ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।
चार वेदांपैकी एक यजुर्वेद, ह्या वेदाच्या दोन शाखा आहेत. कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद.
शुक्ल यजुर्वेद ला वाजसनेय असेही म्हणतात कारण ते वाजसेनाने रचले, त्याला सूर्यामुळे प्राप्त झाले म्हणून ते शुक्ल यजुर्वेद. ह्याच्या अंतर्गत दोन उपनिषदे येतात.
ईशावास्योपनिषद आणि बृहदारण्यक.
ईशावास्योपनिषद सर्वात लहान आणि बृहदारण्यक नावाप्रमाणेच सर्वात मोठे.
शुक्ल यजुर्वेदाचा 40 वा अध्याय म्हणजे ईशावास्योपनिषद.
ईशावास्य-वृत्ति ह्या ग्रंथात
आचार्य विनोबा भावे छांदोग्य उपनिषदाचा दृष्टांत देऊन उपनिषद ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करतात.
यदा वै बली भवति,
अथ उत्थाता भवति,
उत्तिष्ठन् परिचरिता भवति,
परिचरन् उपसत्ता भवति, उपसीदन् द्रष्टा भवति,
श्रोता भवति,
मन्ता भवति,
बोद्धा भवति,
कर्त्ता भवति,
विज्ञाता भवति।
(छांदोग्य उपनिषद् 7.8.1)
जेव्हा मनुष्य दृढ़-संकल्प योजतो तेव्हा तो गुरुची सेवा करण्यासाठी उठून उभा राहतो,
गुरु ची श्रद्धा पूर्वक सेवा करतो. नंतर तो
गुरु च्या जवळ जाऊन बसतो.
उप =जाऊन बसतो
नि =निष्ठा पूर्वक
सद्-गुरुजींचे आचरण आत्मसात करतो
गुरुवाणी ध्यान पूर्वक ऐकतो, त्यांच्या उपदेशाचे
मनन करतो आणि
तदनुसार आचरण करतो.
त्यानंतर त्याला
(वि)ज्ञान प्राप्त होते.
थोडक्यात आत्मबल उत्थान ब्रह्मचर्य गुरू सानिध्य सेवा निरीक्षण श्रवण मनन अवबोधन आचरण आणि अनुभूती.
ईशावास्य च्या शांतीपाठातच ब्रह्म च्या पूर्णत्वाची मांडणी केली आहे. वर दिलेला शांती मंत्र नीट समजून घेतल्यास परत ईशावास्योपनिषद वाचणे म्हणजे केवळ औपचारिकता. ह्या शांती मंत्राला महावाक्य असेही म्हणतात. असे महावाक्य जे सुरवातीपासूनच अस्तित्वात आहे, फक्त आपण ते आतापर्यंत वाचलेले नाही.
ह्या शांती मंत्राचा ढोबळ मानाने अर्थ पाहिला तर गणिती सिद्धान्तांच्या पूर्ण विरूद्ध. तो सूक्ष्मातूनच समजून घ्यायला हवा. कारण ब्रह्म विषयी अमूल्य असे ज्ञान ह्यामधे सांगितले आहे.
भारतीय दर्शनांमधे तीन प्रकारचे ताप सांगितले आहेत.
1. आधिभौतिक ताप : जे अन्य भूत म्हणजे अन्य जीवांपासून उत्पन्न होते, जसे सर्पदंश
2. आधिदैविक ताप : पंचमहाभूतांच्या प्रकोपाने निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे जसे वादळ, भूकंप, त्सुनामी इत्यादी.
3. आध्यात्मिक ताप : जे स्वत:च्याच शरीर किंवा मनाद्वारे प्राप्त होते.
शांती मंत्राच्या शेवटी तीन वेळा ॐ शांतिः शांतिः शांतिः असे म्हणण्याची पद्धत आहे. सर्व प्रकारच्या तापांची शांती होवो. हा जप शरीर, मन आणि आत्म्याच्या शांतीसाठी जपला जातो. आपला भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ शांतीमय असावा अशी त्यामागे भावना आहे. अजून एक भूमिका अशी कि हा शांती मंत्र आपण स्वतःसाठी, आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी आणि विश्वासाठी जपायचा आहे.
ॐ
पूर्णम् अदः ते पूर्ण अदस् नपु प्र. ए. व.
पूर्णम् इदम् हे पूर्ण इदम् नपु. प्र. ए. व.
पूर्णात् पूर्णातून पूर्ण पं. ए. व.
पूर्णम् पूर्ण पूर्ण द्वि. ए. व.
उदच्यते बाहेर पडते उद्+अञ्च धातू जाणे
पूर्णस्य पूर्णाचे पूर्ण ष. ए. व.
पूर्णम् पूर्ण
आदाय काढून घेतले आ+दा धातू देणे +ल्यप् प्रत्यय
पूर्णम् पूर्ण
एव फक्त
अवशिष्यते शिल्लक राहते अव+शिष् धातू आत्मनेपदी प्र. पु. ए. व.
संस्कृत मध्ये 'हे 'आणि 'ते ' असे सांगताना त्याचे अंतर सांगण्यासाठी निरनिराळे शब्द आहेत.
हे अगदी जवळचे (मन)(एतद्)
हे थोडे जवळचे (पुस्तक)(इदम्)
हे जरा लांबचे (इमारत )(अदस्)
दृष्टिआड असलेले (तद्)
(संदर्भ श्लोक-इदमस्तु सन्निकृष्टे समीपतरवर्ति चैतदो रुपम्।अदस्तु विप्रकृष्टे तदिति परोक्षे विजानीयात्॥)
श्लोकांमधे आशय सांगताना असे चपखल शब्द वापरलेले असतात. ॐ शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल. ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
सत् चित आनंद परब्रह्म स्वरूप संपूर्ण आहे आणि हे दृश्य जग सुद्धा संपूर्णच आहे. संपूर्णातून संपूर्ण निर्माण होते, तेही संपूर्ण च आहे. संपूर्णातून संपूर्ण वजा केलं तरी संपूर्णच शिल्लक राहते.
ह्या अर्थाच्या साह्याने जननक्षमतेच्या विज्ञानाचे स्पष्टीकरण देता येईल. आई आपल्या बाळाला जन्म देते ते बाळ संपूर्णच असते. आई पासून दूर झालेले बाळ संपूर्णच राहते.
'ॐ' उत्पति च्या आधी पूर्ण होता. उत्पत्ती नंतरही पूर्ण च आहे.
--------------------------🙏🙏🙏----------------------
वा!! अप्रतिमच👍 मला बऱ्यापैकी हा श्लोक आणि अर्थ माहित होता पण त्याही पुढचे बरेच शिकायला मिळाले.
उत्तर द्याहटवाधन्यवाद अनघा👍
खूप छान!
उत्तर द्याहटवा