि दुःख सर्व सारखेच, जो आसक्ती विरहित आहे, ज्याच्या साठी निंदा आणि स्तुती समान, जो कायम चिंतनशील असतो, आहे त्या परिस्थितीत संतुष्ट असतो, त्याला स्वतःच्या निवासस्थानाप्रती सुद्धा आसक्ती नाही, ज्याची बुद्धि स्थिर आहे, असा भक्तीपूर्ण व्यक्ती मला प्रिय आहे.

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते।

श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः।।12.20।।

ये तु श्रद्दधानाः मत्‌-परमाः इदम्‌ यथा उक्तम्‌ धर्म्य-अमृतम्‌ पर्युपासते, ते भक्ताः मे अतीव प्रियाः ।

 

ये जे यद् पु. प्र. ब. व.

तु परन्तु अव्यय

श्रद्दधानाः श्रद्धा ठेवणारे

श्रत् +धा धातू धारण करणे शानच पु. प्र. ब. व.

मत्‌-परमाः  मला परम लक्ष्य मानणारे

अहं परमाः येषां ते

इदम्‌ हे नपु. द्वि. ए. व.

यथा जसे

उक्तम्‌ सांगितले उक्त नपु. द्वि. ए. व.

धर्म्य- नैतिक

अमृतम्‌ चिरकालीन

 धर्मस्य एव अमृतम्‌

धर्म्यं च तत अमृतम्‌ च द्वि. ए. व.

धर्म यत् प्रत्यय धर्म्य

पर्युपासते उपासना करतात परी +उप +आस् धातू लट लकार प्र.पु.ए.व

ते तद् पु. प्र. ब. व.

भक्ताः भक्त पु. प्र. ब. व.

मे मला अस्मद् च. ए. व.

अतीव अव्यय

प्रियाः प्रिय वि. पु. प्र. ब. व.

 

ह्या अध्यायाच्या सुरवातीला अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दुसर्‍या श्लोकापासून देता देता आता त्याचा शेवट ह्या विसाव्या श्लोकात केला आहे.

भक्तिमार्गाचा अर्थ अतिशय सुंदर पद्धतीने उलगडून दाखवताना भक्तांच्या ठायी अपेक्षित असणार्‍या गुणवैशिष्ट्यांचे सुद्धा वर्णन केले आहे.

यावत् सर्वेषु भूतेषु मद्भभावो नोपजायते ।

तावदेवमुपासीत वाङ्‍मन:कायवृत्तिभि: ॥ श्रीमद्भागवतम् 11.29.17।।

जो पर्यंत मनुष्य सर्व भूतां मधे माझे रूप पाहू शकत नाही तोपर्यंत त्याने आपली वाणी, मन आणि शरीर यांच्या साहाय्याने माझी उपासना करत राहिले पाहिजे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की जे भक्त केवळ माझी प्राप्ती हेच परम ध्येय ठेवून श्रद्धापूर्वक जसे सांगितले आहे तसे शाश्वत अनुष्ठानाची उपासना करतात ते मला अतिशय प्रिय असतात.

----------------------------------------------------🙏🙏🙏🙏---------------------------------------------------------------