श्रीमद्भगवद्गीतेच्या 17 व्या अध्यायाचे नाव 'श्रद्धात्रयविभागयोगः' असे असून त्यामध्ये एकूण 28 श्लोक आहेत.
अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयाऽन्विताः। तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः।।17.1।।
अर्जुन उवाच - हे कृष्ण ! ये शास्त्र-विधिम् उत्सृज्य, श्रद्धया अन्विताः यजन्ते, तेषां निष्ठा तु का ? सत्त्वम् रजः आहो तमः ?
अर्जुन उवाच -
हे कृष्ण ! हे कृष्णा
ये जे यद् पु. प्र. ब. व.
शास्त्र-विधिम् शास्त्रविधींचा शास्तरविधि पु. द्वि. ए. व.
उत्सृज्य, त्याग करून उत+सृज् धातू ल्यप प्रत्यय
श्रद्धया श्रद्धेने श्रद्धा स्त्री. तृ. ए. व.
अन्विताः युक्त होऊन अन्वित पु. प्र. ब. व.
अनु+इ धातू जाणे
यजन्ते, पूजतात यज् धातू लट लकार प्र.पु.ब.व.
तेषां त्यांची तद् पु. ष. ब. व.
निष्ठा निष्ठा स्त्री. प्र. ए. व.
तु परन्तु अव्यय
का कोणती किम् स्त्री. प्र. ए. व.
सत्त्वम् सत्त्व नपु प्र. ए. व.
रजः रजस् नपु प्र. ए. व.
आहो अथवा अव्यय
तमः तमस् नपु. प्र. ए. व.
आधीच्या सर्व श्लोकांची उजळणी केली तर 7व्या अध्यायातील 12 व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी स्वतः च म्हटले आहे की त्यांच्याच शक्तीमुळे त्रिगुण निर्माण झाले आहेत. 16 व्या अध्यायात दैवी आणि आसुरी गुणांची माहिती आपण विस्ताराने वाचली. त्याच अध्यायात श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे की तुझ्या जन्म चांगल्या कुळात झालेला आहे. शिवाय आधीच्या अध्यायात श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री आणि गुरू शिष्याचे नाते उलगडून दाखवणारे अनेक श्लोक आहेत. 16 व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात शास्त्राने घालून दिलेले नियम पाळून, चांगले कर्म आणि निषिद्ध कर्म ह्यातील फरक ओळखून आपले कर्म करावे असे सांगितले आहे. स्वाभाविकपणे अर्जुनाची ज्ञानपिपासू वृत्ती जागृत झालेली दिसते आहे. आतापर्यंत अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांना बरेच प्रश्न विचारून झाले आहेत.
ह्या श्लोकात अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांना प्रश्न विचारला आहे ज्याचे उत्तर उर्वरित श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनाला दिले आहे.
तो प्रश्न असा की
हे कृष्णा! जे लोक शास्त्रात सांगितलेल्या नियमांचा भंग करून पण श्रद्धापूर्वक (देवतांना) पूजतात त्यांच्या निष्ठा बद्दल काय म्हणायचे? त्या सात्विक अथवा राजसिक की तामसिक?
-----------------------------------------------------------------
श्री भगवानुवाच
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा। सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां श्रृणु।।17.2।।
श्रीभगवानुवाच - देहिनाम् सा स्वभावजा श्रद्धा, सात्त्विकी राजसी च तामसी च इति त्रिविधा एव भवति, ताम् शृणु।
श्रीभगवानुवाच -
देहिनाम् देहधारी च्या देहिन् पु. ष. ब. व.
सा ती तद् स्त्री. प्र. ए. व.
स्वभावजा प्राकृतिक गुणांनुसार स्त्री. प्र. ए. व.
श्रद्धा, स्त्री. प्र. ए. व.
सात्त्विकी सात्त्विकी स्त्री. प्र. ए. व.
राजसी स्त्री. प्र. ए. व.
च
तामसी स्त्री. प्र. ए. व.
च
इति अव्यय
त्रिविधा तीन प्रकारच्या स्त्री. प्र. ए. व.
एव अव्यय
भवति, असते भू धातू लट लकार प्र.पु.ए.व
ताम् ती तद् स्त्री. द्वि. ए. व.
शृणु ऐक श्रु. धातू लोट लकार म. पु. ए. व.
ह्या अध्यायातील पहिल्या श्लोकात अर्जुनाने श्रीभगवानकृष्णांना लोकांच्या निष्ठे बाबत प्रश्न विचारला होता जे श्रद्धापूर्वक देवतांना पूजतात पण शास्त्रीय नियमांनुसार नाही.
आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी श्रद्धा ह्या शब्दाचे विश्लेषण केले आहे.
श्रद्धा आणि निष्ठा ह्यामधील फरक नीट समजून घ्यायला हवा.
श्रद् (मन, हृदय) + धा धातू धारण करणे श्रद्धा म्हणजे विश्वास. जिच्यात सत्य ठेवलेले असते ती श्रद्धा
श्रत् सत्यम् । तत् सत्यमस्यां धीयते सा श्रद्धा । दुर्गाचार्य
नि + स्था, नितरां तिष्ठति
निष्ठा चा अर्थ आपल्या आदर्शाशी प्रामाणिक असणे.
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ। ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्।।3.3।।
हे निष्पाप (अनघ) अर्जुन दोन प्रकारच्या निष्ठा ठेवून आत्मज्ञान मिळवता येते. एक म्हणजे ज्ञान चिंतनाचा मार्ग म्हणजे ज्ञानयोग, आणि कर्म करण्याचा मार्ग कर्मयोग.
14 व्या अध्यायात त्रिगुणांचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यापैकी 18 व्या श्लोकात स्पष्टच सांगितले आहे की सात्त्विक उन्नतीस, राजस मध्यमगतीस आणि तामस अधोगतीस प्राप्त होतात. म्हणजेच सर्वच श्रद्धाप्रकार हितकारक नसून, त्याबाबत तारतम्य-विवेक करणे आवश्यक. हानिकारक श्रद्धांचा त्याग केला पाहिजे.
श्रद्धावान व्यक्तिंचे चार प्रकार सांगितले आहेत.
'अज्ञ व अश्रद्ध ‘,‘ अज्ञ व सश्रद्ध ‘, ‘ जाणता आणि अश्रद्ध’ आणि
‘ जाणता आणि सश्रद्ध ‘ .
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति। नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः।।4.40।।
विवेकहीन श्रद्धारहित संशयी माणसाचे पतन होते.
भगवद्गीतेनुसार सात्त्विक श्रद्धेला संयम आणि ज्ञानप्राप्तीची कळकळ यांची जोड मिळाली, तर अशा श्रद्धावानाला परमपवित्र आत्मज्ञान प्राप्त होऊन परमशांतीचा लाभ होतो. श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति।।4.39।।
हे ज्ञान म्हणजे विद्वत्ता, व्यावहारिक ज्ञान किंवा औपपत्तिक ज्ञान नसून पारमार्थिक, आध्यात्मिक ज्ञान होय.
मां च भक्तियोगेन सेवते।
स ब्रह्मभूयाय कल्पते।।14.26।। आणि अशा प्रकारे भक्ती मार्ग सर्वात श्रेष्ठ असे म्हटले आहे.
आधीच्या अध्यायात दैवी गुण म्हणजे सात्विक तर आसुरी गुण म्हणजे राजसिक आणि तामसी हे आपण समजून घेतले आहेच.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
माणसांच्या उपजत श्रद्धा तीन प्रकारच्या असतात. सात्विक, राजसिक आणि तामसी त्या बद्दल तू माझाकडून ऐक.
---------------------------------------------------------------
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः।।17.3।।
हे भारत ! सर्वस्य श्रद्धा सत्त्व-अनुरूपा भवति, अयम् पुरुषः श्रद्धामयः यः यत्-श्रद्धः सः एव सः ।
हे भारत
सर्वस्य सर्वांची सर्व पु. ष. ए. व.
श्रद्धा स्त्री प्र. ए. व.
सत्त्व-अनुरूपा अंतःकरणानुसार स्त्री. प्र. ए. व.
सत् असणे
अनुरूप सदृश
भवति,असते भू धातू लट लकार प्र.पु.ए.व
अयम् हा इदम् पु. प्र. ए. व.
पुरुषः पुरूष पु. प्र. ए. व.
श्रद्धामयः श्रद्धामय पु. प्र. ए. व.
यः जो यद् पु. प्र. ए. व.
यत्-श्रद्धः श्रदधेप्रमाणे यतश्रद्ध पु. प्र. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
एव आणि अव्यय
सः तो (त्याचे स्वरूप आहे) तद् पु. प्र. ए. व.
सत्त्व - सतो भावः । सत्त्व म्हणजे अस्तित्व. सत्त्व म्हणजे प्रकृति.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दोन प्रकारचे गट होते जहाल आणि मवाळ. दोन्ही गटांचे उद्दिष्ट एकच असले तरी ते साध्य करण्याची पद्धत वेगळी होती. त्याच प्रमाणे सर्वांचा परमेश्वरावर विश्वास असला तरी प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी.
आधीच्या श्लोकात श्रद्धा म्हणजे विश्वास हे आपण वाचले. ह्या श्लोकात श्रद्धा ह्या शब्दाचा आणखी खोलात जाऊन अर्थ सांगितला आहे.
प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. पण तरीसुद्धा प्रत्येक माणूस एक व्यक्तीमत्व म्हणून वेगळा आहे. अशा सर्व माणसांची तीन गटात विभागणी केली आहे सात्विक राजस आणि तमस.
अशी व्यक्तीमत्वांची विभागणी आयुर्वेद आणि होमिओपॅथी मध्ये सुद्धा केलेली दिसून येते.
एखादे व्यक्तीमत्व घडण्याच्या प्रक्रियेत अध्यात्मिक दृष्टीकोनातून पूर्वजन्मीच्या कर्माचे संचित कारणीभूत असते तर आधुनिक शास्त्राच्या दृष्टीकोनातून अनुवांशिकता, शिक्षण, बुद्धिमत्ता, आर्थिक परिस्थिती वगैरे. तरीसुद्धा एकाच आईवडिलांच्या पोटी जन्मलेली भावंडे एकाच सारखी नसतात. त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतातच, बौद्धिक व भावनिक कुवत सुद्धा वेगवेगळी असू शकते.अहंकार म्हणजे प्रत्येक व्यक्तीमत्वाची स्वतःची ओळख तसेच श्रद्धा सुद्धा प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची एक ओळख.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे भारत! सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या व्यक्तीमत्वांप्रमाणे असते. हा पुरूष श्रद्धामय आहे, म्हणजे जो पुरुष एखाद्या श्रद्धेने युक्त आहे कारण तो स्वतः तसा आहे.
----------------------------------------------------------------
यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः। प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः।।17.4।।
सात्त्विकाः देवान् यजन्ते, राजसाः यक्ष-रक्षांसि अन्ये तामसाः जनाः प्रेतान् भूतगणान् च यजन्ते।
सात्त्विकाः सात्त्विक लोक सात्त्विक पु. प्र. ब. व.
देवान् देवांचे देव पु. द्वि. ब. व.
यजन्ते, पूजन करतात यज् धातू लट लकार प्र.पु.ब.व.
राजसाः राजसी लोक राजस पु. प्र. ब. व.
यक्षरक्षांसि यक्ष आणि राक्षसाचे यक्षरक्षस् नपु. द्वि. ब. व.
अन्ये इतर अन्य पु. प्र. ब. व.
तामसाः तामसी लोक तामस पु. द्वि. ब. व.
जनाः माणसे जन पु. प्र. ब. व.
प्रेतान् प्रेतांचे प्रेत पु. प्र. द्वि. ब. व.
भूतगणान् भूतगणांचे भूतगण पु. द्वि. ब. व.
च
यजन्ते पूजन करतात यज् धातू लट लकार प्र.पु.ब.व.
हा श्लोक समजून घेताना, 9 व्या अध्यायातील 23 आणि 25 वे श्लोकांची उजळणी करावी लागेल. 23 व्या श्लोकाप्रमाणे परमेश्वराचे पूजन म्हणजे परमेश्वराला शरण जाणे अपेक्षित आहे. काही लोक मात्र आपापल्या आवडीनुसार देवता निवडतात जसे धनाचे प्रतिक लक्ष्मी, शक्तिचे प्रतिक हनुमान आणि तसा लाभ होण्यासाठी पूजन करतात. अर्थात हे चुकीचे आहे.
हेच 25 व्या श्लोकात अधिक स्पष्ट सांगितले आहे.
यान्ति देवव्रता देवान् पितृ़न्यान्ति पितृव्रताः। भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्।।9.25।।
देवतांना पूजणारे देवतांना प्राप्त होतात, पितरांना पूजणारे पितरांना, भूतांना पूजणारे भूतांना आणि मला पूजणारे मला प्राप्त होतात.
मुळात अशा आवडीनिवडी कशाकाय निर्माण होतात? याचे उत्तर 7 व्या अध्यायातील 20 व्या श्लोकात मिळते.
कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः। तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया।।7.20।।
भोगविषयक कामनांमुळे ज्यांचे ज्ञान झाकोळून गेले आहे, ते आपापल्या स्वभावाप्रमाणे अन्य देवतांना पूजतात.
ह्यानंतर श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम्।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि।।7.23।।
अशा अल्पबुद्धि पुरूषांना मिळणारे पूजनाचे फळ नाशवंत असते. जे मला पूजतात तेच मला प्राप्त होतात.
हेच सर्व तत्वज्ञान ह्या श्लोकात त्रिगुणांच्या माध्यमातून सांगितले आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
सात्त्विक लोक देवतांचे पूजन करतात राजसी लोक यक्ष आणि राक्षसांचे पूजन करतात तर इतर तामसी लोक भूतगण प्रेतांचे पूजन करतात.
-------------------------------------------------------------------
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः। दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः।।17.5।।
ये दम्भ-अहंकार-संयुक्ताः काम-राग-बल-अन्विताः जनाः अशास्त्र-विहितम् घोरम् तपः तप्यन्ते।
ये जे यद् पु. प्र. ब. व.
दम्भ-अहंकार-संयुक्ताः दम्भ अहंकार युक्त
दम्भअहंकार सम+युज धातू क्त प्रत्यय पु. प्र. ब. व. काम-राग-बल-अन्विताः कामरागबळ युक्त
कामरागबल अन्वित पु. प्र. ब. व.
जनाः माणसे जन पु. प्र. ब. व.
अशास्त्र-विहितम् शास्त्रविधी शिवाय
न शास्त्र विहीत पु. द्वि. ए. व.
घोरम् घोर नपु. द्वि. ए. व.
तपः तपस् नपु. द्वि. ए. व.
तप्यन्ते तप करतात तप धातू कर्तरी आत्मनेपद लट लकार प्र.पु.ब.व.
कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः।मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान्।।17.6।।
अचेतसः शरीरस्थम् भूत-ग्रामम् अन्तः-शरीरस्थम् च माम् एव कर्षयन्तः, तान् आसुर-निश्चयान् विद्धि।
अचेतसः भ्रमित चेतना असलेले अचेतस् नपु. प्र. ब. व.
शरीरस्थम् शरीरस्थित शरीरस्थ पु. द्वि. ए. व.
भूत-ग्रामम् पंचभूतांचा समूह भूतग्राम पु. द्वि. ए. व.
अन्तः-शरीरस्थम् अंतर्यामी शरीरस्थित अन्तःशरीरस्थ पु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
माम् मला अस्मद् द्वि. ए. व.
एव अव्यय
कर्षयन्तः,यातना देत असतात कृष् धातू नांगरणी करणे णिजन्त शतृ प्रत्यय पु. प्र. ब. व.
तान् ते तद् पु. द्वि. ब. व.
आसुर-निश्चयान् आसुरी निष्ठा असलेले
आसुरनिश्चय पु. द्वि. ब. व.
विद्धि जाणून घे विद् धातू माहीत करुन घेणे लोट लकार म. पु. ए. व.
16 व्या अध्यायातील 23 व्या श्लोकात आसुरी गुणांच्या व्यक्तिंचे वर्णन करताना शास्त्रविधी न पाळता, आचरण करण्याचे परीणाम आपण वाचले.
आतापर्यंतच्या श्लोकात भक्तीयोग ज्ञानयोग आणि कर्मयोगाचे वर्णन करताना कुठेही अघोरी किंवा शरीराला कष्ट होतील अशा पद्धतींचे वर्णन केलेले नाही. पुराणकथांमधे अशा घोर तप केल्याच्या कथा वाचायला मिळतात पण त्या मागचा उद्देश लक्षात घेता, अशा तपस्वींचा बिमोड करण्यात आल्याचे दिसून येते. म्हणजेच परमेश्वराशी एकरूप होण्याची प्रक्रिया अतिशय सुखदायक, आपल्यातील दुर्गुण नष्ट करणारी, मनाला शांती मिळवून देणारी अशीच अपेक्षित आहे. ह्या श्लोकात एक प्रकारे श्रीभगवानकृष्ण आपल्या मनातील व्यथा मांडत आहेत असे वाटते, कारण त्यांचा अंश प्रत्येक शरीरात आहे. पंचमहाभूतांनी तयार झालेले हे शरीर त्यांनीच निर्माण केले आहे. असे असताना घोर तपस्या करण्याने, भगवंतांना सुद्धा कष्ट होतात असे म्हटले आहे. मानसिक ताणतणाव आणि शारीरिक कष्ट आपले आरोग्य बिघडतात. अघोरी तपाचा आपल्या शरीरात असणार्या 7 चक्र आणि तेथे असणार्या शक्ती ज्यायोगे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालू असते, ह्यावर दुष्परिणाम होतो असे कदाचित सुचवायचे असेल. त्या प्रत्येक चक्राचे स्वामी खालील प्रमाणे.
1. मूलाधार चक्र भगवान गणेश
2. स्वाधिष्ठान चक्र भगवान ब्रह्मा
3. मणिपुर चक्र भगवान विष्णु-लक्ष्मी
4. अनाहत चक्र भगवान शिव पार्वती
5. विशुद्धि चक्र माता आदिशक्ति
6. आज्ञा चक्र जीवात्मा
7. सहस्रसार चक्र: परमात्म्याचे निवास.
6व्या अध्यायातील 17 व्या श्लोकात योग्य आहार आणि विहाराने ध्यानयोगींचे दुःख नष्ट होते असे स्पष्टच म्हटले आहे.
ह्या दोन श्लोकांचा थोडक्यात अर्थ असा की
जे लोक शास्त्राविधींचा त्याग करून घोर तपश्चर्या करतात त्यांच्या ठायी दांभिकता, अहंकार, लालसा, क्रोध, शक्तिचा वृथा अभिमान असे दुर्गुण असतात. (त्यांच्या घोर तपश्चर्येने) शरीरातील पंचमहाभूतांना आणि त्यांच्या शरीरात वास करत असलेल्या मला सुद्धा कष्ट देणारे, भ्रमिष्ट असे लोक आसुरी प्रवृत्ती चे असतात हे तू समजून घे.
------------------------------------------------------------------
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः।यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं श्रृणु।।17.7।।
सर्वस्य प्रियः आहारः अपि त्रिविधः भवति। तथा तु यज्ञः, तपः, दानम्। तेषाम् इमम् भेदम् शृणु।
सर्वस्य सर्वांचे सर्व पु. ष. ए. व.
प्रियः प्रिय पु. प्र. ए. व.
आहारः भोजन आहार पु. प्र. ए. व.
अपि सुद्धा
त्रिविधः तीन प्रकारचे त्रिविध पु. प्र. ए. व.
भवति असते भू धातू लट लकार प्र.पु.ए.व.
तथा तसे अव्यय
तु परन्तु अव्यय
यज्ञः यज्ञ पु. प्र. ए. व.
तपः तप नपु. प्र. ए. व.
दानम् दान नपु. प्र. ए. व.
तेषाम् त्यांचे तद् पु. ष. ब. व.
इमम् हे इदम् पु. द्वि. ए. व.
भेदम् फरक भेद पु. द्वि. ए. व.
शृणु ऐक श्रु धातू लोट लकार म. पु. ए. व.
2र्या आणि 3र्या श्लोकात आपण श्रद्धा ह्या उपजत असतात असे वाचले. सर्व माणसांची तीन गटात विभागणी करून त्यांची वैशिष्ट्ये सांगणारा हा अध्याय ज्याचे नाव श्रद्धात्रयविभागयोगः असेच आहे. त्याप्रमाणे प्रत्येक गुणाचे वर्णन आणि विश्लेषण इथून पुढील श्लोकात आपण वाचणार आहोत. त्याची सुरुवात झाली आहे आहारापासून.
अन्नमशितं त्रेधा विधीयते तस्य यः स्थविष्ठो धातुस्तत्पुरीषं भवति यो मध्यमस्तन्मा सं योऽणिष्ठस्तन्मनः॥ छान्दोग्य उपनिषद 6.5.1।।
खाल्लेल्या अन्नाचे तीन प्रकारे विघटन होते. सर्वात मोठा भाग मलरूप होतो, मध्यम भागाच्या मांसपेशी होतात तर तरल भागापासून मन तयार होते.
आहाराचा आणि आपल्या आरोग्याचा थेट संबंध आहे, आरोग्य नाही तर काहीच नाही. त्याचे महत्व सांगणारा हा चरक संहिता मधील श्लोक.
धर्मार्थ काम मोक्षाणां आरोग्यं मूलमुतमम्। रोगास्तस्यापहर्तारः श्रेयशो जीवितस्य च।।
चरक संहिता 1/15
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष (पुरुषार्थाची 4 अंगे ) ह्यांच्या मूळाशी आरोग्य आहे. रोगाच्या प्रादुर्भावाने आरोग्य नष्ट होते.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
ज्या प्रमाणे यज्ञ तप आणि दान तीन प्रकारचे असतात तसेच (आपापल्या प्रकृती प्रमाणे) सर्वांचे प्रिय भोजन सुद्धा तीन प्रकारचे असते. त्यातील फरक तू माझ्याकडून ऐक.
-----------------------------------------------------------------
आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः।रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः।।17.8।।
आयुः-सत्त्व-बल-आरोग्य-सुख-प्रीति-विवर्धनाः, रस्याः स्निग्धाः स्थिराः हृद्याः आहाराः सात्त्विक-प्रियाः।
आयुः-सत्त्व-बल-आरोग्य-सुख-प्रीति-विवर्धनाः, आयु, सत्त्व, शक्ती आरोग्य प्रेम वाढवणारे
विवर्धन पु. प्र. ब. व.
वृध् धातू वृद्धि होणे
रस्याः रसयुक्त रस्य पु. प्र. ब. व.
रस् धातू चवदार असणे
स्निग्धाः स्नेहवर्धक स्निग्ध पु. प्र. ब. व.
स्निह् धातू प्रेम करणे क्त प्रत्यय
स्थिराः स्थिर राहणारे स्थिर पु. प्र. ब. व.
स्था धातू निश्चल असणे
हृद्याः आनंददायी हृद्य पु. प्र. ब. व.
आहाराः आहार पु. प्र. ब. व.
सात्त्विकप्रियाः सात्विक लोकांना आवडतो
सात्त्विकप्रिय पु. प्र. ब. व.
जसे तंबाखू आणि मद्य आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करतातच तसे काही पदार्थ आपले मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतात हे आता शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे. अन्न वाढण्याची पद्धत, त्यातील रंगसंगती ह्याचा सुद्धा आपल्या मनावर चांगला परीणाम होतो. निरनिराळ्या खनिज पदार्थ आणि जीवनसत्वांची कमतरता निरनिराळ्या आजारांना कारणीभूत ठरतात. कोणते पदार्थ कोणत्या ऋतूत, कशाबरोबर, किती प्रमाणात खावे ह्याचे सुद्धा काही अलिखित नियम ठरून गेले आहेत. आयुर्वेदात हे सर्व विस्ताराने लिहिले आहे. काही लोक जगण्यासाठी खातात तर काही जण फक्त खाण्यासाठी जगतात. अती खाणे सुद्धा धोकादायक. कारण भोजनाचा मूळ उद्देश आपले आरोग्य टिकवणे हाच आहे.
समर्थांनी तर भोजनाला यज्ञकर्म म्हटले आहे ते फक्त उदरभरण नव्हे.
आपापल्या नैसर्गिक वृत्ती प्रमाणे आपण आहाराकडे कोणत्या दृष्टीने पाहतो ते ठरत असावे.
म्हणून श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात असे म्हणतात की
आयु, शुद्धि, शक्ती, आरोग्य, सुख, प्रेम वाढविणारे, चवदार, स्नेहवर्धक, मनाला शांती देणारा, आनंद देणारा आहार सात्विक लोकांना प्रिय असतो.
------------------------------------------------------------------
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः।आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः।।17.9।।
कटु-अम्ल-लवण-उष्ण-तीक्ष्ण-रूक्ष-विदाहिनः दुःख-शोक-आमय-प्रदाः आहाराः राजसस्य इष्टाः।
कटु-अम्ल-लवण-उष्ण-तीक्ष्ण-रूक्ष-विदाहिनः कडू आंबट खारट अतीउष्ण कोरडे दाहक
कटु, अम्ल लवण उष्ण तीक्ष्ण रूक्ष विदाहिन् पु. प्र. ब. व.
वि+दह् धातू जळणे, भस्म होणे दुःख-शोक-आमय-प्रदाः दुःख चिन्ता रोगांना उत्पन्न करणारे
दुःख शोक आमय प्रद पु. प्र. ब. व.
प्र+दा धातू देणे
अम् धातू आजारी पडणे
या धातू जाणे
आहाराः आहार पु. प्र. ब. व.
राजसस्य राजस लोकांना राजस पु. ष. ए. व.
इष्टाः प्रिय इष् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ब. व.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी राजसी प्रवृत्ती च्या लोकांच्या आहाराविषयी सांगितले आहे.
ते असे म्हणतात की
कडू आंबट खारट अतीउष्ण कोरडे, दाहक असे पदार्थ (अती प्रमाणात) राजसी लोकांना प्रिय असतात जे दुःख, चिंता आणि रोग उत्पन्न करू शकतात.
------------------------------------------------------------------
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्। उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्।।17.10।।
यत् यातयामम्, गत-रसम्, पूति, पर्युषितम् च उच्छिष्टम् अपि च अमेध्यम् भोजनम् तामस-प्रियम्
यत् जो अव्यय
यातयामम्, प्रभावहीन यातयाम पु. द्वि. ए. व.
यस्य कालं गतम्
या धातू जाणे
यम् धातू प्रतिबंध करणे
गत-रसम्, रसहीन गतरस पु. द्वि. ए. व.
पूति, दुर्गंधयुक्त पूति नपु. द्वि. ए. व.
पूय धातू दुर्गंध येणे क्त प्रत्यय
पर्युषितम् शिळे पर्युषित पु. द्वि. ए. व.
परि+वस् धातू वास करणे क्त प्रत्यय
च
उच्छिष्टम् उष्टे उच्छिष्ट पु. द्वि. ए. व.
उत+शिष् धातू शिल्लक उरणे
अपि च
अमेध्यम् अपवित्र अमेध्य नपु. द्वि. ए. व.
मेध् धातू जवळीक असणे
भोजनम् भोजन पु. द्वि. ए. व.
तामस-प्रियम् तामसप्रिय पु. द्वि. ए. व.
आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण तामसी लोकांच्या आहाराबद्दल सांगत आहेत.
प्राचीन कालगणनेप्रमाणे एका दिवसाची 8 यामात विभागणी केली आहे. एक याम म्हणजे 3 तास. यातयाम म्हणजे अन्न शिजवून तीन तास होऊन गेले आहेत असे. पण ह्या श्लोकात पर्युषित म्हणजे शिळे अन्न असाही उल्लेख आहे. त्यामुळे काही जाणकारांच्या मते यातयाम म्हणजे अर्धवट शिजवलेले अन्न असा अर्थ घेता येईल. ह्या श्लोकातील शब्दांचा शब्दशः अर्थ न घेता, त्यामागे स्वच्छतेच्या आणि ताजे अन्न खाण्याच्या कल्पना असाव्यात. अन्नाला दुसर्यांच्या हाताचा स्पर्श होऊ नये अशी खबरदारी आजही लोक घेतात. खूप काळ शिजवलेले अन्न खाण्यासाठी योग्य रहात नाही.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
तामसी लोकांना अर्धवट शिजवलेले, रूचीहीन, दुर्गंधयुक्त, शिळे झालेले, उष्टे (कोणीतरी टाकून दिलेले) म्हणून अपवित्र असे अन्न आवडते.
------------------------------------------------------------------
अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते। यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः।।17.11।।
यः यज्ञः विधि-दृष्टः यष्टव्यम् एव इति मनः समाधाय अफल-आकाङ्क्षिभिः इज्यते, सः सात्त्विकः
यः जो यद् पु. प्र. ए. व.
यज्ञः यज्ञ पु. प्र. ए. व.
विधि-दृष्टः शास्त्रात सांगितल्या प्रमाणे
विधि+दृश् धातू पाहणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
यष्टव्यम् यज्ञ करणे हेच कर्तव्य
यष्टव्य यज् धातू तव्यत प्रत्यय नपु. प्र. ए. व.
एव हेच
इति असे
मनः मनाला मनस् नपु द्वि. ए. व.
समाधाय संतुष्ट करून सम+आ+धा धातू धारण करणे ल्यप प्रत्यय
अफल-आकाङ्क्षिभिः फल इच्छा रहीत
न फल आकाडःक्षिन् पु. तृ. ए. व.
इज्यते, केला जातो यज् धातू कर्मणि लट लकार प्र.पु.ए.व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
सात्त्विकः सात्त्विक पु. प्र. ए. व.
आधीच्या श्लोकात तीन प्रकारच्या लोकांच्या आहाराच्या आवडीनिवडी बद्दल आपण वाचले आता यज्ञ कसे तीन प्रकारचे असतात त्याबद्दल माहिती देण्यास सुरुवात झाली आहे.
यज् धातू पासून तयार झालेला हा शब्द,
यज देवपूजा-संगतिकरण-दानेषु ह्या पणिनिय सूत्राप्रमाणे यज चा अर्थ देवपूजा, संगतिकरण आणि दान असा होतो.
यज्ञ म्हणजे संकल्प. समर्थांनी भोजनाला यज्ञ कर्म म्हटले आहे. कारण आपला आहार हा जीवसृष्टी वृद्धिंगत होण्याचा सर्वात मोठा घटक.
शेतकर्यांनी शेत नांगरण्यापासून स्वयंपाकघरात चवदार अन्न शिजवण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ह्यात समाविष्ट आहेत. खूप मोठा संकल्प आहे हा. प्रत्येक क्रिये मागची भावना सुद्धा महत्त्वाची. चांगल्या भावनेने शिजवलेले अन्न जास्त उपयुक्त असे आता मान्य झाले आहे.
गीतेच्या 3 र्या अध्यायापासून यज्ञ संबंधी विचार मांडला आहे.
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः। तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः।।3.12।।
यज्ञा मुळे प्रसन्न झालेले देवतागण तुला इष्ट भोग प्रदान करतील. त्यांनी दिलेले भोग जो कोणी कृतज्ञता व्यक्त न करताच उपभोगेल तो खरोखर चोरच आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाने अशी कृतज्ञता शिकवली आहे. म्हणूनच आपण जमिनीला मातेचा दर्जा दिला आहे.
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः।यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते।।4.23।।
जो आसक्तिरहित आणि (लालसा) मुक्त आहे, ज्याचे चित्त ज्ञानात गढून गेले आहे, असे यज्ञासाठी योग्य आचरण करणार्या पुरुषाच्या समस्त कर्मांचा अस्त होतो.
ईशावास्योपनिषदातील पहिल्या श्लोकात जग हे ईश्वराचे आवास आहे आणि कोणतीही लालसा न ठेवता त्याचा उपभोग घेतला पाहिजे (तेन त्यक्तेन भुञ्जीथा) असे स्पष्ट म्हटले आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विधीवत यज्ञ करणे हेच कर्तव्य आहे अशी मानसिकता ठेवून त्याच्या श्रेयाची अपेक्षा न ठेवता केलेला यज्ञ म्हणजे सात्विक.
------------------------------------------------------------------
अभिसंधाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत्। इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्।।17.12।।
हे भरत-श्रेष्ठ! फलम् अभिसन्धाय दम्भार्थम् अपि च एव यत् तु इज्यते, तम् यज्ञम् राजसम् विद्धि।
हे भरत-श्रेष्ठ!
फलम् फल नपु. द्वि. ए. व.
अभिसन्धाय उद्देश्य ठेवून अभि+सम+धा धातू धारण करणे ल्यप प्रत्यय
दम्भार्थम् दाम्भिकतेने दम्भ अर्थ पु. द्वि. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
च आणि अव्यय
एव आणि अव्यय
यत् जो सर्व.
तु परन्तु अव्यय
इज्यते केले जाते इज् धातू कर्मणि लट लकार प्र.पु.ए.व.
तम् ते तद् पु. द्वि. ए. व.
यज्ञम् यज्ञ पु. द्वि. ए. व.
राजसम् राजस पु. द्वि. ए. व.
विद्धि जाण विद् धातू माहीत करुन घेणे कर्तरी लोट लकार म. पु. ए. व.
16.17 मध्ये अविधी पूर्वक यज्ञ करणार्या माणसांचा हा एक आसुरी गुण सांगितला आहे.
आधीच्या अध्यायात यष्टव्य म्हणजे यज्ञ करणे हे एक कर्तव्य मानले पाहिजे आणि त्याच्या श्रेयाची अपेक्षा सुद्धा ठेवली नाही पाहिजे असे म्हटले आहे. श्रेय, दोन प्रकारचे असू शकते, एकतर काही इच्छा पूर्ण व्हावी, जसे अपत्य प्राप्ती आणि दुसरे मृत्यू पश्चात स्वर्गप्राप्ती व्हावी वगैरे. सात्विक माणसे कसलीच अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र राजसी माणसांचे असे नाही.
आयुष्यात काही अनिष्ट घडू नये आणि इष्ट पूर्ती व्हावी यासाठी राजसी व्यक्ती कायम प्रयत्नशील असतात.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
परन्तु हे भरत-श्रेष्ठ! जो यज्ञ दांभिकतेने आणि फळाची अपेक्षा ठेवून केला जातो तो राजस यज्ञ, असे तू समज.
--------------------------------------------------------------------
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम्। श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते।।17.13।।
विधि-हीनम्, असृष्ट-अन्नम्, मन्त्र-हीनम्, अदक्षिणम्, श्रद्धा-विरहितम्, यज्ञम् तामसम् परिचक्षते
विधि-हीनम्, शास्त्रात नमूद केलेल्या नियमांना डावलून विधिहीन पु. द्वि. ए. व.
असृष्ट-अन्नम्, अन्नदानाशिवाय
न सृष्टान्न पु. द्वि. ए. व.
मन्त्र-हीनम्, मन्त्रपठणाशिवाय मन्त्रहीन पु. द्वि. ए. व.
अदक्षिणम्, दानधर्म न करता न दक्षिण पु. द्वि. ए. व.
श्रद्धा-विरहितम्, श्रदधेविना श्रद्धाविरहित पु. द्वि. ए. व.
यज्ञम् यज्ञ पु. द्वि. ए. व.
तामसम् तामस पु. द्वि. ए. व.
परिचक्षते म्हणतात परि+चक्ष् धातू स्पष्ट बोलणे आत्मनेपदी कर्तरी लट लकार प्र.पु.ब.व.
11 व्या श्लोकात यज्ञ ह्या शब्दाची विस्तृत व्याख्या वाचली. यज्ञ म्हणजे देवपूजा, दान आणि संगतिकरण. ह्यामधे यज्ञ केल्यानंतर त्याच्या मिळणार्या श्रेयाबददल काहीच उल्लेख नाही. सहाजिकच सात्विक व्यक्ती त्याचा विचार सुद्धा करत नाहीत.
राजसी व्यक्तींचा मात्र यज्ञ करण्यामागे काहीतरी हेतू असतो.
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।3.14।।
गीतेच्या ह्या श्लोकात यज्ञाचे महत्व सांगितले आहे ते आजच्या काळातील शास्त्रानुसार पडताळून घ्यायला हवे. मात्र त्यासाठी यज्ञात हवी देण्यासाठी आवश्यक सामुग्री उपलब्ध हवी.
ह्या श्लोकात असे म्हटले आहे की शास्त्रोक्त विधी, अन्नदान, मंत्रोच्चार, दक्षिणा आणि श्रद्धा यांच्या शिवाय केलेल्या यज्ञाला तामसी यज्ञ असे म्हणतात.
--------------------------------------------------------------------
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्। ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते।।17.14।।
देव-द्विज-गुरु-प्राज्ञ-पूजनम्, शौचम्, आर्जवम्, ब्रह्मचर्यम्, अहिंसा च शारीरम् तपः उच्यते।
देव-द्विज-गुरु-प्राज्ञ-पूजनम्, देव-द्विज-गुरु-प्राज्ञ-पूजन नपु. प्र. ए. व.
द्वि+ज दोनदा जन्मलेले (ब्राह्मण)
प्रा+ज्ञा धातू समजून घेणे
शौचम् शौच नपु. प्र. ए. व.
आर्जवम्, आर्जव नपु. प्र. ए. व.
ब्रह्मचर्यम्, ब्रह्मचर्य नपु. प्र. ए. व.
अहिंसा स्त्री. प्र. ए. व.
च
शारीरम् शारीर नपु. प्र. ए. व.
तपः तपस् नपु. प्र. ए. व.
उच्यते वच् धातू बोलणे आत्मनेपदी कर्मणि लट लकार प्र.पु.ए.व.
16 व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात आपण दैवी गुण वाचले त्यापैकी एक गुण म्हणजे तप. ह्या श्लोकात शारीरिक पातळीवर केल्या जाणाऱ्या तपाचे वर्णन केले आहे.
16 व्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकात शौच, आर्जव अहिंसा ह्या शब्दांचे अर्थ समजून घेतले.
ह्या श्लोकातील देव द्विज, गुरू, प्राज्ञ ह्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायला हवे.
ब्रह्मा विष्णू महेश ह्या महत्वाच्या देवांव्यतीरीक्त 12 आदित्य, 8 वसू, 11 रूद्र, 2 अश्विनी कुमार अशा 33 जणांना देव मानले जाते..
द्विज म्हणजे ज्याचा दुसर्यांदा जन्म झाला आहे असा, पक्षी (पक्षी अंड्यात आधी आणि नंतर बाहेर जन्म घेतात असे म्हणतात).
जन्मना जायते शूद्र: कर्मणा द्विज उच्यते। मनुस्मृति ।
जन्माने सर्व शूद्र असतात पण कर्माने ते द्विज म्हणून ओळखले जातात.
द्विज म्हणजे संस्कारीत व्यक्ति. थोडक्यात लहान मूल गुरूगृही राहून ज्ञान प्राप्त करतो हा त्याचा दुसरा जन्म.
दुर्योधनाने द्रोणाचार्यांना पहिल्या अध्यायातील 7 व्या श्लोकात द्विजोत्तम असे म्हटले आहे.
तडागकृत् वृक्षरोपी इष्टयज्ञश्च यो द्विजः ।एते स्वर्गे महीयन्ते ये चान्ये सत्यवादिनः ॥(महाभारत, अनुशासन पर्व, अध्याय 58, श्लोक 32)
तलाव खोदणारे , वृक्षरोपण करणारे , आणि यज्ञाचे अनुष्ठान करणारे द्विज यांना स्वर्गप्राप्ती होते. याशिवाय सत्यवचनी लोकांचे सुद्धा महत्व आहे.
तद् भोजनं यद् द्विज भुक्तशेषं तत्सौहृदं यत्क्रियते परस्मिन्।
॥चाणक्यनीति 15.8।।
द्विज भोजनानंतर शिल्लक असलेले भोजन हे उत्तम भोजन आहे.
ह्यानंतर चा शब्द आहे प्राज्ञ. प्रज्ञा म्हणजे प्रकृष्ट ज्ञान’ अर्थात् संपूर्ण ज्ञान. ज्यावेळी व्यक्तीला एखाद्या विषयाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते, तेव्हा त्या संपूर्ण ज्ञानाला प्रज्ञा असे म्हणतात. ‘ज्ञान’ हा शब्द सर्वसामान्य अर्थ प्रकट करतो, परंतु ‘प्रज्ञा’ हा शब्द विशेष अर्थ प्रकट करतो.
तज्जयात् प्रज्ञाऽलोकः ॥3.5॥
धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हीच्या एकत्रित अभ्यासामुळे प्रज्ञा प्राप्त होऊ शकते (योगसूत्र 3.5)
प्रज्ञा म्हणजे सम्यक बुद्धी.
ब्रह्मचर्य हे उत्कृष्ट तप मानले जाते. याज्ञवल्क्य संहिता मध्ये पुढील श्लोकात ब्रह्मचर्य चे वर्णन केले आहे.
कर्मणा मनसा वाचा सर्वास्थासु सर्वदा |सर्वत्र मैथुनतुआगो ब्रह्मचर्यं प्रचक्षते ||
'मन, वाचा आणि कर्म ह्या तीनही पातळीवर मैथुनाचा सदैव त्याग करणे , म्हणजे ब्रह्मचर्य. '
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
देव, द्विज, गुरू, प्रज्ञावंत ह्यांची पूजा करणे (आदर करणे), पवित्रता, सरळमार्गी, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते.
-------------------------------------------------------------------
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्। स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते।।17.15।।
यत् अनुद्वेगकरम् प्रिय-हितम् सत्यम् च वाक्यम् स्वाध्याय-अभ्यसनम् एव च, वाङ्मयम् तपः उच्यते।
यत् यद् नपु. द्वि. ए. व.
अनुद्वेगकरम् न उद्वेग कर नपु. प्र. ए. व.
अन+उद+विज् धातू घाबरणे
प्रिय-हितम् प्रिय-हित नपु. प्र. ए. व.
सत्यम् सत्य नपु. प्र. ए. व.
च
वाक्यम् वाक्य नपु. प्र. ए. व.
स्वाध्याय-अभ्यसनम् स्वाध्याय अभ्यसन नपु. प्र. ए. व.
अभि+अस् धातू फेकणे, ल्युट् प्रत्यय निरन्तर अध्ययन
एव अव्यय
च, अव्यय
वाङ्मयम् वाड्मय नपु. प्र. ए. व.
तपः तप नपु. प्र. ए. व.
उच्यते वच् धातू बोलणे कर्मणि लट लकार प्र.पु.ए.व.
ह्या श्लोकात वाचिक तपाचे विवेचन केले आहे.
हा श्लोक वाचताना पुढील श्लोकाची हमखास आठवण होते.
सत्यम् ब्रूयात प्रियं ब्रूयान सत्यम् अप्रियं, प्रियं च नानृतं ब्रूयात एष धर्मः सनातनः (मनुस्मृति-4.138)
सत्य असे बोलले पाहिजे जे दुसर्यांना प्रिय असेल, अप्रिय सत्य बोलू नये. प्रिय पण असत्य कधी बोलू नये हाच सनातन धर्म आहे.
कोणतेच बोलणे वर्तमानात किंवा भविष्यात उद्वेग निर्माण होईल असे असू नये.
आपली वाचा आपले व्यक्तिमत्व दर्शवते.
स्वाध्याय चे दोन अर्थ सांगितले जातात. पहिला अर्थ भारतीय दर्शनांचा अभ्यास आणि दुसरा
स्वस्थ अध्ययनं स्वाध्यायः, आत्मचिंतन हा सुद्धा स्वाध्याय आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जे बोलणे उद्वेग निर्माण करत नाही , जे प्रिय, हितकारी आणि सत्य असून अभ्यासयुक्त असते त्याला वाचिक तप असे म्हणतात.
------------------------------------------------------------------
मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः।भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते।।17.16।।
मनः-प्रसादः सौम्यत्वम्, मौनम्, आत्म-विनिग्रहः, भाव-संशुद्धिः इति एतत् मानसम् तपः उच्यते।
मनः-प्रसादः मनप्रसाद पु. प्र. ए. व.
प्र + सद् धातू संतुष्ट होणे
सौम्यत्वम्, सौम्यत्व नपु. प्र. ए. व.
मौनम्, मौन नपु. प्र. ए. व.
आत्म-विनिग्रहः, स्वशासन आत्मन् विनिग्रह
पु. प्र. ए. व.
वि+नि +ग्रह् धातू ग्रहण करणे
भाव-संशुद्धिः भावसंशुदधि स्त्री. प्र. ए. व.
शुध् धातू पवित्र होणे
इति अव्यय
एतत् एतद् नपु. प्र. ए. व.
मानसम् मानस् नपु. प्र. ए. व.
तपः तप नपु प्र. ए. व.
उच्यते वच् धातू बोलणे कर्मणि लट लकार प्र.पु.ए.व.
ह्या श्लोकात मानसिक तपाचे वर्णन केले आहे.
सदोदित मन प्रसन्न ठेवता येणारे खरे नशिबवान.
2र्या अध्यायातील 64,65 वे श्लोक म्हणजे जणू मानसशास्त्राचे धडे.
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति।।2.64।।
रागद्वेषाचा त्याग केलेला आत्मसंयमी पुरुष आपल्या ताब्यात ठेवलेल्या इन्द्रियां द्वारे विषयांचे सुख उपभोगून प्रसन्नता (प्रस्ेााद) प्राप्त करतो.
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते।।2.65।।
मन प्रसन्न असले कि सर्व दुखांचा अन्त होतो आणि अशा प्रसन्नचित्त असलेल्या पुरुषाची बुद्धि सुद्धा त्वरित स्थिर होते.
त्यानंतर सौम्यत्व हे मानसिक तपाचे वैशिष्ट्य सांगितले आहे.
सौम्यत्व म्हणजे शालीनता, सज्जनता. कोप, ईर्ष्या, हिंसा, क्रूरता, हेकटपणा ह्या सर्व भावना काबूत असल्या की आपोआपच माणूस प्रेमळ आणि मृदू होतो. प्रयत्नपूर्वक अशी नकारात्मकता दूर करणे ही एक मोठीच कसोटी.
मौनं सर्वाथ साधनम् असे म्हणतात ते काही उगीच नाही. मौन म्हणजे रागावून गप्प बसणे नव्हे. तर ते अध्यात्मिक चिंतनातून निर्माण होते. प्रत्येक वेळी आपले मत व्यक्त करण्याची गरज नसते. विचारल्याशिवाय तर अजिबात बोलू नये. मात्र विचारल्यानंतर सुद्धा व्यक्त न होणे हे मौन. (एखाद्याने गपचूप सर्व काही ऐकून घेणे हे पण मौन नव्हे.) व्यक्त होण्यासाठी योग्य वेळेची वाट पहाणे म्हणजे मौन.
आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः ।
बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम् ॥
केवळ तोंड चालू ठेवल्याने पोपट मैना पिंजर्यात बंद होतात. बगळ्याचे मात्र तसे होत नाही. मौन राखल्यास सर्व काही साध्य होते.
हि झाली व्यावहारिक बाजू.
विपश्यना म्हणजे दीर्घकालीन मौन. हे एक आत्मसंवादाचे निमित्त होय, ज्याच्या मुळे अध्यात्मिक प्रगती साधता येते.
प्रशस्ताप्रशस्त समस्त वचन रचनां। परित्यज्या मौन रतेन साध्यमं।।
तात्पर्य चांगल्या वाईट गोष्टींची चर्चा टाळून केवळ मौन धारण करून अपेक्षित लक्ष्य साधता येते.
आत्म-विनिग्रह हे मानसिक तपाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले आहे. 13 व्या अध्यायात क्षेत्रज्ञ संबंधी वाचताना हे आपण वाचले आहेच.
स्वशासन किंवा आत्मसंयम राखणे सोपे नाही.
त्यानंतर भाव संशुद्धि हे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले आहे.
मनाची सातत्याने शुद्धता ठेवणे खूपच अवघड. समाजात राहताना आपल्यावर इतरांचा प्रभाव पडतच असतो. पण कोणाला जवळ करावे आणि कोणाला दूर ठेवावे हे सांगणारा हा श्लोक
मैत्रीकरुणामुदितोपेक्षणां सुखदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनम्॥ पतंजली योगसूत्र 1.33॥
जेथे लोक सुखी दिसतात त्यांच्याशी मैत्री करा. जेथे दुःख दिसून येते त्याप्रती मनात करूणा उत्पन्न होऊ दे. जे लोक चांगले काम करताना दिसतात त्यांना मदत करा. आणि जेथे लोक वाईट काम करताना दिसतात त्यांच्यापासून दूर रहावे, असे केल्याने चित्त एकाग्र आणि प्रसन्न होते.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की मनाची प्रसन्नता, सौम्यत्व, मौन, आत्मसंयम, मनाची पवित्रता ह्यांना मानसिक तप असे म्हणतात.
---------------------------------------------------------------
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्ित्रविधं नरैः।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते।।17.17।।
अफल-आकाङ्क्षिभिः युक्तैः नरैः परया श्रद्धया तप्तम् तत् त्रिविधम् तपः सात्त्विकम् परिचक्षते।
अफल-आकाङ्क्षिभिः फळाची अपेक्षा न ठेवता
न फल आकाडःक्षिन् पु. तृ. ब. व.
युक्तैः वैशिष्ट्यपूर्ण युज् धातू क्त प्रत्यय पु तृ. ब. व.
नरैः नर पु. तृ. ब. व.
परया परम परा स्त्री. तृ. ए. व.
श्रद्धया श्रद्धा स्त्री. तृ. ए. व.
तप्तम् तप करतो तप् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
त्रिविधम् त्रिविध नपु. द्वि. ए. व.
तपः तपस् नपु. द्वि. ए. व.
सात्त्विकम् सात्विक नपु. द्वि. ए. व.
परिचक्षते म्हणतात परि+चक्ष् धातू कर्तरी आत्मनेपदी लट लकार प्र.पु.ब.व.
आतापर्यंत आपण वाचलेल्या तीन श्लोकांचा सारांश ह्या श्लोकात सांगितला आहे.
14, 15,16 व्या श्लोकात अनुक्रमे शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप ह्या बद्दल आपण विस्तारपूर्वक वाचले.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
आपल्या तपाची कोणतीही फल इच्छा न ठेवता, सर्व वैशिष्ट्यांनी युक्त असा पुरूष जेव्हा परम श्रद्धेने तीनही प्रकारचे (शारीरिक, वाचिक आणि मानसिक) तप करतो तेव्हा त्याला सात्विक तप असे म्हणतात.
---------------------------------------------------------------
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत्। क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्।।17.18।।
यत् तपः सत्कार-मान-पूजार्थम् दम्भेन एव क्रियते, तत् अध्रुवम् चलम् च इह राजसम् प्रोक्तम्।
यत् जे यद् नपु. द्वि. ए. वह
तपः तप नपु. प्र. द्वि . व.
सत्कार-मान-पूजार्थम्
आदर, मान सन्मान, पूजा यासाठी
सत्कार-मान-पूजा नपु. प्र. ए. व.
दम्भेन दम्भ पु. तृ. ए. व.
एव सुद्धा अव्यय
क्रियते केले जाते कृ धातू कर्मणि आत्मनेपदी लट लकार प्र.पु.ए.व.
तत् ते तद् नपु द्वि. ए. व.
अध्रुवम् नाशवान न ध्रुव नपु. द्वि. ए. व.
ध्रु धातू स्थिर असणे
चलम् अनिश्चित चल नपु. द्वि. ए. व.
च अव्यय
इह ह्या लोकात अव्यय
राजसम् राजस् पु. द्वि. ए. व.
प्रोक्तम् म्हटले आहे प्र +वच् धातू क्त प्रत्यय नपु प्र. ए. व.
12 व्या अध्यायात आपण भक्तीयोग वाचला. त्यामध्ये आपण खर्या भक्ताची वैशिष्ट्ये वाचली. 12 व्या श्लोकात राजस यज्ञाची व्याख्या सांगितली आहे.
दाम्भिक ह्या शब्दाचा अर्थ आपण आसुरी गुणासंबंधी वाचत असताना समजून घेतला.
आजकाल देऊळ ह्या संकल्पनेला उत्सवाचे स्वरूप आले आहे. महाप्रसाद, महाआरती सर्व काही महा-महा. असे धार्मिक सोहळे स्वतः चे महत्व वाढविण्यासाठी केले जातात. मग अशी धार्मिकता दाखवण्याची चढाओढच चालू होते. पण अशी मिळवलेली सामाजिक पत ही तात्पुरतीच असते. आणि ह्या सगळ्या मध्ये अध्यात्मिकता बाजूला पडते.
12 व्या श्लोकात राजसी यज्ञाचे वर्णन करताना हे सर्व सांगितले आहेच.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जे तप आदरसत्कार, मानमरातब, पूजा वगैरे अपेक्षा ठेवून दांभिकतेने केला जातो त्या क्षणिक आणि अनिश्चित अशा तपाला राजस तप असे म्हटले जाते.
---------------------------------------------------------------
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः। परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्।।17.19।।
यत् तपः मूढ-ग्राहेण आत्मनः पीडया परस्य उत्सादनार्थम् वा क्रियते, तत् तामसम् उदाहृतम्
यत् जो अव्यय
तपः तपस् नपु. प्र. ए. व.
मूढ-ग्राहेण हटवादीपणाने मूढग्राह पु. तृ. ए. व.
ग्रह् धातू ग्रहण करणे, ग्राह ज्ञान
आत्मनः मन वाचा शरीर आत्मन् पु. ष. ए. व.
पीडया पीडा देऊन पीडा स्त्री. तृ. ए. व.
पीड् धातू
परस्य दुसर्याचे पर पु. ष. ए. व.
उत्सादनार्थम् अहित साधून उद सादन नपु. प्र. ए. व.
सद् धातू शक्तीहीन होणे
वा अथवा अव्यय
क्रियते, केले जाते कृ धातू कर्मणि लट लकार प्र.पु.ए.व
तत् ते तद् नपु. द्वि.ए. व.
तामसम् तामस पु. द्वि. ए. व.
उदाहृतम् उदाहरण उत हृ धातू हरण करणे क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
5व्या आणि 6व्या श्लोकात तामसी वृत्तीच्या व्यक्तींचे वर्णन केले आहे. 13 व्या श्लोकात आपण तामसी यज्ञ म्हणजे काय ते वाचले. एखाद्या व्यक्तीला मूर्ख म्हणणे तसे जोखमीचे काम, कारण एखादे वेड डोक्यात घेऊन त्यावर झपाटलेपणाने काम करून स्वतःला सिद्ध करणारे बरेच असतात. सरतेशेवटी त्यांचे काम लोकांच्या उपयोगी पडणारे ठरते. पण तामसी लोकांच्या मनातील हेतू हा नेहमीच दुसर्यांना त्रास देणे हा असतो. म्हणून ह्या श्लोकात मूढ-ग्राहेण असा शब्द वापरला आहे आणि तामसिक तपा बद्दल विवेचन दिले आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जे तप हटवादीपणाने, स्वतः ला कष्ट देऊन किंवा दुसर्यांना त्रास देण्यासाठी केले जाते त्याला तामसी तप म्हटले जाते.
---------------------------------------------------------------
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे। देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्।।17.20।।
दातव्यम् इति यत् दानम् देशे काले च पात्रे च अनुपकारिणे दीयते, तत् दानम् सात्त्विकम् स्मृतम्।
दातव्यम् दान दिले पाहिजे असे दा धातू तव्यत् प्रत्यय पु. द्वि. ए. व.
इति म्हणून अव्यय
यत् जो अव्यय
दानम् दान नपु. प्र. ए. व.
देशे देश पु. स. ए. व.
काले काल पु. स. ए. व.
च सुद्धा अव्यय
पात्रे पात्र नपु. स. ए. व.
च सुद्धा अव्यय
अनुपकारिणे उपकार न करणार्या प्रति न उपकारिन् पु. च. ए. व.
दीयते, दिले जाते दा धातू कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र.पु.ए.व
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
दानम् दान नपु. प्र. ए. व.
सात्त्विकम् सात्विक नपु. प्र. ए. व.
स्मृतम् म्हटले जाते स्मृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
7 व्या श्लोकात आपण यज्ञ तप आणि दान तीन प्रकारचे असतात हे वाचले. त्यापैकी यज्ञ आणि तप ह्यांचे तीन प्रकार सात्विक, राजसी आणि तामसी गुणांच्या आधारे अभ्यासले. 16 व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात आपण दान हा एक दैवी गुण असून दानाची 5 भूषणे आणि 5 दूषणे वाचली. अर्थातच ह्या गुण दुर्गुणांचे वर्गीकरण त्रिगुणांच्या आधारे आपण वाचणार आहोत. ह्या श्लोकात दानाचे विवेचन सात्विक गुणांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत.
दान सत्पात्री असावे असे म्हणतात. ह्या श्लोकात देश आणि काल असे शब्द वापरले आहेत. ह्याचा अर्थ योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी असा घेता येईल.
भविष्यपुराणात (151.18)सांगितल्याप्रमाणे तीन प्रकारची दाने अत्यंत श्रेष्ठ आहेत – गोदान, भूदान आणि विद्यादान. ह्या तीनही गोष्टी देण्याची पात्रता सुद्धा असली पाहिजे.
अन्यायाने, लबाडी करून मिळवलेले धन, दान-योग्य असू शकत नाही. स्कंदपुराणात (माहेश्वर खंड) सांगितले आहे
न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमत: । कर्त्तव्यों विनियोगश्च ईश्वरप्रीत्यर्थमेव च ।।
प्रामाणिकपणे मिळवलेल्या धनातील दहावा भाग ईश्वराप्रती दान देऊन कर्त्तव्याचे पालन केले पाहिजे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
दान देणे हे कर्तव्य आहे असे मानून योग्य ठिकाणी, योग्य वेळी, पात्र व्यक्तीस उपकार परतफेडीची अपेक्षा न ठेवता जे दान दिले जाते त्याला सात्विक दान असे म्हणतात.
---------------------------------------------------------------
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः। दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्।।17.21।।
यत् तु परिक्लिष्टम् प्रति -उपकारार्थम्, फलम् उद्दिश्य वा पुनः च दीयते, तत् दानम् राजसम् स्मृतम्।
यत् जो अव्यय
तु परन्तु अव्यय
परिक्लिष्टम् नाखुशीने परि+क्लिश् धातू पीडा होणे क्त प्रत्यय पु. द्वि. ए. व.
प्रति -उपकारार्थम्, उपकार करण्याचा हेतूने
प्रति उपकार अर्थम् नपु. प्र. ए. व.
फलम् फल नपु. प्र. द्वि . व.
उद्दिश्य उद्देश्य ठेवून उद+दिश् ल्यप प्रत्यय
दिश् धातू दान देणे
वा अथवा
पुनः परत अव्यय
च आणि अव्यय
दीयते,दिले जाते दा धातू देणे कर्मणि आत्मनेपदी लट लकार प्र.पु.ए.व
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
दानम् दान नपु. द्वि. ए. व.
राजसम् राजस नपु. द्वि. ए. व.
स्मृतम् म्हटले आहे स्मृ धातू आठवणे क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
ह्या श्लोकात राजस दानाचे वर्णन केले आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जे दान क्लेशपूर्वक (अनिच्छेने), दुसर्यांवर परोपकार करण्याच्या उद्देशाने किंवा त्याचे श्रेय मिळवण्यासाठी दिले जाते ते राजसी दान असे म्हटले जाते.
---------------------------------------------------------------
अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते। असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्।।17.22।।
यत् दानम् असत्कृतम् अवज्ञातम्, अदेश-काले अपात्रेभ्यः च दीयते, तत् तामसम् उदाहृतम्।
यत् जो अव्यय
दानम् दान नपु. द्वि. ए. व.
असत्कृतम् सत्कार न करता
न सत्कृत, असत् कृतम् नपु. द्वि. ए. व.
अवज्ञातम्, अनादर अव+ज्ञा धातू क्त प्रत्यय नपु. द्वि. ए. व.
अव खाली
अदेश-काले अयोग्य ठिकाण आणि वेळ
न देश काल पु. स. ए. व.
अपात्रेभ्यः अपात्र नपु. च. ब. व.
च अव्यय
दीयते, दिले जाते दा धातू कर्मणि आत्मनेपदी लट लकार प्र.पु.ए.व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
तामसम् तामस् नपु. द्वि. ए. व.
उदाहृतम् म्हटले जाते उत् +आ+हृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
आता पर्यंत आपण सात्विक, राजसी आणि तामसी गुणांच्या व्यक्तिंचे यज्ञ आणि तप करण्याच्या उद्देशातील फरक समजून घेतले. दान च्या बाबतीत सुद्धा असे विश्लेषण केले असले तरी तीनही प्रकारात 'दान देणे' हे घडतेच, म्हणजे आपल्या कडे असलेल्या गोष्टींचा त्याग सर्वांनाच करावा लागतो.
श्रद्धया देयम् । अश्रद्धयाऽदेयम् ।तैत्तिरीय उपनिषद् 1.11।।
श्रद्धापूर्वक दान द्यावे, श्रद्धा नसेल तर दान देऊ नये. किंवा असेही म्हणता येईल की
श्रद्धापूर्वक दान द्यावे, श्रद्धा नसेल तरी दान द्यावे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे दान चांगल्या हेतूने न देता अपात्र व्यक्तीस, अयोग्य ठिकाणी आणि अयोग्य वेळी, अनादर करून दिले जाते त्याला तामसी दान असे म्हटले जाते.
-------------------------------------------------------------
तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा।।17.23।।
ओम् तत् सत् इति ब्रह्मणः त्रिविधः निर्देशः स्मृतः। तेन ब्राह्मणाः वेदाः च यज्ञाः च पुरा विहिताः।
ओम् अव्यय
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
सत् नपु. प्र. ए. व.
इति म्हणून
ब्रह्मणः ब्रह्म चे ब्रह्मन् नपु. ष. ए. व.
त्रिविधः तीन प्रकारचे त्रिविध पु. प्र. ए. व.
निर्देशः निर्देश पु. प्र. ए. व.
स्मृतः म्हटले जाते स्मृ धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
तेन त्याच्या साह्याने तद् पु. तृ. ए. व.
ब्राह्मणाः ब्राह्मण पु. प्र. ब. व.
वेदाः वेद पु. प्र. ब. व.
च
यज्ञाः यज्ञ पु. प्र. ब. व.
च
पुरा पूर्वी अव्यय
विहिताः रचले गेले वि+धा धातू धारण करणे क्त प्रत्यय पु. प्र. ब. व.
ह्या अध्यायातील 23-28 श्लोकात ॐ तत् सत् चा विस्ताराने अर्थ सांगितला आहे.
8 व्या अध्यायातील 13 व्या श्लोकात ॐ ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला . ॐ, ब्रह्म प्राप्ती चा मन्त्र आहे.
ॐ, इति, एकाक्षरम्, ब्रह्म, व्याहरन्, माम्, अनुस्मरन्, सः याति, परमाम्, गतिम्।।8.13।।
देह त्याग करते वेळी जो ॐ चे स्मरण करेल त्याला परम गती प्राप्त होईल.
ॐ हे ईश्वराच्या निराकार रूपाची अभिव्यक्ति. वेदिक साहित्यात ह्याला अनाहत नाद असे म्हटले आहे.
तत् म्हणजे परमात्मा आणि सत् म्हणजे शाश्वत.
ओइमकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिन :। कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नम:॥शिव षडक्षर स्तोत्रम् । 1।।
योगी पुरुष ॐ चा नाद बिंदू सहित सतत ध्यान करतात आणि त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतात.
ओंकारो यस्य मूलम’- वेदांचा मूळ मंत्र ॐ आहे. ऋग्वेद पत्र आहे , सामवेद पुष्प आहे आणि यजुर्वेद इच्छित फळ आहे. त्याला ‘प्रणव’ असे म्हणतात. बरेचसे धार्मिक मंत्र ॐ अक्षरापासून सुरू होतात कारण ब्राह्मण, वेद आणि यज्ञ यांची सुरवात इथूनच झाली.
तत् हे सर्वनाम ना पुल्लिंगी ना स्त्रीलिंगी, हे परमात्म्याचे सूचक आहे.
सत् म्हणजे सत्य. आत्मा हेच परम सत्य. यज्ञ तप आणि दान करून जी स्थिती प्राप्त होते ते पण सत् आहे. परमात्म्याच्या प्राप्ती साठी केलेले कोणतेही कर्म सत् आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
ॐ तत् सत् ह्या त्रिविध नामांनी ज्या परमात्म्याचा उल्लेख केला आहे त्यापासूनच आदी कालात ब्राह्मण, वेद आणि यज्ञ यांची निर्मिती झाली.
--------------------------------------------------------------
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः। प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्।।17.24।।
तस्मात् ब्रह्म-वादिनाम् विधान-उक्ताः यज्ञ-दान-तपः-क्रियाः सततम् ओम् इति उदाहृत्य प्रवर्तन्ते।
तस्मात् म्हणून तद् नपु. पं. ए. वह
ब्रह्म-वादिनाम् वेद सांगणारे ब्रह्म-वादिन् पु. ष. ब. व.
विधान-उक्ताः शास्त्रात सांगितल्याप्रमाणे
विधान +वच् धातू क्त प्रत्यय स्त्री प्र. ब. व. यज्ञ-दान-तपः-क्रियाः
यज्ञ दान तपस् क्रिया स्त्री. प्र. ब. व.
सततम् नेहमी अव्यय
ओम् अव्यय
इति अव्यय
उदाहृत्य उच्चार करून उत्+आ+हृत धातू ल्यप प्रत्यय
प्रवर्तन्ते आरंभ होतात प्र +वृत् धातू कर्तरी आत्मनेपदी लट लकार प्र.पु.ब.व.
ॐ कारातील ‘अ’ या अक्षराच्या उच्चाराने ब्रह्मदेवाचे स्मरण होते. ‘उ’ या वर्णाच्या उच्चाराने श्रीविष्णूचे स्मरण होते. म् उच्चारामुळे शिवाचे स्मरण होते.
ॐ किंवा प्रणव हे सगळ्या मंत्रांचे पहले बीज अक्षर आहे. या बीजाक्षरात गणपती, शंकर, विष्णू आणि ब्रह्माचे रूप आहे.
मुंडकोपनिषदात (२.२.४) ओंकाराची प्रणव ही संज्ञा दिली आहे.
प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते।अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत् तन्मयो भवेत् ॥मुंडकोपनिषद् 2.2.4।।
ब्रह्म हे लक्ष्य असून प्रणव रूपी धनुष्य आणि आत्मा रूपी बाणाने अतिशय तन्मयतेने, एकाग्रता साधून त्याचा वेध घेतला पाहिजे.
मांडूक्योपनिषदातील ब्रह्मविद्येमधे ॐ काराचे विवेचन वाचायला मिळते.
अंतरात्म्याच्या तीन अवस्था- विश्व (जागृती) , तैजस (स्वप्न) , व प्राज्ञ (सुषुप्ती) यांची ॐ अक्षरातील 'अ' हि मात्रा म्हणजे विश्व, ‘उ’ ही मात्रा म्हणजे तेजस, ‘म् ’ ही मात्रा म्हणजे प्राज्ञ अशी तुलना केलेली आहे. अंतरात्माचे शुद्ध स्वरूप म्हणजे चतुर्थ किंवा तुरीय अवस्था,तोच अद्वैत परमात्मा.
ॐ हा वेदांचे सार आहे असे कठोपनिषदात म्हटले आहे. कोणत्याही मंत्रोच्चारापूर्वी ॐ कार लावल्याने या सर्वांची शक्ती त्या मंत्रापाठी भक्कमपणे उभी राहते, असे सांगितले जाते.
ॐ काराने निर्माण होणाऱ्या स्पंदनांचा शारीरिक व मानसिक पातळीवर चांगला परीणाम होतो असे विज्ञानाने सिद्ध होऊ लागले आहे.
जैन दर्शनमध्येही ॐ काराचे महत्त्व आणि महात्म्य अधोरेखित करण्यात आले आहे. महात्मा कबीर यांनी ॐ काराचे महत्त्व जाणून त्यावर ‘साखियां’ रचल्या आहेत.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
म्हणूनच वैदिक सिद्धांतानुसार अनुक्रमण करणारे, शास्त्र प्रतिपादीत यज्ञ, दान आणि तप ॐ काराचे उच्चारण करून आरंभित होतात.
-------------------------------------------------------------
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः। दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभि:।।17.25।।
तत् इति फलम् अनभिसन्धाय विविधाः यज्ञ-तपः-क्रियाः दान-क्रियाः च मोक्ष-काङ्क्षिभिः क्रियन्ते।
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
इति अव्यय
फलम् फल नपु. प्र. ए. व.
अनभिसन्धाय इच्छा न करता
न अभिसन्ध पु. च. ए. व.
धा धातू धारण करणे
विविधाः विविध स्त्री. प्र. ब. व.
यज्ञ-तपः-क्रियाः यज्ञ तपस् क्रिया स्त्री. प्र. ब. व.
दान-क्रियाः दान क्रिया स्त्री. प्र. ब. व.
च अव्यय
मोक्ष-काङ्क्षिभिः मोक्षाची इच्छा करणारे
मोक्ष आकाडःक्षिन् पु. तृ. ब. व.
क्रियन्ते कृ धातू कर्मणि आत्मनेपदी लट लकार प्र.पु.ब.व.
भारतीय तत्त्वज्ञान आणि धर्म ह्यामध्ये फारसा फरक नाही. तत्वज्ञान हा शब्द तत् +त्व असाच तयार होतो.
तत् म्हणजे ते, सर्वनाम.
ह्या श्लोकात ॐ तत् सत् ह्या मंत्रातील 'तत्' चा अर्थ विस्ताराने सांगितला आहे.
ज्या ज्या गोष्टींना 'ते' असे संबोधता येते ती प्रत्येक वस्तू, व्यक्ती, घटना इत्यादी म्हणजे 'तत्'. म्हणून तत् = सर्वकाही, जे अस्तित्वात आहे ते सर्व म्हणजे अखिल विश्व. 'तत्'चे सार = तत्त्व. 'तत्'चे ज्ञान ते तत्त्वज्ञान.
23 व्या श्लोकाचा संदर्भ घेऊन, तत् म्हणजे परमात्मा. जे काही यज्ञ दान आणि तप करायचे आहे ते सर्व त्याचे आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे 'तत्' चा जप करत, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता यज्ञ, दान, तप वगैरे कर्मे करत असतात.
-------------------------------------------------------------
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते । प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ 17.26॥
हे पार्थ! सत् इति एतत् सत्-भावे साधु-भावे च प्रयुज्यते, तथा प्रशस्ते कर्मणि सत् शब्दः युज्यते।
हे पार्थ!
सत् सत् नपु. प्र. ए. व.
अस् धातू असणे
सत - चांगले
सत - सत्य
इति अव्यय
एतत् हे एतद् नपु. प्र. ए. व.
सत्-भावे सद् भाव पु. स. ए. व.
साधु-भावे साधु भाव पु. स. ए. व.
साध् धातू सिद्ध करणे
च सुद्धा अव्यय
प्रयुज्यते, योजले जाते प्र+युज् धातू कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
तथा सुद्धा अव्यय
प्रशस्ते प्रमाणित प्रशस्त नपु. स. ए. व.
शंस् धातू स्तुती करणे
कर्मणि कर्मे कर्मन् नपु. स. ए. व.
सत् सत् नपु. प्र. ए. व.
शब्दः शब्द पु. प्र. ए. व.
युज्यते योजले जाते युज् धातू कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
सत् शब्दाचे अनेक अर्थ आहेत..
अस् धातू चे रूप म्हणजे असणे.
सत् म्हणजे सत्य
सत् म्हणजे चांगले
सत् परमात्म्याला म्हटले जाते.
सत्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्य। सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्नाः।।
(श्रीमद्भागवतम्-10.2.26)
सत्य ज्यांचे व्रत आहे, जे सत्यपरायण, तीनही काळात सत्य, सत्य भाव, जगाचे उद्भवस्थान, अन्तर्यामी रूपात सत्य निहीत आहे, सत्य आणि ऋत ज्यांचे नेत्र आहेत, त्या सत्य स्वरूपाला आम्ही शरण आहोत.
जो आदि, अंत आणि मध्य मध्ये आहे तो सत् आहे. कालची आपली जागृत अवस्था, त्यानंतर ची स्वप्न आणि सुषुप्तावस्था. आजची जागृत अवस्था, कालच्या सारखी नाही, पण ह्या तीनही अवस्थांचा साक्षीदार सत् आहे. तोच चैतन्य, ज्ञानस्वरूप आणि आनंदस्वरूप आहे.
भाव म्हणजे ईश्वराला जाणून घेण्याची जिवात असलेली तीव्र तळमळ. भाव म्हणजे ईश्वराप्रतीचे अतीव प्रेम, जवळीक आणि शरणागती यांच्या संगमातून अंतःकरणात निर्माण झालेला ओलावा.
सतां प्रसङ्गान्मम वीर्यसंविदो
भवन्ति हृत्कर्णरसायना: कथा: ।
तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि
श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति ॥श्रीमद्भागवतम् 3.25.25 ॥
शुद्ध भक्तांच्या संगतीत श्रीभगवानांच्या लिला आणि त्यांच्या महिमांची चर्चा कानाला आणि अंतःकरणाला अतीशय रोमांचित करतात. असे ज्ञान मिळवून मनुष्य हळूहळू मोक्षमार्गावर चालत राहतो, मुक्ती मिळवतो. त्याच्या मधील लालसा संपुष्टात येतात आणि खर्या अर्थाने तो भक्तियोग अवलंबतो.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे पार्थ! सद्भाव आणि साधु-भाव ह्या साठी सत् असा शब्द वापरला जातो. तसेच प्रशंसनीय कर्म केले असता त्याला सुद्धा सत् असे म्हटले जाते.
------------------------------------------------------------
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते।कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते।।17.27।।
यज्ञे तपसि च दाने च स्थितिः एव सत् इति उच्यते। तत्-अर्थीयम् कर्म एव च सत् इति अभिधीयते।
यज्ञे यज्ञामध्ये यज्ञ पु. स. ए. व.
तपसि तप मध्ये तपस् नपु. स. ए. व.
च सुद्धा अव्यय
दाने दाना मधे दान नपु. स. ए. व.
च सुद्धा अव्यय
स्थितिः निष्ठा स्थिति स्त्री. प्र. ए. व.
एव आणि अव्यय
सत् सत् नपु. प्र. ए. व.
इति म्हणून अव्यय
उच्यते म्हटले जाते वच् धातू कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
तत्-अर्थीयम् त्या अर्थाने
तद् अर्थीय नपु. प्र. ए. व.
कर्म कर्मन् नपु. प्र. ए. व.
एव सुद्धा अव्यय
च आणि अव्यय
सत् सत् नपु. प्र. ए. व.
इति असे अव्यय
अभिधीयते म्हटले जाते अभि+धा धातू कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
आधीच्या अध्यायात सत् - कर्म चा उल्लेख आला आहे.
कर्म-सिद्धांत च्या कल्पना भारतीयांच्या मनात अगदी खोलवर रूतलेल्या आहेत. पेराल तसेच उगवते ह्या उक्तीप्रमाणे, कर्म आणि मोक्ष यांचा अजोड संबंध आहे. आपण जसे कर्म करतो त्या प्रमाणे आपल्याला त्याची फळे मिळतातच हे जरी सिद्ध करता आले नाही तरी समाजात आपल्याला बरीच विषमता दिसून येते. दुर्दैवाच्या फेर्याने हतबल झालेली व्यक्ती आपल्या कर्माला दोष देण्यास प्रवृत्त होते. ह्याच बरोबर पुनर्जन्मावर सुद्धा आपला गाढ विश्वास आहे. आत्मा अमर आहे हे भगवद्गीतेत सांगितले आहेच. कर्मयोगामधे कर्म करत रहा पण त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नये असे म्हटले आहे. जन्म मरणाच्या चक्रातून सुटका हवी असल्यास कर्म बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे असे आपण मानतो.
आतापर्यंत आपण ॐ तत् सत् चा अर्थ समजून घेतला तसेच सद्भाव आणि साधु भाव ह्यांचा अर्थ समजून घेतला. आता ह्या श्लोकात सत् कर्म चा अर्थ सांगितला आहे.
रूढ अर्थाने दोन प्रकारची कर्मे आहेत. लौकिक आणि परमार्थिक. आपल्या कर्माच्या श्रेयाची अपेक्षा न ठेवता केवळ ती कर्मे परमेश्वरासाठीच केली जात आहेत अशी श्रद्धा आणि विश्वास असेल तर ते सत् कर्म होय. ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या चरीत्रातील सुप्रसिध्द वाक्य आठवते. 'ही तर श्रींची इच्छा' अशा श्रद्धेने ते काम करत राहिले म्हणून युगपुरुष म्हणून ओळखले गेले.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
यज्ञ तप आणि दान क्रिया ज्या निष्ठेने केल्या जातात त्यांना सत् म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केले जाणारे कर्म सुद्धा सत् असे ओळखले जाते.
------------------------------------------------------------
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्। असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह।।17.28।।
हे पार्थ ! अश्रद्धया हुतम्, दत्तम्, तप्तम् तपः, यत् च कृतम्, तत् असत् इति उच्यते; नो इह न च प्रेत्य ।
हे पार्थ !
अश्रद्धया श्रद्धेविना
न श्रद्धा स्त्री तृ ए. व.
हुतम्, हवन हु धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
दत्तम्, दिलेले दान दा धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तप्तम् संपन्न तप्त तप धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तपः, तपस् नपु. प्र. ए. व.
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
च सुद्धा अव्यय
कृतम्, केलेले कृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. प्र. ए. व.
असत् असत्य नपु. प्र. ए. व.
इति असे अव्यय
उच्यते म्हणतात वच् धातू कर्मणि आत्मनेपदी लट लकार प्र. पु. ए. व.
नो न अव्यय
इह हे अव्यय
न नाही अव्यय
च सुद्धा अव्यय
प्रेत्य मृत्यू नंतर प्र+इ धातू ल्यप प्रत्यय
ह्या अध्यायातील 3र्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे श्रद्धाभाव सर्व व्यक्तींमधे असतो, फक्त त्याचे प्रकार निरनिराळे आहेत.
श्रत् (म्हणजे सत्य) या नामाला धा (धारण करणे ) हा धातू जोडून ‘ श्रद्धा ’ हा शब्द तयार होतो. त्याचा व्युत्पत्यर्थ जिच्यात सत्य ठेवलेले असते ती (श्रत् सत्यम् । तत् सत्यमस्यां धीयते सा श्रद्धा । दुर्गाचार्य.
परमेश्वराचे अस्तित्व न मानणे ही पण एक श्रद्धाच आहे. मात्र भगवद्गीतेमधे श्रीभगवानकृष्णांनी माझ्यावर विश्वास ठेव असे वारंवार सांगितले आहे.
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति।।4.39।।
श्रद्धावान्, तत्पर और जितेन्द्रिय पुरुष ज्ञान प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याला लगेच परम शान्ति प्राप्त होते.
अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ 9.3 ॥
जे लोक माझी श्रद्धापूर्वक भक्ती करत नाहीत, ते मला प्राप्त होत नाहीत. ते ह्या भौतिक जगात जन्म-मृत्युच्या मार्गावर परत परत येत राहतात. अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।4.40।
अज्ञानी श्रद्धारहित आणि संशयी पुरुष नष्ट होतात. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये असुर शब्दाचा अर्थ अज्ञानी (परमेश्वराला न जाणणारा) घमंडी असा घेतला आहे असे वाटते. आसुरी स्वभावाची माणसे मला शरण येत नाहीत असे 7व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात म्हटले आहे. राक्षसी आणि असुरी शक्तींचा उल्लेख 9व्या अध्यायातील 12 व्या श्लोकात सुद्धा आलेला आहे.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
हे पार्थ! जो यज्ञ, जे दान, जे तप आणि जे कर्म श्रद्धेशिवाय केले जाते, त्याला असत् असे म्हणतात. ते न ह्या जगात (जिवंतपणी) आणि न मृत्यू पश्चात लाभदायक असते.
----------------------------🙏🙏🙏🙏 - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -