बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

त्वमेव माता च पिता त्वमेव

 आधी श्लोकाचे व्याकरणानुसार विश्लेषण करू. 

उपेन्द्रवज् छंदातील या श्लोकाचा उल्लेख पांडव गीतेत (28) सापडतो.  गांधारीने, भगवान श्रीकृष्णांची प्रशंसा करताना असे म्हटल आहे. 

त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव। त्वमेव विद्या च द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवः।।

त्वमेव माता च पिता त्वमेव,

त्वमेव त्वम्+एव

त्वम् तू युष्मद् सर्वनाम प्रथमा एक वचन 

एव च (तूच) अव्यय

माता मातृ ऋकारान्त स्त्री. प्रथमा एक वचन 

मा धातू मोजणी करणे +तृच् प्रत्यय (देणारा /देणारी) 

जीवाला मोजमाप देणारी 

च सुद्धा अव्यय 

पिता पितृ ऋकारान्त पुल्लिंग प्रथमा एक वचन 

पा धातू पालन करणे +तृच् प्रत्यय 

जीवाचे पालन करणारा 

बन्धुश्च बन्धुः +च 

बन्धु पु. प्र.ए. व. 

बन्ध् धातू बन्धन असणे +उ प्रत्यय 

सखा साथ देणारा सखि पु. प्र. ए. व. 

ख्या धातू सखि समान ख्यायते इति 

ह्याचे स्त्रीलिंगी रूप सखी (प्रथमा एक वचन) 

विद्या स्त्री. प्र. ए. व. 

विद् धातू जाणणे +यत् प्रत्यय (यदन्त) जाणून घेण्याजोगे 

द्रविणम् (द्रविणस्) धन (धन जे चलित स्वरूपात आहे जंगम मालमत्ता 

द्रविण नपु. प्र. ए. व.

द्रु धातू वाहणे +त् प्रत्यय

द्रुत गतीने जाणे 

द्रुपद ही महाभारतातील व्यक्तिरेखा अती गतीशील म्हणजेच अस्थिरता दर्शवते. 

सर्वं सर्व नपु. प्र. ए. व. 

मम माझे अस्मद् ष. ए. व. 

देव देवः हे दोन शब्द जोडून लिहिलेले की एकत्र आहेत? जेव्हा दोन शब्दांची संधी झालेली नसते पण ते एकत्र आलेले दिसतात त्याला समास (सम+आस) असे म्हणतात. याचे विग्रह वाक्य मांडणे आवश्यक ठरते.

देवानाम् देवः म्हणजे देवांचा देव असा अर्थ लिहीता येईल.

देवः देव पु. प्र. ए. व. 

दिव् धातू उजेड देणे.

आपण सर्व शब्दांचे रूढार्थाने अर्थ समजावून घेतले. आता प्रश्न असा आहे की गांधारी श्रीभगवानकृष्णांना तुम्ही चलन किंवा चलित धन आहात असे का बरे म्हणाली असेल? गांधारीला अशी मध्येच संपत्तीची आठवण का बरे यावी? 

त्याचा मला समजलेला अर्थ असा..

सर्व प्रथम श्रीभगवानकृष्णांनी श्रीमद्भगवद्गीतेत स्वतःबद्दल वर्णन केलेले श्लोक आपण समजून घ्यायला हवे.

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥18.61॥

ईश्वर सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत आणि सर्वांचे मार्गदर्शक आहेत. तसेच 10 व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात अर्जुनाने 

भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ।(सर्व सजीवांचे उद्गम, स्वामी, देवांचे देव आणि ब्रह्मांड नायक) असे वर्णन केले आहे.

गांधार देशातून हस्तिनापुरात आलेली गांधारी आपले पुढील आयुष्यात राजा धृतराष्ट्रांवरच्या रागापोटी डोळे पट्टीने बांधून जगते.

आयुष्यात काहीच शाश्वत नाही, सर्वकाही प्रवाही झाले आहे. आपले आईवडील, सख्या सर्वजण गांधार प्रदेशात मागे राहिले . 100 पुत्र झाले पण ते सुद्धा जीवंत राहिले नाहीत. कपटी असला तरी सख्खा भाऊ शकुनी सुद्धा राहीला नाही. युद्ध टाळण्याचे किती प्रयत्न झाले, आणि ते कोणीकोणी केले? द्रोणाचार्य आणि विदुरा सारखे विद्वान ते सुद्धा राजाज्ञे पुढे हतबल झाले. त्यांची विद्या सुद्धा मूक झाली. फक्त कृष्णनीती टिकून राहीली.

सर्व काही गमावले आहे. आणि आता फक्त श्रीभगवानकृष्णांचाच आधार आहे. तोच आता मार्ग दाखवणार आहे. म्हणून गांधारी आता श्रीभगवानकृष्णांना असे म्हणते आहे की 

तूच माता, तूच पिता, तूच बंधू तूच सखा, तूच विद्या आणि तूच न टिकणारी संपत्ती, आणि सर्व देवांच्या देवा तूच माझा देव (मार्ग दाखवणारा) आहेस.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा