'श्रवण' चा अर्थ
श्रीमद्भगवद्गीतेत तीन महत्त्वाचे योग सांगितले आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग. सगुण साकार रूपाची भक्ती करता करता आपल्याला भगवंताचे निर्गुण निराकार रूप समजून घ्यायचे आहे. त्यासाठी ज्ञान प्राप्ती हाच एक मार्ग. ज्ञान प्राप्ती कशी करायची ह्याचे मार्गदर्शन आपल्याला वेदांतात वाचता येते. श्रवण, मनन आणि निदिध्यासन अशी ती त्रिसूत्री. सदानंद योगेंद्र सरस्वती यांनी वेदान्तसार या ग्रंथात श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे ज्ञानमार्गाचे भाग आहेत असे स्पष्ट केले आहे. या तिन्हीच्या माध्यमातून ब्रह्मसाक्षात्कार शक्य होतो. ऋषी याज्ञवल्क्य यांनी त्यांच्या पत्नी मैत्रेयीला श्रवण , मनन आणि निदिध्यासन या साधना पद्धतीची वाच्यता केली आहे.
श्रवणादिभिरुद्दीप्तज्ञानाग्निपरितापिताः।
जीवस्सर्वमलान्मुक्तस्स्वर्णवद्द्योतते स्वयम् ।।आत्मबोध 66।।
आदि शंकराचार्य असे म्हणतात की साधक जेव्हा श्रवण (गुरु कडून ऐकणे ), मनन (तर्क-विचार द्वारे दृढ़ता )आणि निदिध्यासन (गहन विचार ) ह्या साधनां द्वारे आत्मज्ञान चा अग्नी प्रज्वलित करतात, तेव्हा ते स्वयं, सोन्यासारखे झळाळतात.
ऋषींनी हि त्रिसूत्री अतिशय विचारपूर्वक रचली आहे. हि तीन सूत्रे आपल्या आधुनिक काळातील अध्ययन पद्धतीशी सुसंगत आहेत का? या प्रश्नाचा उहापोह खालील लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लिहीताना संशोधकाची अभ्यास क्रिया डोळ्यासमोर ठेवली आहे.
मध्यंतरी 'दण्डक्रम पारायण' संबंधी बातमी वाचनात आली होती. इथे विशेष नमूद करावेसे वाटते की त्रिसूत्री मध्ये पाठांतराचा उल्लेख केलेला नाही.
'अर्थेविण पाठांतर कासया करावें । व्यर्थचि मरावे घोकूनियां ॥' असे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवले आहे.
सध्याच्या काळातील शिक्षण पद्धती बघता केवळ पाठांतर करून परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा पर्याय निवड असेच काहीसे स्वरूप दिसून येते. म्हणूनच वैदिक काळातील अध्ययन पद्धत जाणून घ्यायला हवी.
वेदान्तात ब्रह्मतत्वाला जाणून घेणे हेच ज्ञानप्राप्तीचे लक्ष्य. ब्रह्मतत्वाची तुलना इतर कोणत्याही ज्ञानाशी होऊ शकत नाही, एवढाच काय तो आधुनिक शास्त्रांमध्ये फरक. कर्मयोगी ने आपले काम मनापासून करायचे आहे, म्हणजे ते योग्य प्रकारे होण्यासाठी अभ्यास आवश्यकच. म्हणून उपनिषदात सांगितलेल्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गाचे आपण अनुकरण करू शकतो का ते शोधण्याचा हा छोटासा प्रयत्न.
श्रवण म्हणजे ऐकणे हा झाला ढोबळ अर्थ. (आपण वाचणे असे काळानुरूप म्हणायला हरकत नाही). आपल्या मुखातून बाहेर पडलेले ध्वनी समजून घेऊन, त्याला प्रतिसाद देण्याची कृती ज्यामुळे निर्माण होते, ते म्हणजे श्रवण कौशल्य.
भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे उपनिषदातील रहस्य जाणून घेण्यासाठी गुरुंकडून शिष्यांना मिळालेले उपदेश म्हणजे श्रवण.
समर्थांनी श्रवणाचे अतिशय मार्मिक वर्णन केले आहे.
श्रोते पुसती कोण ग्रंथ। काय बोलिलें जी येथ। श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ 1.1.1॥
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ 1.1.28॥
श्रवणाने तत्काळ क्रिया पालटते आणि संशयाची मुळे नष्ट होतात.
रोज व्यायाम केला पाहिजे हे फक्त ऐकून सोडून न देता तात्काळ त्याची अमलबजावणी करायची म्हणजे 'श्रवण'.
अर्थबोध न होता केलेले श्रवण समर्थांना मान्य नाही. अर्थ न जाणून घेता जे एखाद्या ग्रंथाचे नुसते श्रवण करतात, त्यांना समर्थांनी ‘मनुष्यवेशधारी पाषाण’ म्हटले आहे. समर्थ दासबोधात सांगतात की,
अर्थांतर पाहिल्यावीण। उगेेंचि करी जो श्रवण।
तो श्रोता नव्हे पाषाण। मनुष्यवेषें॥ 8. 6.7।।
थोडक्यात अभ्यासपूर्ण श्रवण करून आपण आपल्या विचारात आणि कृती मध्ये बदल घडवून आणणे अत्यावश्यक. श्रवणाची हिच फलश्रुती अपेक्षित आहे. श्रवणामुळे जर आपल्या वर्तनात अमूलाग्र बदल घडणार असेल तर आपण केलेले श्रवण तितकेच दर्जेदार असले पाहिजे.
तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ ज्ञानेश्वरी 9.1॥
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, – अहो श्रोते हो! तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका.
श्रवण प्रक्रियेचे विविध टप्पे, विविध प्रकार, विविध पैलू
म्हणजे षड्लिड्ग. लिंग म्हणजे ओळख. सहा बिंदूंच्या साह्याने श्रवण प्रकाराचे वर्णन केलेले दिसते. त्या संदर्भातील मंत्र पुढीलप्रमाणे
श्रवणं नाम षड्विध-लिङ्गैः अशेष-वेदान्तानाम् अद्वितीय-वस्तुनि तात्पर्य-अवधारणम्।।वेदांत सार। 182।।
सहा प्रकार च्या लिङ्गां (लक्षणे किंवा चिह्ने ) द्वारे सम्पूर्ण वेदान्ताचे तात्पर्य (लक्ष्य) अद्वितीय वस्तु (ब्रह्म) आहे. अशी धारणा असणे म्हणजे ‘श्रवण'.
वर उल्लेख केलेली सहा लक्षणे पुढीलप्रमाणे
1.उपक्रम-उपसंहार, 2.अभ्यास, 3.अपूर्वता,
4.फल, 5.अर्थवाद, 6.उपपत्ति
ह्या सहा पैलूंची आपण तोंड ओळख करून घेऊ.
उपक्रम - उपसंहार (एकवाक्यता) उप' (जवळ) आणि 'क्रम' (मांडणी/सुरुवात) यांपासून तयार झालेला शब्द , ज्याचा अर्थ एखाद्या चांगल्या विषयाची सुरुवात, प्रारंभिक विधान.
’उप+संहार, संहार चा शब्दशः अर्थ ठार मारणे असा नसून शेवट करणे.
उपक्रम आणि उपसंहार ह्या दोन्ही मध्ये एकवाक्यता असावी. म्हणजे ज्या विषयाची सुरुवात केली आहे त्याला सुसंगत असाच शेवट असला पाहिजे. म्हणजे ज्या विषयाचा उहापोह करायचा आहे, फक्त त्याच विषयावर आख्यान करायचे.
'अभ्यास'
अभि' जवळ, पुन्हा, च्या दिशेने. 'अस्' धातु म्हणजे असणे, राहणे, असणे.
'अभ्यास' म्हणजे 'एखाद्या गोष्टीच्या जवळ जाणे', 'वारंवार करणे'.
एखाद्या गोष्टीत कुशलता मिळविण्यासाठी ते काम वारंवार करणे. मराठीत कच्चे मडके ठोकून ठोकून पक्के करणे असा शब्दप्रयोग आहे. छान्दोग्योपनिषदातील 'तत्वमसि' हे महावाक्य उद्दालक ऋषींनी आपला पुत्र आणि शिष्य श्वेतकेतु यांस एकूण 9 वेळा सांगितले. श्रीभगवानकृष्णांनी अर्जुनास 'युद्ध कर ' असे सांगताना 18 अध्यायात एकूण 700 श्लोक सांगितले.
अपूर्व
'अ' (नाही) आणि 'पूर्व' (आधीचे) मिळून 'अपूर्व' (आधी न झालेले) हा अर्थ तयार होतो.
पूर्वी कधीही न पाहिलेले', 'अद्वितीय', 'अनोखे', किंवा 'असामान्य'
पुन्हा पुन्हा अभ्यास केल्यानंतर पूर्वी नसलेल्या ज्ञानाची अपूर्व प्राप्ती. ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत अपूर्वता ही अपरिहार्य अवस्था असली तरी हि स्थिती एखाद्या संशोधकाच्या कामाला सुद्धा लागू पडेल.
फल
फल म्हणजे श्रवण प्रक्रियेचे प्रयोजन. फल' म्हणजे त्या शास्त्राच्या अभ्यासातून मिळणारा अंतिम लाभ किंवा अनुभव. आपल्या अध्ययनाचा, संशोधनाचा हेतू अपेक्षित फलप्राप्ती ने साध्य झाला पाहिजे.
अर्थवाद
भारतीय दर्शनशास्त्र नुसार अर्थवाद म्हणजे
प्रशंसा, स्तुति, एखाद्या विषयाला धरून दिलेला दुजोरा, एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी दिलेले प्रमाण.
न्याय दर्शन च्या अनुसार अर्थवाद चार प्रकारचे आहेत. स्तुति, निंदा, परकृति आणि पुराकल्प.
स्तुती करताना एखादे उदाहरण द्यायचे जसे सूर्यासारखा तेजस्वी.
थोडक्यात मूळ विषयाला अनुसरून सुसंगत उदाहरणे देऊन त्या विषयाला अधोरेखित करायचे.
उपपत्ति
श्रवण प्रक्रियेतील शेवट चा टप्पा म्हणजे ह्या नंतर मनन ची प्रक्रिया सुरू होणार आहे. आपण जे ऐकले आहे त्या बद्दल आता आत्मविश्वास निर्माण झाला आहे आणि त्यावर मनन करायचे आहे.
प्रकरण प्रतिपाद्यार्थसाधने तत्र तत्र श्रूयमाणा युक्तिः उपपत्तिः।।
युक्ती म्हणजे तर्क किंवा हेतू. एखादा विषय समजून घेण्यासाठी सांगितलेले तर्क म्हणजे उपपत्ती. आपल्या रोजच्या व्यवहारातील दृष्टांत देऊन विषय समजावून सांगणे म्हणजे उपपत्ती.
एखादा विषय जर मुळापासून समजून घ्यायचा असेल तर आपणही साधारण वर दिलेल्या पद्धतींचा असाच अवलंब करत असतो. जे संशोधक आपला प्रबंध सादर करतात ते साधारण ह्याच पद्धतीने लिहितात . मंडळी, सहमत आहात का?
इति अनघा
---------------🙏🙏----------------------