बुधवार, २४ मे, २०२३

श्रीमद्भगवद्गीता 16 वा अध्याय

 श्रीमद्भगवद्गीतेच्या 16 व्या अध्यायाचे नाव ' *दैवासुरसम्पद्विभागयोग*  (दैवी आसुर सम्पाद विभाग योग) असे असून त्यामध्ये 24 श्लोक आहेत. 

सम्पद्  (सम+पद् ) पद् धातू संपादन करणे 

ह्या अध्यायात दैवी आणि आसुरी गुणांचे वर्णन केले आहे. 

देव शब्द दिव् धातू चमकणे, तेजस्वी होणे. ह्या पासून तयार झाला. देव पासून दैवी..

मात्र असूर हा शब्दाचा अर्थ सुद्धा आपण समजतो तसा वाईट नाही.

असु+र. असु म्हणजे प्राण.

असुर म्हणजे प्राणवंत

'असुरिति प्राणनामास्त: शरीरे भवति, निरुक्ति ३.८

असुर शब्दाची व्युत्पत्ति सायण च्या अनुसार अशी आहे' अस्यति क्षिपति सर्वान्‌' - जो सर्वांना फेकून देतो. म्हणजे प्रबल.

असुर पासून आसूरी विशेषण निंद्य गोष्टींसाठी रूढ झाले. शुक्राचार्य व त्यांचे चार पुत्र असुरांचे गुरू होते. आसुरी आनंद, आसुर विवाह अशा संकल्पना आहेतच. वरुण, मित्र, अग्नी इ. देवांना ऋग्वेदात असुर हे आदरार्थी विशेषण लावले आहे. महिषासुर हा ब्रह्मदेवांचा निस्सीम भक्त होता. इराणी भाषेत ‘अहुर’ हा शब्द ‘असुर शब्दाशीच संबंधित असून तो चांगल्या अर्थाने घेतला आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये असुर शब्दाचा अर्थ अज्ञानी (परमेश्वराला न जाणणारा) घमंडी असा घेतला आहे असे वाटते. आसुरी स्वभावाची माणसे मला शरण येत नाहीत असे 7व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात म्हटले आहे. राक्षसी आणि असुरी शक्तींचा उल्लेख 9व्या अध्यायातील 12 व्या श्लोकात सुद्धा आलेला आहे.

हे सर्व अर्थ मनात ठेऊन आपण हा अध्याय समजून घेऊया. 


श्री भगवानुवाच

अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः।

दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्।।16.1।।

श्रीभगवानुवाच - अभयम्‌, सत्त्व-संशुद्धिः, ज्ञान-योग-व्यवस्थितिः, दानम्‌, दमः च यज्ञः स्वाध्यायः, तपः, आर्जवम्‌ च।


श्रीभगवानुवाच - 

अभयम्‌, अभय न भय नपु. प्र. ए. व. 

सत्त्व-संशुद्धिः, अंतःकरणाची शुदधता 

सत्त्वसंशुद्धि स्त्री प्र. ए. व. 

ज्ञान-योग-व्यवस्थितिः, ज्ञानासाठी दृढ संकल्प योग ज्ञानयोगव्यवस्थिति स्त्री. प्र. ए. व. 

वि+अव +स्था धातू

दानम्‌, दान नपु प्र ए. व. 

दमः दम पु. प्र. ए. व. 

च आणि अव्यय 

यज्ञः यज्ञ पु. प्र. ए. व. 

स्वाध्यायः, स्व अध्याय पु. प्र. ए. व. 

तपः, तप नपु. प्र. ए. व. 

आर्जवम्‌ आर्जव नपु. प्र. ए. व. 

च आणि अव्यय

पहिल्या श्लोकात एकूण 9 गुण सांगितले आहेत. काळानुरूप  त्यातील काही गोष्टी आपण करत नाही पण काही जण विशिष्ट ध्येयाने आपले जीवन जगताना दिसतात. त्यांच्या कडे दैवी गुण असतात असे म्हणता येईल.

सर्वात पहिला गुण सांगितला आहे तो निर्भयता. भीती दोन प्रकारची असते एक उपजत आणि दुसरी अनुभवातून निर्माण झालेली. दुसर्‍या प्रकारची भीती सहज समजून घेता येते. जसे कोविड आजाराची भीती जी आधी अस्तित्वात नव्हती पण आता निर्माण झाली. पहिल्या प्रकारची भीती मात्र आपण आपल्याच मध्ये निर्माण केलेली असते जसे लोक काय म्हणतील? उद्या माझे कसे होईल ह्याची विवंचना.

ह्या श्लोकात अशा प्रकारच्या विवंचना पासून मुक्ती म्हणजे अभय असे सांगायचे आहे.

दुसरा दैवी गुण सत्त्वसंशुद्धि असा सांगितला आहे. सत् शब्दाचे तीन अर्थ आहेत.

1. अस्तित्व, 2. सत्य =सत्+य 3. चांगले असणे (सज्जन)

अस् धातू पासून निर्माण झालेला हा शब्द आपली ओळख ज्यामुळे निर्माण होते ते अंतःकरण,ते दोषरहित असले पाहिजे. शुध् धातू म्हणजे पवित्र होणे.

ह्याला चित्तशुद्धि (संशयरहित बुद्धि) असेही म्हणता येईल.

अंतःकरणाची चार वैशिष्ट्ये आहेत.

अहंकार, बुद्धि, स्मृति आणि मन (भावना)

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊन, अयोग्य, कटू आठवणी विस्मृतीत टाकून, ज्ञानाच्या आधारे सज्जन व्यक्ती आपली ओळख निर्माण करत असतात.

सतां हि संदेहपदेषु वस्तुषु प्रमाणमन्तकरणप्रवृत्तय।1.21।अभिज्ञानशकुन्तलम्।।

 एखाद्या गोष्टीच्या निर्णय घेताना जेव्हा सज्जन पुरूष द्विधा मनस्थितीत असतात तेव्हा त्यांचे अंतर्मन योग्य निर्णय देत असते.

परमात्म्याच्या जवळ जाण्याचा मार्ग ज्ञान आणि अष्टांग योग असा सांगितला आहे. ह्या मार्गावर टिकून राहणे म्हणजे ज्ञानयोगव्यवस्थिति. हाच तिसरा गुण सांगितला आहे. 

ज्ञान प्राप्त करण्यासाठी चार गोष्टींची गरज आहे.

1 विवेक

2. वैराग्य

3.षट संपत्ति

4. मुमुक्षत्व

एखादी गोष्ट चूक आहे की बरोबर? हे ठरवता येण्याची क्षमता म्हणजे विवेक. ही क्षमता स्वतः पुरती मर्यादित नसून ती सर्व शास्त्रीय सिद्धांतावर आधारित असली पाहिजे म्हणजेच त्या व्यक्ती ज्ञानाने परीपूर्ण असली पाहिजे.

अशा प्रकारे व्यक्ती जेव्हा ज्ञानी असते तेव्हा त्याला सत्य - असत्य, नित्य-अनित्य ह्यामधील फरक चांगला कळतो. आणि अनित्य, असत्याच्या मार्गावर जाण्यापाठीमागचे कारण अज्ञान हेच आहे, ते समजते. जो खरा ज्ञानी असतो, तो अज्ञानाचा गैरफायदा घेत नाही. आपोआपच त्याच्या मनात इतरांप्रती प्रेम, ममत्व निर्माण होऊन स्वतःमध्ये मात्र वैरागी वृत्ती उत्पन्न होते.

विवेक आणि वैराग्याचा प्रादुर्भाव झाला की आपोआपच षट संपत्ति म्हणजे सहा प्रकारचे गुण अंगिकारले जातात. ते पुढीलप्रमाणे

अ. शम म्हणजे मनाचा निग्रह, काम क्रोध मद मत्सर अशा भावनांवर नियंत्रण.

ब. दम सर्व प्रकारच्या वासना, लालसा, मोह पासून विरक्ती

क. उपरती म्हणजे निवृत्ती

ड. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. सर्व प्रकारच्या द्वन्द्वापासून अलिप्तता जसे सुखदुःख, मान-अपमान, शीत-उष्ण वगैरे

इ. श्रद्धा- शास्त्र, संत, गुरू यांवर अढळ विश्वास

ई. समाधान सर्व शंकांचे शास्त्रीय दृष्टीकोनातून निरसन.

अशी सर्व संपत्ती प्राप्त झाल्यानंतर आपोआपच ती व्यक्ती परमात्म्याला भेटण्यास आतुर होते, त्याला फक्त एकच ध्यास शिल्लक राहतो, हेच ते मुमुक्षत्व.

ह्या सर्वाचे सार सांगणारा एक श्लोक

“ऋते ज्ञानान्न मुक्तिः” !

“सा विद्या या विमुक्तये” !

ज्ञानाशिवाय मुक्ती प्राप्त होणार नाही. त्यासाठी सतत ज्ञान मिळवत राहिले पाहिजे.

चौथा दैवी गुण 'दान' हा सांगितला आहे. आपली एखादी गोष्ट सहजपणे दुसर्‍याला देणे तसे अवघडच. दानी वृत्ती निर्माण होते म्हणजेच तेवढी आत्मियता दुसर्‍या माणसांबद्दल वाटू लागते. अगदी गरीब माणूस सुद्धा आपल्यातील अर्धी भाकरी दुसर्‍या उपाशी व्यक्तीला देताना दिसतो ते ह्याच मुळे.

दानाची महती सांगणारे काही श्लोक.

अल्पमपि क्षितौ क्षिप्तं वटबीजं प्रवर्धते । जलयोगात् यथा दानात् पुण्यवृक्षोऽपि वर्धते ॥

जमीनीवर पडलेले छोटेसे बीज पाण्याशी संपर्क आला असता वटवृक्षात रूपांतर होते. तसाच पुण्ण्यवृक्ष सुद्धा दानामुळे मोठा होतो.

दानेन भूतानि वशी भवन्ति

दानेन वैराण्यपि यान्ति नाशम् ।परोऽपि बन्धुत्वभुपैति दानैर्

दानं हि सर्वेव्यसनानि हन्ति ॥

दान दिल्याने सर्व प्राणीमात्रांना जिंकून घेता येते. दानामुळे शत्रूत्व संपते. दानामुळे शत्रू सुद्धा बांधव होतात. दानामुळे सर्व संकटे दूर होतात.

आनन्दाश्रूणि रोमाञ्चो बहुमानः प्रियं वचः । तथानुमोदता पात्रे दानभूषणपञ्चकम् ॥

आनंदाश्रु, रोमांच, याचकाच्या प्रति अती आदर, प्रिय वचन, सत्पात्री दान ही पाच दानाची भूषणे आहेत. 


अनादरो विलम्बश्च वै मुख्यं निष्ठुरं वचः । पश्चात्तापश्च पञ्चापि दानस्य दूषणानि च ॥

तिरस्कार, दान देण्यात विलंब तोंड फिरवून जाणे, निष्ठुर बोलणे, आणि दान दिल्यानंतर पश्चाताप करणे ही पाच  दानाची दूषणे आहेत.

दम म्हणजे वासनांवर नियंत्रण हा पाचवा दैवी गुण सांगितला आहे. तो गृहस्थाश्रमातील व्यक्तींसाठी सांगितला आहे असे वाटते कारण संन्यासी आणि योगींना हे वेगळे सांगायची गरज नाही. ह्यालाच आत्मसंयम अशा विस्तृत अर्थाने पाहिले तर गीतेत अनेक श्लोक सापडतात.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्, अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् | 5.26

जो राग लोभ यापासून मुक्त आहे, ज्याचा स्वतः च्या मनावर ताबा आहे असा ज्ञानी, मुक्ती चा मार्ग त्याच्या जवळपास आहे.


असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्, अभ्यासेन तू कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ||”6.35 

निःसंशय मनावर काबू करणे कठीण आहे पण हे सुद्धा खरे आहे कि सत्य आणि वैराग्याच्या आधारे हे साध्य होऊ शकते. 


 “यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम्, ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् |” 6.26 

 हे चंचल आणि अस्थिर मन जेव्हा जेव्हा विचलित होते तेव्हा आत्मसंयमाने त्यावर ताबा मिळवता येईल.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्।आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति।।2.64।।

 राग द्वेषापासून दूर, संयमित असा आत्मा, विषयांचा उपभोग घेताना प्रसन्न असतो.


धर्मस्य विद्या नैके ये वै प्रोक्त महर्षिभिः| स्वं स्वं विज्ञानमश्रित्य दमस्तेशं परायणं || दमन सदृशं धर्मं नान्यं लोकेषु शुश्रुम| दमो ही परमो लोके प्रशस्तः सर्वधर्मिणम॥

भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश देताना हेच सांगितले की

धर्म पाळण्याचे अनेक मार्ग विद्वानांनी सांगितले. सर्व मार्गांचा गाभा दमन, आत्म अनुशासन हाच आहे. दम हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे.

आत्मसंयम ह्या विषयावर लिहीताना 'योगवशिष्ठ्' ग्रंथाचा विशेष उल्लेख करावा लागेल. वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना केलेला उपदेश. सुकुमार राम, मर्यादापुरुषोत्तम-राम होण्याची प्रक्रिया म्हणजेच योगवशिष्ठ् ग्रंथ. वाल्मिकी ऋषींनी लिहीला आहे. त्या काळात सांगितलेले आत्मसंयमाचे फायदे आजच्या मानसशास्त्रज्ञांना नाकारता येत नाहीत.

कार्वर - शाइअर यांनी 1981 मधे प्रथम असा शोधनिबंध लिहिला.

त्यानंतर 2015 मध्ये Conquer Yourself, Conquer the World असा निबंध प्रसिद्ध झाला. 

आत्मसंयमाने आत्मशक्ती वाढण्यास मदत होते. मानसिक संतुलन ढळू न देता चिकाटीने काम करण्याचे बळ मिळते.

सहावा दैवी गुण यज्ञ. यज्ञ म्हणजे सामूहिक रीत्या केलेला संकल्प, जेथे पंचमहाभूतांची पूजा बांधली जाते. खरया अर्थाने 'सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यकरवावहै..'

आजच्या काळात जरी यज्ञ करत नसले तरी त्यामध्ये घालण्यात येणार्‍या आहुती म्हणजे काही विशिष्ट वनस्पती आणि काही धान्ये शिवाय वड, औदुंबर, पिंपळ, दुर्वा, खैर, रुई, शमी, आघाडा, तीळ, चरु म्हणजे शिजलेला भात, पायस, केळी, नारळ, रेशमी वस्त्र इ. अनेक हर्वीद्रव्ये वापरली जातात. या द्रव्यांपासुन निर्माण होणारा धूर हा औषधी असतो, ह्यावर संशोधन चालू आहे. यज्ञा मध्ये निर्माण होणार्‍या विभूतींचे अनेक औषधी उपयोग दिसून आले आहेत.

वायुशुदधि आणि जलशुदधि करण्याचा संकल्प यज्ञाद्वारे केला जात असावा. जो त्या काळात नक्कीच महत्वपूर्ण असणार.

7वा दैवी गुण आहे स्वाध्याय.

एखाद्या घटनेचा अर्थ व्यक्तीसापेक्ष असू शकतो. प्रत्येक जण आपापल्या दृष्टीकोनातून त्याचा अर्थ लावू शकतो. एखाद्या घटनेकडे कोणी संधी म्हणून पाहील तर कोणी आपत्ती म्हणून. स्वाध्याय म्हणजे स्व अध्यायाचे हेच महत्व आहे.

वाचस्पत्यम् ह्या संस्कृत महाशब्दकोषात स्वाध्याय ची व्याख्या दोन प्रकारे केली आहे.


स्व+अधि+ईण् म्हणजे स्व चे अध्ययन करणे. स्वाध्याय ही एक आत्मानुभूति आहे , स्वतः मधे वाकून स्वतःलाच पाहून स्वतःचा अभ्यास करायचा. आत्म्याचे अध्ययन करायचे. 

स्वाध्याय शब्दाची दूसरी व्याख्या सू+आ+अधिईड़ म्हणजे "शोभनोऽध्यायः स्वाध्यायः' सत्-साहित्याचे अध्ययन स्वाध्याय आहे.

स्वेन स्वस्य अध्ययन स्वाध्यायः” स्वयं द्वारा स्वयं चे अध्ययन म्हणजे स्वाध्याय.

भगवान महावीरांनी स्वाध्याय चे पांच प्रकार सांगितले आहेत. 

१. वाचना २. पृच्छना ३. परिवर्तना ४. अनुप्रेक्षा ५. धर्मकथा.

मह्रिषी पतंजली योग २/४४ मध्ये म्हणतात 

" स्वाध्यायादिष्टदेवतासंप्रयोग:  स्वाध्यायाने ईष्ट ची प्राप्ति होते. महर्षि वेद व्यासांनी योग ची (१/२८) व्याख्या अशी केली आहे. 

स्वाध्यायद योगमासीत योगात स्वाध्यायमामनेत | स्वाध्याययोगसम्पत्या परमात्मा प्रकाशते || 

 स्वाध्याय ओर योग च्या शक्ति ने आत्म्यामधे परमात्म्याचा प्रकाश दिसू शकतो.

ह्यानंतर सांगितलेला गुण आहे तप आणि आर्जव.

सकाळी ठरवलेली गोष्ट आपण संध्याकाळी विसरून जातो. अनेकदा आपले विचार बदलत राहतात. सातत्य टिकवून ठेवणे सोपे नाही. 

आत्मविकास साधायचा असेल तर तप करण्याचा फायदा होतो. यज्ञ जर सर्वांसाठी करत असतील तर तप आत्म उन्नती साठी करायचा. पुराणांतील गोष्टींच्या आधारे, त्रिगुणातील व्यक्ती आपल्याला स्वभावाप्रमाणे उद्दीष्ट ठेवून तप करीत होते. जसे राक्षस अमर राहून सर्वांवर वर्चस्व गाजवण्यासाठी.

आजच्या काळात विशिष्ट उद्दीष्ट समोर ठेवून वर्षानुवर्षे काम करणाऱे तपस्वी दिसतात.

17 व्या अध्यायात तीन प्रकारचे तप सांगितले आहेत.

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्। ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते।।17.14।।

देव ब्राह्मण, गुरूजन, ज्ञानी यांचे पूजन, पवित्रता, ऋजुता, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप असे म्हणतात.

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्। स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते।।17.15।।

(दुसर्‍यांना) न दुखवता, सत्य मधुर आणि हितकारक बोलणे, स्वाध्याय आणि अभ्यास करणे ह्याला वाडःमयीन तप असे म्हटले जाते.

मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः।

भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते।।17.16।।

मनाची प्रसन्नता, सौम्यभाव, मौन, आत्मचिंतन, मनाचा निग्रह आणि शुद्ध भाव ह्यांना मानसिक तप असे म्हणतात. 

ह्या तीनही श्लोकात आपल्यातील दुर्गुण नष्ट होऊन चांगले गुण अंगिकारणे म्हणजे तप,हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. येथे 12 वर्षे घोर तपश्चर्या करणे अपेक्षित नाही.

ब्रह्मचर्येण तपसा देवा मृत्युमपाघ्नत। (सामवेद 11.5.19)

ब्रह्मचर्याची साधना करून देवांनी मृत्यु वर विजय प्राप्त केला.

(कामवासने मुळे शक्ती चा निःपात होतो असे मानले जाते.)

सर्व श्लोक वाचल्यानंतर श्रीमद्भागवतम् मधील पुढील श्लोक महत्वपूर्ण वाटतो.

विद्यातप:प्राणनिरोधमैत्री-

तीर्थाभिषेकव्रतदानजप्यै: ।

नात्यन्तशुद्धिं लभतेऽन्तरात्मा

यथा हृदिस्थे भगवत्यनन्ते ॥ ४८ ॥

देवपूजा, तपस्या, प्राणायाम, स्नेह, तीर्थ-स्नान, कठिण व्रत, दान आणि विविध मंत्रपाठ केल्याने मनुष्याच्या मनाला तशी परम शुद्धि प्राप्त नाही होऊ शकत, जशी हृदयात अपार भक्ती भाव निर्माण झाल्याने होईल.

ऋजोर्भावः इति आर्जवः‘‘ 

 ऋज् धातू, ऋजु+अणु, सरलता

श्रीमदभागवतातील स्कंद 7 अध्याय 11, 8-12 ह्या श्लोकात भक्ताचे एकूण 30 गुण  सांगितले आहेत. त्यापैकी 8व्या श्लोकात आर्जव हा गुण सांगितला आहे.

सत्यं दया तप: शौचं तितिक्षेक्षा शमो दम: ।अहिंसा ब्रह्मचर्यं च त्याग: स्वाध्याय आर्जवम् ॥ ८ ॥

आर्जव चे पर्यायवाची रूप अदंभ (अ+दम्भ) दांभिकता नसणे, पाखंडी नसणे. म्हणजे ईमानदारी. शांडिल्य उपनिषदातील 10 यम (

अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य क्षमा धृति दया आर्जव मितहार शौच)  पैकी एक, आर्जव.

18 व्या अध्यायात ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे सांगितले त्यामधे आर्जव एक आहे. 

शमो दमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च। ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्।।18.42।।

वैदिक साहित्य आणि जैन धर्म साहित्यात 'आर्जव' चे वर्णन वाचायला मिळते. आपल्या मधे दोष निर्माण करण्यासाठी मोह-माया हेच कारणीभूत असतात. त्यावर विजय मिळविल्याशिवाय व्रत आणि तप करण्याला काहीच अर्थ नाही. हा आर्जव भाव, मोक्ष मिळवण्याचा उत्तम मार्ग आहे. ह्यालाच आर्जव धर्म असे म्हटले जाते. जैन पर्युषण पर्व दरवर्षी १० दिवस पाळला जाते. आत्म्याच्या १० धर्मांना या १० दिवसांत प्रकट करून 'आत्मशुद्धी' करण्याची ही संधी असते. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असते. तिसरा दिवस आर्जवचा असतो. म्हणजे मनाचा सरळपणा, निर्मळपणा, मनात कुठलेही कपट नसणे, मायाचार न करणे.

बारसाणुवेक्खा गाथा 73

मोत्तूण कुडिल भावं णिम्मलहिदयेण चरदि जो समणो। अज्जवधम्मं तइयो तस्स दु संभवदि णियमेण ॥73॥

पहिल्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी पुढील दैवी गुण सांगितले आहेत अभय, आत्मशुद्धी, ज्ञानासाठी दृढ संकल्प, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप आणि आर्जव.

-----------------------------------------------------------------

अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम्। दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्।।16.2।।

अहिंसा, सत्यम्‌, अक्रोधः, त्यागः, शान्तिः, अपैशुनम्‌, भूतेषु दया, अलोलुप्त्वम्‌, मार्दवम्‌, ह्रीः, अचापलम्‌।

अहिंसा, अहिंसा स्त्री. प्र. ए. व. 

सत्यम्‌, सत्य नपु. प्र. ए. व. 

अक्रोधः, अक्रोध पु. प्र. ए. व. 

त्यागः, त्याग पु. प्र. ए. व. 

शान्तिः, शान्ति स्त्री. प्र. ए. व. 

अपैशुनम्‌, टिका न करणे अपैशुन नपु. प्र. ए. व.

पिश् धातू चिरफाड करणे 

भूतेषु सर्व जीवांचा भूत पु. स. ब. व. 

दया दया स्त्री. प्र. ए. व. 

अलोलुप्त्वम्‌, लोभ मुक्त अलोलुप्त्व नपु. प्र. ए. व. 

लुप् धातू गोंधळून जाणे 

मार्दवम्‌, सौम्यभाव मार्दव नपु. प्र. ए. व. 

ह्रीः,नम्रता ह्रीः स्त्री. प्र. ए. व. 

अचापलम्‌ दृढता न चापल नपु.प्र. ए. व.

चप् धातू थरथरणे

अहिंसा हा मूलतः योग साधनेच्या यम प्रकारातील महत्त्वाचा घटक. योग साधनेचा उद्देशच मुळी परमेश्वराला जोडून घेणे. साधू आणि योगी अहिंसेच्या मार्गाने जाणारच. मात्र गृहस्थाश्रमातील व्यक्ती साधारणपणे तीन चार कारणाने हिंसा करू शकते, जसे उदरनिर्वाहासाठी (शिकार) कामकाजी (शिपाई, सैन्य दल), आणि आत्मसंरक्षण. गीतेमध्ये अहिंसा शब्द वाचला की लोक बुचकळ्यात पडतात कारण एकीकडे श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत मग अहिंसा कशी आचरणात आणायची? ह्याच कारणाने तो थोडा वादग्रस्त शब्द आहे. गीतेमध्ये सांगितलेल्या अहिंसेचा हेतू नीट समजून घ्यायला हवा.

महाभारतातील अहिंसा संबंधित असलेले श्लोक 

अहिंसा परमो धर्म:। आदिपर्व महाभारत 11.13

अहिंसा श्रेष्ठ धर्म आहे.

यत् स्यादहिंसासंयुक्त स धर्म इति निश्चय:। कर्णपर्व महाभारत 69.57

ज्या कार्यात हिंसा नाही तोच धर्म आहे. 

अहिंसार्थाय भूतानां धर्मप्रवचनं कृतम्।कर्णपर्व महाभारत 69.57

प्राण्यांची हिंसा होऊ नये म्हणून धर्म चा उपदेश केला आहे.

अहिंसासाधुहिंसेति श्रेयान् धर्मपरिग्रह:।शांतिपर्व महाभारत 15.59 

धर्माचे पालन हिंसेने होत असेल तर हिंसा, अहिंसेने होत असेल तर अहिंसा करावी.

जीवितुं य: स्वयं चेच्छेत् कथं सोन्यं प्रघातयेत्। शांतिपर्व महाभारत 259.22

ज्याला स्वतः ला जिवंत रहायचे आहे तो दुसर्‍यांना कसे मारू शकतो?

12 व्या अध्यायात शत्रू मित्र, सुखदुःख, हानी-लाभ, जय पराजय ह्या सर्वाप्रती समभावाने पहाण्यास सांगितले आहे.

वरील सर्व श्लोकातून हेच लक्षात येते की महाभारतात अहिंसेलाच प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र धर्माचे पालन हे त्यापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. श्रीभगवानकृष्णांनी स्वतः च म्हटले आहे की अहिंसेचे पालन तोपर्यंत केले पाहिजे जोपर्यंत शाश्वत धर्माचे पालन करण्यात ती अडचण निर्माण करत नाही. श्रीभगवानकृष्ण असेही म्हणतात की कोणी मारतात, कोणी मारले जातात आणि सर्वच निमित्तमात्र आहेत. फक्त शरीराचा नाश होतो, आत्मा शाश्वत आहे मग त्यासाठी शोक कशाला करायचा?थोडक्यात अहिंसा हाच आपला धर्म आहे असे आपण मानले पाहिजे. मात्र अहिंसेचे पालन करताना तारतम्य बाळगले पाहिजे.

सत्य ही एक अशी शक्ती आहे ज्यावर विश्वासाचा पाया रचला जातो. सते हितम् म्हणजे सर्वांचे कल्याण होवो. सत्य म्हणजे स्वर्गप्राप्ती चा मार्ग. 

धृति क्षमा दमोस्तेयं, शौचं इन्द्रियनिग्रहः। धीर्विद्या सत्यं अक्रोधो, दशकं धर्मलक्षणम् ॥  धर्माची दहा लक्षणे धैर्य, क्षमा, संयम, चोरी न करणे, स्वच्छता, इन्द्रिय निग्रह, बुद्धि, विद्या, सत्य क्रोध न करणे (अक्रोध)।मनुस्मृति. 

सत्यमेव जयते हे महावाक्य तर न्यायसंस्थांचे ब्रीद वाक्य. 

सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।

नासत्यं च प्रियं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥

सत्य आणि प्रिय बोलावे पण अप्रिय सत्य बोलणे टाळावे, प्रिय असत्य पण बोलू नये हाच सनातन धर्म आहे.

सत्यहीना वृथा पूजा सत्यहीनो वृथा जपः । सत्यहीनं तपो व्यर्थमूषरे वपनं यथा ॥

नापिक जमीनीत बी पेरणे जसे व्यर्थ आहे , तसेच सत्याशिवाय केलेली पूजा, जप तप सुद्धा व्यर्थ आहे.

नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम्। न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते।।

सत्य हाच धर्म. सत्याशिवाय काहीच नाही. असत्यापेक्षा तीक्ष्ण दुसरे काहीच नाही.

सत्यप्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम् ॥पतंजली योगसूत्र 2.36॥

जेव्हा सत्य अंगीकारले जाईल तेव्हाच कर्माचे फळ मिळेल. 

सत्य शोधून काढण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी ज्ञान आवश्यक. म्हणून चाणक्य नीती मध्ये असे म्हटले आहे की, 

अधीत्येदं यथाशास्त्रं नरो जानाति सत्तमः । धर्मोपदेशं विख्यातं कार्याऽकार्य शुभाऽशुभम् ।।

जी व्यक्ती शास्त्रात सांगितलेल्या नियमांचा सखोल अभ्यास करून ज्ञान प्राप्त करते त्या व्यक्तीला चांगले वाईट ह्यामधील भेद, शुभ कर्मांचे ज्ञान प्राप्त झाल्याने जीवनात सफलता प्राप्त होते.

ऋतं वच्मि सत्यं वच्मि ।असे अथर्वशीर्षात म्हटले आहे. म्हणजेच शाश्वत सत्य आणि सापेक्ष सत्य ह्याला मान्यता आहे.

पण अंतिम सत्य मात्र ईश्वर आहे.

सत्यं शिवं सुंदरम्. सत्य हेच शिव आहे आणि म्हणूनच ते सुंदर आहे.

क्रोध नवरसातील एक रस. क्रोध, निषेध नोंदवण्यासाठी प्रभावी माध्यम. अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी आवश्यक प्राथमिक घटक. रामायणातील पहिला श्लोक वाल्मिकी ऋषींना क्रोधामुळे सुचला अगदी छंदबद्ध.

मां निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम् ॥1।।

त्यानंतर महाकाव्य निर्माण झाले.

रूद्र च्या जन्माची कहाणी सुद्धा अशीच. ब्रह्माचा क्रोध अनावर झाल्याने भुवयांच्या मधून तो प्रकट झाला ज्यापासून निळ्या - लाल रंगाचे बालक जन्माला आले.

धिया निगृह्यमाणोऽपि भ्रुवोर्मध्यात्प्रजापते: ।

सद्योऽजायत तन्मन्यु: कुमारो नीललोहित: ॥ श्रीमद्भागवतम् 3.12.7 ॥

सर्वसामान्य व्यक्तींच्या बाबतीत मात्र अती क्रोध हा नुकसानकारक. आपल्याला दुर्वास ऋषी, जमदग्नि ऋषींच्या क्रोधाच्या कथा माहीत आहेत.

हिरण्यकश्यपू च्या क्रोधाचे वर्णन पुढील श्लोकात वाचायला मिळते. 

आह चेदं रुषा पूर्ण: सन्दष्टदशनच्छद: ।

कोपोज्ज्वलद्भ्यां चक्षुर्भ्यां निरीक्षन् धूम्रमम्बरम् ॥ श्रीमद्भागवतम् ।7.2.2 ॥

क्रोधाने भिनलेल्या त्याने आपले ओठ चावून जळजळीत नजरेने आकाशाकडे पाहिले, तेव्हा सर्व आकाश धूसर दिसू लागले.

क्रोधो मूलमनर्थानां क्रोधः संसारबन्धनम्। धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात् क्रोधं विवर्जयेत्।।   

मनुष्याच्या सर्व संकटांचे मूळ कारण क्रोध आहे, क्रोध संसाराच्या बंधनाचे कारण आहे, क्रोधाने धर्माचा नाश होतो म्हणून क्रोधाचा त्याग केला पाहिजे.

क्रोधो सर्वार्थ नाशको”

क्रोधाने सर्व कर्म नष्ट होतात.

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।

स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥2.63॥

क्रोधाने बुद्धि भ्रष्ट होते, बुद्धि भ्रष्ट झाल्याने भ्रम आणि स्मृतिभ्रंश. ह्यामुळे त्याचा बुद्धिभेद होतो आणि माणसाचे अधःपतन होते. 

क्रोधो हि शत्रुः प्रथमो नराणां

देहस्थितो देहविनाशनाय।

यथा स्थितः काष्ठगतो हि वह्निः

स एव वह्निर्दहते शरीरम्॥

माणसाचा पहिला शत्रू स्वतः कडे असणारा क्रोध, जो त्याच्या नाशाला कारणीभूत होतो, जसे लाकडात अग्नीचा वास असतो, तोच अग्नी लाकडाच्या जळून जाण्याला कारणीभूत ठरतो.

ह्यानंतर चा गुण सांगितला आहे त्याग. त्यज् धातू पासून निर्माण झालेला हा शब्द. ह्याच्या निरनिराळ्या छटा आहेत. शरीर त्यागणे म्हणजे मृत्यू. 

प्रेमापोटी बलिदान करणे जसे क्रांतिकारकांचे बलिदान. 

मोह माया क्रोध अहंकार यांचा त्याग करणे म्हणजे आत्म-उन्नती. त्यागाने देवत्व प्राप्त होते जसे प्रभू रामचंद्र आणि गौतम बुद्ध.  त्यागाचा आणि ज्ञानाचा जवळचा संबंध आहे. हे जग मिथ्या आहे याचे ज्ञान झाल्यावर त्याचा त्याग करावासा वाटतो.

नास्ति विद्या समं चक्षु नास्ति सत्य समं तप:। नास्ति राग समं दुखं नास्ति त्याग समं सुखं॥ - 

विद्येसारखे चक्षू नाहीत, सत्यासारखी दुसरी तपश्चर्या नाही. आसक्ति सारखे दुःख नाही आणि त्यागासारखे सुख नाही. 

ऐच्छिक सेवानिवृत्ती घेण्यासाठी त्यागपत्र दिले म्हणजे तो काही त्याग नव्हे. त्याग करणे म्हणजे जबाबदारी टाळणे असा अर्थ अपेक्षित नाही, हे सांगणारा 18 व्या अध्यायातील 8 वा श्लोक.

दुःखमित्येव यत्कर्म कायक्लेशभयात्त्यजेत्।

स कृत्वा राजसं त्यागं नैव त्यागफलं लभेत्।।18.8।।

जो मनुष्य निर्धारित कर्मांना दुःख समजून, शारीरिक कष्टांच्या भीतीने त्याचा त्याग करतो, अशा रजोगुणी त्यागाचे फळ मिळत नाही.

परमेश्वराची भक्ती करण्यासाठी आपल्या कर्माचा त्याग करणे सुद्धा अपेक्षित नाही. हे 12 व्या अध्यायातील 11 व्या श्लोकात सांगितले आहेच.

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।

सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्।।12.11।।

जर तू माझ्यासाठी कर्म करण्यास असमर्थ असशील तर केवळ आत्मनियंत्रण करून कर्मफलांचा त्याग कर.

न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः । यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते ॥ 

सर्व शरीरधारींना आपल्या संपूर्ण कर्मांचा त्याग करणे शक्य नाही म्हणून जे कर्मफलांचा त्याग करतात त्यांना त्यागी म्हणता येईल.

शांत रस नवरसातील शेवटचा रस. सुख आणि शांती जणू काही जुळे शब्द. शांततेच्या दोन सामान्य संकल्पना आहेत - नकारात्मक शांती आणि सकारात्मक शांती. हिंसा घडत नाही म्हणजे शांती अशी नकारात्मक व्याख्या काही जण करतात तर सकारात्मक शांती म्हणजे मुळातच अस्तित्वात असणारी,आत्मिक शांति. सामूहिक किंवा सामाजिक शांतता सुद्धा महत्त्वाची कारण त्या मधे पशु पक्षी सुद्धा सामावले जातात. वैदिक साहित्यात निरनिराळे शांती पाठ सापडतात.

यजुर्वेदातील शांति-मन्त्र सर्वसमावेशक आहे. 

ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्षंशान्ति, पृथ्वी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:।

वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा: शान्तिर्ब्रह्मशान्ति,सर्वँशान्ति:, शान्तिरेवशान्ति, सा माशान्तिरेधि॥ ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।।36.17।। 

हे परमात्मा, आकाशात शांती, अंतरीक्षात शांती, पृथ्वी वर शांती असू दे, जलात शांती, औषधे, वनस्पतींमध्ये शांती, सार्‍या विश्वात शांती, सर्व देवतागण शांत असू दे. ब्रह्म शांत, सगळी कडे, चारी बाजूंना शांती असू दे.

शांती चा शब्दकोशातील अर्थ आहे मौन. व्याकुळता किंवा अस्वस्थतेचा अभाव. आवाज-रहीत अवस्था. अशांती म्हणजे कोलाहल.

मनात शांती असेल तर आजूबाजूच्या अशांती वर मात करता येते. येथे गौतम बुद्धाच्या कथेचा उल्लेख करावासा वाटतो. कोणी व्यक्ती त्यांचा अतिशय हीन शब्दात अपमान करीत असता, त्यांनी त्यांची शांती ढळू दिली नाही, शेवटी ती त्रास देणारी व्यक्तीच कंटाळली. गौतम बुद्ध म्हणाले मी तुझ्या शिव्याशापांचा स्वीकारच केला नाही. थोडक्यात शांती म्हणजे सुखासमाधानाचा मंत्र. आत्मविकासाची गुरूकिल्ली. मन शांत असेल तर शरीरात उर्जा निर्माण होते. 


कबीरा यह गत अटपटी, चटपट लखि न जाए। जब मन की खटपट मिटे, अधर भया ठहराय।

अधर म्हणजे ओठ.  आपल्या ओठांची हालचाल शांती नसेल तर जास्त होते. जेव्हा मनाची खटपट संपेल तेव्हा ओठांची हालचाल सुद्धा संपेल. 

शांती कुणाकडून घेता येत नाही ती आपली आपल्यालाच मिळवावी लागते.

शांती म्हणजे परम सुख. समाधान. म्हणूनच रविन्द्रनाथांनी त्यांच्या घराचे नाव ठेवले शांतीनिकेतन.


संत कबीरांनी म्हटले आहे, 

ॐ निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय, बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय।

जो आपली निंदा करतो, त्याला अधिकाधिक आपल्या जवळ ठेवले पाहिजे, तो पाणी, साबण न वापरताच आपला स्वभाव साफ ठेवतो. 

निंदकाचे घर असावे शेजारी असे आपण म्हणतो खरे पण इथे मात्र अपैशुनम म्हणजे टिका न करणे,हा गुण सांगितला आहे. निंदानालस्ती करणे म्हणजे आपल्या वाणीचा दुरूपयोग. जे विचार आपल्या मनात निर्माण होतात तेच शब्दांवाटे बाहेर पडतात. ज्याचे मन शुद्ध त्याची वाणी शुद्ध. दुसर्‍यांची निंदा करणे म्हणजे एक प्रकारे आपल्या मनातील त्या व्यक्ती बद्दल असणारी आसूया व्यक्त करणे.

इन्दुं निन्दति तस्करो गृहपतिं जारो सुशीलं खलः

साध्वीमप्यसती कुलीनमकुलो जह्यात् जरन्तं युवा ।

विद्यावन्तमनक्षरो धनपतिं नीचश्च रूपोज्ज्वलम्

वैरूप्येण हतः प्रबुद्धमबुधो कृष्टं निकृष्टो जनः ॥


चोर चंद्राची निंदा करतो, व्याभिचारी गृहस्थ व्यक्तीची, दृष्ट सज्जनाची, व्यभिचारी स्त्री साध्वी ची, अकुलीन व्यक्ती कुलीन व्यक्ती ची निंदा करतात. युवा पीढ़ी वृद्धांची निंदा करतात; अडाणी विद्वानांची , नीच माणूस धनवान व्यक्तींची , कुरुप सुस्वरूप ची, अज्ञानी ज्ञानींची, नीच मनुष्य सज्जन माणसाची  निंदा करत असतात.

स्कंदपुराणात असे म्हटले आहे की

परनिंदा महा पापं, परनिंदा महा भयं, परनिंदा महा दुखं, तस्या पातकम न परम"  

परनिंदा महापाप आहे, परनिंदा महा भय युक्त आहे, परनिंदा महा दुःखदायक आहे. याच्या सारखे महापातक नाही.

मनुस्मृति मध्ये सुद्धा हेच सांगितले आहे.

नास्तिक्यं वेदनिंदा च देवतानां च कुत्सनम्।

द्वेषं दम्भं च मानं च क्रोधं तैक्ष्ण्यं च वर्जयेत्।

परमेश्वराच्या अस्तित्व वर अविश्वास, वेदांची निंदा, देवतांचा अपमान, लोकांशी शत्रुत्व , पाखंडी वृत्ती , अहंकार, क्रोध, हेकट स्वभाव ह्या सर्व दोषांचा त्याग करणेच हितकारक आहे.

ह्यानंतर सांगितलेला गुण आहे भूत दया. ह्याचा शब्दकोशातील अर्थ, चेतन आणि जड़ सर्वांच्या प्रति मनात असलेला दया-भाव.

आपल्या संस्कृतीनुसार आपण पाच मूलभूत, पंचमहाभूते मानतो. मात्र आधुनिक शास्त्राप्रमाणे वायु आणि जल ही संयुगे आहेत. आपल्याला 3र्या अध्यायातील श्लोकात ह्या पंचमहाभूतांच्या देवतांचा आदर करावा असे सांगितले आहे.

सर्वे वेदा न तत् कुर्युः सर्वे यज्ञाश्च भारत । सर्वे तीर्थाभिषेकाश्च तत् कुर्यात् प्राणिनां दया ॥

हे भारत ! सगळेच वेद अध्ययन यज्ञ, तीर्थ, अभिषेक नाही करू शकत पण ते प्राण्यांवर दया तर नक्कीच करू शकतात.

न सा दीक्षा न सा भिक्षा न तद्दानं न तत्तपः ।न तद् ध्यानं न तद् मौनं दया यत्र न विद्यते ॥

दयाभाव नसेल तर दीक्षा, भिक्षा, दान, तप, ध्यान,आणि मौन सर्वच निरर्थक आहे.

चाणक्य नीती मधला दया-भाव संबंधित श्लोक फार मार्मिक आहे.

राजा वेश्या यमो ह्यग्निस्तकरो बालयाचको। पर दु:खं न जानन्ति अष्टमो ग्रामकंटका:।। 

ह्या श्लोकात चाणक्य असे म्हणतात  कि ह्या जगात आठ प्रकारचे लोक असे आहेत की ते दुसर्‍यांचे दुःख समजून घेत नाहीत. राजा, यमराज, अग्नि, बालक, चोर, वेश्या, याचक आणि समाजकंटक ह्यांच्या वर दुःखाचा कसलाच परीणाम होत नाही.

लोभमुक्त असणे हा सुद्धा एक दैवी गुण सांगितला आहे.

लोभात्क्रोधः प्रभवति लोभात्कामः प्रजायते । लोभान्मोहश्च नाशश्च लोभः पापस्य कारणम् ॥ हितोपदेश, मित्रलाभ, २७।। 

लोभाने क्रोधभाव उत्पन्न होतो. लोभाने लालसा जागृत होतात. लोभाने मोह निर्माण होतो आणि व्यक्ती विवेकबुद्धी घालवून बसतो  आणि नाशाला कारणीभूत होतो. वस्तुतः लोभ हेच सर्व पापांचे कारण आहे.

लोभेन बुद्धिश्चलति लोभो जनयते तृषाम् ।

तृषार्तो दुःखमाप्नोति परत्रेह च मानवः ।।

(हितोपदेश, मित्रलाभ, १४२)

लोभी माणसाची बुद्धि विचलित होते , लोभ असला की अमर्यादित हाव निर्माण होते, अशा व्यक्तीला केवळ दुःखाला सामोरे जावे लागते, ह्या जगात आणि परलोकात सुद्धा.

मृद् धातू पासून मृदुता. मार्दव म्हणजे लिनता. नम्रता.

महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे राहाती ।हा श्लोक माहीत आहेच.

जैन धर्माच्या पर्युषणातील दुसरा दिवस म्हणजे मार्दव धर्म.

मान, दुरभिमान, अहंकार हे माणसाचे मोठा शत्रूच. यावर उपाय म्हणजे मार्दवता (मृदुता),आत्मसात करणे. अहंकाराने मोठी झाडे मोडून पडतात, तर नम्र होणारी, वाकणारी लव्हाळी मात्र सुखरूप राहते. आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी मुदृता-मार्दवच धारण केले पाहिजे. मार्दवतेने आठ प्रकारचे अहंकार संपुष्टात येतात. जसे  जात , कुल, शक्ती , ऐश्वर्य, रूप, तप, विद्या, संपत्ती. 

ह्री म्हणजे नम्रता 

विद्या ददाति विनयं विनयात् याति पात्रताम् । 

विनम्रता, यशस्वी होण्याची जणू गुरूकिल्ली आहे. विश्वामित्र ऋषींची ब्रह्मर्षी उपाधि न मिळण्यामागची कथा सर्वश्रुत आहेच. पूर्ण योग्यता असताना केवळ अहंकारामुळे उपाधी मिळत नव्हती. अहंकार गळून गेला. नम्रता आली आणि उपाधी मिळाली.

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।। सर्वधर्मांचा त्याग करून तू फक्त माझ्या आश्रयाला ये. मला शरण ये. सर्व पापातून तुझी मुक्तता होईल असे श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे.

2र्या श्लोकात शेवटचा म्हणजे अकरावा दैवी गुण सांगितला आहे अचापलम् म्हणजे दृढता, निश्चय,निर्धार.

काम तडीस नेण्यासाठी प्रखर निश्चय करावा लागतो नाहीतर काम अर्धवट राहण्याची शक्यता असते. दुसर्‍या अध्यायातील 37 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला हेच सांगतात. कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।

अशा दृढतेला चाणक्यंनी सिंहाची उपमा दिली आहे.

प्रभूतंकार्यमल्पंवातन्नरः कर्तुमिच्छति। सर्वारंभेणतत्कार्यं सिंहादेकंप्रचक्षते। नीति ग्रंथ। 6. 16।।

ज्या प्रकारे सिंह पूर्ण ताकदीनिशी आपली शिकार करतो,त्याच प्रमाणे व्यक्ति ने दृढ़ निश्चय करून आपले लक्ष्य पूर्ण केले पाहिजे.

6वा अध्याय ज्याचे नाव आत्मसंयम योग, त्यातील 23,24 व्या श्लोकात दृढ संकल्प करून इन्द्रियांवर ताबा ठेवून लक्ष्य गाठण्यास सांगितले आहे.

सरतेशेवटी, वरूनच आलेला आदेश, आपल्याला मान्य असो वा नसो.. त्यात बदल नाही हे सांगणारा श्लोक

नूनं ह्यद‍ृष्टनिष्ठोऽयमद‍ृष्टपरमो जन: । अद‍ृष्टमात्मनस्तत्त्वं यो वेद न स मुह्यति ॥ श्रीमद्भागवतम् 10.5.30 ॥

प्रत्येक व्यक्तिचे प्रारब्ध हे त्याच्या कर्मानुसार ठरते.

आपले कर्म आणि त्याची फळे देणारा पण मीच आहे असे श्रीभगवानकृष्णांनी म्हटले आहेच.

----------------------------------------------------------------

तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता। भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत।।16.3।।

तेजः, क्षमा, धृतिः, शौचम्‌, अद्रोहः, न अति-मानिता दैवीम्‌ सम्पदम्‌ अभिजातस्य भवन्ति।

 

तेजः, तेजस् नपु. प्र. ए. व. 

क्षमा, क्षमा स्त्री प्र. ए. व. 

धृतिः, धैर्य धृति स्त्री प्र. ए. व. 

शौचम्‌, शुद्धता शौच नपु. प्र. ए. व. 

अद्रोहः, अशत्रुत्व अ द्रोह पु. प्र. ए. व. 

न 

अति-मानिता मानापमान अतिमानिता स्त्री. प्र. ए. व. 

दैवीम्‌ दैवी दैव स्त्री. द्वि. ए. व. सम्पदम्‌ संपादन सम्पद स्त्री. द्वि. ए. व. 

अभिजातस्य जन्मापासून अभिजात पु. ष. ए. व. 

जन् धातू उत्पन्न करणे 

भवन्ति आहेत भव धातू होणे लट लकार प्र.पु.ब.व.

पहिल्या दोन श्लोकांत आपण एकूण 20 दैवी गुण वाचले आता ह्या श्लोकात अजून सहा गुण सांगितले आहेत.

त्यापैकी पहिला तेज. पंचमहाभूतांपैकी एक. तेज म्हणजे उर्जा, आत्मिक शक्ती.

योगाभ्यासात तेजस म्हणजे तीव्र आंतरिक शक्ती. आतापर्यंत सांगितलेले सर्व गुण आत्मसात करता करता, आत्मिक शक्ती तीव्र होणारच.

सिंहःशिशुरपि निपतति मदमलिनकपोलभित्तिषु गजेषु ।

प्रकृतिरियं सत्ववतां न खलु वयसस्तेजसो हेतुः ॥ ३८॥ नीती शतक भर्तृहरि।।

उपजत शक्तीमान, तेजस्वी सिंहाचा बच्चा त्वेषाने मदमस्त हत्ती वर चाल करून जातो. कमी वयाचा आणि तेजाचा काही संबंध नाही. 

यस्यास्ति भक्तिर्भगवत्यकिञ्चना

सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा: ।

हरावभक्तस्य कुतो महद्गुणा

मनोरथेनासति धावतो बहि: ॥श्रीमद्भागवतम् ।5.18.12॥ज्यांच्या मनात श्रीभगवानकृष्णांच्या प्रती अपार भक्ती आहे त्यांच्या कडे आपोआपच दैवी गुण उत्पन्न होतात. ज्यांच्या मनात भक्ती नाही, त्यांच्या कडे असे गुण कुठून येणार?

क्षमा करणे आणि क्षमा मागणे दोन्ही अत्युच्च आहे. जो क्षमाशील असतो त्याचा अहंकार संपुष्टात आलेला असतो. असे म्हणतात की आयुष्यात जी व्यक्ती दुसर्‍या ची आधी माफी मागते तो धैर्यवान आणि जो आधीच माफ करून टाकतो तो शक्तीशाली असतो. 

क्षान्ति तुल्यं तपो नास्ति सन्तोषान्न सुखं परम् ।न च धर्मो दयापरः ॥

क्षमा सारखे दुसरे तप नाही, संतुष्टी सारखे दुसरे सुख नाही ,  दयेपेक्षा श्रेष्ठ धर्म नाही.

क्षमा म्हणजे तेजस्वी पुरुषांचे तेज,  तपस्वी व्यक्तींचे ब्रह्म,  सत्यवादी पुरुषांचे सत्य आहे, क्षमा म्हणजे यज्ञ, क्षमा म्हणजे मनोविग्रह, असे म्हटले जाते. 


नरस्याभरणं रूपं, रूपस्याभरणं गुणः। गुणास्याभरणं ज्ञानं, ज्ञानस्याभरणं क्षमा।।

सुंदर रूप म्हणजे माणसाचा दागिना. गुण हा त्या रूपाचा दागिना. ज्ञानशील माणसाचे गुण अधिक शोभून दिसतात आणि क्षमाशीलता ज्ञानी व्यक्तीला आणखी शोभून दिसते.

क्षमा बलमशक्तानाम् शक्तानाम् भूषणम् क्षमा। क्षमा वशीकृते लोके क्षमयाः किम् न सिद्ध्यति॥

क्षमा शक्तीहीन व्यक्तिंची शक्ती, बलवानांचे आभूषण , क्षमा हा गुण संपूर्ण विश्वात व्यापून राहिला आहे. , क्षमाशीलतेने सर्व कार्य सिद्धीस जातात.

'क्षमा वीरस्य भूषणम'.

कवी श्री रामधारी सिंह “दिनकर” यांची छान कविता - 

क्षमा शोभती उस भुजग को

जिसके पास गरल हो,

उसको क्या, जो दतहीन विषहीन, विनीत, सरल हो।

सहनशीलता, क्षमा, दया को तभी पूजता जग है, 

बल का दर्प चमकता उसके पीछे जब जगमग हो।

निरनिराळ्या ग्रंथात क्षमतेविषयी सांगितलेले श्लोक.

धर्मलक्षणे, मनुस्मृति प्रमाणे 

धृति: क्षमा दमोऽस्‍तेयं शौचमिन्‍द्रियनिग्रह:।

धीर्विद्या सत्‍यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्‌।। (मनुस्‍मृति ६.९२)


पद्मपुराण-:

ब्रह्मचर्येण सत्येन तपसा च प्रवर्तते। दानेन नियमेनापि क्षमा शौचेन वल्लभ।। अहिंसया सुशांत्या च अस्तेयेनापि वर्तते।

एतैर्दशभिरगैस्तु धर्ममेव सुसूचयेत।।

महात्मा विदुरांनी 

धर्माची आठ लक्षणे सांगितली आहेत. 

इज्या (यज्ञ-याग, पूजा आदि), अध्ययन, दान, तप, सत्य, दया, क्षमा और अलोभ. 

धृ धातू धारण करणे. धृति म्हणजे कठीण परिस्थितीत न डगमगणारा, धैर्यशील. आपल्या दृढ निश्चयाने आपले इप्सित साध्य करणे म्हणजे धृति. 18 व्या अध्यायातील 33,34,35 व्या श्लोकात अनुक्रमे सात्विक राजसी आणि तामसी प्रकारच्या धृतींचे वर्णन केले आहे.

शौचम म्हणजे शुद्धता, पवित्रता

माणसाची अध्यात्मिक उन्नती असा अर्थ पण लावता येईल. योगाभ्यासातील पाच नियमांपैकी एक नियम म्हणजे शोचम. योगसूत्र 2.40 मध्ये बाह्य शुद्धतेचे वर्णन केले आहे तर 2.41 मध्ये मनाच्या शुद्धतेचे वर्णन केले आहे.

सर्वेषामेव शौचानामर्थशौचं परं स्मृतम् ।

योऽर्थे शुचिर्हि सः शुचिर्न मृद्वारिशुचिः शुचिः ॥5.106॥

मनुस्मृति नुसार आर्थिक शुद्धता ही सर्वश्रेष्ठ शुद्धता आहे.

मनुस्मृति मध्ये 5व्या अध्यायातील 106-109 पर्यंत च्या श्लोकात शुचितापूर्ण आचरणाचे वर्णन केले आहे.

अद्भिर्गात्राणि शुद्ध्यन्ति मनः सत्येन शुध्यति ।

विद्यातपोभ्यां भूतात्मा बुद्धिर्ज्ञानेन शुद्ध्यति ॥5.109॥

शरीराची शुद्धि पाण्याने होते. मनाची शुद्धि सत्यवचनाने, जीवात्म्याची शुचिता विद्या आणि तप करून तर बुद्धि ज्ञानार्जन केल्याने लखलखीत होते.

ह्या श्लोकात पाचवा गुण सांगितला आहे अद्रोह म्हणजे शत्रूत्व नसणे, निष्ठावान, ईमानदार.

अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा |

अनुग्रहश्च दानं च सतां धर्मः सनातनः ||


 ह्या जगातील समस्त प्राणीमात्रांशी मानसिक किंवा शारीरिक पातळीवर, शाब्दिक दृष्टीने द्रोह करू नये,सर्वांच्या प्रति दया भाव, दानशीलता ठेवावी अशा पद्धतीने सज्जनांनी भारतीय सनातन धर्माचा आदर्श घालून दिला आहे. 

अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा । अनुग्रहश्च दानञ्च शीलमेतद् विदुर्बुधाः ॥

वाचिक , मानसिक , कोणत्याही कृतीने कधीही प्राणिमात्रांना दुखवू नये त्यांच्याबरोबर शत्रूत्व ठेवू नये, अनुग्रह, दानशूरता उत्तम शील हेच ज्ञानी लोकांचे लक्षण आहे.

शेवटचा सांगितलेला गुण आहे अति-मानिता म्हणजे स्वतःचे अवास्तव महत्त्व न वाढवणे. निर्गवी व्यक्तिमत्व.

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्। विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते।।18.53।।

अहंकार, बळ, दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह चा त्याग करून ममत्वभावरहित आणि शान्त पुरुष ब्रह्म प्राप्ति साठी योग्य मानला जातो.

ह्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकांचा मिळून अर्थ असा की हे अर्जुन, आता पर्यंत जे 26 दैवी गुण सांगितले आहेत ते सर्व दैवी गुण संपादन झालेल्या पुरूषांची लक्षणे आहेत. 

-----------------------------------------------------------------

दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च। अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्।।16.4।।

हे पार्थ ! दम्भः, दर्पः, अभिमानः च, क्रोधः, पारुष्यम्‌ च, अज्ञानम्‌ एव च आसुरीम्‌ सम्पदम्‌ अभिजातस्य।


हे पार्थ ! 

दम्भः, दम्भ पु. प्र. ए. व. 

दर्पः, घमंड दर्प पु. प्र. ए. व. 

अभिमानः अभिमान पु. प्र. ए. व. 

च, 

क्रोधः, क्रोध पु. प्र. ए. व. 

पारुष्यम्‌ कठोर वाणी पारुष्य नपु. प्र. ए. व. 

च, 

अज्ञानम्‌ अज्ञान नपु. प्र. ए. व. 

एव च 

आसुरीम्‌ आसुरी स्त्री. द्वि. ए. व. 

सम्पदम्‌ संपदा सम्पद स्त्री. द्वि. ए. व. 

अभिजातस्य उत्पन्न झालेला अभि+जन धातू क्त प्रत्यय ष. ए. व.

ह्या श्लोकात आसुरी गुणांची माहिती सांगितली आहे.

त्यापैकी पहिला (दु)र्गुण दम्भ.

श्री शंकराचार्य यांनी म्हटल्या प्रमाणे दम्भ चा अर्थ, जे लोक अधार्मिक असून सुद्धा धार्मिक असल्याचे सोंग घेतात ते दांभिक.

ह्यासाठी रावणाचे उदाहरण देता येईल. वाल्मिकी रामायणानुसार रावण हा शिवभक्त असूनही नीच काम करीत होता.

ह्यानंतरचा आसुरी गुण आहे दर्प म्हणजे घमंडी, अहंकारी.

ह्याच अध्यायातील 18 वा श्लोक

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥16.18.

अहंकार, बल, दर्प, काम आणि क्रोधाच्या आधीन असलेले लोक स्वतः च्या आणि दुसर्‍याच्या शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याचा सुद्धा द्वेष करतात. 

अभिमान म्हणजे गर्विष्ठ,

वर सांगितलेले सर्व दुर्गुण, ज्यामुळे माणूस स्वतः ला श्रेष्ठ आणि दुसर्‍यांना तुच्छ समजायला लागतो, तो स्वतः मध्ये आणि दुसर्‍या मध्ये असणार्‍या परमात्म्याच्या अंशा लाही विसरून जातो. अधःपतनाच्या मार्गावरून जाणारा असा स्वतःच्या विनाशाला कारणीभूत ठरतो.

ह्यानंतर सांगितलेल्या आसुरी गुणाचे वर्णन आपण 2र्या श्लोकात वाचले आहे. क्रोध ह्या दुर्गुणाची अधिक माहिती देणारे श्लोक. 

क्रोधो वैवस्वतो राजा तॄष्णा वैतरणी नदी ।विद्या कामदुघा धेनु: सन्तोषो नन्दनं वनम् ।।


क्रोध, यमराज प्रमाणे आहे, त्याची तृष्णा भयंकर अशा वैतरणी नदीसारखी असचे विद्या माता कामधेनु प्रमाणे फळ देते संतोष हा नंदनवनासारखा असतो. आता ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते की तो कशाची निवड करतो? क्रोध की विद्या आणि संतोष? 

क्रोधो हर्षश्च दर्पश्च ह्रीः स्तम्भो मान्यमानिता।

यमर्थान् नापकर्षन्ति स वै पण्डित उच्यते।।

 ज्ञानी तोच असतो ज्याच्यावर स्वार्थ, क्रोध, अहंकार, कुकर्म, अति-उत्साह, अशा भावनांचा प्रभाव पडत नाही.

क्रोध – वाच्यावाच्यं प्रकुपितो न विजानाति कर्हिचित्। नाकार्यमस्ति क्रुद्धस्य नवाच्यं विद्यते क्वचित्।।

 क्रोधाच्या प्रभावाखाली माणसाला काय बोलावे, काय बोलू नये त्याचा विवेक रहात नाही. त्याच्या साठी अकार्य आणि अवाच्य असे काही नसते.

ह्या श्लोकात पाचवा आसुरी गुण पारुष्य  (परुष+ष्यञ्) म्हणजे अप्रिय भाषण असा सांगितला आहे.

पारुष्यमनृतञ्चैव पैशुन्यञ्चापि सर्व्वशः । असम्बद्धप्रलापश्च वाङ्मयं स्याच्चतुर्व्विधम् ॥ “

पारुष्यं अनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः । असंबद्धप्रलापश्च वाङ्मयं स्याच्चतुर्विधम्

कठोर बोलणे, खोटे बोलणे, निंदा करणे आणि असंबद्ध बोलणे अशी चार प्रकारची वाचिक पापे आहेत.

कटु वचनाने हृदयावर झालेली जखम खूप जास्त खोल असते.

शेवटचा आसुरी गुण सांगितला आहे अज्ञान.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की ज्या व्यक्तीकडे दम्भ, दर्प, अभिमान, (गर्व), क्रोध, कठोर बोलणे, आणि अज्ञान असे गुण आहेत ती आसुरी सम्पदा आहे.

---------------------------------------------------------------

दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता। मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव।।16.5।।

दैवी सम्पत्‌ विमोक्षाय, आसुरी निबन्धाय मता। हे पाण्डव ! मा शुचः दैवीम्‌ सम्पदम्‌ अभिजातः असि।


दैवी दैवी स्त्री प्र. ए. व. 

सम्पत्‌ सम्पदा सम्पद् स्त्री प्र. ए. व. 

विमोक्षाय, मुक्तीसाठी विमोक्ष पु. च. ए. व. 

आसुरी आसुरी स्त्री. प्र. ए. व. 

निबन्धाय बन्धनासाठी निबन्ध पु. च. ए. व. 

मता मानतात मन् क्त प्रत्यय 

हे पाण्डव ! 

मा नको अव्यय 

शुचः शुच धातू शोक करणे 

दैवीम्‌ दैवी स्त्री. द्वि. ए. व. 

सम्पदम्‌ सम्पद् स्त्री. द्वि. ए. व. 

अभिजातः प्राप्त झालेली अभि+जन् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

असि आहे अस् धातू लट लकार म.पु.ए.व.

जन् धातू म्हणजे उत्पन्न होणे ह्यापासून निर्माण झालेला शब्द अभिजात. म्हणजे कुलीन. 

सांख्य दर्शन आपण वाचले आहेच. मोहमायेच्या प्रभावामुळे निरनिराळ्या वासना, लालसा निर्माण होतात हे सुद्धा आपण वाचले. आसुरी गुण हे त्या सर्वांचा परीपाक आहे. तर दैवी गुण हे आपल्याला मुक्तीच्या मार्गावर नेणारे आहेत. एखादा आसुरी गुण सुद्धा यश प्राप्त करण्यामध्ये अडचण निर्माण करतो हे आपण वसिष्ठ ऋषींच्या उदाहरणातून समजून घेतले. सर्व दैवी गुण आणि आसुरी गुणांचे विस्ताराने वर्णन ऐकल्यानंतर सहाजिकच अर्जुनाला संभ्रम झाला असावा की त्याच्या मधे कोणते गुण जास्त आहेत? मुळात युद्ध करणे हा दैवी गुण कसा?

आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की, 

हे पाण्डव दैवी संपदा ह्या मोक्षप्राप्तीसाठी आणि आसुरी संपदा बंधनात अडकून राहण्यासाठी असे मानले जाते. पण तू काही चिंता करू नकोस कारण तुला दैवी संपदा प्राप्त झालेल्या आहेत.

-------------------------------------------------------------

द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च। दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे श्रृणु।।16.6।।

हे पार्थ ! अस्मिन्‌ लोके द्वौ भूत-सर्गौ एव दैवः आसुरः च । दैवः विस्तरशः प्रोक्तः, आसुरम्‌ मे शृणु ।


हे पार्थ ! 

अस्मिन्‌ ह्या इदम् पु. स. ए. व. 

लोके जगात लोक पु. स. ए. व. 

द्वौ द्वि. पु. प्र. द्वि. व. 

भूत-सर्गौ जीवसृष्टी भूतसर्ग पु. प्र. द्वि. व. 

एव अव्यय 

दैवः दैवी दैव पु. प्र. ए. व. 

आसुरः आसुर पु. प्र. ए. व. 

च । 

दैवः दैवी दैव पु. प्र. ए. व. 

विस्तरशः सविस्तर अव्यय 

प्रोक्तः,सांगितले गेले आहे प्र+वच् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

आसुरम्‌ आसुरी आसुर पु. द्वि. ए. व. 

मे माझ्या कडून अस्मद् पु. ष. ए. व. 

शृणु ऐक श्रु धातू लोट लकार म. पु. ए. व.

3र्या 4 थ्या 5 व्या श्लोकात आपण सम्पदा हा शब्द वाचला. सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या बौद्धिक संपदा ह्या शब्दाची आठवण होत राहते.

आपल्याकडे ज्ञान हे नेहमीच सर्वांसाठी खुले होते. त्यावर हकक सांगून धनसंपदा मिळवण्याची आपली संस्कृतीच नाही. महर्षी व्यासांनी व्यक्तीच्या गुणांना संपदा म्हटले आहे.

आधीच्या श्लोकात आपण आसुरी गुण कोणकोणते आहेत ते वाचले. आपल्याला समाजात वावरताना काही अपरिहार्य कारणांमुळे हिंसा करणे भाग पडते, जसे क्षत्रिय धर्माचे पालन करणारे, मेलेल्या जनावरांची कातडी कमावणारे कसाई, पारधी, शिकारी. ह्या सर्वांना राक्षसी म्हणायचे का? त्यांच्या कडे सुद्धा माणूसकी असतेच की. 

 सर्वच ज्ञानी माणसे प्रभूला शरण जात नाहीत कारण त्यांचा अहंकार आडवा येतो. म्हणजे ज्ञान तर आहे पण त्याला ग्रहण लागले आहे त्यामुळे दुष्कर्म करणारे, हीन प्रवृत्ती असणारे श्रीभगवानकृष्णांना शरण जात नाहीत. ते त्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशा व्यक्तीसाठी मूढ असा शब्द वापरला आहे. हे सर्व आपण 7व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात वाचले आहेच.

9 व्या अध्यायातील 11 व्या श्लोकात जो परमेश्वराचे अस्तित्व समजू शकत नाही त्याला मूढ असे म्हटले आहे.

9 व्या अध्यायातील 12 व्या श्लोकात मोहमयी जगात जे राक्षसी, आसुरी शक्तिंमधे गुरफटून गेले आहेत, ज्यांची बुद्धि भ्रष्ट झाली आहे, त्यांचे लक्ष्य, त्यांची कार्ये, त्यांचे ज्ञान सर्व काही व्यर्थ आहे असे म्हटले आहे. ह्या सर्व विवेचनावरून एवढे स्पष्ट होते की राक्षस गण म्हणजे कोणी अक्राळविक्राळ रूप धारण केलेल्या व्यक्ती नसून, माणसांमधील वाईट प्रवृत्ती आहेत. ह्या श्लोकात भूतसर्ग असा शब्द वापरला आहे म्हणजे सर्व प्राणीमात्र असे अपेक्षित असावे. 

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

ह्या जीवसृष्टीत दोन प्रकारचे जीव राहतात, दैवी आणि आसुरी. त्यापैकी दैवी संपदा चे मी विस्ताराने वर्णन केले आता आसुरी गुणांचे वर्णन माझ्याकडून ऐक.

------------------------------------------------------------------

प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः। न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते।।16.7।।

आसुराः जनाः प्रवृत्तिम्‌ निवृत्तिम्‌ च न विदुः, तेषु न शौचम्‌, न च आचारः न च सत्यम्‌ अपि विद्यते।


आसुराः आसुरी आसुर पु. प्र. ब. व. 

जनाः लोक जन पु प्र. ब. व. 

प्रवृत्तिम्‌ प्रवृत्ति स्त्री. द्वि. ए. व. 

निवृत्तिम्‌ निवृत्ति स्त्री. द्वि. ए. व. 

च 

न विदुः,जाणत नाही विद् धातू माहीत करुन घेणे लट लकार प्र.पु.ब.व. 

तेषु त्यांचे तद् पु. स. ब. व. 

न शौचम्‌, अशुद्ध शौच नपु. प्र. ए. व. 

न च 

आचारः आचरण आचार पु. प्र. ए. व. 

न, च 

सत्यम्‌ सत्य नपु. प्र. ए. व. 

अपि 

विद्यते असते विद् धातू मनन करणे लट लकार प्र.पु.ए.व.

श्रीभगवानकृष्णांनी आसुरांची वैशिष्ट्ये सांगायला सुरुवात केली आहे. ह्या श्लोकात सांगितलेल्या प्रवृत्ती आणि निवृत्ति ह्या दोन संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्याचा आवाका बराच मोठा आहे असे दिसते.

श्रीआदिशंकराचार्यांनी गीता भाष्य च्या प्रारंभी वैदिक धर्माचे दोन प्रकार 'प्रवृत्ति' आणि 'निवृत्ति' असे सांगितले आहे. 

“द्विविधो हि वेदोक्तो धर्मः, प्रवृत्ति लक्षणो निवृत्ति लक्षणश्च,

 जगतः स्थितिकारणम्, प्राणिनां साक्षादभ्युदयनिश्रेयशहेतुः।''

प्रत्येक व्यक्तिच्या इच्छेनुसार त्याच्या निरनिराळ्या विषयांप्रती प्रवृत्ती असतात.

परमेश्वराने प्रजापतींना प्रवृत्ती चा उपदेश दिला तर सनक, सनन्दन सारख्या ऋषिंकरवी निवृत्ती मार्गाचे ज्ञान दिले.

स भगवान् सृष्ट्वा इदं जगत् तस्य च स्थितिं चीकीर्षुः मरीच्यादीन् अग्रे सृष्ट्वा प्रजापतीन् प्रवृत्तिलक्षणं धर्मं ग्राहयामास वेदोक्तम्।

ततः अन्यान्च सनकसनन्दनादीन् उत्पाद्य निवृत्तिलक्षणं धर्मं ज्ञानवैराग्यलक्षणं ग्राहयामास।

धर्माचे दोन जीवनमार्ग आहेत. प्रवृत्ती लक्षण धर्म हा कर्म मार्गपर आहे तर निवृत्ती लक्षण हे संन्यास मार्ग पर आहे. 

प्रवृत्ती लक्षण हे ऐश्वर्य युक्त वर्णाश्रमातील व्यक्तिंसाठी उपकारक तर निवृत्ती लक्षण जे ज्ञान आणि वैराग्य प्रधान आहे ते मोक्ष मिळवण्यासाठी उपकारक. 


प्रवृत्तौ जायते रागो निर्वृत्तौ द्वेष एव हि। निर्द्वन्द्वो बालवद् धीमान् एवमेव व्यवस्थितः॥ अष्टावक्र गीता 16.8।।

प्रवृत्ती मुळे राग (आसक्ती) निर्माण होते तर, निवृत्ती मुळे द्वेष, म्हणूनच बुद्धिमान पुरुष लहान बालकाप्रमाणे द्वन्द रहित म्हणजे दोन्ही बाबतीत उदासीन असतो.

संत ज्ञानेश्वरांनी काय म्हटले आहे ते पाहू.

म्हणोनि प्रवृत्ति आणि निवृत्ति। इयें वोझीं नेघें मती।अखंड चित्तवृत्ती। माझ्या ठायी।। ज्ञानेश्वरी। 12-121।।


श्रीदत्तस्वामींनी रचलेली काही दत्तगीते 

1. प्रवृत्ति निवृत्ति शाखा द्वयम् ,

वन्दे दत्तं वेद वृक्षम् (पल्लवी)

मी भगवान दत्तात्रयांना नमन करतो जे वैदिक अश्वत्थ वृक्षाप्रमाणे आहेच, ज्याच्या दोन शाखा प्रवृत्ती आणि निवृत्ती आहेत. 

2.प्रवृत्ति रधर्मोपरि स धर्मो,

निवृत्ति रस्योपरि परमात्मा ।

प्रवृत्ती मध्ये अधर्मा पेक्षा धर्म श्रेष्ठ. निवृत्ती मध्ये परमात्मा हाच श्रेष्ठ. 

तसे बघायला गेले तर प्रवृत्ती हाच निवृत्ती मार्गाचा पाया ठरू शकतो. प्रवृत्ती जर दोषयुक्त असतील तर परमेश्वराला ह्या जगात अवतार घ्यावा लागतो असे गीतेतच सांगितले आहे. निवृत्ती मार्गाचे समर्थन करण्यासाठी परमेश्वर अवतार घेत नाहीत.

दासबोधात प्रवृत्ती आणि निवृत्ती संकल्पनेवर काही श्लोक सापडतात.

प्रवृत्ती चाले अधोमुखें । 

निवृत्ती धावे ऊर्धमुखें । 

ऊर्ध्वमुखें नाना सुखें । 

विवेकी जाणती ।। 

।। दासबोध : 12/08/19 ।। 

प्रवृत्ति अथवा निवृत्ती । 

प्रचितीविण अवघी भ्रांती । 

गळंग्यामधील जगज्जोति । 

चेतेल कोठें ।। ।। दासबोध : 19/02/05 ।।

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

आसुरी लोकांना प्रवृत्ती, निवृत्ती असे काही ज्ञान नसते, त्यांच्या कडे बाह्यशुदधता नसते, ना चांगले आचरण ना सत्य.

---------------------------------------------------------------

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्। अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम्।।16.8।।

ते आहुः जगत्‌, अप्रतिष्ठम्‌ असत्यम्‌, अनीश्वरम्‌, अपरस्पर-सम्भूतं काम-हैतुकम्‌ अन्यत्‌ किम्‌।


ते तद् पु. प्र. ब. व. 

आहुः ब्रू धातू बोलणे लट लकार प्र.पु.ब.व. 

जगत्‌, जग जगत् नपु. प्र. ए. व. 

अप्रतिष्ठम्‌ निराश्रय, 

प्रति +स्था स्थापन झालेले अप्रतिष्ठ नपु. प्र. ए. व. 

असत्यम्‌, असत्य नपु. प्र. ए. व. 

अनीश्वरम्‌, न ईश्वर नपु. प्र. ए. व. 

अपरस्पर-सम्भूतं अपरः पर सम्भूत नपु. प्र. ए. व. 

काम-हैतुकम्‌ कामहैतुक नपु. प्र. ए. व. 

अन्यत्‌ अन्य नपु. द्वि. ए. व. 

किम्‌ नपु. द्वि. ए. व.

श्रीभगवानकृष्ण आसुरांच्या मानसिकतेचे वर्णन करत आहेत. ते सुद्धा जगत मिथ्या असाच विचार करतात पण वेगळ्या पद्धतीने.

हा श्लोक वाचताना चार्वाक दर्शन ची आठवण होते.

यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।

त्रयोवेदस्य कर्तारौ भण्डधूर्तनिशाचराः ।

मनुष्याने जिवंत असेपर्यंत सुखात जगले पाहिजे. अगदी कर्ज काढून तूप प्यावे. मृत्यू नंतर देहाची राख झाली की पुनर्जन्माचा प्रश्नच कुठे येतो? तीन वेदांचे रचयिता खरोखर धूर्त प्रवृत्ती चे निशाचर आहेत.

चार्वाक दर्शन आणि इतर दर्शनात मतभेद असले तरी ते एक महत्त्वाचे दर्शन मानले जाते.

सृष्टि आणि भूतां च्या उत्पत्ती संबंधी काही श्लोक.

कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः प्रथमं यदासीत्।

सतो बन्धुमसति निरविन्दन्हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥10.129.4॥ नासदीय सूक्त ऋग्वेद

सर्वप्रथम परमात्म्याच्या मनात ही विराट सृष्टि निर्माण करण्याची इच्छा प्रकट झाली. त्यातून प्रथम बीज निर्माण झाले. ज्ञान, विवेक, बुद्धि, मन ह्यामधून त्याला भौतिक रूप प्राप्त झाले. 


कामो जज्ञे प्रथमो नैनं देवा आपुः पितरो न मर्त्याः । ततस्त्वमसि ज्यायान् विश्वहा महांस्तस्मै ते काम नम इत्कृनोमि ॥अथर्ववेद 9.2.19 ॥

सृष्टि च्या उत्पत्ती च्या प्रवासात 

देवगण, पितर, मनुष्य ह्या सर्वांच्या आधी कामदेवांचा उद्भव झाला, म्हणून आपण श्रेष्ठ आहात. आपल्याला नमन. 


कामस्तदग्रे समवर्तत मनसो रेतः प्रथमं यदासीत्। स काम कामेन बृहता सयोनी रायस्पोषं यजमानाय धेहि ॥अथर्ववेद 19.52.1॥

सर्वप्रथम कामदेवाची उत्पत्ती झाली, तेच प्रथम बीज, त्यामुळे सृष्टी निर्माण झाली अशा यजमानांना ऐश्वर्य प्राप्त होवो.

मयाध्यक्षेण प्रकृति सूयते स चराचरम्’- 9.10।। असे स्वतः श्रीभगवानकृष्णांनी म्हटले आहेच.

आत्मन भाकाशः सम्भूतः । आकाशादायुः। वायोराप्तिः । अप्रापः । अद्यः पृथिवी । पृथिव्या ओपधयः । औषधीभ्यः अन्नं । अन्नात्पुरुषः।" (तैत्तिरीय उपनिषद् 2.1)

त्या आत्म्यापासून आकाश निर्माण झाले, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नी पासून जळ, जळातून पृथ्वी, पृथ्वीवर औषधी वनस्पती, अन्न आणि अन्नामुळे पुरुष. 

आसुर मात्र स्त्री पुरुषांच्या संबंधातून भूतलोक निर्माण झाले असेच मानतात.

काही टीकाकार 'अपरस्परसम्भूत किम अन्यत्' ह्याचा जोडून अर्थ स्त्री पुरुष संयोगाशिवाय इतर मार्ग उपलब्ध आहेत का? असाही लावतात.

ईश्वराचे अस्तित्व मान्यच नसल्याने, आम्हाला कोणी त्राता नाही, येथे शाश्वत असे काहीही नाही. असेच आसुरांना वाटते.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

ते (आसुर) असे म्हणतात की हे जग निराश्रित, असत्य, ईश्वर-रहीत आहे. केवळ स्त्री पुरुष संयोगाने निर्माण झालेले आहे, अजून काय?

----------------------------------------------------------------

एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः।प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः।।16.9।।

एताम्‌ दृष्टिम्‌ अवष्टभ्य नष्ट-आत्मानः, अल्प-बुद्धयः, अहिताः उग्र-कर्माणः, जगतः क्षयाय प्रभवन्ति।


एताम्‌ ही एतद् स्त्री. द्वि. ए. व. 

दृष्टिम्‌ दृष्टि स्त्री. द्वि. ए. व. 

अवष्टभ्य स्वीकारून अव+स्तभ् ल्यप प्रत्यय 

नष्ट-आत्मानः, नतद्रष्ट नष्ट आत्मन् पु. प्र. ए. व. 

अल्प-बुद्धयः, अल्प बुद्धि अल्पबुद्धि पु. प्र. ब. व. 

अहिताः अहितकारक अहित पु. प्र. ब. व. 

उग्र-कर्माणः, उग्र कर्म करणारे उग्रकर्मन् पु. प्र. ब. व. 

जगतः जगाच्या जगत् नपु. ष. ब. व. 

क्षयाय विनाशाला क्षय पु. च. ए. व. 

प्रभवन्ति कारणीभूत ठरतात प्र +भू धातू होणे लट लकार प्र.पु.ब.व.7व्या आणि 8 व्या श्लोकात सांगितलेल्या सर्व आसुरी गुणांच्या परीणामामुळे असे लोक स्वतः ला आसुरी म्हणवून तर घेतातच, समाजाच्या विनाशाला सुद्धा कारणीभूत ठरतात.

(आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन) असा आयुष्याप्रती असणारा निष्कर्ष घेऊन पुढे जाणारे नतद्रष्ट, अल्पबुद्धि असणारे, विध्वंसक, उग्र अशी कामे करणारे जगाच्या विनाशाला कारणीभूत ठरतात.

-------------------------------------------------------------------

काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः।

मोहाद्गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः।।16.10।।

दुष्पूरम्‌ कामम्‌ आश्रित्य, दम्भ-मान-मद-अन्विताः मोहात्‌ असत्‌-ग्राहान्‌ गृहीत्वा, अशुचि-व्रताः प्रवर्तन्ते।


दुष्पूरम्‌ अतृप्त दुष्पूर पु. द्वि. ए. व. 

दुर +पूर धातू पूर्ण भरणे 

कामम्‌ काम पु. द्वि. ए. व. 

आश्रित्य,आधार घेऊन आ+श्रि धातू सेवा करणे ल्यप प्रत्यय दम्भ-मान-मद-अन्विताः

दम्भमानमदअन्वित पु. प्र. ब. व. 

दांभिकता मानापमान घमंड हे सर्व बाळगून 

अनु+इ धातू जाणे, प्राप्त करणे +क्त 

मोहात्‌ मोह पु. पं ए. व. 

असत्‌-ग्राहान्‌ अशुभ निश्चय असदग्राह पु. द्वि. ब. व. 

ग्रह् धातू ग्रहण करणे 

गृहीत्वा, ग्रह धातू स्वीकार करणे क्त्वा प्रत्यय 

अशुचि-व्रताः अपवित्र प्रतिज्ञा अशुचिव्रत पु. प्र. ब. व. 

प्रवर्तन्ते वृद्धि होते प्र +वृत् धातू लट लकार प्र.पु.ब.व.

8व्या श्लोकात आपण कामदेव ही एक दैवी शक्ती आहे, अशा अर्थाचे श्लोक वाचले. आता ह्या श्लोकात 'काम ' चा अर्थ अतृप्त इच्छा असा घ्यावा लागेल.

तुलसीदासांनी रामचरित मानस ग्रंथात छान श्लोक सांगितले आहेत.

बिरति बिबेक बिनय बिग्याना। बोध जथारथ बेद पुराना॥

दंभ मान मद करहिं न काऊ। भूलि न देहिं कुमारग पाऊ॥

ज्यांना वैराग्य, विवेक, विनय, विज्ञान (विशेष ज्ञान) वेद-पुराण यांचे यथार्थ ज्ञान असते ते दम्भ, अभिमान आणि मद कधीच करत नाहीत आणि कुमार्गावर चालत नाहीत.


काम कोह मद मान न मोहा। लोभ न छोभ न राग न द्रोहा॥

जिन्ह कें कपट दंभ नहिं माया। तिन्ह कें हृदय बसहु रघुराया॥1॥


ज्यांच्या कडे काम, क्रोध, मद, अभिमान मोह, लोभ, क्षोभ, राग द्वेष, कपट, दम्भ, काहीच नाही, हे रघुराज! आपण त्यांच्या हृदयात वास करावा.

खरेच, आयुष्यात ' राम' नाही तर काहीच नाही.

आसुरी गुणांच्या परीणामांचे पुढे वर्णन करताना श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की

दम्भ, मानापमान, घमंड असे दुर्गुण बाळगून, कधीच पूर्ण होऊ न शकणार्‍या कामनांना जवळ करून, अज्ञानापोटी चुकीचे सिद्धान्त स्वीकारून, भ्रष्ट आचरण करून जगात वावरताना दिसतात.

------------------------------------------------------------------

चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः।

कामोपभोगपरमा एतावदिति निश्िचताः।।16.11।।

प्रलयान्ताम्‌ अपरिमेयाम्‌ चिन्ताम्‌ उपाश्रिताः काम-उपभोग-परमाः च, एतावत्‌ इति निश्चिताः।


प्रलयान्ताम्‌ मरण येईपर्यंत प्रलय अन्ता स्त्री द्वि. ए. व. 

अपरिमेयाम्‌ अमर्याद न परिमेया स्त्री. द्वि. ए. व. 

मि धातू पसरणे 

चिन्ताम्‌ चिन्ता स्त्री. द्वि. ए. व. 

उपाश्रिताः आश्रय घेऊन 

उप+श्रि धातू सेवा करणे क्त प्रत्यय पु. प्र. ब. व. 

काम-उपभोग-परमाः इन्द्रिय भोग हेच लक्ष्य 

काम उपभोग परम पु. प्र. ब. व. 

च, 

एतावत्‌ इति हे असे एतावत्‌ एतद् +वत नपु प्र. ए. व. 

निश्चिताः ठामपणे मानतात निश्चित पु. प्र. ब. व.

निः +चि धातू एकत्र करणे क्त प्रत्यय

आसुरी गुणांचा पाया हा भोगवादावर आधारित आहे. आतापर्यंत सांगितलेले सर्व आसुरी गुण चंगळवादातून निर्माण होतात.

हा श्लोक वाचताना चार्वाक दर्शन ची पुन्हा पुन्हा आठवण येते. जणू काही ह्या श्लोकातून चार्वाक दर्शनावर टीकाच केली आहे असे वाटावे. पण तसे असते तर महर्षी व्यासांनी चार्वाकांचा सरळ उल्लेख केला असता. तर ते तसे नाहीये. चार्वाक ही एक व्यक्ति असे म्हटले तर त्यांच्या बद्दल निश्चित माहिती मिळत नाही. चार्वाक तत्वज्ञानाचा उदय तत्कालीन सामाजिक अव्यवस्थेच्या विरोधात झाला असावा. चार्वाक म्हणजे चारू वाक् म्हणजे मिष्टभाषी.

चर्व धातू पासून तयार झालेला शब्द खाणे पिणे मौजमजा ह्यावर विश्वास असणारा. 

चार्वाक दर्शन महाभारताच्या काळात अस्तित्वात नव्हते असे वाटते. मात्र भोगवाद प्रचलित होता, असणारच. महाभारतातील युद्धच मुळी राज्याच्या मालकी हक्कावरून झाले.

महाभारतातील शांती पर्व अध्याय 38 मधील 20-36 ह्या श्लोकात युधिष्ठिर आणि चार्वाक नामक आसुर, यांचा उल्लेख आढळतो. चार्वाक दुर्योधनाचा मित्र, जो ब्राह्मण वेषात युधिष्ठिराला भेटायला आला असता, धर्मराजाची निंदा करतो, आणि इतर ब्राह्मणांच्या तेजाने भस्म होतो.

प्रत्येक भारतीय दर्शनात चार्वाक दर्शन ( जड़वाद ) चा उल्लेख आणि त्याचे खंडन केलेले आढळते. 

रामायणातील जाबालि ऋषि आणि प्रभू श्रीराम यांच्या मधील संवाद जडवाद दर्शवितो.

छान्दोग्य उपनिषदातील 8 व्या अध्यायातील 7 व्या खंडात प्रजापतिंसमोर घडलेला इन्द्र-विरोचन यांच्या मधे घडलेला आत्मन चा शोधसंवाद भौतिकवाद आणि अध्यात्मवादातील फरक स्पष्ट करतो.

ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते। आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः।।5.22।।

इन्द्रियांच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या सुखांना आरंभ आणि अंत आहे आणि ते दुःखाचे कारण आहेत, म्हणून विवेकी माणसे त्यापासून दूर राहतात.

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् |

व्यवसायात्मिका बुद्धि: समाधौ न विधीयते || 2.44||

जेव्हा मन संसारीक सुखाच्या अपेक्षात बुडून गेले आहे ते भगवान प्राप्तीचा दृढ संकल्प करू शकत नाही.

आसुरी व्यक्तींचे पुढे वर्णन करताना श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की इन्द्रिय सुख हेच आयुष्यातील सर्वश्रेष्ठ लक्ष्य मानणार्‍या व्यक्तींना आयुष्याच्या शेवटापर्यंत ह्याच गोष्टींची चिंता लागून राहिलेली असते. 

------------------------------------------------------------------

आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः। ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान्।।16.12।।

आशा-पाश-शतैः बद्धाः, काम-क्रोध-परायणाः, काम-भोगार्थम्‌ अन्यायेन अर्थ-सञ्चयान्‌ ईहन्ते


आशा-पाश-शतैः आशाआकांक्षांचे शेकडो पाश आशापाशशत पु. तृ. ब. व. 

बद्धाः, जखडून बद्ध पु. प्र. ब. व. 

काम-क्रोध-परायणाः कामक्रोध प्रवृत्त 

 कामक्रोधपरायण पु. प्र. ब. व. काम-भोगार्थम्‌ उपभोगण्यासाठी कामभोग अर्थ नपु. प्र. ए. व. 

अन्यायेन अन्याय पु. तृ. ए. व. 

अर्थ-सञ्चयान्‌ अर्थसञ्चय पु. द्वि. ब. व. 

ईहन्ते प्रयत्न करतात ईह धातू प्रयत्न करणे लट लकार प्र.पु.ब.व.

चंगळवादाचा पुरस्कार करायचा तर गाठीशी पैसाअडका हवाच. भारतीय तत्त्वज्ञानात पैसे कमवायचे नाही असे म्हटलेले नाही पण ते वाईट मार्गाने कमावू नये आणि जरूरीपेक्षा जास्त धनसंचय करू नये असे मात्र अपेक्षित आहे.

यावद् भ्रियेत जठरं तावत् स्वत्वं हि देहिनाम्। अधिकं योऽभिमन्येत से स्तेनो दण्डमर्हति ।।(श्रीमद्भागवतम्-7.14.8) 

तेवढेच धनसंचय करावे जेवढे आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे. जास्तीच्या धनाचे दान करावे. आवश्यकतेपेक्षा जास्त संपत्ती जमा असेल देवाच्या दृष्टीने तो चोर ठरतो आणि त्याला शिक्षा मिळते.

आसुरी माणसांना मात्र जितके धन मिळेल तेवढे हवेच असते. ह्या निमित्ताने महर्षी व्यासांनी चंगळवादावर भाष्य केले आहे असे म्हणता येईल.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की शेकडो लालसांच्या बंधनात अडकलेले, काम आणि क्रोधाने प्रवृत्त असे आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अयोग्य मार्गांचा अवलंब करून संपत्ती गोळा करू लागतात.

------------------------------------------------------------------

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम्। इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्।।16.13।।

मया अद्य इदम्‌ लब्धम्‌, इमम्‌ मनोरथम्‌ प्राप्स्ये, इदम्‌ धनम्‌ मे अस्ति, पुनः अपि इदम्‌ भविष्यति।


मया मी अस्मद् तृ. ए. व. 

अद्य आज अव्यय 

इदम्‌ हे नपु. प्र. ए. व. 

लब्धम्‌, प्राप्त केले आहे लभ् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व. 

इमम्‌ हे इदम् पु. द्वि. ए. व. 

मनोरथम्‌ मनोरथ पु. द्वि. ए. व. 

प्राप्स्ये, मिळवीन प्र+आप् धातू लृट लकार उ. पु. ए. व. 

इदम्‌ हे नपु. प्र. ए. व. 

धनम्‌ धन नपु. प्र. ए. व. 

मे माझ्या कडे अस्मद् ष. ए. व. 

अस्ति, आहे अस् धातू असणे लट लकार प्र.पु.ए.व. 

पुनः अव्यय 

अपि सुद्धा 

इदम्‌ हे नपु. प्र. ए. व. 

भविष्यति असेल, होईल भू धातू होणे लृट लकार प्र.पु.ए.व.

एखाद्या गोष्टीची गरज आणि इच्छा ह्यातील फरक लक्षात न घेतल्याने त्याचा परिणाम पर्यावरणाचा ऱ्हास होण्यावर होतो. आसुरी गुण असलेल्या व्यक्ती च्या मनात कसे विचार चालू असतात त्याचे वर्णन ह्या श्लोकात केले आहे. आपल्याला सुद्धा हे अगदी सहज लागू पडते.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

आज मी इतके काही कमावले आहे त्याने माझे मनोरथ पूर्ण होईल. माझ्या कडे इतकी संपत्ती आहे, त्यापेक्षा जास्त मी पुढे मिळवीन.

------------------------------------------------------------------

असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि। ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी।।16.14।।

असौ शत्रुः मया हतः, अपरान्‌ अपि च अहं हनिष्ये, अहम्‌ ईश्वरः, भोगी, अहम्‌ सिद्धः, बलवान्‌ सुखी ।


असौ तो अदस् पु. प्र. ए. व. 

शत्रुः शत्रु पु. प्र. ए. व. 

मया माझ्या कडून अस्मद् तृ. ए. व. 

हतः, मारला गेला हन् धातू क्त प्रत्यय पु प्र. ए. व. 

अपरान्‌ त्रास देणारे अपर पु. द्वि. ब. व. 

पृ धातू संतुष्ट करणे 

अपि सुद्धा 

च आणि 

अहं मी अस्मद् प्र. ए. व. 

हनिष्ये, मारीन हन् धातू लृट लकार उ. पु. ए. व. 

अहम्‌ मी अस्मद् प्र ए. व. 

ईश्वरः, ईश्वर पु. प्र. ए. व. 

भोगी, भोगिन् पु. प्र. ए. व. 

अहम्‌ मी अस्मद् प्र. ए. व. 

सिद्धः, द्रष्टा सिद्ध पु. प्र. ए. व. 

बलवान्‌ बलवान पु. प्र. ए. व. 

सुखी सुखिन् पु. प्र. ए. व.

श्रीभगवानकृष्णांनी आधीच सांगितले आहे की सर्व गोष्टींचा कर्ता करविता तेच आहेत हे मनात ठेऊन हा श्लोक वाचला पाहिजे. आधीच्या श्लोकात पैसे कमावण्याचे प्राविण्य संपादन केले की आत्मविश्वास वाढतो असे सांगितले, आता आत्मविश्वास वाढला की आसुरी गुणांची माणसे कसा विचार करतात ते सांगितले आहे. आत्मविश्वास, अती आत्मविश्वासात कसा रूपांतरित होतो, माणूस कसा आत्मकेंद्रित होतो हे सांगणारा हा श्लोक.

एका शत्रू चा मी काटा काढला (मारले) इतरांचा पण काटा काढीन. मी आता ईश्वर ( सर्वगुणसंपन्न), भोगी, सिद्धपुरूष, शक्तीमान आणि सुखी आहे.

-----------------------------------------------------------------

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया। यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः।।16.15।।

आढ्यः अभिजनवान्‌ अस्मि, मया सदृशः अन्यः कः अस्ति ? यक्ष्ये, दास्यामि, मोदिष्ये इति अज्ञान-विमोहिताः।

अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः। प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ।।16.16।।

अनेक-चित्त-विभ्रान्ताः मोह-जाल-समावृताः काम-भोगेषु प्रसक्ताः, अशुचौ नरके पतन्ति। 


आढ्यः श्रीमंत आढ्य पु. प्र. ए. व. 

अभिजनवान्‌ उच्च कुलीन अभि जनवत् पु. प्र. ए. व. 

जन् धातू उत्पन्न होणे 

अस्मि, आहे अस् धातू असणे कर्तरी लट लकार उ. पु. ए. व. 

मया माझ्या अस्मद् तृ. ए. व. 

सदृशः सारखे सदृश पु. प्र. ए. वह

दृश् धातू पाहणे 

अन्यः अन्य पु. प्र. ए. व. 

कः कोण किम् पु. प्र. ए. व. 

अस्ति अस् धातू असणे कर्तरी लट लकार प्र.पु.ए.व. 

यक्ष्ये, यज्ञ करीन यज् धातू यज्ञ करणे लृट लकार आत्मने उ. पु. ए. व. 

दास्यामि, दान देईन दा धातू लृट लकार उ. पु. ए. व. 

मोदिष्ये आनंदी होईन मुद् धातू आनंदी होणे लृट लकार उ. पु. ए. व. 

इति अव्यय 

अज्ञान-विमोहिताः अज्ञानामुळे मोहित झालेले अज्ञानविमोहित पु. प्र. ब. व.


अनेक-चित्त-विभ्रान्ताः अनेक प्रकारे भ्रमित झालेला अनेकचित्तविभ्रान्त पु. प्र. ब. व.

भ्रम् धातू अस्थिर असणे मोह-जाल-समावृताः मोहजालात अडकलेला 

मोहजालसमावृत पु. प्र. ब. व.

वृ धातू आच्छादन करणे 

काम-भोगेषु कामभोग पु. स. ब. व. 

प्रसक्ताः, आसक्त प्र+सच् धातू जवळीक असणे क्त प्रत्यय पु. प्र. ब. व. 

अशुचौ अपवित्र न शुचि पु. स. ए. व. 

नरके नरक पु. स. ए. व. 

पतन्ति पडतात पत् धातू पडणे लट लकार प्र.पु.ब.व.

थोड्याश्या यशाने हुरळून गेलेली व्यक्तींचे पाय जमिनीवर रहात नाहीत, त्यांच्या कडे प्रचंड अहंकार असतो, स्वतः च्या क्षमतेबाबत बद्दल अनेक गैरसमज असू शकतात. ह्या सर्वाचा उपाय एकच ते म्हणजे स्वतःचे मूल्यांकन करणे, आपल्या विचारांना ज्ञानाची जोड देणे.

अश्रुतश्च समुत्रद्धो दरिद्रश्य महामनाः।

अर्थांश्चाकर्मणा प्रेप्सुर्मूढ इत्युच्यते बुधैः ॥

ज्ञानाशिवाय स्वतःला ज्ञानी समजून घमंडखोर असणारा , दरिद्री असूनही मोठ्या योजना आखणारा, काम न करता श्रीमंत होण्याची स्वप्ने बघणारा व्यक्ति मूर्ख समजला जातो.

ह्या श्लोकात असाच काहीसा विचार महर्षी व्यासांनी मांडला आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की (आसुरी गुणांच्या व्यक्ति असा विचार करतात की ) मी तर धनवान आहे, चांगल्या घरात जन्माला आलो आहे, माझ्या सारखे दुसरे आहेच कोण? मी मोठे यज्ञ करीन, दानधर्म करीन, मौजमजा करीन, अशाप्रकारे अज्ञानामुळे स्वतःच्याच तंद्रीत असणारे, विविध भ्रम मनात असणारे, मोहजालात अडकून पडलेले, विविध प्रकारच्या कामेच्छा पासून दूर होऊ न शकणारे शेवटी अपवित्र नरकात जाऊन पडतात.

-------------------------------------------------------------------

आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः।यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम्।।16.17।।

ते आत्म-सम्भाविताः स्तब्धाः धन-मान-मद-अन्विताः, दम्भेन अविधि-पूर्वकम्‌ नाम-यज्ञैः यजन्ते।


ते ते तद् पु. प्र. ब. व. 

आत्म-सम्भाविताः स्वयंश्रेष्ठ आत्मन् सम्भावित पु. प्र. ब. व. 

सम+भू धातू प्राप्त करणे क्त प्रत्यय 

स्तब्धाः हेकेखोर स्तब्ध पु. प्र. ब. व. 

स्तम्भ् धातू अडथळा निर्माण करणे क्त प्रत्यय 

धन-मान-मद-अन्विताः, संपत्ती अहंकार युक्त उन्मत्त असा 

धनमानमद अन्वित पु. प्र. ब. व. 

अन्वित युक्त अनु+इण् धातू +क्त प्रत्यय 

दम्भेन दम्भ पु. तृ ए. व. 

अविधि-पूर्वकम्‌ न विधि पूर्वक अव्यय 

नाम-यज्ञैः नाममात्र यज्ञ नामन् यज्ञ पु. तृ. ब. व. 

यजन्ते संपन्न करतात यज् धातू लट लकार आत्मने. प्र.पु.ब.व.

मनुस्मृति मध्ये एक छान श्लोक वाचायला मिळतो.

अधर्मेणैधते तावत् ततो भद्राणि पश्यति ।तत: सपत्नाञ्जयति समुलस्तु विनश्यति ।। (4.174)

मनुष्य अधर्माने प्रथम उन्नत्ती करतो, संपत्ती सत्ता मान सर्व काही मिळवतो. तो शत्रूंवर सुद्धा विजय प्राप्त करतो, नातेवाईकांना हरवतो आणि शेवटि स्वतः चाच नाश करून घेतो.

हा श्लोक वाचताना सध्या दिसणार्‍या देवळातील परिस्थिती वर भाष्य करणे अनिवार्य आहे. खूप मोठी मोठी देवळे, ती बांधण्यासाठी करण्यात येणारा अवाढव्य खर्च. माणसाच्या ऐपतीप्रमाणे मिळणारे देवाचे दर्शन, महाआरती, महाप्रसाद ह्या सर्वांच्या मागे चालू असलेली आर्थिक गणिते. ह्या सगळ्या मध्ये खरी भक्ती किती? व्यवहार किती? दिखावा किती? 

चांगल्या कामाचा गवगवा करू नये असे म्हणतात. महाभारतातील अश्वमेधपर्वातील 97.43 श्लोकात खूप छान वर्णन केले आहे.

 गूहितस्य भवेद्वृद्धिः कीर्तितस्य भवेत्क्षयः।। महाभारत अश्वमेधपर्व 14.97.43।।

चांगल्या गोष्टींची प्रसिद्धीशिवाय वृद्धि होते आणि गाजावाजा केला कि त्याचा नाश होतो. 

4 थ्या अध्यायातील 24-30 श्लोकात यज्ञ कसा करावा ह्या संबंधी माहिती दिलेली आहेच. 

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की ते (आसुरी गुणांच्या व्यक्ति) स्वतः ला सर्व श्रेष्ठ मानणारे, हेकेखोर, संपत्ती आणि अहंकाराने भरलेले उन्मादयुक्त, नियमानुसार यज्ञ न करता केवळ नाममात्र यज्ञ करण्याचा दिखावा करतात.

------------------------------------------------------------------

अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः। मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः।।16.18।।

अहङ्कारम्‌ बलम्‌ दर्पम्‌ कामम्‌ क्रोधम्‌ च संश्रिताः अभ्यसूयकाः आत्म-पर-देहेषु माम्‌ प्रद्विषन्तः ।


अहङ्कारम्‌ अहङ्कार पु. द्वि. ब. व. 

बलम्‌ बल नपु. द्वि. ब. व. 

दर्पम्‌ दर्प पु. द्वि. ए. व. 

कामम्‌ काम पु द्वि. ए. व. 

क्रोधम्‌ क्रोध पु. द्वि. ए. व. 

च 

संश्रिताः कास धरून सम् +श्रि धातू सेवा करणे क्त प्रत्यय पु. प्र. ब. व. 

अभ्यसूयकाः ईर्ष्या करणारा अभि+असूयक पु. प्र. ब. व. 

अभि+असु+ण्वुल् 

आत्म-पर-देहेषु स्वतः च्या आणि दुसर्‍या शरीरात असणाऱ्या आत्मन् पर देह पु. स. ब. व. 

माम्‌ मला अस्मद् सर्व द्वि. ए. व. 

प्रद्विषन्तः द्वेष करतात प्र+द्विष् धातू शत्रूत्व करणे शतृ प्रत्यय पु. प्र. ब. व.

आतापर्यंतच्या श्लोकात अहंकार ह्या आसुरी गुणाचे वर्णन आपण बरेचदा वाचले. अहंकार म्हणजे स्वतःची ओळख आणि त्याबद्दल वाटणारा अभिमान.

महत्तत्त्वाद्विकुर्वाणाद्भगवद्वीर्यसम्भवात् ।

क्रियाशक्तिरहङ्कारस्त्रिविध: समपद्यत ॥श्रीमद्भागवतम् 3.26.23॥

वैकारिकस्तैजसश्च तामसश्च यतो भव: । मनसश्चेन्द्रियाणां च भूतानां महतामपि ॥ श्रीमद्भागवतम् 3.26.24 ॥

जीवन शक्ती, जी परमेश्वराच्या शक्तीचाच एक भाग आहे, त्यामधून अहंकार निर्माण होतो, ज्याची विभागणी तीन प्रकारे म्हणजे सत्व रज आणि तम अशी केली जाते. अहंकारापासून आपले मन, इन्द्रिये आणि पंचमहाभूते निर्माण झाली.

सात्त्विक अहंकार हा रचनात्मक मानला जातो. त्याग करण्याची वृत्ती, दृढता, धैर्य सेवाभाव अशा गुणांनी युक्त ईश्वराला समर्पित असतो.

रजोगुणी अहंकारी व्यक्ति स्वार्थी, स्वतः ची संपत्ती, मानमरातब आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी लोकोपयोगी कामे करणारी असते, त्यामुळे काही प्रमाणात समाजाला उपयुक्त अशी ठरते.

तामसिक अहंकार मात्र क्रूरता दर्शविते. कायम आत्मकेंद्रित असणाऱ्या व्यक्तींना चांगले आणि वाईट ह्यामधे फरक करता येत नाही. अशा व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असू शकतात.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

अहंकार, बळ, दर्प, काम आणि क्रोध ह्या सर्वांचा आधार घेऊन दुसर्‍यांवर कुरघोडी करणारे हे लोक स्वतः च्या आणि इतरांच्या शरीरात असणार्‍या माझा सुद्धा द्वेष करतात.

-------------------------------------------------------------------

तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान्।

क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु।।16.19।।

तान्‌ द्विषतः अशुभान्‌ क्रूरान्‌, संसारेषु नराधमान्‌ अहम्‌ अजस्रम्‌ आसुरीषु योनिषु एव क्षिपामि।


तान्‌ ते तद् पु. द्वि. ब. व. 

द्विषतः द्वेष करणारे द्विष् शतृ प्रत्यय पु. प्र. ब . व. 

अशुभान्‌ पापीअशुभ पु. द्वि. ब. व. 

क्रूरान्‌, क्रूर पु. द्वि. ब. व.

संसारेषु जगात संसार पु. स. ब. व. 

नराधमान्‌ नराधम  पु. द्वि. ब. व.

अहम्‌ अस्मद् सर्व प्र. ए. व. 

अजस्रम्‌ पुन्हा पुन्हा अव्यय 

आसुरीषु आसुरी स्त्री. स. ब. व. 

योनिषु योनीत योनि स्त्री. स. ब. व. 

एव 

क्षिपामि पाठवतो क्षिप् धातू फेकणे उडवणे कर्तरी लट लकार उ. पु. ए. व.

हा श्लोक थोडासा बुचकळ्यात टाकणारा आहे. म्हणजे आधी अंडे की आधी कोंबडी असा प्रश्न पाडणारा.  आधीच्या श्लोकात आपण अहंकाराचे तीन प्रकार वाचले, त्यापैकी तामसिक अहंकारी व्यक्ती आपल्या आजूबाजूला अजिबात नको, अशा असतात. स्वभावाला औषध नसते असे म्हणतात. पण वाल्या कोळी चा वाल्मिकी झाल्याचे उदाहरण आहेच. मानसोपचार केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र  येथे माणसामध्ये अमूलाग्र बदल घडून आलेली कितीतरी उदाहरणे असतात. पाप पुण्य ह्या सारख्या आपल्या कल्पना आणि त्याची मिळणारी फळे, ह्यावरून आपल्या वर्तणुकीला आपणच जबाबदार असतो असे आपल्या मनात पक्के ठसवलेले असते. मग प्रश्न पडतो की चुकीच्या मार्गाने जाणार्‍या व्यक्तींना परमेश्वर कसा मदत करतो? जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो।। असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.

ह्या श्लोकात मात्र चुकीच्या वर्तनाला परमेश्वर शासन करतात असे म्हणायचे आहे, असे वाटते.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की त्या द्वेषी, क्रूरकर्मी, संसारात नीच काम करणारे नराधम यांना परतपरत आसुरी योनींमधे जन्माला घालतो.

-----------------------------------------------------------------

असुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि।मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्।।16.20।।

हे कौन्तेय! जन्मनि जन्मनि आसुरीम्‌ योनिम्‌ आपन्नाः मूढाः माम्‌ अप्राप्य ततः अधमाम्‌ गतिम्‌ एव यान्ति ।


हे कौन्तेय! 

जन्मनि जन्मोजन्मी जन्मन् नपु. स. ए. व. 

जन्मनि जन्मन् नपु. स. ए. व. 

आसुरीम्‌ आसुरी स्त्री. द्वि. ए. व. 

योनिम्‌ योनि पु. द्वि. ए. व. 

आपन्नाः प्राप्त होतात आडः+पद् धातू जाणे क्त प्रत्यय पु. प्र. ब. व. 

मूढाः मूर्ख लोक मूढ पु. प्र. ब. व. 

माम्‌ मला अस्मद् सर्व द्वि. ए. व. 

अप्राप्य प्राप्त न होता न प्र+आप् धातू मिळणे ल्यप प्रत्यय 

ततः त्यानंतर अव्यय 

अधमाम्‌ अधोगतीला अधमा स्त्री. द्वि. ए. व. 

गतिम्‌ गति स्त्री. द्वि. ए. व. 

एव अव्यय 

यान्ति जातात या धातू जाणे कर्तरी लट लकार प्र.पु.ब.व.

आधीच्या श्लोकात आसुरी गुणांच्या व्यक्तिंना पुन्हा पुन्हा राक्षस योनी मधे जन्म घ्यावा लागतो असे म्हटले असले तरी पुराणातील कथांनुसार कंस, शिशुपाल यांची स्वतः भगवंतांनी हत्या करून सुद्धा त्यांना मोक्ष प्राप्ती झाली होती. याच अर्थाचा श्लोक श्रीमदभागवतात सापडतो.

निभृतमरुन्मनोऽक्षद‍ृढयोगयुजो हृदि यन्मुनय उपासते तदरयोऽपि ययु: स्मरणात् ।श्रीमद्भागवतम् 10.87.23।।

केवळ (तिरस्कारापोटी) त्याचे पुन्हा पुन्हा चिंतन करून सुद्धा, भगवंताच्या शत्रूंना परम सत्य प्राप्त झाले, जे योगी आपल्या योगाभ्यासाने प्राप्त करतात.

सध्या उपलब्ध असलेल्या पर्यावरण शास्त्राच्या माहितीनुसार ह्या पृथ्वीवरील प्रत्येक जीव महत्त्वाचा, प्रत्येक प्रजातीला नेमून दिलेल्या कार्यानुसार ह्या पृथ्वीवर चा समतोल राखला जातो. त्यामुळे महर्षी व्यासांनी म्हटल्याप्रमाणे आसुरी योनीतील जन्म म्हणजे नक्की कोणता जन्म? आणि तो वाईट की चांगला हे कसे ठरवायचे ते समजू शकत नाही. कदाचित पुढच्या श्लोकात स्पष्टीकरण मिळेल. 

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे कौन्तेय! त्या मूर्ख लोकांना जन्मोजन्मी आसुरी योनी प्राप्त होते. अशा प्रकारे ते माझ्या पासून लांब आणखीन अधोगतीला जातात.

-------------------------------------------------------------------

त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः। कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।।16.21।।

कामः क्रोधः तथा लोभः - आत्मनः नाशनम्‌ इदम्‌ त्रिविधम्‌ नरकस्य द्वारम्‌, तस्मात्‌ एतत्‌ त्रयम्‌ त्यजेत्‌ ।


कामः काम पु. प्र. ए. व. 

क्रोधः क्रोध पु. प्र. ए. व. 

तथा अव्यय 

लोभः लोभ पु. प्र. ए. व. 

आत्मनः आत्मन् पु.ष. ए. व. 

नाशनम्‌ नाशन् नपु. प्र. ए. व. 

इदम्‌ हे नपु प्र. ए. व. 

त्रिविधम्‌ त्रिविध नपु. प्र. ए. व. 

नरकस्य नरक पु. ष. ए. व. 

द्वारम्‌ द्वार नपु. प्र. ए. व. 

तस्मात्‌ अव्यय 

एतत्‌ एतद् नपु. द्वि . ए. व. 

त्रयम्‌ त्रय नपु. द्वि. ए. व. 

त्यजेत्‌ त्यज् धातू कर्तरी विधीलिडः प्र. पु. ए. व.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपु मानले गेले आहेत.

त्यापैकी पहिल्या तीन गुणांचा ह्या श्लोकात उल्लेख केला आहे.

काम म्हणजे लालसा, इच्छा, आकांक्षा, हाव, हवस असे 3 र्या अध्यायातील 37-38 श्लोकात आपण वाचले. 3र्या श्लोकातील 37 व्या श्लोकात असे सांगितले आहे की रजोगुणातून निर्माण होणारी अभिलाषा पूर्ण झाली नाही तर त्यातून निर्माण होणारा क्रोध आपली विवेक बुद्धी गिळंकृत करतो. काम ला अग्नी ची उपमा दिली आहे. जितके आपण अग्नी ला अर्पण करत जाऊ तितकी आग भडकत जाते. आपली सद्विवेक बुद्धि जाळत जाते. ह्यासाठी जुगारी चे उदाहरण देता येईल.  म्हणजेच कामेच्छा पूर्ती हा मार्ग नव्हे. मात्र सर्वसामान्य माणसांनी धनप्राप्ती साठी प्रयत्न करू नये असे सुद्धा नाही. फक्त त्याचा अतिरेक करू नये आणि मनाचा समतोल ढळू देऊ नये. गीतेच्या 2र्या अध्यायातील 62-63 श्लोकात हेच सांगितले आहे. आसक्ती मुळे क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळे बुद्धि नष्ट होते, त्यामुळे माणसाचे पतन होते. ह्यासाठीच आत्मसंयम राखणे आवश्यक आहे. आणि आपल्या रागावर आणि कामनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. (2.64)

काम क्रोध मद लोभ सब नाथ नरक के पंथ । सब परिहरि रघुबीरहि भजहु भजहिं जेहि संत ।। श्री रामचरितमानस, सुंदरकांड।।

कामं क्रोधं लोभं मोहं, त्यक्त्वाऽऽत्मानं भावय कोऽहम् ।आत्मज्ञानविहीना मूढा-स्ते पच्यन्ते नरकनिगूढाः ॥ भजगोविन्दम् ।२६॥

लोभात् क्रोधः प्रभवति। लोभात् कामः प्रजायते ।लोभात् मोहश्च नाशश्च। लोभः पापस्य कारणम् ।।

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की काम क्रोध आणि लोभ हे आत्मनाश करणारे तीन प्रकार जणू नरकाची द्वारे आहेत. त्या तीन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे.

--------------------------------------------------------------------

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः।

आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम्।।16.22।।

हे कौन्तेय ! एतैः त्रिभिः तमो-द्वारैः विमुक्तः नरः, आत्मनः श्रेयः आचरति, ततः पराम्‌ गतिम्‌ याति।


हे कौन्तेय ! 

एतैः हे एतद् नपु. तृ. ब. व. 

त्रिभिः तिन्ही त्रि नपु. तृ. ब. व. 

तमो-द्वारैः नरकाच्या द्वारापासून तमस द्वार नपु. तृ. ब. व. 

विमुक्तः मुक्त वि+मुच् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व. 

नरः,पुरूष नर पु. प्र. ए. व. 

आत्मनः आपल्या आत्मन् पु.ष. ब. व. 

श्रेयः कल्याणासाठी श्रेयस् नपु. द्वि. ए. व. 

आचरति, आचरण करतात आ+चर् धातू लट लकार प्र.पु.ए.व 

ततः त्याने अव्यय 

पराम्‌ श्रेष्ठ परा स्त्री. द्वि. ए. व. 

गतिम्‌ गती गति स्त्री. द्वि. ए. व. 

याति प्राप्त होते या धातू लट लकार प्र.पु.ए.व.

20 व्या श्लोकात उपस्थित झालेल्या प्रश्नाचे उत्तर ह्या श्लोकात मिळते आहे असे वाटते.  जसे पर्यावरणीय दृष्टीने सारे जीवजंतू सारखेच महत्त्वाचे तसे आसुरी योनीतील जन्म म्हणजे काही किड्यामुंग्यांचा जन्म नव्हे. माणसाचाच जन्म पण तामसी प्रवृत्ती जहाल मात्रेत असलेला. हे आधीच्या श्लोकात स्पष्ट झाले आहे. काम, क्रोध आणि लोभ आपल्याला नरकाच्या द्वारा पाशी घेऊन जातात. अती लोभ आणि क्रोधापायी होणारा मनःस्ताप हे आपल्या नशिबाचे भोग मानण्याचे कारण नाही तर ही आपणच आपल्यावर ओढवून घेतलेली परीस्थिती असते असे म्हणता येईल. आपल्यातील दुर्गुण नष्ट झाले तर दुःखाला काही जागाच उरणार नाही. आपल्यावर चांगले संस्कार घडणे, चांगले गुरू भेटणे किती महत्त्वाचे आहे हे या श्लोकामुळे समजते. काहीच नाही तर निदान आपल्याला चांगली उपरती व्हावी. प्रयत्नांति परमेश्वर. पुनर्वसन करणे हे सुद्धा पुण्ण्याचे काम ठरू शकते. 

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की (आधीच्या श्लोकात काम क्रोध लोभ यांचा त्याग केला पाहिजे असे सांगून झाल्यावर श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की )

हे कौन्तेय! नरकाच्या तीन दरवाज्यांपासून लांब राहिल्याने तो स्वतः च्या कल्याणासाठी अनुरूप असे आचरण करतो आणि परम गतीला प्राप्त होतो.

---------------------------------------------------------------------

यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः। न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्।।16.23।।

यः शास्त्र-विधिम्‌ उत्सृज्य, काम-कारतः वर्तते, सः न सिद्धिम्‌ अवाप्नोति, न सुखम्‌, न पराम्‌ गतिम्‌।


यः जो यद् पु. प्र. ए. व. 

शास्त्र-विधिम्‌ शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रविधि पु. द्वि. ए. व. 

शास् धातू बोध करणे शासन करणे. ष्ट्रन् प्रत्यय 

हितानुशासनं ग्रन्थः 

उत्सृज्य त्यागून उत+सृज् धातू ल्यप प्रत्यय 

सृज् धातू सोडून देणे 

काम-कारतः मनमानी करत कामकार तासिल प्रत्यय 

वर्तते वर्तन करतो वृत् धातू प्रवृत्त होणे आत्मने लट लकार प्र.पु.ए.व 

सः तो तद् पु. प्र. ए. व. 

न अव्यय 

सिद्धिम्‌ सिद्धि स्त्री द्वि. ए. व. 

सिध् धातू सिद्ध होणे 

अवाप्नोति, प्राप्त होते अव+आप् धातू लट लकार प्र.पु.ए.व. 

न अव्यय 

सुखम्‌, सुख नपु. द्वि. ए. व. 

खन् धातू खणणे. 

न अव्यय 

पराम्‌ श्रेष्ठ परा स्त्री द्वि. ए. व. 

गतिम्‌ गति स्त्री द्वि. ए. व.

ह्या श्लोकातील शास्त्रविधी आणि कामकारत ह्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायला हवे.

एखाद्या विषयाच्या माहितीची मुद्देसूद मांडणी म्हणजे शास्त्र. शास्त्र म्हणजे विज्ञान. भारतीय तत्त्वज्ञानात शास्त्र चा अर्थ अनुशासन किंवा उपदेश असा आहे. 

शास्ति च त्रायते च। शिष्यते अनेन।

आपले बोट धरून पुढे घेऊन जाणारे, अनुशासन द्वारा आपल्याला तारून नेणारे ते शास्त्र.

शास्त्र म्हणजे असे धर्म ग्रंथ जे लोकांना मार्ग दाखवणारे, त्यांच्या हितासाठी लिहिले गेले.

'शासनात् शास्त्रम् 'शासन करणारे शास्त्री ज्यांच्या द्वारा धर्माचे अनुशासन केले जाते.

अशा ह्या शासन रूपी शास्त्राची गरज काय आहे?

जेव्हा न्यायव्यवस्था अस्तित्वात नव्हती तेव्हा धर्माची शिकवण समाजात सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपयोगी पडत होती.

एखादे काम नीट ठरवून दिलेल्या पद्धतीने करणे आणि घिसाडघाईने करणे ह्यामधील फरक आणि त्यातून मिळणारे समाधान किंवा मनःस्ताप हे समजून घ्यायला हवे. 

कामकारत ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा. हा शब्द दोन धातूंपासून तयार झाला असावा. 

कम् धातू म्हणजे कामना करणे

कृ धातू करणे

कामकारत म्हणजे स्वतःच्या इच्छेने, मर्जीने काम करणे म्हणजे थोडक्यात नियम न पाळणे.

खन् म्हणजे खणणे. जमिन खणणे तर आवश्यक पण ते सहजपणे करता येणे म्हणजे सुख.

ह्या श्लोकाचा अर्थ समजून घेताना 9व्या अध्यायातील दोन श्लोक ह्याच्या जोडीने वाचले तर अर्थ अजून स्पष्ट होईल. 

येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयाऽन्विताः। तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्।।9.23।।

हे कौन्तेय ! श्रद्धावान भक्त जे अन्य देवतांना पूजतात ते माझे पूजन विधिपूर्वक करत नाहीत. 

यान्ति देवव्रता देवान् पितृ़न्यान्ति पितृव्रताः।भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्।।9.25।।

देवतांचे पूजन केल्यास देवता फळ देतात. पितरांचे पूजन केल्यावर पितर प्रसन्न होतात. भूतांचे पूजन केल्यास भूत प्राप्त होतात आणि माझे पूजन करून मी प्राप्त होतो. 

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

जो शास्त्रोक्त पद्धत न अवलंबता, स्वतः च्या मर्जी ने आचरण करतात त्यांना ना सिद्धि प्राप्त होते, ना सुख, ना परमगती.

--------------------------------------------------------------------

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ। ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि।।16.24।।

तस्मात्‌ ते कार्य-अकार्य-व्यवस्थितौ शास्त्रम्‌ प्रमाणम्‌। शास्त्र-विधान-उक्तम्‌ ज्ञात्वा इह कर्म कर्तुम्‌ अर्हसि ।


तस्मात्‌ म्हणून अव्यय 

ते तुझे युष्मद् च. ए. व. 

कार्य-अकार्य-व्यवस्थितौ कर्तव्य अकर्तव्य संबंधित नियम कार्यअकार्यव्यवस्थिति स्त्री. स. ए. व. 

शास्त्रम्‌ शास्त्र नपु. प्र. ए. व. 

प्रमाणम्‌ प्रमाण नपु. प्र. ए. व. 

शास्त्र-विधान-उक्तम्‌ शास्त्रात सांगितल्याप्रमाणे 

ज्ञात्वा समजून घेऊन ज्ञा धातू समजून घेणे क्त्वा प्रत्यय 

इह या जगात अव्यय 

कर्म कर्मन् नपु. द्वि . ए. व. 

कर्तुम्‌ करणे कृ धातू करणे तुमुन् प्रत्यय 

अर्हसि योग्य आहे अर्ह धातू योग्य असणे परस्मैपदी कर्तरी लट लकार म. पु. ए. व.

ह्या अध्यायातील शेवटचा श्लोक मला अर्थाच्या दृष्टीने फार महत्वाचा वाटतो. शास्त्रविधान ह्या शब्दाचा अर्थ आपण आधीच्या श्लोकात समजून घेतला.

सामाजिक शास्त्रात नमूद केलेली प्रमेये ही समाजात आढळून येणार्‍या प्रवृत्तींचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून मांडलेली असतात. हे करत असताना  विविध शास्त्रांचा जसे मानसशास्त्र, अर्थशास्त्र, राजकारण,न्यायशास्त्र, प्रथा, परंपरा यांचा आधार घेतलेला दिसतो. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेले सर्व श्लोकरूपी उपदेश आधुनिक काळातील शास्त्रांच्या प्रमेयांशी तंतोतंत जुळतात.

भूतं भव्यं भविष्यं च सर्वं वेदत् प्रसिध्यति (मनुस्मृति-12.97) 

"भूत वर्तमान आणि भविष्याशी निगडित कोणत्याही सिद्धांताची विश्वासार्हता वेदांतील तत्वज्ञानावर आधारित असावी. "ह्या अध्यायाचा समारोप करताना श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की

म्हणूनच शास्त्रात सांगितलेल्या तत्वांना प्रमाण मानून चांगले कर्म आणि निषिद्ध कर्म ह्यातील फरक समजून घेऊन तुझे कर्म तू केले पाहिजेस.

------------------------------🙏🙏🙏🙏--------------------