शनिवार, १८ जानेवारी, २०२५

मुण्डकोपनिषद् 2.1.1-10

               मुण्डकोपनिषद् 2.1.1-10

तदेतत्‌ सत्यं यथा सुदीप्तात्‌ पावकाद् विस्फुलिङ्गाः सहस्रशः प्रभवन्ते सरूपाः। तथाक्षराद् विविधाः सोम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापि यन्ति ॥2.1.1।।

तत् एतत् सत्यं यथा सुदीप्तात् पावकाद् सरूपाः विस्फुलिङ्गाः सहस्रशः प्रभवन्ते तथा सोम्य विविधाः भावाः अक्षरात् प्रजायन्ते तत्र एव अपि यन्ति च ॥


तत् ते तद् नपु. प्र. ए. व. 

एतत् हे एतद् नपु. प्र. ए. व. 

सत्यम् सत्य नपु. प्र. ए. व. 

यथा ज्याप्रमाणे अव्यय 

सुदीप्तात् प्रज्वलित सुदिप्त पु. पं. ए. व. सु+दीप् धातू प्रकाशित होणे क्त प्रत्यय 

पावकाद् अग्नी पासून पावक पु. पं. ए. व.

पावक (शुद्ध करणारा) अग्नी 

सरूपाः त्या स्वरूपाच्या स+रूपा स्त्री. प्र. ब. व. 

रूपेण सह सरूपाः

विस्फुलिङ्गाः अग्नीकण वि+स्फुलिङ्ग पु. प्र. ब. व. 

स्फुल धातू लवलवणे इङ्गच् प्रत्यय 

सहस्रशः हजारों सहस्त्र +शस् प्रत्यय 

प्रभवन्ते उत्पन्न होतात प्र+भू धातु चुरादिः गण कर्तरि प्रयोग लट् लकार आत्मनेपद प्र. पु. ब. व. 

तथा अव्यय याप्रमाणे 

हे सोम्य संबोधन 

विविधाः निरनिराळे विविध पु. प्र. ब. व. 

भावाः जीव भाव पु. प्र. ब. व.

भू भावयति होणे 

अक्षरात् अक्षर ब्रह्मापासून अक्षर पु. पं. ए. व. 

प्रजायन्ते जन्माला येतात 

प्र जायन्ते जै धातु भ्वादिः भावकर्मणि लट् लकार आत्मनेपद प्र. पु. ब. व. 

तत्र तेथे अव्यय 

एव सुद्धा अव्यय 

अपि येथे अपि हा उपसर्ग म्हणून वापरला आहे जो धातू पासून वेगळा लिहीला जातो. आवरण ह्या अर्थी त्याचा वापर होतो. 

अपि यन्ति पुन्हा जातात 

यन्ति इ धातू जाणे कर्तरि लट्लकारः  प्र. पु. ब. व. 

च सुद्धा अव्यय

अंगिरा ऋषी, शौनक ऋषींना उपदेश देत असताना त्यांना हे सोम्य! असे संबोधले आहे. त्या मागची त्यांची भूमिका काय असावी ते शोधायला हवे. सोम म्हणजे चंद्र. चंद्रासारखी शीतलता असणारे शौनक ऋषी असा अर्थ अपेक्षित आहे का? सोमपान करणारा तो सोम्य असाही उल्लेख सापडतो आहे.

सर्व सजीवांचा कार्य काल लक्षात घेता, जर ब्रह्मदेवाला अग्नी ची उपमा दिली असेल तर ब्रह्मापासून उत्पन्न होणाऱ्या जीवांना ठिणगी ची उपमा अगदी सार्थ आहे. कारण ब्रह्मदेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांची असते.।। श्रीमद्भगवद्गीता। 8.17।। असे म्हटले आहे. ठिणगी अग्नी पासून निर्माण होते, थोडावेळ हवेत तरंगते, फार लांब जाऊ शकत नाही आणि पुन्हा अग्नीतच विलीन होते. येथे दोन्ही क्रियांचा उल्लेख केला आहे सृजनता आणि विलीनीकरण. हे वाचल्यावर 'आकाशापरिच्छिन्नत्व न्याय' ह्या लौकिक न्यायाची आठवण होते. एखाद्या घटात जे वातावरण असते तेच घट फुटल्यावर कायम राहते, बाहेरच्या वातावरणाशी एकरूप होऊन जाते. ह्या 

अद्वैत तत्वज्ञानाची अनुभूती ह्या श्लोकात होते. 

मंत्राची सुरवात 'तत् एतत् सत्यं' म्हणजे हेच ते सत्य अशी केली आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

हे सोम्य! हेच सत्य आहे, ज्या प्रमाणे प्रज्वलित अग्नी पासून त्याच्या सारख्या हजारो ठिणग्या निर्माण होतात, त्याचप्रमाणे ब्रह्म अक्षरापासून निरनिराळे सजीव निर्माण होतात आणि तेथेच विलीन होतात.

दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः स बाह्याभ्यन्तरो ह्यजः।

अप्राणो ह्यमनाः शुभ्रो ह्यक्षरात्‌ परतः परः ॥2.1.2।।

दिव्यः अमूर्तः अजः शुभ्रः पुरुषः सबाह्याभ्यन्तरः हि हि अप्राणः अमनाः अक्षरात् परतः हि ॥


दिव्यः दिव्य पु. प्र. ए. व. 

दिव धातु प्रकाशणे यत् प्रत्यय 

अमूर्तः अ+मूर्छ् धातु क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

अजः अज पु. प्र. ए. व. 

न जायते जन धातु उत्पन्न होणे 

शुभ्रः शुभ् धातु  रक् प्रत्यय पु. प्र. ए. व. 

पुरुषः पुरुष पु. प्र. ए. व. 

सबाह्याभ्यन्तरः सह बाह्य अभ्यन्तरः अभि+अन्तर पु. प्र. ए. व. 

हि हि खरोखर अव्यय 

अप्राणः अ+प्राण पु. प्र. ए. व. 

अमनाः अ+मन् धातु घः प्रत्यय पु. प्र. ब. व. 

अक्षरात् अक्षर नपु. पं. ए. व. 

परतः अव्यय 

पर+तसिल प्रत्यय 

पर=पॄ धातु पालन करणे+अच् प्रत्यय 

हि खरोखर अव्यय

अक्षर ब्रह्मापासून निरनिराळे जीव उत्पन्न होतात असे आपण आधीच्या मंत्रात वाचले. त्या सर्वांना ठिणगी ची उपमा दिली होती. मुण्डकोपनिषदातील 1.1.8 ह्या मंत्रात ब्रह्माच्या तपश्चर्येने ही जीवसृष्टी निर्माण झाली असे वाचले होते. आता ह्या मंत्रात त्या अक्षरब्रह्म चे वर्णन केले आहे. बर्‍याच उपनिषदात ब्रह्माचे वर्णन केले आहे. तसा मुण्डकोपनिषदातील 1.1.6 ह्या मंत्रात सुद्धा परब्रह्माचे स्वरूप स्पष्ट केले आहे. बृह् धातु म्हणजे वाढणे ह्यापासून निर्माण झालेला शब्द ब्रह्म. त्याच्या तपश्चर्येचे फळ म्हणजे ह्या सृष्टीची निर्मिती आणि येथे राहणारे असंख्य जीव. शंकराचार्यांनी परिवृढ असा शब्दप्रयोग केला आहे. अग्नीला तसा आकार काही नसतो. मात्र तो प्रकाशमान आहे. अक्षरब्रह्म ला दिव्य असे म्हटले आहे. तो स्वयंप्रकाशित आहे. प्रकाश म्हणजे उजेड आणि साहित्यात त्याचा अर्थ ज्ञान सुद्धा.

ब्रह्माला अमूर्त म्हणजे आकार उकार नसलेला निराकार असे सुद्धा म्हटले आहे. देवांच्या मूर्तींची कल्पना अगदीच मानवनिर्मित. अजः म्हणजे अनादी. तो फक्त आहे. तो कशापासूनही निर्माण झालेला नाही. तो म्हणजे केवळ पवित्रता. असे हे चैतन्यरूपी आत्मतत्त्व आत आणि बाहेर सारखेच आहे. तो फक्त पुरुष आहे त्यामुळे प्रकृती चे कोणतेही गुण त्याच्या कडे नाही. म्हणून तो प्राण आणि मन रहीत असा आहे. 

महतः परमव्यक्तमव्यक्तात्पुरुषः परः । कठोपनिषद् 1.3.11 मध्ये ब्रह्माचा असा उल्लेख आहे. महान आत्म्याहून श्रेष्ठ अव्यक्त आहे आणि अव्यक्त हून श्रेष्ठ पुरुष आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

स्वयंप्रकाशी, निराकार, अनादी, आंतरबाह्य व्यापलेला पवित्र असा प्राण रहीत आणि मन रहीत, अव्यक्तापेक्षा श्रेष्ठ पुरूष आहे.

एतस्माज्जयते प्राणो मनः सर्वेन्द्रियाणि च।खं वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी ॥2.1.3।।

एतस्मात् प्राणः मनः सर्वेन्द्रियाणि खं वायुः ज्योतिः आपः विश्वस्य धारिणी च जायते ॥


एतस्मात् यापासून एतद् पु. पं. ए. व.

प्राणः प्राण पु. प्र. ए. व. 

मनः मन पु. प्र. ए. व. 

सर्वेन्द्रियाणि सर्व इन्द्रिये 

सर्व इन्द्रिय नपु. प्र. ब. व. 

खं आकाश ख नपु. प्र. ए. व.

वायुः वायु पु. प्र. ए. व. 

ज्योतिः अग्नी ज्योतिस् नपु. प्र. ए. व.

आपः जल आप पु. प्र. ए. व.

विश्वस्य विश्वाला विश्व नपु. ष. ए. व. 

धारिणी (विश्वाला)धारण करणारी धारिणी स्त्री. प्र. ए. व.

धारिन् धात्री इन् प्रत्यय  स्त्री. प्र. ए. व. 

धात्री धातृ स्त्री. प्र. ए. व. धातृ धा धातु तृच् प्रत्यय

च सुद्धा अव्यय 

जायते उत्पन्न होते जन् धातु कर्तरि लट् लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

आधीच्या मंत्रात आपण (पुरुष) संबंधी वर्णन वाचले. त्याआधीच्या मंत्रात ब्रह्म अक्षरापासून सर्व सजीव निर्माण होतात आणि तेथेच विलीन होतात हेच सत्य आहे असे वाचले होते. त्याच उत्पत्ती चे आता विस्ताराने वर्णन केले आहे.

हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानावर प्राचीन सांख्यदर्शन या शास्त्राचा मोठाच प्रभाव आहे.

पंचमहाभूते कशी निर्माण झाली याची चर्चा न्याय, वैशेषिक, वेदान्त इ. दर्शनांनी केली आहे. ही तत्त्वे आत्म्यापासून निर्माण झाली, असे उपनिषदांनी म्हटले आहे.  

तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः। आकाशाद्वायुःवायोरग्निः। अग्नेरपः। अदभ्यः पृथिवीः।। तैत्तिरीयोपनिषद् 2.1।।  तैत्तिरीय उपनिषदात  आकाश, वायू, अग्‍नी, आप व पृथ्वी अशी पाच तत्त्वे उत्पन्न झाली, असे म्हटले आहे.

आधीच्या मंत्रात अक्षरब्रह्म, प्राण रहीत आणि मन रहीत आहे असे म्हटले आहे. मात्र तेच प्राण आणि मन ह्यांच्या उत्पत्ती चे कारण आहे. म्हणूनच 1.1.6 ह्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे अक्षरब्रह्म हे अगोत्र, अवर्ण आणि इन्द्रिये नसलेले असे आहे. आधीच्या मंत्राप्रमाणे त्याचे दिव्य शक्ती हे विशेषण अगदी समर्पक आहे. 

‘एकोऽहं बहु स्याम्’ जेव्हा परमात्म्याला आपली उत्क्रांती व्हावी असे वाटते तेव्हा प्राणाची निर्मिती होते. 

'शरीरसंयुक्तं ज्ञानं करणमतींद्रियम्।' असे इन्द्रियांचे वर्णन केले आहे.

शरीराची चेतना म्हणजे ‘प्राण’. शरीरातील प्राण त्याचे वय ठरवते म्हणून प्राणाला ‘सर्वायुष्’ असे म्हटले आहे. मनाला 'अंतरिंद्रिय' असे म्हटले जाते.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

याच्यापासून (अक्षरब्रह्म पासून) प्राण, मन, सर्व इंद्रिये, आकाश, वायु, तेज, उदक आणि विश्वाला धारण करणारी पृथ्वी ही उत्पन्न होतात.

अग्नीर्मूर्धा चक्षुषी चन्द्रसूर्यौ दिशः श्रोत्रे वाग्‌ विवृताश्च वेदाः। वायुः प्राणो हृदयं विश्वमस्य पद्‌भ्यां पृथिवी ह्येष सर्वभूतान्तरात्मा ॥2.1.4।।

अग्निः मूर्धा चन्द्रसूर्यौ चक्षुषी दिशः श्रोत्रे विवृताः वेदाः च वाग् वायुः प्राणः हृदयम् विश्वं अस्य पदभ्यां पृथिवी  एषः सर्वभूतान्तरात्मा हि ॥


अग्निः अग्नि पु. प्र. ए. व. 

मूर्धा मस्तक मूर्धन्  पु. प्र. ए. व. 

चन्द्रसूर्यौ चन्द्रसूर्य नपु. प्र. द्वि. व. 

चक्षुषी डोळे चक्षुस् नपु. प्र. द्वि. व. 

दिशः (सर्व) दिशा दिश् स्त्री. प्र. ब. व. 

श्रोत्रे दोन कान श्रोतृ पु. च. ए. व. 

विवृताः  वाचा, विवरण करून सांगितलेले विवृत पु. प्र. ब. व.  

वेदाः वेद पु. प्र. ब. व. 

च सुद्धा अव्यय 

वाग् वाणी वाच् स्त्री. प्र. ए. व. 

वायुः वायु पु. प्र. ए. व. 

प्राणः प्राण पु. प्र. ए. व. 

हृदयम् हृदय नपु. प्र. ए. व. 

विश्वं विश्व नपु. प्र. ए. व. 

अस्य याच्या इदम् नपु. ष. ए. व. 

पदभ्यां पायापासून पद 

पृथिवी  पृथिवी स्त्री. प्र. ए. व. 

एषः हा एतद् पु. प्र. ए. व. 

सर्वभूतान्तरात्मा सर्व भूतांचा आत्मा 

सर्वभूतान्तरात्मन् पु. प्र. ए. व. 

हि खरोखर अव्यय

आधीच्या मंत्रापासून प्रकृति च्या निरनिराळ्या अविष्काराची चर्चा करत असता अक्षरब्रह्म पासून पंचमहाभूते आणि प्राण मन आणि इन्द्रिये निर्माण होतात असे म्हटले आहे.

प्रकर्षेण करोति इति प्रकृति:’ अर्थात् जे (सृष्टीतील पुरुषाव्यतिरिक्त सर्व अन्य तत्त्वांना) उत्पन्न करते, ते तत्त्व म्हणजे प्रकृती होय. अक्षरब्रह्म पासून प्रकृतिची निर्मिती झाली. पुरूष आणि प्रकृति रूढार्थाने वेगळे असले तरी परमात्म्याचा अंश प्रत्येक गोष्टीत आहेच. हेच ह्या मंत्रात सांगितले आहे.

असौ वाव लोको गौतमाग्निस्तस्यादित्य एव समिद्रश्मयो धूमोऽहरर्चिश्चन्द्रमा अङ्गारा नक्षत्राणि विस्फुलिङ्गाः॥ छान्दोग्योपनिषद् 5.4.1।।

हे गौतम ! स्वर्ग अग्नि आहे, सूर्य त्याचे ईंधन आहे , किरणें धूर आहेत, दिवस ज्वाला आहेत, चंद्रमा अंगारे आणि तारे ठिणग्या. 

अग्नी म्हणजे प्रकाश म्हणजेच ज्ञान. 

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

याचे अग्नी हे मस्तक, चन्द्र आणि सूर्य हे डोळे, सर्व दिशा म्हणजे कान, वेद हीच वाणी, वायु म्हणजे प्राण, सर्व विश्व हे त्याचे हृदय, पायांपासून पृथ्वी, हा खरोखर सर्व भूतांचा अंतरात्मा आहे.

तस्मादग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात्‌ पर्जन्य ओषधयः पृथिव्याम्‌। पुमान्‌ रेतः सिञ्चति योषितायां बह्वीः प्रजाः पुरुषात्‌ संप्रसूताः ॥2.1.5।। 

तस्मात् अग्निः सूर्यः यस्य समिधः सोमात् पर्जन्यः पृथिव्याम् ओषधयः पुमान् योषितायां रेतः सिञ्चति पुरुषात् बह्वीः प्रजाः सम्प्रसूताः ॥


तस्मात् त्याच्यापासून तद् पु. पं. ए. व. 

अग्निः  अग्नि पु. प्र. ए. व. 

सूर्यः सूर्य पु. प्र. ए. व. 

यस्य ज्याच्या यद् पु. ष. ए. व. 

समिधः  समिधा पु. प्र. ए. व. 

सोमात् चंद्रापासून सोम पु. पं. ए. व. 

पर्जन्यः पर्जन्य पु. प्र. ए. व. 

पृथिव्याम् पृथ्वीवर पृथिवी स्त्री. स. ए. व. 

ओषधयः ओषधि स्त्री. प्र. ब. व. 

पुमान् पुरूष पुंस् पु. प्र. ए. व. 

योषितायां स्त्रीमध्ये योषिता स्त्री. स. ए. व. 

रेतः वीर्य रेत पु. प्र. ए. व. 

सिञ्चति शिंपण करतात सिच् धातु कर्तरि लट् लकार परस्मैपद प्र. पु. ए. व. 

पुरुषात् पुरुषापासून पुरुष पु. पं. ए. व. 

बह्वीः पुष्कळ बह्वीः स्त्री. द्वि. ब. व. 

प्रजाः  प्रजा स्त्री. प्र. ब. व. 

सम्प्रसूताः उत्पन्न होतात सम+प्र+सू धातु क्त प्रत्यय स्त्री. प्र. ब. व.

दुसर्‍या मुण्डकातील पहिल्या खंडातील 3 र्या मंत्रापासून अक्षरब्रह्म पासून प्रकृति ची विविध अंगांची निर्मिती होण्याची प्रक्रिया सांगण्यास सुरुवात झाली आहे. ह्या मंत्रात अप्रत्यक्षपणे पंचाग्नि विद्येचा उल्लेख केला आहे. हिंदू धर्मातील मृत शरीराचे दहन करण्यामागील कारणमीमांसा ह्या मंत्राच्या निमित्ताने लक्षात येते. पंचाग्नि विद्या, पुनर्जन्माच्या सिद्धांतावर भाष्य करते. ह्या मंत्रात आकाश, पर्जन्य, पृथ्वी तसेच पुरुष आणि स्त्री ह्या पाच अग्नींचा उल्लेख केला आहे. छान्दोग्योपनिषदातील 6 व्या अध्यायातील 2र्या खंडातील 1-4 ह्या श्लोकात ह्यावर भाष्य केले आहे. पंचाग्नि विद्येचा गर्भित अर्थ असा आहे की अग्नी मध्ये कोणतीही वस्तू टाकली असता त्यातील पाण्याचा अंश उर्ध्वदिशेला(आकाश प्रथम अग्नी) म्हणजे परलोकात  जातो. ज्याचे रूपांतर पर्जन्यात (द्वितीय अग्नी) होऊन पृथ्वीवर (तृतीय अग्नी) त्याचा वर्षाव होऊन अन्नात रूपांतर होते. ह्या अन्नाच्या पोषणाने पुरुष (चतुर्थ अग्नी) आणि स्त्री (पंचम अग्नी) निर्माण होऊन पुनरुत्पादन चालू राहते.

खालील दोन मंत्रात  गंमतशीर पद्धतीने ह्याचे वर्णन केले आहे.

तदैक्षत् बहु स्यां प्रजायेयति तत्तेजोऽसृजत् तत्तेज् अक्षत् बहु स्यां प्रजायेयति तदपोऽसृजत्। तस्माद्यत्र क्वच शोचति स्वेदते वा पुरुषस्तेजस एव तदध्यापो जायन्ते ॥ छान्दोग्योपनिषद् 6.2.3 ॥

त्या अस्तित्वाने ठरवले ‘मी पुन्हा जन्म घेईन, मग त्याने आग तयार केली, त्या आगीने सुद्धा ठरवले ‘मी वाढत जाईन, पुन्हा जन्म घेईन ’ मग आगीने पाणी तयार केले. म्हणूनच शोक व्यक्त करताना अश्रू ढाळतात आणि घाम फुटतो.

ता आप ऐक्षन्त भाव्यः स्याम प्रजायेमहिति तां अन्नमसृजन्त तस्माद्यत्र क्व च वर्षति तदेव भूयिष्ठमन्नं भवत्यद्भ्य एव तदध्यन्नद्यं जायते ॥ छान्दोग्योपनिषद् 6.2.4 ॥

त्या पाण्याने ठरवले ‘मी वाढेन; परत जन्म घेईन.’ पाण्याने भोजन बनवले.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

त्यापासून आकाशाची निर्मिती होते ज्यामधे सूर्याच्या समिधा पडतात. चंद्रापासून पर्जन्याची निर्मिती. पर्जन्यामुळे पृथ्वीतलावर निरनिराळ्या वनस्पतींची निर्मिती होते. ह्या वनस्पतींमुळे पुरुष आणि स्त्री. पुरुषाने आपले बीज स्त्री मध्ये स्थापित केल्यानंतर अनेक प्रजा निर्माण होतात.

तस्मादृचः साम यजूंषि दीक्षा यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च।संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्यः ॥2.1.6।।

तस्मात् ऋचः साम यजूंषि दीक्षाः सर्वे यज्ञाः च क्रतवः दक्षिणाः च सम्वत्सरः च यजमानः लोकाः च उत्पन्नाः यत्र सोमः यत्र सूर्यः पवते ॥


तस्माद् तद् पु. पं. ए. व. 

ऋचः ऋच् स्त्री. प्र. ब. व. 

साम सामन् नपु. प्र. ए. व. 

यजूंषि यजूष् नपु. प्र. ब. व. 

दीक्षा दीक्षा स्त्री. प्र. ए. व. 

सर्वे सर्व पु. प्र. ब. व. 

यज्ञाः यज्ञ पु. प्र. ब. व. 

च सुद्धा अव्यय 

क्रतवः क्रतु पु. प्र. ब. व. 

दक्षिणाः  दक्षिणा स्त्री. प्र. ब. व. 

च सुद्धा अव्यय 

संवत्सरः संवत्सर पु. प्र. ए. व. 

यजमानः यजमान पु. प्र. ए. व.  

लोकाः लोक पु. प्र. ब. व. 

च सुद्धा अव्यय 

यत्र जेथे यद् + त्रल् अव्यय 

सोमः सोम पु. प्र. ए. व. 

यत्र जेथे यद् + त्रल् अव्यय 

सूर्यः सूर्य पु. प्र. ए. व. 

पवते पू धातु पवित्र करणे भ्वादि कर्तरि लट् लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.

आधीच्या मंत्रात स्त्री पुरुष संयोगातून निर्माण होणारे जीव आणि पर्जन्यामुळे अन्नधान्याची व्यवस्था त्याने निर्माण केली असे वाचले. आता ह्या मंत्रात मनुष्याच्या ज्ञान प्राप्तीची व्यवस्था कशाप्रकारे केली आहे ते सांगितले आहे.

हे दोन मंत्र वाचताना पारशी लोकांचा धर्मग्रंथ अवेस्ता मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहूर माझदा ने ही सृष्टी

निर्माण केली याची आठवण होते. फारशी धर्मामध्ये 

अग्नि आणि पाणी या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. अग्यारी मध्ये पवित्र अग्नी कायम प्रज्वलित केलेला असतो. ऋग्वेद आणि अवेस्ता यांच्यातील भाषेमध्ये बरेच साम्य आढळते असे म्हणतात.

ह्या मंत्रात बरेचसे अनोळखी शब्द वापरले आहेत त्यांचे अर्थ समजून घ्यायला हवे.

ऋचा' ह्या शब्दाची व्युत्पत्ति 'ऋक्' ह्या धातूपासून झाली ज्याचा अर्थ आहे 'प्रशंसा करणे'. ऋचा म्हणजे वेदांमधील पद्यात्मक मंत्र. शंकरभाष्य आणि आपटे यांच्या शब्दकोशाप्रमाणे जी रचना छंदात्मक आणि ऊंच स्वरात म्हटली जाते त्या ऋचा. मात्र छंदात्मक असून ज्याचा जप केला जातो ते सामन् (साम).

यजुर्वेदातील गद्य म्हणजे यजूष्. इज्यतेसनेनेति यजुः' म्हणजे ज्या मंत्रांच्या पठणाने यज्ञ केला जातो, ते यजुष्.

दीक्षा आणि सामान्य शिक्षण ह्यामधील फरक असा - शिक्षण सर्वजण घेतात मात्र दीक्षा देताना गुप्तता पाळण्यात येते.

शिक्षणाने साक्षरता येते दीक्षेने गुरूकृपा होते जीवन सार्थकी लागते.

शिक्षण व्यावहारिक गोष्टींचे दिले जाते. दीक्षा म्हणजे योगाभ्यास, नामस्मरण, गुरुमंत्र वगैरे. शिक्षक अनेक असू शकतात. मात्र दीक्षा देणारे गुरू आजीवन गुरु असतात.

क्रियतेऽसौ इति ।  कृ धातु + “कृञः क्तुः” =क्रतु. म्हणजे बलिदान. स्वार्थत्याग

संवत्सर साधारणपणे एक वर्षाचे मानले जाते. 

सम्यक् वसन्ति मासादया:अस्मिन् (ज्यात मास आदी विभाग व्यवस्थित सामावतात त्याला संवत्सर असे म्हणतात.

'स वसन्ति ऋतवौ यत्र' असे सुद्धा म्हटले आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

'त्या' च्या पासून वैदिक ऋचा, छन्दोबद्ध कवने, यजुर्वेदातील यज्ञ पद्धती, गुरूंकडून प्राप्त झालेले उपदेश, बळी, दक्षिणा आणि सर्व यज्ञविधी, यज्ञकाल, यज्ञकर्ता तसेच जे सूर्य चंद्राकडून पवित्र केले जातात असे लोक उत्पन्न झाले.

तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसि। प्राणापानौ व्रीहियवौ तपश्च श्रद्ध सत्यं ब्रह्मचर्यं विधिश्च ॥2.1.7।।

तस्मात् च देवाः बहुधा साध्याः मनुष्याः पशवः वयांसि प्राण अपानौ व्रीहियवौ तपः च श्रद्धा सत्यम् ब्रह्मचर्यम् विधिः च सम्प्रसूताः ॥


तस्मात् त्यापासून तद् पु. पं. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

देवाः देव पु. प्र. ब. व. 

बहुधा विविध अव्यय 

साध्याः साधुगण साध्य पु. प्र. ब. व. 

मनुष्याः मनुष्य पु. प्र. ब. व. 

पशवः पशु पु. प्र. ब. व. 

वयांसि पक्षी वयस् नपु. प्र. ब. व. 

प्राण-अपानौ प्राण-अपानवायू प्राण-अपान पु. प्र. द्वि. व. 

व्रीहियवौ तांदूळ आणि जव व्रीहिश्च यवश्च पु. प्र. द्वि. व.

तपः तप पु. प्र. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

श्रद्धा श्रद्धा स्त्री. प्र. ए. व. 

सत्यम् सत्य नपु. प्र. ए. व. 

ब्रह्मचर्यम् ब्रह्मचर्य नपु. प्र. ए. व.  

विधिः नैतिक मूल्य विधि पु. प्र. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

सम्प्रसूताः उत्पन्न होतात सम+प्र+सू धातु क्त प्रत्यय स्त्री. प्र. ब. व.

सूक्ष्मापासून स्थूलाच्या निर्मिती चा प्रवास असे ह्या मंत्राचे वर्णन करता येईल. आधीच्या मंत्रात ह्या सृष्टीतील घटकांना सूर्य आणि चंद्र पवित्र करतात असे म्हटले होते. सूर्याशिवाय आपले जीवन अशक्य आहेच पण चंद्राचा प्रभाव सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.

पंचमहाभूतांचे जे निरनिराळे स्वामी आहेत त्यांना देवता असे म्हणतात.

ह्या सृष्टीमध्ये मनुष्यप्राणी, निरनिराळे पशू पक्षी निर्माण झाले तसेच त्यांच्यासाठी भरणपोषण करणार्‍या वनस्पती निर्माण झाल्या. त्यानंतर संस्कृती चा उदय झाला ज्यामधे तप, सत्य, श्रद्धा ब्रह्मचर्य आणि नैतिकता अशी मूल्ये निर्माण झाली.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

आणि त्यापासून विविध देवता, साधुगण, मनुष्य, पशू, पक्षी, प्राण अपान वायू, तांदूळ आणि जव यासारखी धान्ये, तपश्चर्या, श्रद्धा सत्य, ब्रह्मचर्य आणि नैतिकता सारखी मूल्ये निर्माण झाली.

सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात्‌ सप्तार्चिषः समिधः सप्त होमाः। सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिताः सप्त सप्त ॥2.1.8।।

तस्मात् सप्त प्राणाः सप्त अर्चिषः सप्त समिधः होमाः इमे सप्त लोकाः प्रभवन्ति सप्त सप्त येषु निहिताः गुहाशयाः प्राणाः चरन्ति ॥


तस्मात् तद् पु. पं. ए. व.

सप्त सप्तन् प्र. ब. व.

प्राणाः प्राण पु. प्र. ब. व.

सप्त सप्तन् प्र. ब. व.

अर्चिषः ज्वाला अर्चिष् नपु. पं. ए. व.

सप्त सप्तन् प्र. ब. व.

समिधा इन्द्रिय विषय समिध् पु. तृ. ए. व.

होमाः आहुती होम पु. प्र. ब. व.

इमे हे इदम् पु. प्र. ब. व.

सप्त सप्तन् प्र. ब. व.

लोकाः लोक पु. प्र. ब. व. 

प्रभवन्ति निर्माण होतात प्र+भू धातू असणे कर्तरि लट् लकार परस्मैपद प्र. पु. ब. व. 

सप्त सप्त सप्तन् प्र. ब. व.

येषु ज्यामधे यद् पु. स. ब. व.

निहिताः स्थापित नि+धा धातु धारण करणे क्त प्रत्यय पु. प्र. ब. व. 

गुहाशयाः गुहेत विसावलेले गुहा+शी धातु शयन करणे अच् प्रत्यय पु. प्र. ब. व. 

प्राणाः प्राण पु. प्र. ब. व. 

चरन्ति फिरतात चर् धातु कर्तरि लट् लकार परस्मैपद प्र. पु. ब. व. 

हा मंत्र वाचताक्षणी सात ह्या संख्येचे विशेष महत्त्व लक्षात येते. ह्या मंत्रात सात प्राण, सात ज्वाळा, सात समिधा, सप्त होम किंवा आहुती आणि सात लोक यांचा उल्लेख केला आहे. ह्या सात गोष्टींचा गर्भित अर्थ समजावून घ्यायला हवा.

आपल्याला सप्त सूर, सात नद्या (गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी)  सप्तपदी, इंद्रधनुष्याचे 7 रंग, 7 ग्रह, 7 समुद्र, , सूर्याचे 7 घोड़े, आठवड्याचे 7 दिवस माहीत असतात. 

अन्नमय प्राणमय मनोमय ज्ञानमय विज्ञानमय चित्तमय आत्मामय असे सात कोष आपल्या शरीरात आहेत. मुण्डकोपनिषदातील 1.2.4 ह्या मंत्रात आपण सात प्रकारच्या ज्वाळांचे वर्णन वाचले होते.

स॒प्तऽऋष॑यः॒ प्रति॑हिताः॒ शरी॑रे स॒प्त र॑क्षन्ति॒ सद॒मप्र॑मादम्।स॒प्तापः॒ स्वप॑तो लो॒कमी॑यु॒स्तत्र॑ जागृतो॒ऽअस्व॑प्नजौ सत्र॒सदौ॑ च दे॒वौ ॥ (यजुर्वेद 34.55)

आपल्या शरीरात सात प्राण म्हणजे सात ऋषि आहेत. हे सतत कार्यरत राहून आपल्या शरीराचे रक्षण करतात. निद्रा स्थिती मध्ये सुद्धा हे सात लोकांत  जागृत अवस्थेत राहून निरंतर सजीवांची रक्षा करत असतात.

सात लोक म्हणजे आपली सात इन्द्रिये, ज्ञानेन्द्रिये दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या आणि जीभ ज्यायोगे आपल्याला शब्द, रस गंध स्पर्श आणि रूप ह्यांचे आकलन होते. ह्यांना सात गुहा असे मानले तर त्या सर्वांमध्ये प्राणशक्ती चा संचार चालू असतो. 

अशा एकेक गुहेत एकेक प्राण म्हणजे सात प्राण आहेत. जणू प्राण यज्ञच चालू आहे ज्यामधे सात प्रकारच्या समिधा पडत आहेत. ह्या आहुतींमुळे सात प्रकारच्या ज्वाळा म्हणजे ज्ञानप्राप्ती होत आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

त्याच्यापासून सात लोक, सात ज्वाला, समिधा, सात होम आणि त्यात फिरणारे सात प्राण निर्माण होतात जे साती इन्द्रिय रूपी गुहांमध्ये स्थापित होऊन विहरत असतात.

अतः समुद्रा गिरयश्च सर्वेऽसमात् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः।अतश्च सर्वा ओषधयो रसश्च येनैष भूतैस्तिष्ठते ह्यन्तरात्मा॥ 2.1.9।।

अतः सर्वे समुद्राः गिरयः च अस्मात् सर्वरूपाः सिन्धवः स्यन्दन्ते। अतः च सर्वाः ओषधयः रसः च येन एषः अंतरात्मा भूतैः  तिष्ठते हि ॥


अतः त्यापासून अव्यय एतद् +तासिल प्रत्यय

सर्वे सर्व पु. प्र. ब. व.

समुद्राः समुद्र पु. प्र. ब. व. 

गिरयः पर्वत गिरि पु. प्र. ब. व.

च सुद्धा अव्यय 

अस्मात् त्यापासून इदम् पु. पं. ए. व.

सर्वरूपाः सर्व प्रकारच्या सर्वरूप पु. प्र. ब. व. 

सिन्धवः नद्या सिन्धु स्त्री. प्र. ब. व.

स्यन्दन्ते वाहतात स्यन्द् धातु पसरणे भ्वादिः कर्तरि लट् लकार आत्मनेपद प्र. पु. ब. व.

अतः त्यापासून अव्यय एतद् +तासिल प्रत्यय

च सुद्धा अव्यय 

सर्वाः सर्व पु. प्र. ब. व. 

ओषधयः वनस्पती ओषधि स्त्री. प्र. ब. व.

रसः रस पु. प्र. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

येन ज्याने यद् पु /नपु. तृ ए. व.

एषः हा एतद् पु. प्र. ए. व.

अंतरात्मा अंतरात्मन् पु. प्र. ए. व.

भूतैः पंचमहाभूतांनी भूत नपु. तृ ब. व.

तिष्ठते राहतो स्था धातु कर्तरि लट् लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व. 

हि खरोखर अव्यय

हा मंत्र श्रीमद्भगवद्गीतेच्या 7 व्या अध्यायातील 8 व्या आणि 9 व्या श्लोकाशी समांतर आहे. त्यामध्ये सुद्धा परमेश्वराच्या अस्तित्वाचे वर्णन केले आहे. आधीच्या मंत्रात निरनिराळ्या इन्द्रिय रूपी गुहांमध्ये प्राण वसलेले असतात असे म्हटले होते. आता आपल्या आजुबाजुला असलेल्या वातावरणाचे वर्णन केले आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या, त्यांचे  उगमपर्वत , पाण्यामुळे वाढणारे निरनिराळे वृक्ष आणि वनस्पती हे सर्व 'त्या ' नेच निर्माण केले आहे. हे सांगताना अंतरात्मा असा शब्द वापरला आहे.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की याच्यापासून सर्व समुद्र आणि पर्वत निर्माण झाले. निरनिराळ्या वर्णनांच्या नद्या यापासून प्रवाहित होतात. सर्व औषधी आणि षड्रसांच्या योगाने हा अंतरात्मा वेढलेला असतो.

पुरुष एवेदं विश्वं कर्म तपो ब्रह्म परामृतम्‌। एतद्यो वेद निहितं गुहायां सोऽविद्याग्रन्थिं विकिरतीह सोम्य ॥2.1.10।।

इदं विश्वं कर्म तपः च पुरुषः एव गुहायाम् निहितं परामृतम् एतत् ब्रह्म यः वेद सोम्य सः अविद्याग्रन्थिम् इह विकिरति ॥

इदं हे इदम् नपु. प्र. ए. व. 

विश्वं विश्व नपु. प्र. ए. व. 

कर्म कर्मन् नपु. प्र. ए. व. 

तपः तपस् नपु. प्र. ए. व. 

च सुद्धा अव्यय 

पुरुषः पुरुष पु. प्र. ए. व. 

एव च अव्यय 

गुहायाम् गुहेमध्ये गुहा स्त्री. स. ए. व. 

निहितं दडलेले निहित नपु. प्र. ए. व. 

परामृतम् श्रेष्ठ अमृत परामृत नपु. प्र. ए. व. 

एतत् हे एतद् नपु. प्र. ए. व. 

ब्रह्म ब्रह्मन् नपु. प्र. ए. व. 

यः जो यद् पु. प्र. ए. व. 

वेद 

हे सोम्य 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

अविद्याग्रन्थिम् अविद्याग्रन्थि पु. द्वि. ए. व. 

इह येथे अव्यय 

विकिरति सोडतो वि+कॄ धातु फेकून देणे कर्तरि लट् लकार परस्मैपद प्र. पु. ए. व.

आतापर्यंतच्या मंत्रांतून ह्या विश्वाची उत्पत्ती आणि त्याचे निरनिराळे अविष्कार 'पुरुषा' पासून निर्माण झाले असे नमूद केले आहे. मानवी उत्पादन आणि मानवी शरीराची अचूक निर्मिती त्याचबरोबर मानवी संस्कृती आणि मूल्यांची निर्मिती आणि ज्ञान प्राप्तीची सोय असे सर्व पैलू ह्यांची चर्चा झाली. आता ह्या खण्डातील हा शेवटचा मंत्र एक सारांश ह्या स्वरुपाचा.

आपल्या आयुष्यात अज्ञान हा सर्वात मोठा अडथळा. अविद्येच्या गाठी सोडवत जाणे म्हणजे ज्ञान प्राप्ती. निरीक्षण, अनुभव आणि गुरूकृपा ह्यामुळे आपण घडत जातो. आपले अंतिम लक्ष्य 'त्या' प्राप्ती आणि मोक्ष.

ह्या मंत्राचा थोडक्यात अर्थ असा की

हे सोम्य! ' पुरुष ' म्हणजेच हे सर्व विश्व आहे. तो म्हणजेच कर्म, तप, श्रेष्ठ अविनाशी ब्रह्म. हे ब्रह्म आपल्या हृदयामध्यें स्थित आहे असें जो जाणतो तोच अविद्येच्या गाठी सोडवून टाकतो.

----------------------🙏🙏🙏🙏🙏-----------------