गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8वा

                                                     श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8वा

गीतेच्या आठवां अध्यायाचे नाव अक्षरब्रह्मयोग असे आहे , ज्यामध्ये  28 श्लोक आहेत.

अर्जुन उवाच

 

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम।

अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते।।8.1।।

 

अर्जुन उवाच - हे पुरुषोत्तम! तत्‌ ब्रह्म किम्‌ ? अध्यात्मम्‌ किम्‌ ? कर्म किम्‌ ? अधिभूतम्‌ किम्‌ प्रोक्तम्‌ ? अधिदैवम्‌ च किम्‌ उच्यते ?

अर्जुन उवाच -

 हे पुरुषोत्तम!

तत्‌ ब्रह्म किम्‌ ? ते ब्रह्म तत्व काय?

अध्यात्मम्‌ किम्‌ ?

कर्म किम्‌ ?

अधिभूतम्‌ किम्‌

प्रोक्तम्‌ प्र +उक्तम्

 अधिदैवम्‌ च किम्‌

उच्यते वच् धातू

7व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात श्रीभगवानांनी ज्या दोन शब्दांचा उल्लेख केला त्या दोन शब्दांचा अर्थ अर्जुन ह्या श्लोकात श्रीकृष्णाला विचारत आहे.

हे पुरुषोत्तम

ते ब्रह्म (तत्व) म्हणजे काय?

अध्यात्म म्हणजे काय?

कर्म म्हणजे काय?

अधिभूत कशाला म्हणतात?

अधिदैव कशाला म्हणतात?

 

अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन।

प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः।।8.2।।

 

हे मधुसूदन! अत्र अस्मिन्‌ देहे अधियज्ञः कः कथम्‌ ? कथम्‌ च नियत-आत्मभिः प्रयाण-काले ज्ञेयः असि ?

हे मधुसूदन!

अत्र येथे

अस्मिन्‌ देहे ह्या देहामधे

अस्मिन्‌. इदम् सप्तमी ए. व.

अधियज्ञः

 कः  कोण 

कथम्‌ कशाप्रकारे

कथम्‌ कसे

च आणि

नियत-आत्मभिः नियमानुसार चालणारा आत्मा, संयमी आत्मा

 प्रयाण-काले शेवटच्या क्षणी

ज्ञेयः ज्ञा धातू जाणणे

 असि ? अस् धातू असणे

8व्या अध्यायातील पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात अर्जुनाने श्रीकृष्णाला एकूण 7 प्रश्न विचारले आहेत.

7व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी प्रयाण काळ असा पुसटसा उल्लेख केला होता त्यासंदर्भात सुद्धा अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न विचारत आहे.

(थोडक्यात 7 व्या अध्यायातील उल्लेख केलेल्या सर्व मुद्द्यांची ऊत्तरे आता मिळत जातील.

हे मधुसूदना

आपल्या देहात हा अधियज्ञ कसा काय रहात असतो.

मृत्यू समयी (तुझ्या चरणी लीन असलेला) संयमीत आत्मा तुझे स्मरण कसे करतो?

 

श्री भगवानुवाच

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते।

भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः।।8.3।।

 

श्रीभगवानुवाच - परमम्‌ अक्षरम्‌ ब्रह्म, स्वभावः अध्यात्मम्‌ उच्यते, भूत-भाव-उद्भव-करः विसर्गः कर्म-संज्ञितः।

श्रीभगवानुवाच -

 परमम्‌ श्रेष्ठतम श्रेष्ठ

अक्षरम्‌ टिकून राहणारा

अ + क्षर धातू वाहणे (वाहून जाणे)

 ब्रह्म, ब्रः + मत्

मत् बुद्धि

ब्रू धातू बोलणे

स्वभावः

अध्यात्मम्‌

उच्यते, वद् धातू बोलणे

भूत-भाव-उद्भव-करः भौतिक जग निर्माण करणारा

विसर्गः

वि +सर्ग

सृज् धातू सोडून देणे

कर्म

संज्ञितः संज्ञात असे म्हणतात.

सम +ज्ञा धातू जाणणे ज्ञात

8व्या अध्यायातील पहिल्या दोन श्लोकात जे प्रश्न अर्जुनाने विचारले त्यांची उत्तरे आता भगवान् देत आहेत.

श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

अक्षर म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असे श्रेष्ठ हे ब्रह्म आहे.

वेदांमध्ये श्रेष्ठ अविनाशी शक्तीला ब्राह्मण असे संबोधले आहे.

बृहदारण्यकोपनिषद् 3.8.8 आणि 3.8.9 ह्या श्लोकात  असेच उल्लेख आले आहेत.

ह्या शाश्वत अशा ब्रह्मा ला अध्यात्म असे म्हटले आहे.

अध्यात्म चा शाब्दिक अर्थ स्व चा शोध. स्वानुभूती. स्वानुभूती म्हणजे आत्मा शरीर मन बुद्धि ह्यांची ओळख. स्वभाव म्हणजे अध्यात्म.

ह्या भौतिक जगात आत्मा 14 लक्ष प्रकारे आपले अस्तित्व दाखवून देतो ज्यासाठी त्यागाची आवश्यकता असते. अशा यज्ञा- मधे जे काही अर्पण केले जाते त्याची फलनिष्पत्ती म्हणजे जीवात्मा जो आपल्या कर्माप्रमाणे सक्रिय होतो.

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत् |18.48

आपल्या वाट्याला आलेले जीवन हेच आपले कर्म. जरी ते दोषयुक्त असले तरी त्याचा त्याग करू नये. आपल्या कर्माचा विसर्ग करत रहा.

कार्यकारणकर्तृत्वे हेतु: प्रकृतिरुच्यते ।

पुरुष: सुखदु:खानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥13.21

गीतेतील हा श्लोक आपल्या कर्मानुसार मिळालेल्या बाह्य रुपाची कल्पना अधिक स्पष्ट करतो.

पुरुष आणि प्रकृती ह्यांचे परस्परसंबंध सांगितले आहेत.

 

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्।

अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर।।8.4।।

हे देह-भृताम्‌ वर! क्षरः भावः अधिभूतम्‌, पुरुषः अधिदैवतम्‌, अत्र देहे च अहम्‌ एव अधियज्ञः ।

हे देह-भृताम्‌ वर!

 क्षरः भावः नाशवन्त

क्षर धातू वाहून जाणे

अधिभूतम्‌, भौतिक अभिव्यक्ति

 पुरुषः सजीव रूपे

अधिदैवतम्‌,

अत्र देहे च

अहम्‌ एव

अधियज्ञः ।

आधीच्या श्लोकात तीन प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर आता पुढे श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

हे श्रेष्ठ देहधारी

7व्या अध्यायातील 5व्या श्लोकात सजीव सृष्टि चे विस्तृत वर्णन आपण पाहिले.

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान्गुणान्।

कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु।।13.22।।

प्रकृती मध्ये असलेला पुरुष प्रकृतीचा उपभोग घेतो आणि त्या प्रमाणे त्या गुणांच्या आधारे निरनिराळ्या योनींमधे प्रवेश करतो.

तस्यैष आदेशो यदेतद्विद्युतो व्यद्युतदा इतीन्न्यमीमिषदा इत्यधिदैवतम्‌ ॥ केनोपनिषद 4

पुरुष म्हणजे सर्जनशीलता जी सर्व लोकांत व्यापलेली आहे ते अधिदैवत आहे..

ब्रह्म अध्यात्म कर्म अधिभूत अधिदेव हे सर्व परमात्म्याने व्यापलेले आहे. सर्व यज्ञ हे त्याला संतुष्ट करण्यासाठीच केले जातात. म्हणजे तो परमात्मा हाच अधियज्ञ आहे

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना।

मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः।।9.4।।

अशा प्रकारे श्रीभगवानकृष्णांनी आतापर्यंत सहा प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

 

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्।

यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।।8.5।।

 

अन्त-काले यः माम्‌ एव स्मरन्‌ कलेवरम्‌ मुक्त्वा च प्रयाति, सः मत्‌ भावम्‌ याति, अत्र संशयः न अस्ति।

अन्त-काले अंतिम काळात

 यः जो

 माम्‌. एव माझे च

  स्मरन्‌  स्मरण

 कलेवरम्‌ नश्वर देह

 मुक्त्वा त्यागून

 

 प्रयाति प्रयाण करण्याची पद्धत

या धातू जाणे

सः तो

मत्‌ भावम्‌ मम भाव

 अस्मद पंचमी

 याति, जातो

अत्र इथे

संशयः

 न अस्ति। असत नाही

आता अर्जुनाने विचारलेल्या शेवटच्या म्हणजे 7 व्या प्रश्नाचे उत्तर ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण देत आहेत.

 

ह्या श्लोकातील कलेवर ह्या शब्दाचा अर्थ समजून घेतला तर ह्या श्लोकाचा अर्थ जास्त चांगला समजेल.

कले वर अशी शब्दाची फोड केली कि त्यातील वर म्हणजे श्रेष्ठ. वृ धातू शोधणे, नक्की करणे.

(वर वधूला नक्की करतो आणि स्वयंवर म्हणजे वधू स्वतः स्वतः साठी नक्की करते.)

नरवर म्हणजे नरांमधला श्रेष्ठ.

कल म्हणजे ओढा, प्रवृत्ती, अंगी असलेले गुण.

कलाकार

अक्कल

आपल्यासाठी कलेवर ह्या शब्दाचा अर्थ फक्त देह असा नाही तर त्या देहामधे असणारे गुणवैशिष्ट्ये. अंतिम क्षणांचे वर्णन करताना फक्त देहाचा त्याग न करता आपल्या मनातील सर्व भावनांचा, आशा आकांक्षांचा सुद्धा त्याग करणे अपेक्षित आहे.

(मृत्यू समयी अंतिम इच्छा विचारून ती पूर्ण करण्यासाठी धडपड करणे हे फक्त सिनेमातच शोभून दिसेल.)

महान व्यक्तींचे शेवटचे शब्द आपल्याला माहीत आहेत जसे येशू ख्रिस्त, महात्मा गांधी, गौतम बुद्ध वगैरे.

तर भगवानश्रीकृष्ण असे सांगत आहेत की जो अंतिम समयी मला स्मरण करतो, जो माझ्याशी एकरूप होतो त्याला माझे स्वरूप प्राप्त होते ह्यात काही शंकाच नाही.

ह्याचा असा सुद्धा अर्थ घेता येईल कि भले तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगला असाल पण अंतिम क्षणी जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल, तुम्ही पूर्णपणे शरणागती पत्करली असेल तर तुम्हाला सुद्धा भगवानांची प्राप्ती होईल.

 

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।

तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः।।8.6।।

हे कौन्तेय! अन्ते यम्‌ यम्‌ वा अपि भावम्‌ स्मरन्‌ कलेवरम्‌ त्यजति; सदा तद्त्‌ भाव-भावितः तम्‌ तम्‌ एव एति।

 

हे कौन्तेय!

अन्ते शेवटच्या क्षणी

 यम्‌ यम्‌ जे जे

 वा किंवा

अपि सुद्धा

 भावम्‌ भाव

स्मरन्‌ आठवून

कलेवरम्‌ नश्वर शरीर

त्यजति; त्याग करणे

 सदा नेहमी

 तद्त्‌ भाव-भावितः

 तम्‌ तम्‌ ते ते

एव नक्कीच

एति जातो

इ धातू जाणे

कलेवर ह्या शब्दातील कल ह्या शब्दाचा अर्थ ओढा, प्रवृत्ती असा होतो.

 

आपले शरीर तर नश्वर आहेच पण त्याबरोबरच आपल्या कडे असणार्‍या प्रवृत्तींचा सुद्धा त्याग करणे अपेक्षित आहे.

श्रीमद्भगवत महापुराणातील कथेप्रमाणे राजा भरताला हरिणाचा पुनर्जन्म मिळाला होता कारण मृत्यू समयी त्याच्या जवळ हरिणाचे पिल्लू होते त्याचेच विचार भरताच्या मनात चालू होते.

ह्या श्लोकात श्रीभगवान असे सांगत आहेत की

हे कौन्तेय,

अंतिम समयी आपल्या मनात ज्या भावना, जे विचार चालू असतात तेच विचार घेऊन तो नवीन शरीर धारण करतो.

 

यं यं लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान्‌।

तं तं लोकं जयते तांश्च कामां-स्तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत्‌ भूतिकामः ॥ मुण्डकोपनिषद् 3

 

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च।

मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।।8.7।।

तस्मात्‌ सर्वेषु कालेषु माम्‌ अनुस्मर, युध्य च मयि अर्पित-मनः-बुद्धिः। असंशयम्‌ माम्‌ एव एष्यसि।

 

तस्मात्‌ त्यामुळे

तद् पंचमी एकवचन

सर्वेषु कालेषु पूर्ण काळ

माम्‌ मला

 अनुस्मर, आठव

अनु + स्मर धातू आठवणे

 युध्य लढ

युध् धातू लढणे परस्मैपदी मध्यमपुरुष

च आणि

 मयि माझ्यात

अर्पित समर्पित

मनः-बुद्धिः। मन आणि बुद्धी

असंशयम्‌ निःसंशय

माम्‌  मला

एव नक्कीच

 एष्यसि। प्राप्त होईल

इ धातू जाणे

एक व्याकरणाच्या दृष्टीने संदर्भ देते. 3 र्या अध्यायातील 30 व्या श्लोकात युद्धस्व विगतज्वरः असा उल्लेख केला आहे.

येथील युद्धस्व चे व्याकरण 8व्या अध्यायातील 7 व्या श्लोकात असलेल्या युध्य ह्या शब्दाचे व्याकरण वेगळे आहे. असे महर्षी व्यासांनी का केले असावे करा बरे विचार.

आता अर्थाकडे वळू. आधीच्या श्लोकाचा अर्थ समजून घेतल्यानंतर हा श्लोक सहज समजतो.

आपल्याला आपल्या मृत्युची वेळ निश्चित माहित नसते, त्यामुळे परमेश्वराशी एकरूप व्हायचे असेल तर सतत त्याचे स्मरण करणे आवश्यक आहे.

म्हणूनच श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

म्हणूनच सर्व काळ तू माझे स्मरण कर आणि तुझे युद्ध करण्याचे कर्तव्य पार पाड. (सर्वेषु कालेषु हे शब्द युद्ध्य ला जोडून न घेता वेगळा मुद्दा म्हणून वाचायला हवा) ह्यामागे एक महत्वाचा संदेश सुद्धा दिला आहे जसे श्रीकृष्णाचे स्मरण करताना आपल्या कर्तव्याचा विसर पडू देऊ नये.

असे मन आणि बुद्धी दोन्ही पातळ्यांवर मला समर्पण केल्यास निःसंदेह तुला माझी प्राप्ति होईल.

सुमिरन की सुधि यों करो, ज्यौं गागर पनिहार।

बोलत डोलत सुरति में, कहे कबीर विचार ।।

परमेश्वराचे असे स्मरण करा जसे गावातील डोक्यावरुन पाण्याचा हंडा घेऊन चालत जाणाऱ्या महिला त्या हंड्याचा विचार करतात.

 

अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना।

परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्।।8.8।।

हे पार्थ! अभ्यास-योग-युक्तेन न अन्य-गामिना चेतसा अनुचिन्तयन्‌, परमम्‌ दिव्यम्‌ पुरुषम्‌ याति ।

 

हे पार्थ!

 अभ्यास-योग-युक्तेन अभ्यास आणि योग

 

अन्य इतरत्र

गामिना गामिन्

गच्छन् गम धातू जाणे

 चेतसा चेतस् बुद्धि

अनुचिन्तयन्‌ अनु +चिन्तयन्

चिन्त् धातू चिंतन करणे

 परमम्‌ श्रेष्ठ

 दिव्यम्‌ दिव्य

 पुरुषम्‌

याति जातो

या धातू जाणे

परमेश्वराचे सतत चिंतन करावे हा विचार गीतेमध्ये अनेक वेळा मांडला आहे

1. अनन्यचेताः सततं 8.14

2. मय्येव मन आधत्स्व 12.8

3. तेषां सततयुक्तानां 10.10

7व्या अध्यायातील 27 व्या श्लोकात द्वंद्व ह्या शब्दाचे विवेचन केले आहे. ह्या श्लोकात अभ्यास आणि योग हे शब्द वापरले आहेत आणि परमेश्वराचे असे चिंतन अपेक्षित आहे , जेथे सर्व द्वंद्व समाप्त झाली आहेत, एकाग्रता साध्य झाली आहे आणि मन दुसरी कडे कुठेही विचलित होत नाही आहे . असे परमेश्वराचे स्मरण केले असता त्याला श्रेष्ठ दिव्यत्व प्राप्त होते.

 

कविं पुराणमनुशासितार  मणोरणीयांसमनुस्मरेद्यः।

सर्वस्य धातारमचिन्त्यरूप मादित्यवर्णं तमसः परस्तात्।।8.9।।

यः कविम्‌, पुराणम्‌, अनुशासितारम्‌, अणोः अणीयांसम्‌, सर्वस्य धातारम्‌, अचिन्त्य-रूपं, तमसः परस्तात्‌ आदित्य-वर्णम्‌ अनुस्मरेत्‌।

 

यः जो

 कविम्‌  कवी

 पुराणम्‌, पुराणातील

 अनुशासितारम्‌ अनुशासितृ

 अणोः  अणु (पं. ए. व)

अणीयांसम्‌, अणूंचा अणु

सर्वस्य सर्वांचे

सर्व ष. ए. व.

धातारम्‌, धा धातू धारण करणे.

 अचिन्त्य विचार न करण्यासारखे

अ+चिन्त्य

रूपं रूप

 तमसः तमस् अंधकार

परस्तात्‌ पलिकडे

पर अस्ताति

आदित्य-वर्णम्‌ सूर्यासारखे तेज

 अनुस्मरेत्‌ आठवावे

अनु +स्मृ

हा श्लोक मला प्राचीन ज्ञान याविषयी जास्त महत्वाचा वाटतो. महर्षी कणाद यांनी अॅटम म्हणजे अणू बद्दल लिहून ठेवले आहेच. गीतेच्या ह्या श्लोकात अणूंचा अणू असा स्पष्ट उल्लेख आहे.

ह्या श्लोकात कवी म्हणजे सर्व काही जाणणारा, सर्वज्ञ असा अर्थ घ्यायचा. ह्या श्लोकात परमात्म्याचे आठ गुण सांगितले आहेत.

 

जो पुरुष सर्वज्ञ असून भूत वर्तमान आणि भविष्यकाळ जाणतो, अनादि, समस्त जगाचा शासक, सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्टींचा धारणकर्ता, पालनकर्ता, कल्पनाशक्ती च्या पलिकडे असे ज्याचे रुप, सूर्यासारखा तेजस्वी, अज्ञानाच्या अंधकारापासून दूर अशा परमात्म्याचे स्मरण करतो त्याचे स्मरण करताना तो त्याला प्राप्त होतो.

अशाच अर्थाचा आणखी एक श्लोक

वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमसः परस्तात्‌।

तमेव विदित्वातिमृत्युमेति नान्यः पन्था विद्यतेऽयनाय॥ श्वेताश्वतरोपनिषद् 3.8।।

 

प्रयाणकाले मनसाऽचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव।

भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम्।।8.10।।

भक्त्या युक्तः सः प्रयाण-काले योग-बलेन भ्रुवोः मध्ये प्राणम्‌ सम्यक्‌ आवेश्य, अचलेन मनसा, च तम्‌ दिव्यम्‌ परम्‌ पुरुषम्‌ एव उपैति।

 

भक्त्या भक्तिने

 भक्ति (तृ ए. व.)

 युक्तः

 सः तो

प्रयाण-काले अंतिम समयी

 योग-बलेन योगबलाच्या साह्याने

योग बल

 भ्रुवोः दोन भुवया

मध्ये

 प्राणम्‌ प्राण

सम्यक्‌ पूर्णपणे

आवेश्य, केंद्रीत करणे

आ+ विश् धातू प्रवेश करणे

 अचलेन निश्चल

 मनसा, मन

च सुद्धा

तम्‌ तो

दिव्यम्‌ दिव्य

परम्‌ श्रेष्ठ

पुरुषम्‌ पुरुष

एव खरोखर

उपैति जवळ जाणे

उप +इ धातू जाणे

अर्जुनाने दुसर्‍या श्लोकात विचारलेला शेवटचा प्रश्नाचे उत्तर भगवानांनी अनेक प्रकारे निरनिराळ्या श्लोकात दिली आहेतच त्याचबरोबर शिवाय सतत योगाभ्यासात मग्न रहावे असेही सुचवत आहेत असे वाटते (कारण मरण कधी येणार हे आपल्याला माहित नसते आणि अस्वस्थ असताना योगाभ्यास करणे अवघडच. म्हणजे स्वस्थ राहून प्राणायाम करीत असताना मरण येणे चांगले हेच तर सुचवायचे नसेल?)ह्या श्लोकातील योगबलेन हा शब्द तेच सुचवतो. योग सतत करत राहिल्यानेच बळ प्राप्त होईल.

 

श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

अंतिम समयी जो आपली प्राणशक्ति आपल्या योगशक्तीने, आज्ञा चक्रावर केंद्रीत करून मन निश्चल करून परमात्म्याचे स्मरण करेल तो त्याच्या जवळ पोहोचू शकेल.

 

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः।

यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये।।8.11।।

वेद-विदः यत्‌ अक्षरम्‌ वदन्ति, वीत-रागाः यतयः यत्‌ विशन्ति, यत्‌ इच्छन्तः ब्रह्मचर्यम्‌ चरन्ति, तत्‌ पदम्‌ ते संग्रहेण प्रवक्ष्ये।

 

वेद-विदः वेद जाणणारा

 यत्‌ ज्या

 अक्षरम्‌ टिकून राहणारा

अ +क्षर धातू वाहणे

 वदन्ति, सांगतात

वद् धातू बोलणे

 वीत-रागाः राग निघून गेलेला

वि +इ धातू जाणे

 यतयः नियमांचे काटेकोर पालन करणारा

यम यती

यत्‌  ज्याचे

विशन्ति विश् धातू प्रवेश करणे

यत्‌ जो

इच्छन्तः इच्छा करणारा

ब्रह्मचर्यम्‌

चरन्ति, चर धातू हालचाल करणे

 तत्‌ त्याचे

पदम्‌ पद स्थिति स्थान

ते तुला

संग्रहेण संग्रहाने

प्रवक्ष्ये। मी सांगेन

प्र +वच् धातू बोलणे

वेदांमध्ये परमेश्वराला वेगवेगळ्या नावांनी संबोधले आहे त्यापैकी एक म्हणजे अक्षर.

खालील श्लोकात पण अक्षर असे संबोधले आहे

एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गि सूर्यचन्द्रमसौ विधृतौ तिष्ठतः।

बृहदारण्यकोपनिषद्-3.8.9

संग्रहेण ह्या शब्दाचा अर्थ 'संक्षिप्त ' असा घ्यायचा. सार म्हणजे थोडक्यात.

4 थ्या अध्यायात परमेश्वराच्या निर्गुण निराकार रुपाची चर्चा करून झाली आहे.

6व्या अध्यायात 14 व्या श्लोकात योगतत्वाचे आचरण करणारा असा प्रशांतात्मा असा उल्लेख आला आहे.

आता पुढे श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जे वेद जाणतात ते त्याला अक्षर असे म्हणतात ; जे रागरहित, प्रयत्नशील पुरुष ब्रह्म तत्त्वात (आचरण) प्रवेश करतात जे स्व इच्छेने ब्रह्मचर्य चे पालन करतात, त्या उद्दिष्ट, ध्येयास्थानाबददल मी तुला थोडक्यात सांगेन.

 

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च।

मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम्।।8.12।।

सर्व-द्वाराणि संयम्य, मनः हृदि च निरुध्य आत्मनः, प्राणम्‌ मूर्ध्नि आधाय, योग-धारणाम्‌ आस्थितः।

 

सर्व-द्वाराणि सर्वद्वारः सर्व दारे

 संयम्य, निग्रह करून

सम +यम धातू प्रतिबंध करणे

मनः मन

हृदि च हृदयात सुद्धा

हृद सप्तमी एकवचन

निरुध्य रोखून धरणे

नि +रुध् धातू थांबवणे

आत्मनः, आत्मन्

प्राणम्‌ प्राणशक्ति

मूर्ध्नि डोक्यात

मूर्धन्

आधाय,

आ +धा धातू धारण करणे

 योग-धारणाम्‌ योगधारणा

आस्थितः। स्थित असणे

आ +स्था

योगाभ्यास करते वेळी प्रत्याहार करणे म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांचे काम रोखून ठेवणे आवश्यक.

नाक कान डोळे जीभ आणि स्पर्श ही सर्व द्वारे बंद करून,

आपले मन आपल्या हृदयात स्थानबद्ध करून, आपली प्राणशक्ति आपल्या मेंदूत एकत्रित करून योगसाधनेतील चिंतनात मग्न झाले पाहिजे.

 

ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।

यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्।।8.13।।

यः ओम्‌ इति एक-अक्षरम्‌ ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌, देहम्‌ त्यजन्‌ प्रयाति, सः परमाम्‌ गतिम्‌ याति।

 

यः जो

ओम्‌ इति ओम असे

 एक-अक्षरम्‌ एक अक्षर

 ब्रह्म ब्रहमतत्व

 व्याहरन्‌  कथन करणे

वि+आ +हृ धातू

 माम्‌ मला

अनुस्मरन्‌, आठवून

अनु +स्मृ

 देहम्‌ देह

 त्यजन्‌ त्यागून

प्रयाति, जातो

प्र +या धातू जाणे

 सः तो

परमाम्‌ गतिम्‌ श्रेष्ठ स्थान /दर्जा

याति। पोहोचणे.

अ-उ-म ही तीन अक्षरे समाविष्ट असलेल्या ओम ह्या पवित्र अक्षराला प्रणव असे म्हणतात. जे परमेश्वराचे निर्गुण निराकार रुपाचे दर्शन घडवतो.

ह्या श्लोकातील व्याहरन् हा शब्द महत्त्वाचा.

व्याहरन् व्याहृति म्हणजे सांकेतिक शब्द जे आपल्याला दक्ष रहायला सांगतात.

जसे सावधान.

तसे वैदिक साहित्यात 7 व्याहृति आहेत. त्यापैकी 3 महाव्याहृति ज्या आपण गायत्री मंत्र म्हणायच्या आधी म्हणतो.

7 व्याहृति खालील प्रमाणे

ॐ भू: ------ मूलाधार चक्र,

ॐ भुवः ---- स्वाधिष्ठान चक्र,

ॐ स्वः ----- मणिपुर चक्र,

ॐ महः ---- अनाहत चक्र,

ॐ जनः -- -- विशुद्धि चक्र,

ॐ तपः ------ आज्ञा चक्र,

ॐ सत्यम् --- सहस्त्रार ||ऋग्वेदातील 3र्या मंडलातील 62 व्या सूक्तातील 10 वा मंत्र

"तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि, धियो योनः प्रचोदयात् |"

 

श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात असे म्हणतात की अंतिम समयी देह त्याग करत असताना ओम ह्या पवित्र शब्दाचे उच्चारण करत करत जो मला स्मरण करतो त्याला परमगति प्राप्त होते.

 

अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः।

तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः।।8.14।।

हे पार्थ! यः अनन्य-चेताः नित्यशः सततं माम्‌ स्मरति, नित्य-युक्तस्य तस्य योगिनः अहं सुलभः ।

 

हे पार्थ!

यः जो

अनन्य अन्यत्

न +अन्यः

चेताः चेतसि मन

नित्यशः नियमित

सततं सतत

माम्‌ माझे

स्मरति, स्मृ धातू स्मरण करणे

नित्य युक्तस्य शाश्वत योग

तस्य त्याचे

योगिनः योगी

अहं मी

सुलभः सहज

अन्याश्रयाणां त्यागोऽनन्यता ।। (नारद भक्ति दर्शन सूत्र-10)

"भगवान को छोड़कर दूसरे आश्रयों के त्याग का नाम अनन्यता है।"

ह्या श्लोकातील अनन्य शब्द महत्त्वाचा आहे. ह्याचा अर्थ न अन्य. म्हणजे इतर कोणीही नाही. असा उल्लेख गीतेच्या

इतर श्लोकात पण दिसून येतो. अनन्याश्चिन्तयन्तो मां (9.22), तमेव शरणं गच्छ (18.62), मामेकं शरणं व्रज। (18.66)

 

"मामेकमेव शरणमात्मानं सर्वदेहिनाम्।"

(श्रीमदभागवतम्-11.12.15)

ह्या श्लोकातील दुसरा महत्त्वाचा शब्द नित्ययुक्त

नित्य म्हणजे शाश्वत.

बौद्ध तत्वज्ञानाप्रमाणे अनिक्क म्हणजे तत्कालिन.

सुखाचे क्षण आणि दुःख येतात आणि जातात. म्हणजे ते सर्व अनिक्क (अनित्य) आहे

म्हणजेच नित्य शाश्वत आहे. पाश्चात्य तत्वज्ञानात, हेरॅकलिटस(Heraclitus)  ह्या ग्रीक तत्ववेत्त्याने पांटार्ही(panta rhei) म्हणजे सर्व काही वाहून जाते (everything flows) असे सांगितले.

परमेश्वराकडे पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग जसे कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग.

ह्या श्लोकात भक्ति मार्गाचा उल्लेख केला आहे.

मराठी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार भक्तीचे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून वेगवेगळे प्रकार मानण्यात आले आहेत. सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असे दोन प्रमुख प्रकार होतात. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य व माधुर्य असे पाच प्रकारही मानण्यात आले आहेत. मनात काहीतरी हेतू बाळगून केली जाणारी ती हैतुकी भक्ती आणि निर्हेतुकपणे केली जाणारी ती अहैतुकी भक्ती होय. हैतुकी ही ‘गौणी’ व ‘अहैतुकी’ ही ‘मुख्या’ वा ‘परा’ भक्ती मानली जाते. यांपैकी हैतुकीचे सात्त्विकी, राजसी व तामसी असे तीन पोटप्रकारही सांगण्यात आले आहेत. शास्त्रांना अनुसरुन केली जाणारी व गौण असलेली वैघी भक्ती आणि ईश्वरावरील नितान्त प्रेम दर्शविणारी व प्रमुख असलेली रागात्मिका भक्ती, असेही दोन प्रकार आहेत. गौणी भक्ती करणाऱ्या भक्ताचे आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्था असे तीन प्रकार पाडण्यात आले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन हे भागवतपुराणाने सांगितलेले भक्तीचे नऊ प्रकार आहेत. या प्रकारांची संख्या नऊ असल्यामुळेच या भक्तीला ‘ नवविधा ‘ भक्ती असे नाव रुढ झाले आहे. नारदाने गुणमाहात्म्य, रुप, पूजा, स्मरण, दास्य, सख्य, कांताभाव, वात्सल्य, आत्मनिवेदन, तन्मयता व परमविरह अशा अकरा आसक्तींमध्ये भक्तीचे वर्गीकरण केले आहे.

श्रीभगवानकृष्ण असे म्हणताहेत की

हे पार्थ

जो योगी निरंतर भक्तिमधे तल्लीन झाला आहे जो फक्त माझेच चिंतन करतो त्याला मी सहज प्राप्त होतो.

 

मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्।

नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः।।8.15।।

परमाम्‌ संसिद्धिम्‌ गताः महात्मानः माम्‌ उपेत्य, दुःख-आलयम्‌ अशाश्वतम्‌ पुनः जन्म न आप्नुवन्ति।

 

परमाम्‌ परम श्रेष्ठ

 संसिद्धिम्‌ पूर्णत्व

 गताः पोहोचले

 महात्मानः महान आत्मा

माम्‌ मला

उपेत्य प्राप्त करणे

उप + इ धातू जाणे

दुःख-आलयम्‌ दुःखाचे घर

अशाश्वतम्‌ क्षणिक

 पुनः जन्म पुर्नजन्म

 न आप्नुवन्ति। प्राप्त होत नाही

आप धातू प्राप्त करणे मिळणे.

मला प्राप्त केल्यानंतर हे महात्मा योगी परत या दुःखी अनित्य जगात येत नाहीत कारण त्यांनी तशी सिद्धि प्राप्त केलेली असते.

 

आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन।

मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते।।8.16।।

हे अर्जुन! आब्रह्म-भुवनात्‌ लोकाः पुनः-आवर्तिनः; हे कौन्तेय! माम्‌ उपेत्य पुनः जन्म तु न विद्यते।

 

हे अर्जुन!

 आब्रह्म-भुवनात्‌ ब्रह्म लोकांपासून

आ+ब्रह्म

 लोकाः सर्व लोक

 पुनःआवर्तिनः    पुनरावृत्ती

हे कौन्तेय!

 माम्‌ मला

उपेत्य प्राप्त करणे

 पुनः जन्म पुर्नजन्म

 तु परन्तु

न विद्यते मिळत नाही

पृथ्वी स्वर्ग आणि नरक ह्या कल्पना आपल्याला चांगल्याच माहीत आहेत. ह्याचे पण वेगवेगळे थर आहेत जसे वैदिक ग्रंथांमध्ये पृथ्वी च्या खाली सात लोक, तल, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल,आणि पाताळ असे वर्णन केले आहे.

पृथ्वीच्या वर सात लोक-भूः, भूवाः, स्वाः, महाः, जनः, तपः, आणि सतयः लोक अस्तित्वात आहेत असे मानले जाते. ह्या सर्वांना 'स्वर्ग' या 'देवलोक' असे म्हणतात.

यहुदी आणि मुस्लिम धर्मात सुद्धा सात स्वर्ग मानले जातात. सातवा आसमान म्हणतात ते हेच.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

ब्रह्म लोकांपासून सर्वच लोकांचा पुनर्जन्म (पुनरावृत्ती) शक्य आहे पण जे मला प्राप्त करतात त्यांना मात्र मुक्ति मिळते.

 

सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदुः।

रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः।।8.17।।

ब्रह्मणः यत्‌ सहस्र-युग-पर्यन्तम्‌ अहः युग-सहस्र-अन्ताम्‌ रात्रिम्‌ विदुः ते जनाः अहोरात्र-विदः।

 

ब्रह्मणः

 यत्‌ ते

सहस्र-युग-पर्यन्तम्‌

अहः दिवसा

अहस्

 युग-सहस्र-अन्ताम्‌

रात्रिम्‌ रात्री

विदुः जाणणे

विद् धातू

ते.

 जनाः लोक

अहोरात्र- दिवसरात्र

विदः ।।जाणतात

वैदिक गणनेप्रमाणे  युगांची मोजणी खाली दिल्याप्रमाणे आहे

कलियुग - 432,000 वर्ष

द्वापरयुग - 8,64,000 वर्ष

त्रेतायुग - 1,296,000 वर्ष

सतयुग - 1,728,000 वर्ष

ह्या सर्वांचे एक महायुग - 4,320,000 वर्ष.

दिवस आणि रात्रीच्या 24 तासात दिवसा 15 आणि रात्री 15 मुहूर्त, एकूण 30 मुहूर्त असतात. म्हणजेच एक मुहूर्त 48 मिनिटांचा (2 घटीका) असतो.

 

मुहूर्त चे नाम    प्रारंभ    समाप्त वेळ

रुद्र                   06.00         06.48

आहि             06.48               07.36

मित्र                07.36.          08.24

पितृ                08.24              09.12

वसु                09.12              10.00

वराह             10.00               10.48

विश्‍वेदेवा       10.48        11.36

विधि             11.36               12.24

सप्तमुखी             12.24        13.12

पुरुहूत          13.12    14.00

वाहिनी          14.00    14.48

नक्तनकरा          14.48            15.36

वरुण             15:36                  16:24

अर्यमा          16:24    17:12

भग                 17:12          18:00

गिरीश            18:00                 18:48

अजपाद       18:48          19:36

अहिर बुध्न्य      19:36   20:24

पुष्य                 20:24.      21:12

अश्विनी         21:12      22:00

यम                22:00               22:48

अग्नि             22:48               23:36

विधातॄ         23:36.     24:24

कण्ड            24:24    01:12

अदिति         01:12         02:00

जीव/अमृत      02:00        02:48

विष्णु            02:48    03:36

युमिगद्युति        03:36                  04:24

ब्रह्म              04:24                05:12

समुद्रम.        05:12.  06:00

ह्या श्लोकात श्रीभगवान असे म्हणतात की

ब्रह्माचा एक दिवस एकसहस्र महायुगाचा आणि रात्र सुद्धा तशीच एक सहस्र महायुगाची (कल्प)

ज्यांना ब्रह्माचा दिवस आणि रात्र माहीत आहे त्यांना दिवसरात्रीबददल माहिती आहे.

 

अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे।

रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके।।8.18।।

सर्वाः व्यक्तयः अहः आगमे अव्यक्तात्‌ प्रभवन्ति, रात्रि आगमे तत्र अव्यक्त-संज्ञके एव प्रलीयन्ते।

 

सर्वाः सर्व

व्यक्तयः व्यक्ति

अहः आगमे दिवसाची सुरुवात

अहः  दिवस

 आगमे येणारा

आ +गमे

अव्यक्तात्‌ व्यक्त न झालेला

अव्यक्तं - न व्यक्तं

 प्रभवन्ति,

प्र +भवन्ति प्रकर्षेण भवति

प्र +भू धातू

 रात्रि आगमे रात्री च्या सुरवातीला

तत्र तेथे

 अव्यक्त-संज्ञके

सम +ज्ञा धातू समजून घेणे

एव प्रलीयन्ते।

प्र +ली धातू विरघळून जाणे लिनाति

प्रलय, लयास जाणे.

आधीच्या श्लोकात आपण ब्रह्मा च्या दिवस आणि रात्री ची व्याप्ती पहिली. आता पुढे श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

ब्रह्मा च्या दिवसाच्या शुभारंभापासून अप्रकट व्यक्ति प्रगट होतात आणि ब्रह्माच्या रात्रीची सुरवात झाली की सर्व जण अप्रकट अवस्थेत परत जातात.

 

भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते।

रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे।।8.19।।

हे पार्थ! सः एव अयम्‌ भूत-ग्रामः अवशः भूत्वा भूत्वा रात्रि आगमे प्रलीयते अहः आगमे प्रभवति।

 

हे पार्थ!

सः ते

एव सुद्धा

 अयम्‌ ते

भूत-ग्रामः जीवांचा समूह

अवशः वश नसणे

अ +वशः

भूत्वा भूत्वा होऊन होऊन

भू धातू होणे

रात्रि आगमे रात्रीची सुरवात

प्रलीयते विलीन होते

प्र +ली धातू

अहः आगमे दिवसाची सुरुवात

प्रभवति। प्रभाव असतो

प्र +भू धातू.

आधीच्या आणि ह्या श्लोकात प्रलीयते हा शब्द आला आहे.

ह्याचा अर्थ प्रलय.

प्रत्येक संस्कृतीमधे प्रलयाच्या कल्पना विषद केलेल्या दिसतात फक्त इजिप्त आणि जपानी संस्कृती ह्याला अपवाद.

प्रलयाच्या कल्पने मागे पुर्ननिर्मिती हा उद्देश असावा. अतिवृष्टी, बर्फ वितळणे, अग्नी, सूर्य, वादळ, हिवाळा इ. कारणांनी प्रलय झाल्याच्या कथा आहेत. आणि तसे घडले सुद्धा आहे.

प्रलयाचे स्वरूप साधारण असे - एखाद्या देवतेच्या (किंवा क्वचित कृष्णसर्पासारख्या दुष्टशक्तीच्या) कोपाने प्रलय होणे, एखाद्या सदाचरणी पुरुषाला पूर्वसूचना मिळाल्याने त्याने नौका, पेटी इ. साधनांचा उपयोग करून प्रलयातून वाचणे, भावी प्रलयाची सूचना देवता वा एखादा प्राणी याजकडून मिळणे, पुनर्निर्मितीसाठी सर्व प्राणिमात्रांची बीजे प्रलयातून वाचणे, प्रलयानंतर वाचलेल्या व्यक्तीने यज्ञ करणे, पुन्हा निर्मिती होणे इ. घटना या जगातील बहुसंख्या प्रलयकथांतून कमीजास्त फरकाने वर्णिलेल्या आढळतात.

जे. जी. फ्रेझरच्या मते प्रलयकथा ऐतिहासिक घटनांवर आधारलेल्या नसून पर्वत, समुद्र, दऱ्या इ. निसर्गघटनांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण करण्यासाठी तयार झाल्या आहेत. उदा., ड्यूकेलिअनची ग्रीक प्रलयकथा ही थेसलीच्या पर्वतांत निर्माण झालेल्या फटीचे स्पष्टीकरण देण्यासाठी तयार झाली आहे.

 

द बाइबल’ मधे  विशाल जल प्रलय अशी कथा आहे , ज्यामध्ये असे वर्णन आहे कि  पृथ्वी पाण्यात बुडाली (

हजरत नूह  ने एक मोठी नाव आणून सर्व प्राण्यांच्या  एक-एक जोड़ी ला वाचवले होते.

हिन्दू शास्त्रांमध्ये चार प्रकारच्या प्रलयांचे वर्णन आहे नित्य, नैमित्तिक, द्विपार्थ आणि प्राकृत.

नित्य प्रलय    

वेंदांतानुसार सर्वसाधारण होणारे मृत्यु ला नित्य प्रलय असे नाव आहे जन्म झाला की मृत्यु अटळ ही सर्वमान्य कल्पना आहे.

 

2.आत्यन्तिक प्रलय : ह्यामध्ये योगीजन आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्याने ब्रहमतत्वात विलीन होतात. म्हणजेच त्यांना मोक्ष प्राप्त होतो.

 

3.नैमित्तिक प्रलय : वेंदांतानुसार  प्रत्येक कल्पाच्या शेवटी तीनही लोकांचा क्षय म्हणजे पूर्ण विनाश होतो. ब्रह्माचा एक दिवस समाप्त होतो , त्यावेळी विश्वाचा नाश होतो. हे सर्व आपण विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर हिम युग वगैरे शी ह्याचा संबंध जोडता येईल. कारण नैमत्तिक प्रलयकालात अती वृष्टी, वादळे, अती भयंकर सूर्याची उष्णता अशी वर्णने आहेत.

 4.प्राकृत प्रलय : ह्यामधे पूर्ण सूर्य मालेचा नाश होणे अपेक्षित आहे. न जल ना वायू ना पृथ्वी,ना आकाश न अग्नि. तिन्ही लोकांचा नाश म्हणजे प्राकृत प्रलय.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे पार्थ

हा तोच जीवांचा समूह आहे जो पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन नष्ट होतो. ब्रह्माच्या दिवसाच्या सुरवातीला उत्पन्न होतो आणि ब्रह्माच्या रात्रीबरोबर अपरिहार्यपणे नष्ट होतो, विलीन होतो.

 

परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः।

यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति।।8.20।।

तस्मात्‌ अव्यक्तात्‌ तु परः अन्यः यः सनातनः अव्यक्तः भावः सः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति।

 

तस्मात्‌ त्या पासून

तद् पंचमी एकवचन

अव्यक्तात्‌ अप्रकटलेला

अव्यक्त

तु परन्तु

परः अलौकिक

अन्यः

यः जो

सनातनः शाश्वत

अव्यक्तः

भावः

सः तो

सर्वेषु सर्व

भूतेषु जीव

नश्यत्सु  नाश होत असताना

न विनश्यति। नाश होत नाही

आधीच्या श्लोकात प्रलयासंबंधी विस्तृत माहिती वाचल्यानंतर अर्थातच मनात प्रश्न येणे स्वाभाविक आहे, मग बाकी शिल्लक काय उरते?

त्याचेच उत्तर पुढे.

ह्या श्लोकात श्रीभगवान असे म्हणतात की

ह्या अव्यक्त पेक्षा सुद्धा अलौकिक शाश्वत सत्य आहे जे सर्व भूतांचा नाश झाल्यावर सुद्धा अविनाशी असते.

 

अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्।

यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम।।8.21।।

अव्यक्तः अक्षरः इति उक्तः, तम्‌ परमाम्‌ गतिम्‌ आहुः, यम्‌ प्राप्य न निवर्तन्ते, तत्‌ मम परमम्‌ धाम ।

 

अव्यक्तः अप्रकट

अक्षरः स्थिर

अ +क्षर धातू वाहणे

इति उक्तः, असे म्हणतात

 तम्‌ तो

 परमाम्‌ श्रेष्ठ

 गतिम्‌ गंतव्य स्थान

आहुः,म्हणतात

ब्रू धातू बोलणे

 यं जो

प्राप्य  व्यापणे

प्र +आप धातू प्राप्त करणे

न निवर्तन्ते, परत येत नाहीत

वृत धातू होणे

नि +वृत परत येणे

तत्‌ ते

मम माझे

परमम्‌ श्रेष्ठतम

 धाम ।घर

धामन् नपु एव

 

वैष्णव पंथानुसार भगवान श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत. आणि त्यांचे निवासस्थान गोलोक धाम आहे. ह्यालाच परमधाम असे पण म्हणतात.

जसे गोलोक तसे साकेत लोक, (श्रीराम चे स्थान) वैकुण्ठ लोक, (श्रीविष्णू चे स्थान), शिव लोक,  देवी लोक वगैरे.

वैकुण्ठ चा अर्थ कुण्ठ नसलेला.

कुण्ठ धातू म्हणजे निष्क्रिय निराश.

परमधाम चे वर्णन गीतेच्या 15 व्या श्लोकात केले आहे.

न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः ।

यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥15.6

कथाउपनिषद 1.3.11 मध्ये सांगितलेला श्लोक खालील प्रमाणे

महतः परमव्यक्तमव्यक्तात्पुरुषः परः ।

पुरुषान्न परं किंचित्सा काष्ठा सा परा गतिः ॥ ११ ॥

अव्यक्त चा उल्लेख गीतेतील 12.3 श्लोकात आणि अक्षर चा उल्लेख 15.16 श्लोकात दिसून येतो.

आता ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

ज्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात त्याच शाश्वत अशा स्थानाला परमधाम असे म्हटले जाते आणि ज्यांना हे स्थान प्राप्त होते ते परत येत नाहीत. त्यांना मोक्ष प्राप्त होतो.

 

पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया।

यस्यान्तःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्।।8.22।।

हे पार्थ! भूतानि यस्य अन्तः-स्थानि येन इदम्‌ सर्वम्‌ ततम्‌, सः परः पुरुषः तु अनन्यया भक्त्या लभ्यः ।

 

हे पार्थ!

भूतानि सजीव

यस्य ज्याचे

यद् ष एव

अन्तः-स्थानि आतले स्थान

अन्तस्थ

येन ज्यामुळे

इदम्‌ हे

 सर्वम्‌  सर्व

 ततम्‌,

तन् धातू पसरणे

 सः तो

परः महान

पुरुषः पुरुष

तु परन्तु

अनन्यया इतर काही नाही

न अन्य

भक्त्या भक्तीने

भज् धातू आश्रय घेणे

लभ्यः लाभ होतो

लभ् धातू प्राप्त होणे

 

ह्या श्लोकातील अन्तस्थ हा शब्द सर्वात महत्त्वाचा.

वेदांमध्ये परमेश्वराला पाने फुले फळे लगडलेल्या झाडाची उपमा दिली आहे. परमेश्वर सर्व-विस्तारीत आहे (Plenary expansions) आपल्या चार भुजांमधे त्यांनी शंख चक्र कमळ आणि गदा धरले ज्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रेरणा मिळतात.

त्यांना बर्‍याच नावांनी ओळखले जाते जसे पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, हृषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ वगैरे.

ह्या श्लोकात भक्तियोगाचे महत्व सांगताना

श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

संपूर्ण जीवसृष्टी ज्याच्या मधे आंंतरभूत आहे आणि ज्याच्या मुळे सर्व जग व्यापून गेले आहे असा परमपुरुष असाधारण भक्तिनेच प्राप्त होईल.

ब्रह्मसूत्रातील 5.37 श्लोकात गोलोकाचे वर्णन परमोच्च सुख असे केले आहे.

आनंदचिन्मयरसप्रतिभाविताभिस्ताभिर्य एव निजरूपतया कलाभिः।गोलोक एव निवसत्यखिलात्मभूतो गोविंदमादिपुरुषम तमहं भजामि॥ ब्रह्म सूत्र 5.37

 

भक्तिमार्गाचे महत्व भागवतात असे सांगितले जाते

भक्त्याहमेकया ग्राह्यः श्रद्धयाऽऽत्मा प्रियः सताम्।

(श्रीमद्भागवतम्-11.14.21)

मी फक्त त्या भक्तांना प्राप्त होतो जे श्रद्धा आणि प्रेमपूर्वक माझी भक्ती करतात.

 

मिलेहिं न रघुपति बिनु अनुरागा, किए जोग तप ज्ञान विरागा

(रामचरितमानस)

कोणी अष्टांग योगाभ्यास करेल, कोणी तपस्या किंवा ज्ञानमार्गाचा अवलंब करेल, विरक्त आयुष्य जगेल पण भक्ती शिवाय परमेश्वर प्राप्त होणार नाही.

 

तमेव विदित्वाति मृत्युमेति-

श्वेताश्वतर उपनिषद 3.8

केवळ परमेश्वराला जाणून घेतल्यानंतरच जन्म मृत्यू वर विजय प्राप्त होतो.

 

यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः।

प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ।।8.23।।

हे भरतर्षभ! यत्र काले तु प्रयाताः योगिनः अनावृत्तिम्‌ आवृत्तिम्‌ च एव यान्ति, तम्‌ कालम्‌ वक्ष्यामि ।।

 

हे भरतर्षभ!

यत्र जेथे

काले काल वेळ

तु परन्तु

प्रयाताः जाणारा

प्र +या धातू जाणे प्रयाण

 योगिनः योगी

आवृत्तिम्‌ 

वृत् धातू बोलणे, प्रवृत्त होणे

आवृत्ती परत परत निर्माण होणे

अनावृत्तिम्‌

अन् आवृत्ती 

च एव आणि सुद्धा

यान्ति, पोहोचलेला

या धातू जाणे

 तम्‌ ती

कालम्‌ वेळ

वक्ष्यामि ।।सांगतो

वच् धातू बोलणे

आधीच्या श्लोकात भक्तिमार्ग अनुसरून मुक्ति प्राप्त होते हे सांगून झाल्यावर

आता श्रीभगवानकृष्ण असे म्हणताहेत की

हे अर्जुना

आता मी तुला त्या मार्गाची माहिती देतो

(ह्या श्लोकात काल चा अर्थ मार्ग असा घेतला तर अर्थ समजायला सोपे आहे.)

ज्या समयी योगी (देह त्याग करुन) संपूर्णपणे माझ्यामध्ये विलीन होतात (त्यांना मुक्ति मिळते) आणि (अशा वेळेची सुद्धा माहिती देतो)

ते परत सुद्धा येतात (पुनर्जन्म घेतात).

 

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।

तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः।।8.24।।

धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।

तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते।।8.25।।

अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।

तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः।।8.24।।

अग्निः, ज्योतिः, अहः, शुक्लः षण्मासाः उत्तर-अयनम्‌, तत्र प्रयाताः ब्रह्मविदः जनाः ब्रह्म गच्छन्ति।

 

अग्निः,

 ज्योतिः, उजेड

 अहः, दिवस

शुक्लः शुक्ल पक्ष

षण्मासाः सहा महिने

उत्तर-अयनम्‌, उत्तरायण

तत्र  तेथे

प्रयाताः जाणारा

प्र +या धातू जाणे

ब्रह्मविदः ब्रह्म जाणणारे

जनाः लोक

 ब्रह्म

गच्छन्ति। जातात

 

 

धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।

तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते।।8.25।।

धूमः, रात्रिः, तथा कृष्णः षण्मासाः दक्षिण-अयनम्‌, तत्र योगी चान्द्रमसम्‌ ज्योतिः प्राप्य निवर्तते।

 

धूमः, धूर

 रात्रिः,

तथा आणि

 कृष्णः कृष्ण पक्ष

षण्मासाः सहा महिने

दक्षिण-अयनम्‌, दक्षिणायन

 तत्र. तेथे

योगी

चान्द्रमसम्‌ ज्योतिः आकाशात दिसणारे तारे

प्राप्य प्राप्त करतात

निवर्तते। परत येतात

नि +वृत् धातू असणे (अस्तित्व)

 

24 व्या आणि 25 व्या श्लोकात उत्तरायण आणि दक्षिणायन ह्यावर भाष्य केले आहे.

23 व्या अध्यायात सूतोवाच केल्याप्रमाणे श्रीभगवानकृष्ण आता त्या दोन मार्गांविषयी माहिती देत आहेत. 24 व्या अध्यायात ते असे म्हणतात की

जेव्हा सूर्य 6 महिने पृथ्वीच्या ऊत्तरेला झुकलेला आहे, दिवसाचा काळ मोठा आहे आणि शुक्ल पक्षात चंद्राचा प्रकाश आहे अशा काळात जे देहाचा त्याग करतात, जे ब्रह्म तत्त्व जाणतात त्यांना ब्रह्मा ची प्राप्ती होते.

25 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

दक्षिणायन स्थिति मधे जेव्हा रात्री चा काळ मोठा होतो, चंद्राचा प्रकाश कृष्ण पक्षात कमी कमी होत जातो, रात्र धूसर होत जाते अशा वेळी जर योग्याने देहत्याग केला तर तो स्वर्गात पोहोचतो, (तेथे सुख उपभोगतो) आणि काही काळानंतर त्याचा पुनर्जन्म होतो.

 

असेच वर्णन छान्दोग्योपनिषद् मध्ये पण वाचता येते

तद्य इत्थं विदुः। ये चेमेऽरण्ये श्रद्धा तप इत्युपासते तेऽर्चिषमभिसंभवन्त्यर्चिषोऽहरह्न आपूर्यमाणपक्षमापूर्यमाणपक्षाद्यान्षडुदङ्ङेति मासांस्तान् ॥ ५.१०.१ ॥

मासेभ्यः संवत्सरं संवत्सरादादित्यमादित्याच्चन्द्रमसं चन्द्रमसो विद्युतं तत्पुरुषोऽमानवः स एनान्ब्रह्म गमयत्येष देवयानः पन्था इति ॥ ५.१०.२ ॥छान्दोग्योपनिषद्.

 

शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते।

एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽऽवर्तते पुनः।।8.26।।

हि जगतः एते शुक्ल-कृष्णे गती शाश्वते मते। एकया अनावृत्तिम्‌ याति अन्यया पुनः आवर्तते।

 

हि नक्कीच, कारण

 जगतः जगाचे

 एते ह्या

शुक्ल-कृष्णे शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष

गती मार्ग

 शाश्वते न संपणारे

श्व उद्या

श्व श्व परत परत

 मते मत

मन् धातू समजणे, माहित असणे

एकया एकाने

अनावृत्तिम्‌ परत येत नाहीत

अन +आ+ वृत् धातू असणे

वृ धातू आच्छादन करणे

याति जातो

या धातू जाणे

 अन्यया अन्य

 पुनः पुन्हा

आवर्तते। परत येतात

आ+वृत् धातू

 

आधीच्या 2 श्लोकाचा अर्थ समजून सांगितल्यानंतर ह्या श्लोकात त्याचा परत सारांश सांगितला आहे तो असा

अनादि काळापासून शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे परत परत येतात.

जे (योगी) शुक्ल पक्षात देहत्याग करतात ते परत येत नाहीत आणि जे कृष्ण पक्षात देहत्याग करतात त्यांचे काही काळानंतर पुनरागमन होते.

 

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन।

तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन।।8.27।।

हे पार्थ! एते सृती जानन्‌ कश्चन योगी न मुह्यति; तस्मात्‌ हे अर्जुन! सर्वेषु कालेषु योग-युक्तः भव।

 

हे पार्थ!

एते ह्या (दोन)

सृती मार्गिका

सृ धातू पुढे जाणे, सरकणे

जानन्‌ माहित असणारा

कश्चन कोणीतरी

योगी 

न मुह्यति; गडबडून जात नाही

मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे

तस्मात्‌ म्हणून

 हे अर्जुन!

सर्वेषु कालेषु सर्व काळ

योग-युक्तः

भव. हो (होऊदे)

हे पार्थ

ज्या योगी ना हे दोन मार्ग माहीत आहेत (24,25,26 ह्या श्लोकात विवेचन केल्या प्रमाणे)

ते कधीच विचलित होत नाहीत.

ते कसल्याही मोहात पडत नाहीत.

म्हणून हे अर्जुना तू सुद्धा असाच सर्व काळ योगाची साधना कर.

 

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्।

अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्।।8.28।।

 

योगी इदम्‌ विदित्वा, वेदेषु यज्ञेषु तपःसु दानेषु च यत्‌ पुण्य-फलम्‌ प्रदिष्टम्‌, तत्‌ सर्वम्‌ एव अत्येति, आद्यम्‌ च परम्‌ स्थानम्‌ उपैति।

 

योगी

इदम्‌ हे

 विदित्वा, जाणलेला

विद् धातू जाणणे

 वेदेषु वेद

यज्ञेषु यज्ञ

तपःसु तप

दानेषु दान

च सुद्धा

 यत्‌ जे

पुण्य-फलम्‌ पुण्य

प्रदिष्टम्‌, प्राप्त केलेले

प्र +दिश् धातू देणे

तत्‌ ते

सर्वम्‌ सर्व

 एव सुद्धा

अत्येति पलिकडे जातो

अति + इ धातू जाणे

आद्यम्‌ आद्य प्रथम

च आणि

परम्‌ स्थानम्‌ सर्वोच्च स्थान

 उपैति  पोहोचतो

उप +इ धातू जाणे

श्रीभगवानकृष्णांनी आधीच्या श्लोकात अर्जुनाला योगी तर होण्यास सांगितले पण योगी म्हणजे नक्की कसे ते गीतेतील 6 व्या अध्यायातील 18, 19 श्लोकात आधीच सांगून झाले आहे. आता त्यापुढे जाऊन श्रीभगवान असे म्हणतात की

जो योगी ज्ञानमार्ग, वेदाध्ययन, तपस्या, दानधर्म (कर्मयोग) ह्या सर्वांमुळे मिळणारे पुण्य ह्या सर्व गोष्टींची माहिती असणारा असा त्या सर्वांच्या पलिकडे जाऊन परमेश्वराशी एकरुप होतो (निस्सीम भक्ति) त्याला त्या सर्वोच्च स्थानाची प्राप्ती होते.

 

नेम धर्म आचार तप ग्यान जग्य जप दान।

भेषज पुनि कोटिन्ह नाहिं रोग जाहिं हरिजान ।। रामचरितमानस

 

अनासक्तस्य विषयान् यथार्हमुपयुञ्जत:।

निर्बंध: कृष्णसंबंधे युक्तं वैराग्यमुच्यते।।

प्रापञ्चिकतया बुद्धया हरिसंबन्धिवस्तुन:।

मुमुक्षभि: परित्यागो वैराग्यं फल्गु कथ्यते।।भक्तिरसामृत सिंधु 2.255.256.

------------------------------------🙏🙏🙏🙏-----------------------------------------------------------------