।। श्री।।
4थ्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात अर्जुनाला श्रीभगवानकृष्णांनी ऊठ आणि युद्ध करण्यास सिद्ध हो असे सांगितले. अर्जुन उठला तर नाही पण त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. 5व्या अध्यायाची सुरवात त्या प्रश्नापासून होत आहे.
कर्म संन्यास योग हे गीतेच्या पाचव्या अध्यायाचे नाव असून त्यात 29 श्लोक आहेत. ह्यात अर्जुन श्रीकृष्णाला कर्मयोग आणि ज्ञान योग ह्या दोन्हीतील फरक विचारत आहे, त्यावर श्रीकृष्णांचे उत्तर आपण ह्या अध्यायात वाचू.
संन्न्यासम् कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि। यच्छ्रेय एतयोरेकम् तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ।।5.1।।
अर्जुन उवाच - हे कृष्ण कर्मणाम सन्न्यासम पुनः योगम् च शंससि ; एतयोः यत् एकम् श्रेयः तत् मे सुनिश्चितम् ब्रूहि ।
अर्जुन उवाच -
हे कृष्ण!
कर्मणाम् कर्मांचा कर्मन् नपु. ष. ब. व.
सन्न्यासम् त्याग सन्न्यास पु. द्वि. ए. व.
पुनः अव्यय
योगम् कर्मयोगाची योग पु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
शंससि प्रशंसा शंस् धातू कर्तरि लट लकार म. पु. ए. व.
एतयोः ह्या दोन्ही 8एतद् पु. ष. द्वि. व.
यत् जे यद् नपु. प्र. ए. व.
एकम् एक नपु. प्र. ए. व.
श्रेयः कल्याणकारी श्रेय नपु. प्र. ए. व.
तत् ते तद् नपु. द्वि. ए. व.
मे माझ्यासाठी अस्मद् ष. ए. व.
सुनिश्चितम् खात्रीलायक सुनिश्चित नपु. प्र. ए. व.
ब्रूहि सांगावे ब्रू धातू कर्तरि लोट लकार म. पु. ए. व.
अर्जुनाने एकूण 16 प्रश्न श्रीभगवानकृष्णांना विचारले त्यापैकी हा 5वा प्रश्न. कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मोक्ष दायी आहेत, पण कर्मसंन्यासापेक्षा कर्म योगाची श्रेष्ठता वर्णन केली आहे. कर्मत्याग करणे हे सुद्धा एक कर्मच. 4.33 व्या श्लोकात आपण ज्ञानयोगाबद्दल वाचले. कोणतेही कर्म ज्ञानाशिवाय करणे म्हणजे निव्वळ देखावा. ज्ञानयज्ञ म्हणजे आत्मज्ञान. ज्ञानामुळेच नैष्कर्म्यं येते. विद्या विनयेन शोभते हे आपल्याला माहित आहेच. 4.40 व्या श्लोकात श्रद्धायुक्त राहून कर्म करण्यास सांगितले आहे. श्रत् म्हणजे सत्य तर धा म्हणजे धारण करणे. . सत्याकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धेच्या विरुद्ध शंका आहे. ज्याच्या मनात शंका आहे तो सत्यापर्यंत जाऊ शकत नाही. ज्या ठिकाणी श्रद्धा पक्की असते त्या ठिकाणी संशयाला स्थान नसते. पण श्रद्धायुक्त असण्यासाठी ज्ञान हवेच.
रामचरितमानसच्या मंगलाचरण बालकांडातील दुसऱ्या श्लोकात असे म्हणतात
भवानी-शंकरौ वन्दे श्रद्धा-विश्वास रूपिणौ ।
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा: स्वान्त:स्थमीश्वरम् ।
महादेव आणि पार्वती यांच्यामध्ये शिवजी वक्ता असून ते अनुभवी आहेत आणि पार्वती श्रद्धावान आहे; ती श्रोता आहेत. संवाद होण्यासाठी वक्ता अनुभवी असावा आणि श्रोता श्रद्धावान असायला हवा. गुरूवर पूर्ण विश्वास हवा. श्रद्धा गुरू आहे आणि विश्वास शिष्य आहे.
शंकराचार्य म्हणतात -
शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धिवाधारणम्।
सा श्रद्धा श्रद्धा सदाभिर्यया वस्तुपलभ्यते ॥
धर्मग्रंथ आणि गुरू जे उपदेश करतात ते खंबीर निर्णयाने स्वीकारणे, यालाच ऋषीमुनींची श्रद्धा म्हणतात, ज्यातून वास्तवाची जाणीव होते.
ह्या श्लोकात अर्जुनाला श्रीभगवानकृष्णांच्या वक्तव्यावर शंका उपस्थित झाली आहे.
अर्जुन ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांना असे विचारत आहे की
हे कृष्ण! आपण कर्मसंन्यास आणि कर्मयोग ह्यांची वाखाणणी केली, ह्या दोन्ही मध्ये माझ्यासाठी नक्की काय श्रेयस्कर ठरेल ते कृपया सांगावे.
श्री भगवानुवाच
सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ।
तयोस्तु कर्मसंन्यासत्कर्मयोगो विशिष्यते।।5.2।।
श्रीभगवानुवाच - संन्न्यासः कर्म-योगः च उभौ निःश्रेयसकरौ; तयोः तु कर्म-संन्न्यासात् कर्म-योगः विशिष्यते।
श्रीभगवानुवाच -
संन्न्यासः सांख्ययोग संन्न्यास पु. प्र. ए. व.
कर्म-योगः कर्म-योग पु. प्र. ए. व.
च सुद्धा अव्यय
उभौ दोन्हीही उभ पु. प्र. द्वि. व.
निःश्रेयसकरौ असंदिग्ध कल्याणकारी निःश्रेयसकर पु. प्र. द्वि. व.
तयोः दोन्हींचे तद् पु. ष. द्वि. व.
तु परन्तु अव्यय
कर्म-संन्न्यासात् सांख्ययोगपेक्षा कर्म-संन्न्यास पु. पं. ए. व.
कर्म-योगः कर्म-योग पु. प्र. ए. व.
विशिष्यते श्रेष्ठ आहे वि+शाष् धातू भले करणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
पहिल्या श्लोकात अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता त्याचे अपेक्षित उत्तर हेच की अज्ञानी पुरूषाने कर्म केव्हा करावे आणि कर्मत्याग केव्हा करावा ह्या संबंधी चे विवेचन. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली ती अविरत बहरत जावी ह्या हेतूनेच. म्हणजे माणसांनी कर्म करणे अपेक्षित आहेच. त्यामुळे सर्वांनाच पडलेला प्रश्न, अशी कोणती युक्ती वापरावी ज्यामुळे कर्म केले असता पाप लागणार नाही आणि कर्म पूर्तता सुद्धा होईल? ह्याचे उत्तर या अध्यायात मिळावे.
काही संदर्भग्रंथात कर्मसंन्यास म्हणजे सांख्य योग असे म्हटले आहे. कारण सांख्य म्हणजे ज्ञान योग. पुरूष आणि प्रकृति ह्यामधील फरक सांगणारा. प्रकृती ची पाच मूलतत्त्वे समजावून सांगणारा योग. मन,अहंकार आणि बुद्धि ह्या सूक्ष्मतत्वांचे वेगळेपण स्पष्ट करून सांगणारा योग. 2र्या अध्यायातील काही श्लोकात आत्म्याची वैशिष्ट्ये सांगताना सांख्ययोगाचे सूतोवाच केले आहेच. 4.41 व्या श्लोकात ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ज्ञान मिळवणे हे सुद्धा कर्मच.
म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही निःसंशय परम कल्याणकारी आहेत मात्र कर्मसंन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ.
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति। निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात्प्रमुच्यते।।5.3।।
महाबाहो! यः न द्वेष्टि, न काङ्क्षति, सः नित्य- संन्न्यासी ज्ञेयः; हि निर्द्वन्द्वः सः सुखम् बन्धात् प्रमुच्यते।
महाबाहो!
यः जो यद् पु. प्र. ए. व.
न अव्यय
द्वेष्टि द्वेष करतो द्विष् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
न अव्यय
काङ्क्षति, इच्छा आकांक्षा ठेवतो काङ्क्ष धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
नित्य- संन्न्यासी सर्व काळ संन्यासी
नित्य- संन्न्यासिन् पु. प्र. ए. व.
ज्ञेयः समजण्यायोग्य ज्ञेय ज्ञा धातू यत् प्रत्यय पु. प्र. ए. व.
हि कारण
निर्द्वन्द्वः द्वन्द्व रहित निर्द्वन्द्व पु. प्र. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
सुखम् अव्यय
बन्धात् बन्धनातून बन्ध पु. पं. ए. व.
प्रमुच्यते मुक्त होतात प्र+मुच् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
दोन प्रकारचे लोक आपल्याला पहायला मिळतात. काही जण स्वेच्छेने संन्यासी होतात, कुठेतरी एकांतात बसून तप करतात. आयुष्यातील सर्व बंधने त्यांनी तोडून टाकलेली असतात. दुसर्या प्रकाराचे लोक संसारात राहून फक्त दुसर्यांसाठी जगतात. त्यांच्या स्वतःच्या अशा इच्छा आकांक्षा काहीच नसतात. म्हणजे एक प्रकारचे संन्यासीच ते. संन्यासी ह्या शब्दाचा अर्थ येथे सांगितला आहे. तो कर्माचा त्याग नसून आपल्या आवडीनिवडींचा त्याग. समत्व ह्या गुणाचे विस्तृत वर्णन 12 व्या अध्यायात सांगितले आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आचरणात आणावे असा हा श्लोक.अपेक्षाभंगाचे परीणाम टाळण्यासाठी उपयुक्त असा उपदेश. समत्व दृष्टि तेव्हाच आपल्यामध्ये येते जेव्हा आपल्याला यश अपयश यांची अपरिहार्यता समजते. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की
जो पुरुष कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणतीही इच्छाआकांक्षा ठेवत नाही तो नेहमीच कर्मयोगी संन्यासी होय. असा द्वन्द्व रहीत सहजच बन्धन मुक्त होतो.
सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः।
एकमप्यस्थितः सम्यगुभ्योर्विन्दते फलम्।।5.4।।
साङ्ख्य-योगौ पृथक् बालाः प्रवादन्ति न पण्डिताः । एकम् अपि सम्यक् आस्थितः उभयोः फलम् विन्दते ।
साङ्ख्य-योगौ कर्मसंन्यास आणि कर्मयोग
साङ्ख्य-योग पु. प्र. द्वि. व.
पृथक् पृथक्करण करणारे अव्यय
बालाः बालबुद्धि बाल पु. प्र. ब. व.
प्रवादन्ति म्हणतात प्र +वद् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.
न अव्यय
पण्डिताः ज्ञानी पण्डित पु. प्र. ब. व.
एकम् एक नपु. प्र. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
सम्यक् पूर्णतः अव्यय
आस्थितः स्थित आडः+स्था धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
उभयोः दोन्हीची उभ पु. ष. द्वि. व.
फलम् फल नपु. द्वि . ए. व.
विन्दते प्राप्त होते विद् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
भौतिक जगाचे विश्लेषण करून त्याचे मूळ शोधण्याचा अभ्यास म्हणजे सांख्य. दुसर्या श्लोकात कर्मसंन्यास ह्या शब्दाचा वापर केला होता त्यालाच आता सांख्ययोग असे संबोधले आहे. कर्मसंन्यास दोन प्रकारचे असतात. आयुष्यात आलेल्या संकटांना तोंड देण्यास असमर्थ ठरल्या ने पलायनवादी मनोवृत्तीने सर्व गोष्टींकडे पाठ फिरवणे म्हणजे कर्मत्याग. यालाच फल्गु वैराग्य असे म्हटले जाते. त्या उलट युक्त वैराग्य म्हणजे सर्व काही समजून उमजून, परमेश्वराला शरण जाऊन, सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करणारे कर्मयोगी.
गृहित्वापिन्द्रियैरार्थन्यो न द्वेष्टि न हृष्यति।
विष्णुमायामिदं पश्यन्स वै भागवतोत्तम: ॥ श्रीमदभागवतम् 11.2.48॥
संसारात राहून सुद्धा जो निःस्पृहःतेने ईश्वराची शक्ती ओळखून काम करत राहतो तो परम भक्त असतो.
ज्ञानमार्ग, सर्व त्याग करून ज्ञान आणि कर्ममार्ग, कर्तृत्वभोक्तृत्वाचा त्याग करून केलेले कर्म यांची फले निरनिराळी असे ज्ञानी पुरुष कधीच म्हणत नाहीत.
देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा ।
तैसें ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो ॥ज्ञानेश्वरी 30॥
आकाश आणि पोकळी यांच्यामधे ज्याप्रमाणे भिन्नता नाही त्याप्रमाणे कर्मयोग व आणि सांख्ययोग यांची एकता असते.
तयासींचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।
जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण ॥ज्ञानेश्वरी 31॥
ज्याला सांख्य व कर्मयोग अभिन्नतेने पटले त्यालाच जग समजले , ज्ञानप्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले.
योग वशिष्ठ ग्रंथात 'वैराग्य-प्रकरण' मध्ये वैराग्यची लक्षणे विस्ताराने वाचायला मिळतात. भर्तृहरिंचे वैराग्यावर 100 श्लोक वैराग्यशतकम् सर्वांनाच माहीत आहे.
कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही चा हेतू एकच, लक्ष्य एकच.
म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की
बालबुद्धिचे लोक सांख्य आणि कर्मयोग वेगळे समजतात, ज्ञानी पुरुष नाही. कोणत्याही योग चा पुरस्कार केला असता दोन्हीचे फलीत सारखेच प्राप्त होते.
यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्यैरपि गम्यते। एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति।।5.5।।
सङ्ख्यैः यत् स्थानम् प्राप्यते , तत् योगैः अपि गम्यते ; यः साङ्ख्यम् योगम् च एकम् पश्यति, स पश्यति।
साङ्ख्यैः ज्ञान योगाने साड्ःख्य नपु. तृ. ए. व.
यत् जे यद् नपु. द्वि. ए. व.
स्थानम् परमस्थान स्थान नपु. द्वि. ए. व.
प्राप्यते प्राप्त होते प्र+आप कर्मणि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
तत् ते तद् नपु प्र. ए. व.
योगैः कर्मयोगाने योग पु. तृ. ब. व.
अपि सुद्धा अव्यय
गम्यते प्राप्त केले जाते गम् धातू कर्मणि लट लकार प्र. पु. ए. व.
यः जो यद् पु. प्र. ए. व.
साङ्ख्यम् सांख्ययोग साङ्ख्य नपु. द्वि. ए. व.
योगम् कर्मयोग योग पु. द्वि. ए. व.
च सुद्धा अव्यय
एकम् एक पु. द्वि. ए. व.
पश्यति पाहतो दृश् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
सः जो तद् पु. प्र. ए. व.
पश्यति पाहतो दृश् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
ह्या श्लोकात महर्षी व्यासांनी यः पश्यति स पश्यति अशी सुंदर शब्दरचना केली आहे. थोडक्यात डोळसपणे जो पाहतो त्यालाच दिसते.
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः॥ब्रह्मबिन्दुपनिषद्।2।।
आपले मन हेच सर्व माणसांच्या बन्धन किंवा मोक्षाचे प्रमुख कारण आहे.
रोजच्या आयुष्यात एखादी गोष्ट अपायकारक आहे हे माहीत असूनही आपण मोहापायी ती गोष्ट करतो. एखादी गोष्ट पाहून न पाहिल्यासारखे करतो किंवा पाहिलेल्या गोष्टीचा आपल्याला सोयीस्कर असा अर्थ आपण घेतो.
आत्मवत् सर्व-भूतेषु यः पश्यति स पण्डितः ॥ हितोपदेश 1.14 ॥
सर्व सजीवांना आपल्या सारखेच बघतो तोच खरा पण्डित.
अहंकारशून्य निष्काम कर्मे ज्ञानप्राप्तीची अत्युत्तम साधने असतात. असे ज्ञान प्राप्त करून योगी निर्लेप होतात. सांख्य ज्ञान आणि कर्मयोग दोन्हीचा हेतू एकच, आत्मसाक्षात्कार. हे सर्व आपण आधीच्या श्लोकात वाचले आहेच. एखाद्या ठिकाणी पोहोचण्याचे पर्याय वेगवेगळे असू शकतात तसेच हे. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे सांगत आहेत की
सांख्ययोगी जे तत्व प्राप्त करतात तेच कर्मयोगी सुद्धा करतात. जो सांख्य आणि कर्म योगाचे एकच फलित पाहू शकतो तोच पाहतो.
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमोयोगतः। योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति।।5.6।।
हे महाबाहो! अयोगतः तु सन्न्यासः आप्तुम् , दुःखम् योग -युक्तः मुनिः न चिरेण ब्रह्म अधिगच्छति ।
हे महाबाहो! महान बाहू
अयोगतः कर्म योग शिवाय अ योगतः तासिल
तु परन्तु अव्यय
संन्न्यासः संन्न्यास पु. द्वि. ए. व.
आप्तुम् प्राप्त करून आप् धातू तुमून प्रत्यय
दुःखम् कठीण दुःख नपु. प्र. ए. व.
योगयुक्तः कर्मयोगी योगयुक्त पु. प्र. ए. व.
मुनिः मननशील मुनि पु. प्र. ए. व.
न चिरेण शीघ्र न +चिर नपु. तृ. ए. व.
चि धातू जमवत जाणे बाहुलकात् रक् प्रत्यय
चिर म्हणजे वेळ जमवत जाणे
ब्रह्म ब्रह्मन् नपु. प्र. ए. व.
अधिगच्छति अधि+गम् धातू जाणे कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
आपले आयुष्यच आपला महान गुरू असतो. फक्त आपली शिकण्याची तयारी हवी. स्वतः शांत राहून, प्रसंगी दोन पावले मागे येऊन आपले काम चोख करणे हे जीवनकौशल्य, यालाच सहनशीलता असेही म्हणता येईल. सहनशीलता वाढवणे म्हणजेच आपला अहंकार दूर करून, दुसर्याकडून फार अपेक्षा न ठेवता समोर आलेली परीस्थिती स्वीकारून पुढे जाणे. कर्मयोग सुद्धा फार काही वेगळा नाही.
एखादा संन्यासी अनेक वर्षे एकांतात बसून तप करत असणारा जर माणसांच्या समूहात आला, तर इतरांकडून झालेला अपमान सहन करून आयुष्य निभावू शकेल का? आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवले आहे हे संसाररूपी परीक्षा केंद्रातच सिद्ध होईल ना?
यदि न समुद्धरन्ति यतयो हृदि काम-जाता ।। श्रीमद्भागवतम् 10.87.39।।
जे संन्यासी आपल्या मनातून कामभावना काढून टाकू शकत नाही ते अशुद्ध राहतात.
कामनत् यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र। पर्याप्तकामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामः ॥मुण्डकोपनिषद् 3.2.2।।
आपल्या कामनांच्या अभिलाषेमुळेच मनुष्य पुनर्जन्म घेतो.
श्रीमद्भागवतम् 11.18.40 मध्ये भोंदू संन्यासी चे वर्णन केले आहे. जो फक्त बाह्य स्वरूपात संन्यासी वेषात आहे आणि 6 प्रकारच्या मायांवर त्याचा ताबा नाही, त्याला काहीच प्राप्त होत नाही
निष्काम कर्मयोग हा गुण संन्यासी मध्ये कसा दिसून येईल? म्हणजेच कर्मयोग करत असता ज्ञानयोगी होणे जास्त श्रेयस्कर. कर्मयोग करता करता संन्यास, म्हणजेच सर्वत्याग प्रस्थापित होईल. ह्या श्लोकात मुनी असा समर्पक शब्द वापरला आहे. मुनीला ब्रह्म प्राप्त होईल असे म्हटले आहे. मुनी म्हणजे मनन करणारा. ज्याचे राग द्वेष नष्ट झाले आहेत असा.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
परन्तु हे महा-बाहो! कर्म योग शिवाय संन्यास प्राप्त होणे कठिण आहे. मननशील योगी पुरूषाला मात्र ब्रह्मा शीघ्रतेने प्राप्त होतो.
योगयुक्तो पवित्रात्मा विजितात्मा जितेन्द्रियः।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते।।5.7।।
योग-युक्तः, विशुद्ध-आत्मा, विजित-आत्मा, जित-इन्द्रियः, सर्व-भूत-आत्म-भूत-आत्मा, कुर्वन् अपि न लिप्यते।
योग-युक्तः कर्म योगी योग-युक्त पु. प्र. ए. व.
विशुद्ध-आत्मा पवित्र हृदय असलेला विशुद्ध-आत्मन् पु. प्र. ए. व.
विजित-आत्मा संयमित मन विजित-आत्मन् पु. प्र. ए. व. जित-इन्द्रियः इन्द्रियांवर विजय मिळविलेला जित-इन्द्रिय पु. प्र. ए. व. सर्व-भूत-आत्म-भूत-आत्मा,सर्व जीवाच्या आत्मस्वरूप ज्याचा आत्मा सर्व-भूत-आत्म-भूत-आत्मन्
पु. प्र. ए. व.
कुर्वन् कर्म करून कृ धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
न अव्यय
लिप्यते लिप् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
कर्मयोगीच्या व्यक्तीमत्वात कर्म करता करता कसा बदल होत जातो आणि तो सर्वोच्च स्थानी कसा पोहोचतो हे सांगणारा हा श्लोक. निष्काम कर्म, पवित्र हृदय, मनावर ताबा, इन्द्रियांचे समर्पण आणि सर्व सजीवांमधे एकाच परमात्म्याचे दर्शन हि सर्व योगीची लक्षणे आहेत. ह्या श्लोकात आत्मा हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरला आहे जसे बुद्धि, मन आणि इन्द्रिय.
1. विशुद्धात्माः विशुद्ध बुद्धि युक्त
2. विजितात्माः मनावर विजय प्राप्त केलेला
3. जितेन्द्रियः इन्द्रियांवर ताबा मिळवला आहे असा.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जो कर्मयोगी, ज्याचे हृदय पवित्र आहे, ज्याने आत्म्यावर आणि इन्द्रियांवर विजय मिळविला आहे, सर्व जीवांच्या आत्म्याला आपलाच आत्मा मानतो त्याने कर्म केले असता तो कर्म बंधनमुक्त असतो.
नैव किंचित्क्रोमीति युक्तो मन्येत् तत्त्ववित्।
पश्यञ्चश्रृण्वन्स्पृश्ञ्जिघ्रन्नश्नंगच्छन्स्वपञ्चश्वसं।।5.8।।
युक्तः तत्त्ववित् पश्यन श्रुण्वन्, स्पृशं, जिघ्रन्, अश्न्न, गच्छन, स्वपन, श्वसन न एव किञ्चित् , करोमि इति मन्येत् ।
प्रलपण्विसृजन्गृहन्नुन्नमिषन्निमिष्न्नपि।
इन्द्रियाणिन्द्रियार्थेषु वर्तान्त इति धारयन् ॥ 5.9 ॥
प्रलप्न, विसृजन, गृह्नन् , उन्मिषां निमिषां अपि , इंद्रियाणि इंद्र-अर्थेषु एव वर्तन्ते इति धारयन्
युक्तः युक्त पु. प्र. ए. व.
तत्त्ववित् सत्य जाणणारा तत्त्वविद् पु. प्र. ए. व.
पश्यन्स पाहताना दृश् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
श्रुण्वन् ऐकताना श्रु धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
स्पृशन् स्पर्श करताना स्पृश् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
जिघ्रन् वास घेताना घ्रा धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
अश्नन् खाताना अश् धातू खाणे शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
गच्छन जाताना गम धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
स्वपन् झोपताना स्वप् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
श्वसन श्र्वास घेताना श्वस् धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
न अव्यय
एव सुद्धा अव्यय
किञ्चित् काहीही किञ्चित् नपु. द्वि. ए. व.
करोमि करतो कृ धातू करणे कर्तरि लट लकार उ. पु. ए. व.
इति असे अव्यय
मन्येत् मानतात मन् धातू मान्य करणे कर्तरि विधीलिडः लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
प्रलप्न बोलून प्र+लप् धातू बोलणे शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
विसृजन वि+सृज् धातू सोडून देणे शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
गृह्नन् गृह् धातू ग्रहण करणे शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
उन्मिषन् डोळे उघडून उत् +मिष धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
निमिषन् डोळे मिटून नि+मिष धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
अपि सुद्धा अव्यय
इंद्रियाणि इन्द्रिये इन्द्रिय नपु. प्र. ब. व.
इंद्र-अर्थेषु इन्द्रियांविषयी इंद्रियार्थ पु. स. ब. व.
एव सुद्धा अव्यय
वर्तन्ते वृत् धातू असणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ब. व.
इति असे अव्यय
धारयन् धारण करून धृ धातू धारण करणे णिच् शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
आधीच्या श्लोकाचा कर्मयोगी ला कोणत्याही कर्मांचे बंधन नसते हे सांगून झाल्यावर त्याचे विश्लेषण ह्या श्लोकात करून सांगणारा हा श्लोक. इन्द्रिये आपापली कामे करत आहेत. मात्र योगी च्या दृष्टीने ही सर्व कर्म शून्य आहेत. कारण आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो विशुद्ध-आत्मा, जित-इन्द्रियः विजित-आत्मा असा आहे. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
सत्य जाणणारा योगी बघताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, सोडून देताना, चालताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, ग्रहण करताना, डोळे उघडताना, डोळे मिटताना असाच विचार करत असतो की ह्या सर्व गोष्टींचा कर्ता नाही. फक्त त्याची इन्द्रिये त्या त्या विषयात क्रियाशील आहेत.
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः। लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा।।5.10।।
यः सङ्गम् त्यक्त्वा ब्रह्मणि आधाय कर्माणि , सः अम्भसा पद्म – पत्रम् इव , पापे न न लिप्यते
यः जो यद् पु. प्र. ए. व.
सङ्गम् आसक्ती सङ्ग पु. द्वि. ए. व.
त्यक्त्वा त्यागून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय
ब्रह्मणि परमात्म्याला ब्रह्मन् नपु. स. ए. व.
आधाय अर्पण करतो आ+धा धातू ल्यप प्रत्यय
कर्माणि कर्मे कर्मन् नपु. द्वि. ब. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
अम्भसा पाण्याने अम्भस् नपु. तृ. ए. व.
पद्मपत्रम् कमलपत्र पद्मपत्र नपु. द्वि. ए. व.
इव जसे अव्यय
पापेन पापाने पाप नपु. तृ. ए. व.
न लिप्यते लिप्त होत नाही लिप् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
एकूणच भारतीय तत्त्वज्ञानात आणि संस्कृत साहित्यात कमळाची उपमा बरेचदा वाचायला मिळते, जसे कमलनयन, चरणकमल, करकमल वगैरे. अनेक रंगी कमळ सुंदर तर दिसतेच, त्याचा काही भाग खाण्यासाठी पण वापरतात. याहीपेक्षा एक महत्त्वाचा गुण म्हणजे कमल चिखलात उगवते आणि त्याची पाने पाण्यात असून सुद्धा भिजत नाहीत. ह्या अध्यायातील 3,7.8.9.10 ह्या श्लोकात निष्काम कर्मयोग छान समजावून सांगितला आहे. निरपेक्ष भावनेने काम करता करता आधी चित्त शुद्धी आणि त्यानंतर ज्ञान, अनुभव आणि मुक्ती अशा वरच्या पायर्या कर्म योगी चढत जातो. आत्मा अकर्ता आणि अभोक्ता आहे हे त्याला चांगले माहीत आहे. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण आपल्या हातून नकळत घडणाऱ्या चुकांबद्दल बोलत आहेत. एखाद्याला हेतूपुरस्सर त्रास देणे आणि नकळत दुसर्या चे नुकसान करणे ह्यातील फरक न्यायदान करताना आपली न्यायप्रणाली सुद्धा मानते. आपल्या मनातील हेतू शुद्ध असावा.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जो आसक्ती चा त्याग करून आपली सर्व कर्मे ब्रह्माला अर्पण करतो त्याला जसे कमळाच्या पाने पाण्याने भिजत नाहीत तसे त्याची पापे चिकटत नाहीत.
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि। योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वाऽऽत्मशुद्धये।।5.11।।
योगिनः कायेन , मनसा , बुद्धध्या, केवलैः इन्द्रियैः अपि सङ्गम् त्यक्त्वा आत्मशुद्धये कर्म कुर्वन्ति
योगिनः योगी योगिन् पु. प्र. ए. व.
कायेन शरीराने काय नपु. तृ ए. व.
मनसा मनाने मनस् नपु. तृ ए. व.
बुद्धध्या बुद्धिने बुद्धि स्त्री. तृ ए. व.
केवलैः केवळ केवल नपु. तृ ब. व.
इन्द्रियैः इन्द्रियांच्या साह्याने इन्द्रिय नपु. तृ ब. व.
अपि सुद्धा अव्यय
सङ्गम् आसक्ती सङ्ग पु. द्वि. ए. व.
त्यक्त्वा त्याग करून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय
आत्मशुद्धये आत्मशुद्धी साठी आत्मशुद्धि स्त्री च. ए. व.
कर्म कर्मे कर्मन् नपु. द्वि. ए. व.
कुर्वन्ति करतात कृ धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.
काया मनस् आणि बुद्धि हे तीनही आत्म्यापासून वेगळे आहेत म्हणजेच प्रकृती चा भाग आहेत. हे आता ह्या श्लोकात प्रकर्षाने सांगितले आहे. आता पर्यंत आपण कर्मयोगी परमेश्वराला सर्व कर्मे अर्पण करतात असे वाचले होते आता थोडासा वेगळा अर्थ ह्या श्लोकात वाचायला मिळतो. येथे आत्मशुद्धी चा उल्लेख केला आहे.
पिशाचान् दानवान् यक्षान् पृथिव्यां चैव राक्षसान् ।
अंगुग्रेन तान्हन्या मिच्छन् हरी गणेश्वरः।। वाल्मीकि रामायण युद्धकाण्ड 6.18.23
सुग्रीव युद्धापूर्वी जेव्हा भयभीत झाले होते त्यावेळी श्रीराम म्हणतात की मला वाटले तर सहजच रावणच काय सर्व दैत्यांचा संहार करू शकतो, (पण ही आत्मशोध करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होत आहे.)
निष्काम कर्म करता करता आत्मशुद्धि होतेच,ज्ञान सुद्धा प्राप्त होते.
मम नाथ यद् अस्ति योऽस्म्यहं सकलम् तद्धी तवैव माधव । नियतस्वम् इति प्रबुद्धधैरथवा किं नु समर्पयामि ते।।
श्रीस्त्रोत रत्न-50
मी जेंव्हा अज्ञानी होतो तेव्हा मला असे वाटायचे की मी तुम्हाला (श्रीविष्णूंना) खूप काही अर्पण करू शकतो. पण आता मला समजले आहे की हे सर्व तुमचेच आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे सांगत आहेत की
योगी आसक्ती चा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि इन्द्रियांद्वारे केवळ आत्मशुद्धी साठी कर्म करतात.
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते।।5.12।।
युक्तः कर्म-फलं त्यक्त्वा नैष्ठिकीम् शान्तिम् आप्नोति। अयुक्तः कामकारेण फले सक्तः निबध्यते।
युक्तः योगी युज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
कर्म-फलं कर्मफलांचा कर्म-फल नपु. द्वि. ए. व.
त्यक्त्वा त्याग करून त्यज् धातू क्त्वा प्रत्यय
नैष्ठिकीम् निश्चित नैष्ठिकी स्त्री. द्वि. ए. व.
न+ई+स्था धातू स्थिर असणे
शान्तिम् शान्ति स्त्री. द्वि. ए. व.
आप्नोति प्राप्त करतो आप् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
अयुक्तः परमेश्वराला जोडून न घेतलेला अ+युक्तः युज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
कामकारेण कामने मुळे कामकार पु. तृ. ए. व.
फले फलांत फल नपु. स. ए. व.
सक्तः आसक्त होऊन सञ्ज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
निबध्यते बंधनात अडकतो नि+बन्ध् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
एकाचवेळी जन्मलेल्या बाळांचे प्रारब्ध सारखेच असते का? असा प्रश्न बर्याच जणांना पडतो. त्याचप्रमाणे एकच प्रकारच्या कर्माची फळे समानच असतील का? ह्या प्रश्नाचे उत्तर येथे दिले आहे असे म्हणता येईल. त्यासाठी कर्म करतेवेळी कोणता हेतू मनात होते ते तपासून पहावे लागेल.
युक्त म्हणजे युक्तीने काम करणारा (आयुक्त) त्याच्या विरुद्ध अयुक्त.
युक्त चा दुसरा अर्थ जोडून घेतलेला. युक्त आणि अयुक्त म्हणजे परमेश्वराशी जोडले गेलेला आणि परमेश्वराशी जोडून न घेतलेला.
निष्काम कर्म करता करता आत्मशुद्धि होऊन ज्ञान प्राप्ती होते. कर्म योगीला नित्य आणि अनित्य ह्यामधील फरक उमजून येतो. विवेक वैराग्य अशा सद्गुणांचा उदय होणे ती निष्ठा, ज्याला ती प्राप्त झाली तो नैष्ठिक. हे संस्कृत भाषेतील सौंदर्यस्थळ आहे . (भाव भावकी) जी व्यक्ती निष्ठावान असते त्याची श्रद्धा कायमस्वरूपी असते. अशा योगीला शांती प्राप्त होते ती सुद्धा निरंतर. (दोन देशातील राजकीय शांती नव्हे.)
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
कर्मयोगी कर्मफळाचा त्याग करून शाश्वत अशी शांतता प्राप्त करतो. सकाम पुरुष कर्मफळाच्या आसक्तीमुळे कर्मबंधनात बांधले जातात.
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी।नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्।।5.13।।
वशी देहि सर्व-कर्माणि मनसा सन्न्यस्य न कुर्वन् , न कारयन् एव नव-द्वारे पूरे , सुखम् आस्ते ।
वशी संयमी वशिन् पु. प्र. ए. व.
वश धातू इच्छा करणे
देहि देहधारी देहिन् पु. प्र. ए. व.
सर्व-कर्माणि सर्व कर्मे सर्व-कर्मन् नपु. द्वि. ब. व.
मनसा मनाने मनस् नपु. तृ. ए. व.
सन्न्यस्य त्यागून सम+नि+अस् ल्यप प्रत्यय
न अव्यय
कुर्वन् करणारा कृ धातू शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
न अव्यय
एव सुद्धा अव्यय
नव-द्वारे (शरीराची) नऊद्वारे नवन् द्वार नपु. स. ए. व.
कारयन् करवून घेणारा कृ णिच् शतृ प्रत्यय पु. प्र. ए. व.
पूरे घरात पुर नपु. स. ए. व.
सुखम् आनंदपूर्वक अव्यय
आस्ते स्थित असतात आस् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
मूत्रपुरीषोत्सर्ग, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुडी, एक जिव्हा अशा शरीराला असणाऱ्या 9 द्वारांचा ह्या श्लोकात उल्लेख केला आहे.
नवद्वारे पुरे देही हंसो लेलायते बहिः। वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च ।।श्वेताश्वतरोपनिषद्-3:18
जीवात्मा नऊ द्वारांच्या शरीरात राहणारा, परमात्म्याचाच अंश आहे जो ह्या संसाराचा स्वामी आहे.
सुखाची जणू व्याख्याच ह्या श्लोकात सांगितली आहे. देहधारण केलेला संन्यस्त जीव, आत्मसंयमित आहे तो ह्या 9 दरवाजे असलेल्या शरीरात सुखाने नांदत आहे. कारण तो मीच कर्ता, करविता अशा विचारांपासून दूर आहे.
ह्या नगरीमध्ये इन्द्रिये, मन, बुद्धी हे नागरिक सुद्धा राहतात. मात्र योगी अहंकारशून्य निष्कामी असा आहे, 4.18 श्लोकात सांगितल्याप्रमाणे नित्य नैमित्तिक काम्य प्रतिषिद्ध अशा सर्व कर्मांचा त्याग करून अकर्म ला कर्म आणि कर्म ला अकर्म मानणारा असा तो खरा बुद्धीवान आहे. त्याचे वर्णन करताना श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
सर्व कर्मांचा मनाने संन्यास करून नवद्वार असणार्या नगरीत राहून कर्म न करता न करविता सुखाने राहतो.
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः। न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते।।5.14।।
प्रभुः न लोकस्य कर्माणि , न कर्तव्यम् , न कर्म-फल-संयोगम् सृजति । स्वभावः तु प्रवर्तते ।
प्रभुः परमेश्वर प्रभु पु. प्र. ए. व.
न अव्यय
लोकस्य लोकांची लोक पु. ष. ए. व.
कर्माणि कर्मे कर्मन् नपु. द्वि. ब. व.
न अव्यय
कर्तव्यम् कर्तव्य नपु द्वि. ए. व.
न अव्यय
कर्म-फल-संयोगम् कर्मफळाचा संबंध कर्म-फल-संयोग पु. द्वि. ए. व.
सृजति तयार करतो सृज् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
स्वभावः प्रकृति स्वस्य भावः स्वभाव पु. प्र. ए. व.
तु परन्तु अव्यय
प्रवर्तते कार्यंवित करतो प्र+वृत् धातू प्रवृत्त करणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
प्रभू हा शब्द प्रथमच ह्या श्लोकात वाचायला मिळतो आहे. प्र+भू भवति धातू होणे. प्रभवति म्हणजे प्रभाव टाकणारा. जो लोकांवर प्रभाव टाकतो तो प्रभू. आता प्रश्न असा आहे की प्रभाव कोणावर पडतो आहे? आस्तिकांवर की नास्तिकांवर? वेदांत सांगितल्याप्रमाणे जो वेदांना मानतो तो आस्तिक, वेदांना न मानणारे नास्तिक. येथे प्रभूचे अस्तित्व जो मानतो तो आस्तिक.
प्रत्येकाच्या मनात जसा भाव असतो, त्याला तसा तो दिसतो. ज्यांचा देवावर अजिबात विश्वास नाही ते फक्त विज्ञानावर विश्वास ठेवतील, वादविवाद, चर्चा करतील आणि आपले काम करतील. आणि दुसर्या गटातील लोक मात्र नशीबावर हवाला, फारसे प्रयत्न न करता काम करतील.
कर्तृत्व =कर्तृ (कृ धातू तृच् प्रत्यय देणारा ) +त्व
कर्ता करणारा कर्तृ पु. प्र. ए. व.
त्व प्रत्यय त्या व्यक्तीची योग्यता दर्शविते.
न कर्तृत्वं सृजति प्रभुः म्हणजेच कोणतेही कर्म तुम्ही आस्तिक असलात तरीही प्रभू घडवून आणत नाही.
मग मनात प्रश्न येतो, कर्म म्हणजे तरी काय? त्याची व्याख्या कोठे सांगितली आहे का?
भूतभावोद्भवकरो विसर्ग: कर्मसंज्ञित: ||8. 3||
भूत भावो उद्भव करोति
उद्+भू धातू प्रगती होणे
भूतस्य (भूतकाळ) भावः (वर्तमानकाळ) उद्भवं(भविष्यकाळ) करोति
आपल्या भूतकाळात वर्तमानकाळ आणि वर्तमानकाळात भविष्यकाळ असतो. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा भूतकाळ होतो. म्हणजेच त्याचा विसर्ग होतो.
असे एकेक सोडून दिलेले क्षण म्हणजे कर्म.
3र्या अध्यायातील 4 थ्या श्लोकात आपण वाचले आहेत की कर्माचा आरंभच केला नाही म्हणून नैष्कर्म्यं प्राप्त होणार नाही तसेच कर्मांचा त्याग (भौतिक पातळीवर) केला म्हणून सिद्धी प्राप्त होणार नाही. म्हणजेच कर्म तर केलेच पाहिजे. आणि आधीच्या व्याख्येप्रमाणे निघून जाणारा क्षण संस्मरणीय असावा. मात्र त्यामध्ये मोह माया आसक्ती असू नये. प्रकृतीची ही वैशिष्ट्येच या जगाच्या रंगमंचावर नाट्य घडवून आणतात.
प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो.
सर्वांनाच साधु आणि विंचवाची गोष्ट माहीत आहे . पाण्यात बुडणाऱ्या विंचवाला साधू पुन्हा पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तर विंचू पुन्हा पुन्हा साधूला दंश करत असतो. ह्याला कारण स्वभाव. दोघेही आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतात.
कर्म तर आपण करतोच पण दरवेळेस आपल्याला यश मिळतेच असे नाही. ह्यावर 18 व्या अध्यायातील 13 व्या श्लोकात सुंदर विवेचन दिले आहे.
पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे।
सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्।।18.13। कर्म सिद्धीस नेण्यासाठी 5 कारणांची आवश्यकता असते ती कोणती?
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।18.14।।
अधिष्ठानं म्हणजे काम करणारे साधन, कर्ता म्हणजे क्रिया घडवून आणणारा.. (इच्छा करणारा)
करणं पृथकविधम् म्हणजे विविध कार्य करू शकणारी इंद्रिये
विविध पृथक्चेष्टा म्हणजे इंद्रियांची विविध काम करण्याची शक्ती (skills)
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैव.
पळण्याच्या स्पर्धेत अर्ध्या सेकंदाने पदक हुकते,ते दैव असते.
आपण बिया पेरतो पण सर्वच उगवतात असे काही नाही. क्षत्रियाचा धर्म लढण्याचा पण त्याच्या कर्मफलसंयोगाप्रमाणेच त्याला विजय मिळेल. (कोणीतरी एक नक्की हरणार असतो)
थोडक्यात आपले कर्तृत्व, कर्म ह्यावर भगवंताचा प्रभाव नसतो तसेच त्यांच्या कर्मा ची फळे सुद्धा तो देत नाही.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
परमेश्वर माणसाच्या कर्माचे नाही कर्तृत्वाचे नाही, ना कर्म आणि कर्मफळाच्या संबंधाची रचना करत. मात्र प्रकृती कार्यान्वित असते.
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः। अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः।।5.15।।
विभुः न कस्यचित् पापम् , न च एव सुकृतम् आदत्ते । अज्ञानेन ज्ञानम् आवृत्तम् , तेन जन्तवः मुह्यन्ति ।
विभुः विशेष भवति इति विशेष घडणे
विभु पु. प्र. ए. व.
भू धातू होणे
न अव्यय
कस्यचित् कोणाचे किञ्चित् नपु. ष. ए. व.
पापम् पाप नपु. द्वि. ए. व.
न अव्यय
च सुद्धा अव्यय
एव सुद्धा अव्यय
सुकृतम् पुण्यकर्म सुकृत नपु. द्वि. ए. व.
आदत्ते परत घेणे आड्ः +दा धातू देणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
अज्ञानेन अज्ञानामुळे अज्ञान नपु. तृ. ए. व.
ज्ञानम् ज्ञान नपु. प्र. ए. व.
आवृत्तम् झाकलेले आवरण आड्ः+वृ धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तेन त्याने तद् नपु. तृ. ए. व.
जन्तवः जीव जन्तु पु. प्र. ब. व. जन् धातू उत्पन्न करणे
मुह्यन्ति मोहित होतो मुह् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.
आधीच्या श्लोकात प्रभू शब्द वापरला होता आता ह्या श्लोकात विभू असे म्हटले आहे.
पाप पुण्ण्याच्या कल्पना ह्या श्लोकाच्या निमित्ताने समजून घेता येतील.
पा धातू रक्षण करणे +अप (त्यापासून दूर) =पाप
वाईट कर्म करणार्यांचे प्रभू रक्षण करणार नाही असा पाप ह्या शब्दाचा अर्थ घ्यायला हवा.
सुखदु:खे समे कृत्वा लाभलाभौ जयाजयौ |
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि || 2.38||
सुख दुःख लाभ हानि जय पराजय हे सर्व सारखेच असे मानून तू युद्धाला तयार हो. तू युद्ध केलेस म्हणून तुला पाप लागणार नाही.
पु पुनाति शुद्ध करणे पुण्यकर्म म्हणजे पवित्र कर्म.
पुन्हा एकदा प्रकृति पासून निर्माण होणाऱ्या विकारांचे वर्णन ह्या श्लोकात केले आहे.
सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज। अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।।
जरी 5व्या अध्यायात भगवंत म्हणत असले की ते पापही घेत नाहीत आणि पुण्य सुद्धा घेत नाहीत
पण 18 व्या अध्यायात मात्र अर्जुनाला असे सांगत आहेत की तू मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्ति देईन.
ह्याचा नक्की अर्थ काय असावा?
मुळात वाईट आणि चांगले कर्म कसे ठरवायचे?
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि।।2.38।।
सुख दुःख, लाभ हानि, जय पराजय हे सर्व सारखेच असे मानून तू युद्धाला तयार हो. तू युद्ध केलेस म्हणून तुला पाप लागणार नाही. थोडक्यात सर्व कर्मे आपण स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करायची. स्वार्थ आला की कर्मफळे सुद्धा आली.
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य येथे चपखल लागु पडते.
अज्ञानेनावृतं ज्ञानं ह्याचा अर्थ अज्ञानामुळे ज्ञान झाकून ठेवणे
अज्ञानामुळे जर ज्ञान झाकले गेले असेल तर मनात चलबिचल होते. Knowledge makes man perfect.
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव। येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि।।4.35।। इथे सुद्धा भगवान् हेच सांगत आहेत.
जर तुझ्याकडे ज्ञान असेल तर तुला पुन्हा मोह होणार नाही.
Half knowledge is dangerous.
एखादी गोष्ट लहान मुलाला करू नको असे सांगितले की त्याला तेच करावेसे वाटते कारण त्यातील धोके त्याला माहीत नसतात. मग तीच गोष्ट करण्याचा त्याला मोह आवरत नाही.
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते। ततो भूय इव ते तमो य उ विद्यायां रताः ॥ ईशावास्योपनिषद 9।।
ज्याच्या कडे ज्ञान नाही तो घोर अंधकारमय जीवन जगतो पण ज्याला आपल्या कडे खूप ज्ञान आहे असे वाटते तो त्यापेक्षा वाईट अवस्थेत असतो. (आपल्या अज्ञानाची त्याला जाणीव नसते)
विद्याञ्चाविद्याञ्च यस्तद्वेदोभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते ।।
ईशोपनिषद् 11।।
अविद्या चा शेवट अटळ आहे पण विद्या अमर्त्य आहे. सत्य हे चिरंतन आहे.
यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः ।
अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम् ॥केनोपनिषद् 3॥
ज्याला असे वाटते की त्याला सर्व काही समजले आहे खरे तर ते त्याचे अज्ञान असते.
आपण कायम ज्ञान प्राप्ती करत राहिले पाहिजे.
म्हणजेच आपण आपले ज्ञान सतत तपासून घेत राहिले पाहिजे. थोडक्यात
जर अज्ञानाचे आवरण ज्ञानावर नसेल तर मोह होणार नाही.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
सर्व व्यापी परमात्मा कोणाचे पुण्य आणि पाप घेत नाही. ज्ञानावर असलेल्या अज्ञानाच्या आवरणामुळे जीव मोहात पडत असतात.
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्।।5.16।।
येषाम् तु तत् अज्ञानम् आत्मनः ज्ञानेन नाशितम् , तेषाम् ज्ञानम् आदित्यवत् तत् परमं प्रकाशयति ।
येषाम् ज्याचे यद् पु. ष. ब. व.
तु परन्तु अव्यय
तत् ते तद् नपु प्र. ए. व.
अज्ञानम् अज्ञान अ+ज्ञानम् नपु. प्र. ए. व.
आत्मनः परमात्म्याचे आत्मन् पु. ष. ए. व.
ज्ञानेन ज्ञानामुळे ज्ञान नपु. तृ. ए. व.
नाशितम् नष्ट केले आहे नश् धातू णिच् क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तेषाम् त्यांचे तद् पु. ष. ब. व.
ज्ञानम् ज्ञान नपु. प्र. ए. व.
आदित्यवत् अव्यय
तत् परमं ते श्रेष्ठ तत्पर पु. द्वि. ए. व.
प्रकाशयति प्रकाशित होते प्र+काश् धातू णिच् कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
एक वेगळीच वाक्यरचना आपल्यासमोर ह्या श्लोकात मांडली आहे. 'अज्ञानम् ज्ञानेन नाशितम् ' म्हणजे ज्ञानामुळे अज्ञानाचा नाश होतो. अज्ञान नाशवंत आहे आणि अर्थातच ज्ञान शाश्वत आहे सत्य आहे. सत्य एकच असते. असत्य कितीही असू शकतात.
यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥4.19॥ ह्या श्लोकात ज्ञानाला अग्नीची उपमा दिली आहे. कामना रहीत कर्म ज्ञानरूपी अग्नीत भस्म झाले म्हणून कर्मफळाची अपेक्षा सुद्धा नष्ट झाली.
दुसर्या वाक्यात ज्ञानम् प्रकाशयति असे म्हटले आहे. मग येथे सहाजिकच प्रश्न पडतो, ज्ञान कर्ता आहे की कर्म?
ज्ञानाला आदित्यवत् म्हणजे सूर्याची उपमा दिली आहे. म्हणजे ज्ञान माणसाला स्वयंप्रकाशित बनवते. त्या काळात सूर्य, स्वयंप्रकाशित आहे हे माहीत होते हे सुद्धा विशेषच. आपल्या सर्वांनाच माहित असलेला अभंग
'मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड,
उजेडी राहिले उजेड होऊन' यथार्थ वर्णन करतात.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जेव्हा ज्ञानामुळे अज्ञानाचा नाश होतो तेव्हा सूर्यासारख्या तेजस्वी असा तो परमात्म्याची अनुभूती देतो.
तबुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिषूतकल्मषाः ॥5.17॥
तत्-बुद्धयः,तत्-आत्मानः,तत्-निष्ठाः,तत्-परायणाः,ज्ञान-निर्धूत-कलमषाः अपुनरावृत्तिम गच्छन्ति
तत्- बुद्धयः त्याची बुद्धि तद्-बुद्धी स्त्री. प्र. ब. व.
बुध् धातू बोध होणे
तत्-आत्मानः त्याचा आत्मा तद्-आत्मन् पु. प्र. ब. व.
तत्-निष्ठाः त्याची निष्ठा तद्-निष्ठा स्त्री. प्र. ब. व.
तत्-परायणाः तेच परमलक्ष्य तद्-परायणा स्त्री. प्र. ब. व.
ज्ञान-निर्धूत-कल्मषाः ज्ञान-निर्धूत-कल्मष ज्ञानामुळे नष्ट झालेले पाप स्त्री. प्र. ब. व.
निर्+धू धातू नष्ट होणे +क्त प्रत्यय
कर्म +सो धातू नष्ट होणे (स्यति) +कः
अपुनरावृत्तिम् मुक्ती अ+पुनरावृत्ति स्त्री. द्वि. ए. व.
गच्छन्ति जातात गम् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ब. व.
15 व्या श्लोकात ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले होते 16 व्या श्लोकात त्याचे गुणविशेष सांगितले. आता ह्या श्लोकात त्याचे परिणाम सांगितले आहेत. तल्लीन होणे ह्या शब्दाचा अर्थ येथे समजतो.
बुध् धातू म्हणजे बोध होणे, ज्ञान प्राप्त होणे. राजपुत्र सिद्धार्थ ला दुःखाची दिसल्यावर त्याची कारणे शोधण्यासाठी तो घराबाहेर पडला आणि बुद्ध झाला.
माणसाची बुद्धी तो आयुष्यात जे काही करणार असतो, त्यासाठी मार्गदर्शन करत असते. अनेक ज्ञानी, कलाकार, समाजसेवक, उद्योजक हे कोणतीही पार्श्वभूमी नसताना अचाट कामगिरी करून दाखवतात. स्वयंप्रकाशित असा ज्ञानी इतक्या उच्च पातळीवर जाऊन पोहोचला आहे की त्याची बुद्धी परब्रह्मात रममाण झाली आहे., परब्रह्म च त्याचा आत्मा आहे, त्याची निष्ठा परब्रह्मातच दृढ झाली आहे आणि तोच आता त्याचा पुरूषार्थ आहे. अशा आत्मज्ञानामुळे त्याची सर्व पातके धुवून निघाली आहेत. अशा ज्ञानींची पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म होत नाही. ते परमगतीला प्राप्त होतात. ह्या वरून परमवीरचक्र ह्या शब्दाची आठवण येते. चक्र म्हणजे सुद्धा गती. किती उदात्त विचार आहेत ह्या पुरस्कारामागे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
ज्याची बुद्धि आत्मा निष्ठा सर्व काही परमात्म्यामधे असे काही रममाण झाले आहे की आता तेथून परत मागे फिरणे होणार नाही. त्याची ज्ञानामुळे सर्व पापे नष्ट झाली आहेत.
विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि। शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः।।5.18।।
पण्डिताः विद्या-विनय-सम्पन्ने ब्राह्मणे , गवि , हस्तिनी , च शुनि , श्वपाके च एव सम-दर्शिनः ।
पण्डिताः विद्वान पण्डित पु. प्र. ब. व.
विद्या-विनय-सम्पन्ने नम्र विद्यासंपन्न विद्या-विनय-सम्पन्न पु. स. ए. व.
ब्राह्मणे ब्रह्मवेत्त्याकडे ब्राह्मण पु. स. ए. व.
गवि गाय गो स्त्री. स. ए. व.
हस्तिनी हत्ती हस्तिन् पु. स. ए. व.
च सुद्धा अव्यय
शुनि कुत्रा श्र्वन् पु. स. ए. व.
श्वपाके चांडाल श्वपाक पु. स. ए. व.
च सुद्धा अव्यय
एव सुद्धा अव्यय
सम-दर्शिनः सम-दर्शिन् पु. प्र. ब. व.
आता ह्या श्लोकात ज्ञानी पुरुष ओळखायचा कसा त्याचे वर्णन केले आहे, गाय हत्ती कुत्रा आणि कुत्रा खाणारे यांची उदाहरणे देऊन. मागील श्लोकात ज्ञानी पुरुषाचे वर्णन आदित्यवत् म्हणजे सूर्यासारखा स्वयंप्रकाशित असे म्हटले होते, येथे सूर्याच्या दुसर्या गुणाची उपमा ज्ञानी पुरुषाला दिली आहे. कवी भा. रा. तांबे यांची अर्थपूर्ण कविता 'दिनकर समदर्शी तू खरा'.
पुढे येणाऱ्या 6व्या अध्यायातील 29 आणि 32 व्या श्लोकात सुद्धा समदर्शी असण्याचे दाखले दिले आहेत. येथे ज्ञानी विद्यमान तर आहेच, तो विनयशील आहे, सर्वांकडे एकाच दृष्टीने पाहतो. गाय सत्वगुणी, हत्ती रजोगुणी आणि कुत्रा तमोगुणी तर श्र्वपाक विद्याहीन असे मानले तर अशा सर्वांकडे ज्ञानी पुरुष एकाच नजरेने पाहतो. मनात कोणताच भेदभाव नाही. असे चित्र सामूहिक धार्मिक कार्यक्रमात पाहता येते. जसे पंढरपूरला जाणारी वारी, सर्वांच्या मनात फक्त विठ्ठलाचे चिंतन असते. सर्वच एकमेकांकडे विठ्ठल भावनेने पहात असतात.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की
विद्ये ने चित्तवृत्ती शांत आणि मर्यादशील झालेल्या ब्रह्मवेत्त्याकडे, गाय, हत्ती, कुत्रा तसेच चांडाळ यासर्वांकडे विद्वान सारख्याच दृष्टीने पाहतात.
इहैव तैर्जितः सर्गों येषां साम्ये स्थितं मनः । निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥5.19॥
येषाम् मनः साम्ये स्थितम् , तैः इह एव सर्गः जितः , हि समम् ब्रह्म निर्दोषम् , तस्मात् ते ब्रह्मणि स्थितः
येषाम् ज्याचे यद् पु. ष. ब. व.
मनः अंतःकरण मनस् पु. प्र. ए. व.
साम्ये समतेत साम्य नपु. स. ए. व.
स्थितम् स्थिर स्थित स्था धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.
तैः त्यांनी तद् पु. तृ. ब. व.
इह ह्या आयुष्यात अव्यय
एव सुद्धा अव्यय
सर्गः संपूर्ण जगाला सर्ग पु. प्र. ए. व.
सृज् धातू निर्माण करणे घञ् प्रत्यय
जितः जिंकले आहे जि धातू जिंकणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
हि कारण अव्यय
समम् समत्व सम नपु. प्र. ए. व.
ब्रह्म ब्रह्मन् नपु. प्र. ए. व.
निर्दोषम् निर्दोष नपु. प्र. ए. व.
तस्मात् म्हणून तद्. पु. पं. ए. व.
ते ते तद् पु. प्र. ब. व.
ब्रह्मणि ब्रह्मात ब्रह्मन् नपु. स. ए. व.
स्थितः स्थित स्था धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
ह्या श्लोकात ब्रह्माचे गुणविशेष सांगताना निर्दोष असे विशेषण वापरले आहे. आधीच्या श्लोकात सूर्याची उपमा देऊन स्वयंप्रकाशित आणि समता असे ब्रह्मवेत्त्याचे गुण सांगितले होते. सर्वांप्रती समता राखणे हे आत्मसाक्षात्काराचे लक्षणच होय. सर्व आत्म्यांमधे परमेश्वराचा अंश आहे असे गीता आपल्याला सांगते. मात्र व्यावहारिक दृष्ट्या आपण लोकांचे वर्गीकरण करतो कधी धार्मिक, कधी आर्थिक कधी सामाजिक. ज्याच्या मनात लोभ लालसा नाही, ज्याच्या मनातून राग लोभ नष्ट झाले आहेत, ज्याला कोणी जवळचा नाही आणि दूरचा सुद्धा नाही, त्यालाच समता साधता येते. म्हणूनच संतांना आपण देवासमान मानतो. ब्रह्माला ह्या श्लोकात दोषरहित म्हटले आहे.
ब्रह्मा म्हणजेच समता.
समत्वं योग उच्यते।।2.48।। हे आपण वाचले आहेच.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
ज्याच्या मनात आता फक्त समतेचा भाव आहे, त्याने सर्व जगाला जिंकून घेतले आहे, कारण समत्व असा ब्रह्म निर्दोष आहे, म्हणून अशा लोकांना ब्रह्मत्व प्राप्त झाले आहे.
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्।
स्थिरबुद्धिर्सम्मूधो ब्रह्मविदब्रह्माणि स्थितः ॥ 5.20॥
स्थिर-बुद्धिः, असम्मूढः , ब्रह्मवित् ब्रह्मणि स्थितः प्रियम् प्राप्य न प्रहृष्येत् अप्रियम् प्राप्य च न उद्विजेत् ।
स्थिर-बुद्धिः स्थिर-बुद्धि स्त्री. प्र. ए. व.
असम्मूढः संशयरहित असम्मूढ पु. प्र. ए. व.
अ+सम+मुह् धातू बुद्धि भ्रम होणे क्त प्रत्यय
ब्रह्मवित् ब्रह्म जाणणारा ब्रह्मन्+विद् पु. प्र. ए. व.
ब्रह्मणि ब्रह्मा ब्रह्मन् नपु. स. ए. व.
स्थितः अचल स्था धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
प्रियम् आवडणार्या प्रिय पु. द्वि. ए. व.
प्राप्य प्राप्त होऊन प्र+आप् धातू ल्यप प्रत्यय
न अव्यय
प्रहृष्येत् हर्षित होणे प्र+हृष् धातू कर्तरि विधीलिडः लकार प्र. पु. ए. व.
अप्रियम् नावडत्या न प्रिय पु. द्वि. ए. व.
प्राप्य प्राप्त होऊन प्र+आप् धातू ल्यप प्रत्यय
च सुद्धा अव्यय
न अव्यय
उद्विजेत् उद्विग्न होतो उद्+विज् धातू कर्तरि विधीलिडः लकार प्र. पु. ए. व.
रोजच्या आयुष्यात उपयोगी पडेल असा श्लोक. आपल्या आयुष्यात रोजच चढ-उतार, यश-अपयश कडू-गोड अशा घटना घडत असतात. ह्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने हाताळाव्या हे सांगणारा हा श्लोक.
ब्रह्म स्थित व्यक्ती आयुष्यात कशी वागते ते सांगताना दोन विशेषणे वापरली आहेत. स्थिरबुद्धि आणि असम्मूढ
अचल आणि स्थिर अशा मानसिकतेचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वरांनी पर्वताची उपमा दिली आहे.
तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।
तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलिया जो ॥ 5.103 ॥
मृगजलाच्या लोंढ्याने ज्याप्रमाणे मोठा पर्वत किंचितही ढकलला जात नाही, त्याप्रमाणे चांगल्या अथवा वाईट गोष्टी प्राप्त झाल्या असता ज्याच्यामधे चलबिचल उत्पन्न होत नाहीत ॥ ज्ञानेश्वरी। 5. 103॥
काय कमावलं काय गमावलं ह्याचा हिशोब करून साध्य तरी काय करायचे आहे?ज्याचे अंतिम लक्ष्य केवळ ब्रह्म प्राप्ती हेच आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जो स्थिरबुद्धि, संमोहरहित ब्रह्म जाणणारा पुरुष ब्रह्मात स्थित आहे त्याला प्रिय गोष्ट प्राप्त झाली म्हणून हर्ष होत नाही आणि अप्रिय गोष्ट प्राप्त झाली म्हणून उद्विग्नता येत नाही.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम्। स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते।।5.21।।
बाह्य -स्पर्शेषु असक्त-आत्मा आत्मनि यत् सुखम् विन्दति सः ब्रह्मयोगयुक्तात्मा अक्षयम् सुखम् अश्नुते ।
बाह्य-स्पर्शेषु बाह्यविषयसुखात बाह्य-स्पर्श पु. स. ए. व.
असक्त-आत्मा आसक्ती रहीत आत्मा
असक्त-आत्मन् पु. प्र. ए. व.
आत्मनि आत्म्यातच आत्मन् पु. स. ए. व.
यत् जो यद् नपु. प्र. ए. व.
सुखम् सुख नपु. प्र. ए. व.
विन्दति मानतो विद् धातू जाणणे, मनन करणे कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
ब्रह्मयोगयुक्तात्मा ब्रह्माला जोडला गेलेला आत्मा ब्रह्मयोगयुक्तआत्मन् पु. प्र. ए. व.
अक्षयम् न संपणारे न+क्षय अक्षय नपु. द्वि. ए. व.
सुखम् सुख नपु. द्वि. ए. व.
अश्नुते अनुभवतो अश् धातू अनुभव करणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
श्रीमद्भगवद्गीतेत कधीच देवाला घाबरून रहा, देवाचा कोप होईल अशा प्रकारची भाषा वापरलेली नाही. उलट परमात्म्याशी जोडून घेऊन निस्सीम आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. सर्वांनी कायम आनंदाने जगावे असाच संदेश गीतेत दिलेला आहे. मात्र आपला आनंद शाश्वत असावा. क्षणभंगूर नसावा.
आनन्दो ब्रह्मेति व्यजानात्। तैत्तिरीयोपनिषद् भृगुवल्ली षष्ठोऽनुवाकः 1।।
आनंद हाच ब्रह्म आहे.
केवलानुभवानंदस्वरूप: भगवान:। श्रीमद्भागवतम्। 7.6.23।।
परमेश्वराचा अनुभव केवळ आनंद आहे.
ह्या श्लोकात बाह्य-स्पर्श असक्त असा शब्द वापरला आहे म्हणजे शब्द, रूप, गंध इ. विषयांमध्ये ज्यांचे अंतःकरण रममाण होत नाही असा विषयविरक्त व्यक्ति, जो केवळ आत्मनिष्ठ होऊन, आत्म्याशी तादात्म्य पावलेला असा, ज्याच्या आनंदाची पराकाष्ठा झाली आहे.
सांगैं कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटें ।तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ? ॥ज्ञानेश्वरी 5.107 ॥
सांग कमळाच्या पाकळीच्या पात्रावर जो शुद्ध चंद्रकिरणांचे भोजन करतो, तो चकोर पक्षी वाळवंटातील दगड चाटत बसेल काय ? ॥ 5.107।।
थोडक्यात आनंद, मनाची शांती हे सर्व आपल्या मधेच असते, हेच ते आत्मज्ञान.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणतात की
बाह्य सुखाची निरीच्छा असणारा स्वतः च्या आत्म्यामधेच सुखाचा अनुभव घेतो, ब्रह्माशी जोडले गेलेला असा शाश्वत सुख अनुभवतो.
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः।।5.22।।
हे कौन्तेय ! ये भोगाः संस्पर्शजाः ते हि दुःख-योनिः आदि अन्तवन्तः एव , बुधः तेषु न रमते ।
हे कौन्तेय !
ये यद् पु. प्र. ब. व.
भोगाः भोग पु. प्र. ब. व.
संस्पर्शजाः संपर्कातून उत्पन्न होणारे संस्पर्शज पु. प्र. ब. व.
सम+स्पृश् धातू स्पर्श करणे +जन् धातू उत्पन्न होणे
ते तद् पु. प्र. ब. व.
हि कारण अव्यय
दुःख-योनयः दुःखाचा उगम दुःख योनि पु. प्र. ब. व.
आदि अन्तवन्तः आरंभ आणि अंत आदि अन्तवन्त् पु. प्र. ब. व.
एव सुद्धा अव्यय
बुधः बुद्धिवान बुध पु. प्र. ए. व.
तेषु त्यामध्ये तद् पु. स. ब.व.
न अव्यय
रमते रमतो रम् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
आपण एखादी गोष्ट वापरून, काही दिवसांनी फेकून देण्याची संस्कृती पाश्चात्यांकडून शिकलो. त्यापूर्वी आपल्याला घरातील जुन्या वस्तू अगदी पणजोबांच्या वेळेपासून आहेत असे सांगायला अभिमान वाटायचा. ह्यामुळे नक्की संसाधनांची बचत आणि कमी कचरा निर्माण होत असे. ह्यालाच शाश्वत जीवनशैली असे म्हणतात. हिच गोष्ट श्रीभगवानकृष्णांनी अध्यात्मिक अंगाने सांगितली आहे.
नायं देहो देहभाजां नृलोके
कष्टान् कामनरर्हते विड्ःभुजां ये।
तपो दिव्यं पुत्रका येन सत्त्वं
शुद्ध्येद्यस्माद् ब्रह्मसौख्यं त्वनन्तम् ॥श्रीमद्भागवतम् 5.5.1॥
इन्द्रिय सुखाच्या मागे धावण्यापेक्षा, भक्ती आणि कठोर परिश्रमांनी खरा आनंद मिळवला पाहिजे कारण इन्द्रिय सुख तर विष्ठा खाणारी डुक्करे सुद्धा मिळवतात.
आधीच्या श्लोकात स्वतःच्या आत्म्यामधेच रममाण असणारे नितांत सुखी असतात असे म्हटले आहेच.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
कारण हे कौन्तेय! जे इन्द्रिये आणि विषयांच्या संयोगातून निर्माण होणारे भोग आहेत ते दुःख निर्माण करतात अशा सुखांना सुरवात आणि शेवट आहे, ह्यामधे बुद्धीमान माणसे रमत नाहीत.
ंशक्नोतिहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः।।5.23।।
यः इह शरीर-विमोक्षणात् प्राक्, एव काम-क्रोध-उद्भवम् वेगम् सोढुम् शक्नोति सः युक्तः सः सुखी नरः ,।
यः जो यद् पु. प्र. ए. व.
इह ह्या (शरीरात) अव्यय
शरीर-विमोक्षणात् शरीराला मोक्ष शरीर-वि मोक्षण पु. पं. ए. व.
वि+मोक्ष् धातू मुक्ती मिळणे
प्राक् आधी अव्यय
एव सुद्धा अव्यय
काम-क्रोध-उद्भवम् काम क्रोधाने उत्पन्न होणाऱ्या काम-क्रोध-उद्भव पु. द्वि. ए. व.
वेगम् वेगाला वेग पु. द्वि. ए. व.
सोढुम् सहन करून सह् धातू तुमून प्रत्यय
शक्नोति शकतो शक् धातू कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
युक्तः योगी युज् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
सुखी सुखिन् पु. प्र. ए. व.
नरः पुरूष नर पु. प्र. ए. व.
दोन माणसे एकत्र राहू लागली कि काहीना काही तरी भावनिक नाते निर्माण होणार मग ते प्रेम असेल, राग लोभ असेल नाहीतर द्वेष किंवा आसूया. ह्या सगळ्याला काही मर्यादा नसते. किंवा ती आपल्यालाच ठरवावी लागते. नाहीतर त्याचा आपल्याला त्रास होतो. आपले मन आणि शरीराची ताकद वाढवून कोणत्याही प्रसंगाला टक्कर देण्याची तयारी हवी. टक्कर देणे म्हणजे प्रत्युत्तर नव्हे तर आपले मन संतुलित ठेवणे. कोणत्याही त्रासदायक गोष्टींचा आपल्या शरीरावर परिणाम न होऊ देणे. (योगी हा असाच असतो.) आपल्यालाच हे करावे लागते कारण दुसरा व्यक्ती कसा विचार करेल कसा वागेल ते आपल्याला ठरवता येत नाही. श्रीभगवानकृष्ण आपल्याला ह्या श्लोकातून हेच सांगत आहेत. पतंजली योगसूत्र आणि श्रीमद्भगवद्गीता दोन्ही मधे मन आनंदी असावे, शांत असावे असा आवर्जून उल्लेख केला आहे. ह्या श्लोकात वेग हा शब्द वापरला आहे म्हणजे काम, क्रोधाचे प्रसंग पुन्हा पुन्हा घडू नयेत. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जो ह्या लोकांतच शरीर त्याग करण्यापूर्वी काम आणि क्रोध सहन करू शकतो तो खरा योगी आणि सुखी पुरूष होय.
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथन्तर्ज्योतिरेव यः।स योगी ब्रह्म निर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति।।5.24।।
यः अन्तःसुखः, अन्तर आरामः, तथा एव यः अन्तर्ज्योतिः, सः योगी ब्रह्म-भूतः ब्रह्म-निर्वाणम् अधिगच्छति
यः जो यद् पु. प्र. ए. व.
अन्तःसुखः स्वतः मध्ये सुख अन्तस्सुख पु. प्र. ए. व.
अन्तर आरामः आत्म्यामधेच रमणारा अन्तर आराम पु. प्र. ए. व.
रम् धातू रमणे.
तथा त्याप्रमाणेअव्यय
एव नक्कीच अव्यय
यः जो यद् पु. प्र. ए. व.
अन्तर ज्योतिः आत्मज्ञानी अन्तर ज्योति पु. प्र. ए. व.
सः तो तद् पु. प्र. ए. व.
योगी योगिन् पु. प्र. ए. व.
ब्रह्म-भूतः ब्रह्माशी जोडला गेलेला ब्रह्मन् भूत पु. प्र. ए. व.
ब्रह्म-निर्वाणम् मोक्ष ब्रह्म-निर्वाण नपु. द्वि. ए. व.
अधिगच्छति प्राप्त होते अधि+गम् धातू जाणे कर्तरि लट लकार प्र. पु. ए. व.
राम ह्या शब्दाच्या शाब्दिक कोटी बर्याच आहेत. जेथे रमावेसे वाटते तेथे राम असतोच. नाहीतर जगण्यात काही रामच उरत नाही.
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् । अभिरामस्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥रामरक्षा 16।।
जो कल्पवृक्षाच्या बागेसारखा आहे आणि सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आहे, जो तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर आहे, तोच राम आपला परमेश्वर आहे ॥16॥
आपल्याला 5 ज्ञानेन्द्रिये दिली आहेत ज्याच्या साह्याने आपण बाहेरील जग अनुभवू शकतो पण खरा आनंद तर आपल्या अंतरात्म्यात आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात सतत दुसर्याशी तुलना करून आपण आनंदी होतो.
ऋतम्भरा तत्र प्रज्ञा|| योगसूत्र। 1.48 ||
समाधि अवस्थेत मनुष्याला परम सत्याची अनुभूति मिळते.
जे ऐसेनि सुखें मातले। आपणपांचि आपण राहिले। ते मी जाने निखीळ ओतले समरस्याचे। ज्ञानेश्वरी 5.137।।
जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झाले आहेत, ते पूर्णपणे सामरस्याचे (ब्रह्मैक्य भावाचे) ओतलेले पुतळेच आहेत.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
ज्याचे सुख बाह्य विषयावर अवलंबून नसून आत्मस्वरूपात तो सुखी असतो, आत्मचिंतन हीच विश्रांती, आत्मसाक्षात्काराने तो उजळून निघतो, तो ब्रह्माशी एकरूप तादात्म्य पावलेला, जणू काही मोक्ष प्राप्त करून घेतो.
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः। छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः।।5.25।।
क्षीण-कल्मषाः छिन्न-द्वैधाः यत्-आत्मानः सर्व-भूतहिते रताः ऋषयः ब्रह्म-निर्वाणम् लभन्ते
क्षीण-कल्मषाः सर्व पापे नष्ट झाली आहेत असा क्षीण-कल्मष पु. प्र. ब. व.
क्षी धातू क्षीण होणे
छिन्न-द्वैधाः सर्व संशय मिटले आहेत असा (दुविधा छाटल्या गेल्या.)
छिन्न-द्वैध पु. प्र. ब. व.
यत्-आत्मानः आत्मसाक्षात्कारी, संयमीत यत्-आत्मन् पु. प्र. ब. व.
सर्व-भूतहिते सर्वांच्या हितासाठी सर्व-भूतहित पु. स. ए. व.
रताः रमतात रम् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ब. व.
ऋषयः ऋषि पु. प्र. ब. व.
ऋष् धातू जाणे
ब्रह्म-निर्वाणम् मोक्ष ब्रह्म-निर्वाण नपु. द्वि. ए. व.
लभन्ते प्राप्त होतात लभ् धातू कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ब. व.
5व्या अध्यायातील 24. 25. 26 ह्या श्लोकात निर्वाण हा शब्द आला आहे (तसेच तो 2.72 आणि 6.15 मध्ये पण आलेला आहे). निर्वाण शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला हवा.
निर +वाण वा वाहणे
नि म्हणजे वेगळे होणे,
(निर्वात, निरिच्छ निर्दोष वगैरे )
जो वाहतो तो वायू,
सर्व वायूंचे वाहणे थांबले.
निर्वात म्हणजे दिव्यातील वात संपणे
निर्वात म्हणजे वारा सुद्धा नाही म्हणजे जिथे कांहीच नाही अशी पोकळी. Vacuum. Barometer मधे पाऱ्याच्या वर असते तशी. ती पोकळीच असते हा सिद्धांत Torricelli नं मांडला. म्हणून vacuum measurement साठी torr टॅार हें युनिट आहे. समुद्रसपाटीपासून barometer मधे पारा ७६ सें.मी. इतका असतो. जितके वर जाऊं तितकी पाऱ्याची उंची कमी म्हणजे निर्वातता अधिक.
पांडव स्वर्गारोहण करत असताना, ठराविक उंचीवर गेल्यावर युधिष्ठिर सांगतो “इथून पुढे संवाद बंद, आत्मकेंद्रित रहायचं” हिमालयात जाऊन साधना करण्यामागे हेच रहस्य असूं शकतं.
निर्वाण हा शब्द फक्त गीतेत नाही तर बौद्ध, जैन धर्मातील साहित्यात आला आहे. निर्वाण चा साधारण अर्थ मोक्ष, मुक्ति. तात्विक अर्थ आत्मा आणि ब्रहमतत्वाची सांगड जैन तत्वज्ञानाप्रमाणे आत्म्याची मुक्ति. बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाप्रमाणे सर्व इच्छां पासून मुक्त, पुनर्जन्मापासून मुक्ति. ग्रंथसाहिबा मध्ये निर्बाण असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुद्धा मुक्ती.
सर्वात शेवटी निर्वाण षटकम्
ज्यामध्ये 6 श्लोक आहेत. जेव्हा आदि शंकराचार्य आपल्या गुरुंना प्रथम भेटले त्यावेळी त्यांनी स्वतः ची ओळख ह्या 6 श्लोकातून सांगितली.
यम आणि नियम ह्यामधील फरक सुद्धा समजून घ्यायला हवा.
यम म्हणजे स्वतःहून पाळण्याचे जीवनशैली जसे सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अपरिग्रह वगैरे. नियम हे तयार केलेले असतात. जसे वाहतुकीचे नियम.
आधीच्या श्लोकात ब्रह्माशी एकरूप झालेला योगी आत्मस्वरूपातच सुखी असतो असे वाचले. म्हणजे त्याची वासना आणि अहंकार नष्ट झाले आहेत, त्यांना पराकोटीची शांती लाभली आहे. ते फक्त दुसर्याच्या कल्याणाचाच विचार करतात. त्यांची सर्व पापे नष्ट झाली आहेत. अशाप्रकारे ज्यांच्या संकल्प विकल्पांचा उच्छेद झाला आहे ते ऋषी.
ऋषींचे चढत्या क्रमाने सात प्रकार पडतात. राजर्षी, कांडर्षी, श्रुतर्षी, परमर्षी. देवर्षी, महर्षी आणि ब्रह्मर्षी.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
ज्यांचे मन शरीर आत्मा बुद्धि नियमबद्ध झाले आहेत, सर्व संशय नष्ट झाले आहेत, ज्यांची पापे पूर्ण नष्ट झाली आहेत. जे दुसर्यांच्या हितामधेच सुख मानतात त्यांना निर्वाण ब्रह्म प्राप्त होते.
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्। अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्।।5.26।।
काम- क्रोध-वियुक्तानाम् यत-चेतसाम् विदित -आत्मनाम् यतिनाम् अभितः ब्रह्म-निर्वाणं वर्तते ।
काम- क्रोध-वियुक्तानाम् काम क्रोधापासून मुक्त काम- क्रोध-वियुक्त नपु. ष. ब. व.
वि+युज् धातू क्त प्रत्यय
यत-चेतसाम् मन जिंकले आहे असा यत-चेतस् नपु. ष. ब. व.
चित् धातू विचार करणे
विदित-आत्मनाम् परमात्म्याचा साक्षात्कार झालेला विदित-आत्मन् पु. ष. ब. व.
यतिनाम् ज्ञानी पुरूषांचे यति पु. ष. ब. व.
अभितः सर्वबाजूंनी अव्यय
ब्रह्म-निर्वाणं मोक्ष ब्रह्म-निर्वाण नपु. द्वि. ए. व.
वर्तते परीपूर्ण आहे वृत धातू असणे कर्तरि लट लकार आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
निर्वाण शब्दाचा अर्थ आपण आधीच्या श्लोकात समजून घेतला. ह्या अध्यायातील 2र्या श्लोकात कर्मयोग श्रेष्ठ असून सामान्य माणसाला करण्याजोगा आहे असे म्हटले तर 3 र्या श्लोकात कर्मयोगी ची व्याख्या सांगितली आहे. आपले मन सर्वस्वी आपल्या स्वाधीन ठेवून म्हणजे यतचेतसाम् असा, फक्त परमार्थाचा विचार करणार्याने कर्म केले काय किंवा न केले काय ते सदैव ब्रह्मसुख च अनुभवतात. त्याला आत्मज्ञान झाले आहेच. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वरांनी आत्मानुभव लिहिला.
अशा योगी साठी राग लोभ आता उरलेच नाहीत.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
ज्यांचे मन पूर्णतः ताब्यात आहे आणि ते वासना आणि क्रोधापासून मुक्त आहेत अशा ज्ञानी ला नेहमीच शाश्वत आनंद लाभतो.
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः। प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ।।5.27।।
बाह्यान् स्पर्शान् बहिः कृत्वा, एव चक्षुः भ्रुवोः अन्तरे कृत्वा, नास-अभ्यन्तर-चारिणौ प्राण-अपानौ समौ च
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः।।5.28।।
यः यत-इन्द्रिय-मनः-बुद्धिः, मोक्ष-परायणः विगत-इच्छा-भय-क्रोधः, सः मुनिः सदा मुक्तः एव ।
बाह्यान् बाहेरील बाह्य पु. द्वि. ब. व.
स्पर्शान् स्पर्श पु. द्वि. ब. व.
बहिः बाहेर अव्यय
कृत्वा करून कृ धातू क्त्वा प्रत्यय
एव सुद्धा अव्यय
चक्षुः डोळे चक्षुस् नपु. द्वि. ए. व.
भ्रुवोः भुवयां भ्रु स्त्री. ष. द्वि. व.
अन्तरे मधे अन्तर नपु. स. ए. व.
कृत्वा करून कृ धातू क्त्वा प्रत्यय नास-अभ्यन्तर-चारिणौ नाकपुड्यांमधे वहन नास-अभ्यन्तर-चारिन् पु. द्वि. द्वि . व.
अभि+अन्त् धातू बांधणे +र
चर् धातू जाणे
प्राण-अपानौ श्वास उच्छ्वास
प्राण-अपान पु. द्वि. द्वि . व.
समौ समान सम पु. द्वि. द्वि . व.
च सुद्धा अव्यय
यः जो यद् पु. प्र. ए. व.
यत-इन्द्रिय-मनः-बुद्धिः संयमित इन्द्रिय, मन बुद्धि यत - इन्द्रिय-मनस्-बुद्धि स्त्री. प्र. ए. व.
मोक्ष-परायणः मुक्ती साठी बद्ध
मोक्ष-परायण पु. प्र. ए. व. विगत-इच्छा-भय-क्रोधः कामना भीती राग त्यागलेला विगत-इच्छा-भय-क्रोध पु. प्र. ए. व.
वि+गम् धातू जाणे
सः तो तद् पु. प्र. ए. व.
मुनिः मुनि पु. प्र. ए. व.
सदा नेहमी अव्यय
मुक्तः मुक्त मुच् धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.
एव सुद्धा अव्यय
आधीच्या श्लोकात आपण कर्मयोगी ने आपल्या प्रयत्नांनी साध्य केलेल्या निर्वाण अवस्थेबद्दल वाचले आता ह्या आणि पुढील श्लोकात ध्यानयोगावर विवेचन केले आहे. योगाभ्यासाने आपल्या मनावर ताबा मिळवता येतो. 5 वा अध्याय उपनिषद् ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र ह्यावर आधारित आहे. यज्ञभोक्तामहापुरुषमहेश्वरः असे नाव आहे ह्या अध्यायाचे. योगाभ्यास आणि प्राणायाम करणार्यांना हा श्लोक चांगलाच मनाला भावेल.
स्पर्श आपल्या हाताने होतो असे आपल्याला वाटते पण तो नाकाद्वारे गंध, जीभेद्वारे रस आणि कानाद्वारे शब्दांचा आणि अर्थात डोळ्याने रंग आणि रुप असा सुद्धा होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या इन्द्रियांद्वारे आपल्या मनाला स्पर्श होत असतो. आपण जेव्हा ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा डोळे मिटून बाह्य जगाशी संपर्क थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण डोळे मिटून घेतले तरी आपल्याला दिसत असतेच. त्याला कारण आपले मन. सर्व काही आपल्या मनावर अवलंबून असते. अगदी जागेपणी सुद्धा आपले लक्ष नसेल तर शेजारच्या माणसाचे बोलणे ऐकू येत नाही. अगदी सहजपणे आपण म्हणतो, माझे लक्ष नव्हते परत सांग.
मुक्तीचे 5 प्रकार सांगितले जातात. सालोक्य, सार्ष्टि, सारूप्य, सामीप्य और सायुज्य. पण ह्या सर्व मृत्यू नंतर च्या गोष्टी आहेत. आपण त्याचा विचार ह्या श्लोकात करत नाही आहोत. योगाभ्यासाने परमात्म्याशी एकरूप होता येते हे ह्या श्लोकात प्रामुख्याने सांगितले आहे.
सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रूपल्लवां पडे गांठी ।
तेथ पाठिमोरी दिठी । पारखोनियां ॥ ज्ञानेश्वरी 5. 152॥
इडा, पिंगळा व सुषुम्ना या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाफ होतो तेथे दृष्टि स्थिर करून मागे (जे दिसते तेच ब्रह्म) पहावे.
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम । चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती ॥ ज्ञानेश्वरी 5.153॥
उजव्या (पिंगळा) व डाव्या (इडा) नाकपुडीतून जात येत असलेल्या वायूची गति (रेचक व पूरक) बंद करून (म्हणजे कुंभक करून) प्राण (हृदयस्थ वायु) व अपान (गुदस्थ वायु) यांचे ऐक्य करून त्यासह चित्तास ते व्योमगामी (म्हणजे मूर्ध्नी आकाशाकडे जाणारे) करतात.
ह्या दोन श्लोकांचा थोडक्यात अर्थ असा की
मनावर ताबा मिळवायचा असेल तर डोळे बंद करून आपल्या दोन भुवयांच्या मध्ये दृष्टी ठेवून आपला श्वास आणि उच्छ्वास समान ठेवून, श्वासामूळे निर्माण होणारा ध्वनी (स्पर्श) ऐकण्याचा प्रयत्न करायचा. अशाप्रकारे (ध्यानयोगाचा अभ्यास करुन)
मन आणि बुद्धी ह्यावर ताबा मिळवलेला मुनी इच्छा भिती राग हे सर्व त्यागून मोक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू करतो तो नेहमी मुक्त असतो .
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्। सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।5.29।।
यज्ञ-तपसाम् भोक्तारम् सर्व-लोक-महेश्वरम् सर्व-भूतानाम् सुहृदम् माम् ज्ञात्वा शान्तिम् ऋच्छति।
यज्ञ-तपसाम् यज्ञ तपांचा यज्ञ-तपस् नपु. ष. ब. व.
भोक्तारम् लाभधारक भोक्तृ पु. द्वि. ए. व.
सर्व-लोक-महेश्वरम् सर्व लोकांचा महान ईश्वर सर्व-लोक-महत् ईश्वरम् पु. द्वि. ए. व.
सर्व-भूतानाम् सर्व सजीवांचे सर्व-भूत पु. ष. ब. व.
सुहृदम् सुहृद पु. द्वि. ए. व.
माम् मला अस्मद् द्वि. ए. व.
ज्ञात्वा जाणून ज्ञा धातू क्त्वा प्रत्यय
शान्तिम् शान्ति स्त्री. द्वि. ए. व.
ऋच्छति प्राप्त होते ऋ धातू शतृ प्रत्यय पु. स. ए. व.
5व्या अध्यायातील हा शेवटचा श्लोक. आधीच्या श्लोकात ध्यानयोगावर भाष्य केले होते. त्याला ज्ञानाची जोड असायला हवी. आपण एखादी गोष्ट ज्याला देतो तो त्याचा उपभोग घेतो असे म्हणतो. परमेश्वराचा अंश प्रत्येकामध्ये आहे म्हणजे आपण दिलेल्या दानाचा परमेश्वरच भोक्ता आहे.
तमीश्वरानां परमं महेश्वरं तम देवतानां परमं च दैवतम्। श्वेताश्वतर उपनिषद 6.7।।
आपण ईश्वरांचे ईश्वर, आणि सर्व देवतांचे देव आहात.
धुर् धातू+टाप्=धूरा म्हणजे भार वाहणे
धुर+यत् =धुर्य म्हणजे बैल
मराठीत धूरा वाहणे म्हणजे जबाबदारी घेणे.
जर आपण बैलगाडीत ओढत घेऊन जाणार्या बैलांचे निरीक्षण केले तर बरेचदा गाडीवान निवांत गाडीत बसलेला असतो आणि बैल सहजपणे चालत असतो. बैलाला कोठे जायचे आहे ते चांगले माहीत असते. महादेवाच्या देवळात नंदी एकटक पिंडी कडे पहात असतो. ते एकाग्रता आणि स्वामीनिष्ठेचे प्रतिक आहे.
भोक्ता यज्ञ-तपांचा मी सोयरा विश्व-चालक । जाणूनि ह्यापरी माते शांतीस वरिला चि तो ॥ गीताई 29॥
परमात्म्याला विश्वाचा बैल असे मानले तर त्याच्या वर विश्वास ठेवून आपण निवांत रहायचे. तो आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवणार आहे.
एकदा ही समजूत पक्की झाली की परम शांतीचा लाभ होतो. आधीच्या श्लोकात आपण ध्यान योगाने मिळणार्या शांती बद्दल वाचले आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला हेच सांगत आहेत.
ते असे म्हणतात की
मला यज्ञ आणि तपांचा लाभार्थी, सर्व लोकांचा महान ईश्वर सर्व जीवांचा शुभचिंतक असे समजून घेतले की शांती मिळेल.
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः । हरिः ॐ तत् सत् ।।
अशा प्रकारे शाश्वत परमसत्य उपनिषद् ब्रह्मविद्या जाणण्याचा श्रीभगवानकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद असलेल्या कर्मसंन्यासयोग नावाचा पाचवा अध्याय समाप्त होत आहे.
---------------------🙏🙏🙏🙏---------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा