गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

श्रीमद्भगवद्गीता 3रा अध्याय

 गीतेच्या 3 र्या अध्यायाचे नाव कर्मयोग असे असून त्यामध्ये 45 श्लोक आहेत.


अर्जुन उवाच


ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन।

तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव।।3.1।।

अर्जुन उवाच - हे जनार्दन! बुद्धिः कर्मणः ज्यायसी ते मता चेत्‌, तत्‌ हे केशव! माम्‌ घोरे कर्मणि किम्‌ नियोजयसि ?

अर्जुन उवाच - अर्जुनाने विचारले 

 हे जनार्दन! हे श्रीकृष्णा

 बुद्धिः बुदधि

 कर्मणः कर्मन् कामापेक्षा 

 ज्यायसी ज्यायस् श्रेष्ठ 

 ते मता असे मानतात 

चेत्‌ जर 

 तत्‌ तर

हे केशव! 

माम्‌ मला 

घोरे भयंकर 

कर्मणि कर्म 

किम्‌ का

 नियोजयसि ? आज्ञा देणे 

 नि +योजसि युज् धातू लागू करणे

अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण युद्ध भूमीवर उभे आहेत

अर्जुन श्रीकृष्णाला विचारत आहे

जर कर्मा पेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग तू मला हे भयंकर युद्ध का करायला भाग पाडत आहेस?

—-------------—------------------------------------------------

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे।

तदेकं वद निश्िचत्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्।।3.2।।

व्यामिश्रेण इव वाक्येन मे बुद्धिं मोहयसि इव। तत्‌ एकं निश्चित्य वद, येन अहम्‌ श्रेयः आप्नुयाम्‌।व्यामिश्रेण व्य +आ +मिश्र 

व्य व्यापून गेलेले 

 इव वाक्येन असे वाक्य 

 मे बुद्धिं माझी बुद्धि 

मोहयसि इव। मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे 

तत्‌ तद् ते 

एकं 

निश्चित्य 

वद, सांग 

 येन यद् ज्यामुळे 

अहम्‌ मी 

 श्रेयः श्रेयस अधिक चांगले 

 आप्नुयाम्‌। आप् धातू मिळणे 


दुसर्या अध्यायात कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, बुद्धि योग आणि आत्मज्ञान ह्या वरील विवेचन ऐकल्यानंतर अर्जुन गोंधळून गेला आहे. विशेषतः कर्म योग आणि ज्ञानयोग ऐकल्यानंतर. कारण क्षत्रियाचा धर्म तर लढण्याचा, म्हणुनच अर्जुन पुढे असे म्हणतो

कृष्णा तुझ्या अशा सरमिसळ वाक्यामुळे माझी बुद्धि भ्रमित झाली आहे, म्हणून तू ठोस असे काही तरी सांग ज्यामुळे माझ्या समजुतीत अजून स्पष्टता येईल.

--------------------------------------------------------

श्री भगवानुवाच


लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ।

ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्।।3.3।।

श्रीभगवानुवाच - हे अनघ! अस्मिन्‌ लोके द्विविधा निष्ठा मया पुरा प्रोक्ता साङ्ख्यानाम्‌ ज्ञान-योगेन, योगिनाम्‌ कर्म-योगेन ।

श्रीभगवानुवाच - 

हे अनघ! अ+नघ निष्पाप 

 अस्मिन्‌ लोके ह्या इहलोकात 

द्विविधा द्वि विधा विध् धातू नियम करणे, विधान करणे 

निष्ठा नियम श्रद्धा 

मया माझ्या कडून 

पुरा पूर्वीच 

प्रोक्ता समजावणे 

 प्र उक्त वच् धातू बोलणे 

साङ्ख्यानाम्‌ साडःख्य योग 

ज्ञान-योगेन, झानाने 

योगिनाम्‌ योगींचे 

 कर्म-योगेन कर्मा ने 

आधीच्या श्लोकात अर्जुनाने जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे आता श्री भगवान देत आहेत. 

ते म्हणतात 

हे निष्पाप अर्जुना 

माझ्या कडून पूर्वीच लोकांना मोक्षप्राप्तीचे दोन मार्ग सांगून झाले आहेत. ज्यांना ज्ञानप्राप्तीची ओढ लागलेली आहे त्यांच्या साठी (साख्यांना) ज्ञानयोग. आणि जे कर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्या साठी कर्मयोग.

----------------------------------------------------------

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते।

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति।।3.4।।

 

पुरुषः कर्मणाम्‌ अनारम्भात्‌ नैष्कर्म्यं न अश्नुते। न च संन्न्यसनात् एव सिद्धिम्‌ समधिगच्छति।

पुरुषः माणूस 

कर्मणाम्‌ कर्माचे 

 अनारम्भात्‌, न आरम्भात् 

 नैष्कर्म्यं निष्कर्म, कर्म रहीत 

 न 

अश्नुते प्राप्त होणे 

 अश्न धातू खाणे 

 न च आणि नाही 

संन्न्यसनात् सम +न्यसनात्

सम +नी +अस् त्याग करणे 

एव 

सिद्धिम्‌ सिद्धि 

समधिगच्छति सम अधि गच्छति प्राप्त होणे 

आता ह्या श्लोका पासून श्रीभगवानांनी कर्मयोग उलगडून सांगायला सुरवात केली आहे.

पहिल्या ओळीत कर्मयोग्यासाठी सल्लावाचक सूचना आणि दुसर्‍या ओळीत ज्ञानी माणसासाठी सूचना.

कर्मयोग समजावून घेताना कर्म म्हणजे काय ह्याची कल्पना स्पष्ट असायला हवी. जगण्यासाठी आवश्यक जे करावे लागते ते कर्म.

जगणे म्हणजे काय?

ईशा वास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्‌।

तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्‌ ॥ ईशावास्योपनिषद 1

कर्मयोगीने जर कर्म करण्याचा आरम्भच केला नाही (प्रत्यक्ष कृती नाही पण मनात विचार चालूच आहेत) तर त्याला कर्मा पासून मुक्ति मिळाली असे नाही.

आणि जर ज्ञानी माणसाने (ज्याने ज्ञानार्जनाचा मार्ग स्वीकारला आहे असा) कर्म करायचे सोडून दिले म्हणून त्याची लक्ष्य पूर्ती होणार नाही. (त्याला ज्ञान प्राप्त करावेच लागेल). 

------------------------------------------------

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ।

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ 3.5।।

पाचव्या अध्यायातील 4था श्लोक वाचल्यानंतर आता 3 र्या अध्यायातील 5 वा श्लोक चा अर्थ समजून घेणे जास्त आवडेल.

ह्यातील पाहिल्या ओळीचा अर्थ सरळ सोपा आहे. 

कश्चित क्षणं अपि न हि जातु अकर्मकृत।

18 व्या अध्यायातील 48 व्या श्लोका प्रमाणे कोणतेच कर्म हे निर्दोष नसते आणि 3 र्या अध्यायातील 4 थ्या श्लोका प्रमाणे कर्म हे करावेच लागेल, कर्माचा त्याग केला म्हणून सिद्धि प्राप्त होणार नाही आणि कर्माचा आरंभ केला नाही म्हणून नैष्कर्म्य प्राप्त होणार नाही. आणि आता भगवान् असेही सांगत आहेत की कर्म तर कोणालाच चुकलेले नाही. असा एकही क्षण नाही जो मनुष्याचा कर्म केल्या वाचून जात नाही.

आता दुसर्‍या ओळीत खरी मेख आहे.

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः।

ह्यवशः=हि+अवशः

वश करणे म्हणजे ताब्यात ठेवणे. Control करणे.

कार्यते म्हणजे केले जाते.

कर्म ताब्यात ठेवले जाते कसे तर


सर्व प्रकृतिजैः गुणैः।

म्हणजेच प्रकृति (निसर्ग) च्या नियमानुसार.

ह्याचा थोडक्यात अर्थ असा की आपण जे कर्म करतो, ते आपल्याला करणे भागच असते कारण ते सर्व निसर्ग नियमानुसार चालू असते. त्यातून आपली मुळीच सुटका नाही. 

वश ह्या शब्दावरून कोणता मराठी शब्द /गाणे आठवते बरे.? 

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला... 

ह्या गाण्यामध्ये कवीच्या भावना थेट हृदयापर्यंत पोहोचतात. 

अशाच अर्थाचे दुसरे गाणे 

पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा..

यावर पुन्हा भगवान् असेही सांगून मोकळे होतात

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः।

आपण जे कर्म करतो त्यावर प्रभूंचा काहिच प्रभाव नाही बरं. 😀

----------------------------------------------

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्।

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते।।3.6।।

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन।

कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते।।3.7।

गीते तील एकएक श्लोक म्हणजे आपल्या मानवी स्वभावाचे कंगोरे उलगडून तर दाखवतानाच आपल्याला उपदेश सुद्धा देतात.

6वा श्लोकात आस्ते हे क्रियापद आहे

आ+अस=आस धातू आसन ग्रहण करणे

स्मरन् =स्मृ धातू स्मरण करणारा

मनसा स्मरन्= मनात स्मरण करणारा

कशाचे स्मरण चालू आहे?

आपल्याला 5 कर्मेन्द्रिय दिली आहेत, त्याचा संयम जरी बाळगला असला तरी मनात मात्र त्याचेच विचार चालू आहेत.

इंद्रिय +अर्थाः+मूढ +आत्मा

मिथ्य +आचारः

येथे आत्मा म्हणजे मन असा अर्थ घेतला की सर्व काही स्पष्ट होते.

आपले मन हे सुद्धा एक इंद्रियच आहे. आपल्या मनाच्या आदेशानुसारच आपण कृती करत असतो.

जर आपले मन आणि आपण करत असलेली कृती ह्याचा ताळमेळ नसेल तर त्याचा अर्थ आपण फसवत असतो स्वतः ला ही आणि दुसर्‍यांना ही. 

मिथ्य आचरण करणारा म्हणजेच खोटारडा माणूस. 

आपण आपल्या मनाशी प्रामाणिक असले पाहिजे असे म्हणतात तेच हे. 

आता पुढचा श्लोक आपल्याला कर्म योगाचा एक धडा शिकवून जातो. 


यस्त्विन्द्रियाणि = यः तू इंद्रियाणि 

मनसा

 नियम्यारभतेऽर्जुन=नियम्य +आरभते 

कर्मेन्द्रियैः

कर्मयोगमसक्तः =कर्मयोग +आसक्तः

तू विशिष्यते=वि +शिष 

शिष म्हणजे पारखणे 

विशिष =विशेष पारखून घेणे 

शिष वरुन शिष्य शब्द आला आहे. 

पूर्वीच्या काळी सर्व शिष्य काही एकाच तुकडीत बसून एकच अभ्यासक्रम शिकत नसत. तर गुरु प्रत्येक शिष्याची पारख करुन त्याच्या कुवतीप्रमाणे शिकवत असत जसे अर्जुनाला धनुर्विद्या, भीमाला गदायुदध वगैरे.

तर अशा प्रकारे जेव्हा आपण आपल्या इंद्रियांवर आपल्या मनाने निर्बंध घालतो (नियम घालून देतो) आणि आपले कर्म करतो तो..... 


दोन श्लोकातील फरक नीट लक्षात घ्या.

आधीच्या श्लोकात जरी कृती करणे चालू नसले तरी त्या बद्दल चे विचार मनात चालूच होते.

7व्या श्लोकात कृती चालू ठेवायची आहे पण मन मात्र आसक्त आहे.

न सक्तः

सज, सज्ज (सज्ज होणे म्हणजे मनाची पूर्ण तयारी असणे) मन त्यात गुंतलेले असणे.

असक्त म्हणजे मन अजिबात गुंतलेले नसणे.

ह्या शब्दाची थोडी वेगळी छटा जो शब्द आपण हिंदी भाषेत ऐकतो.

सक्त आदमी, सक्त ताकीद

म्हणजे आता कोणतीही सूट नाही.

Fully dedicated, fully focused.

अर्जुनाची आणि पक्षाच्या डोळ्याची गोष्ट तर माहित आहेच आपल्याला

कर्णाची गोष्ट सुद्धा तशीच. आपल्या गुरुची झोपमोड होऊ नये म्हणून त्याला चावलेला विंचू त्याच्या मनापर्यंत पोहोचलाच नाही तो फक्त आपले कर्तव्य करत राहिला.

तो.... विशेष कर्म योगी असतो (विशिष्यते)

-------------------------------------------------------

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः।

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः।।3.8।।

गीते मध्ये काही श्लोक खूप विचार करायला लावणारे आहेत पण काही श्लोक हे रोजच्या जीवनात सहज मार्गदर्शक ठरतात.

जसा हा श्लोक.

जीवन यात्रा हा शब्द आपण सहज वापरतो, ह्या श्लोकात शरीर यात्रा असा शब्द वापरला आहे.

कठोपनिषद् मध्ये शरीर यात्रा चा उल्लेख आहे.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।

बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ।।

(कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, मंत्र ३)


इंद्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान् ।

आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः ।।

(कठोपनिषद्, अध्याय १, वल्ली ३, मंत्र ४)

तुमच्या जीवनरथाचा तुम्ही स्वामी आहात आणि शरीर हा रथ असून, तुमची बुद्धी तुमचा रथ हाकते आहे आणि मन हा लगाम आहे.

दशरथ म्हणजे 10 घोड्यांचा रथ म्हणजेच 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेन्द्रिय असणारे शरीर.

आता मूळ श्लोकाचा अर्थ पाहू.

नियतं =नि+यम (धर्म म्हणजे duty) नियमाप्रमाणे चालणारी ती नियती.

सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत्।

सर्वारम्भा हि दोषेण धूमेनाग्निरिवावृताः।।18.48।।

सहज समोर आलेले कर्म जरी सदोष असले तरी त्याचा त्याग करायचा नाही (न त्यजेत्) कारण जेथे अग्नि असतो तेथे धूर निर्माण होतोच.  

म्हणूनच 

कर्म ज्यायो ह्यकर्मणः

कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे (जायस आहे) केव्हाही चांगले. 

आता दुसर्‍या ओळीतील 

 प्रसिद्ध्येदकर्मणः 

हा शब्द थोडा गमतीशीर, थोडा बोचरा सुद्धा जेव्हा आपण तो शरीरयात्रा ह्या शब्दाशी जोडून घेतो. 

प्र +सिद्ध् म्हणजे सिद्ध होणे. 

प्रसिद्धे अकर्मणः 

म्हणजे आपल्या शरीरयात्रेचे कर्म न केल्यामुळे प्रसिद्ध न होवो. 

आजकाल आपला सर्व नियम झुगारून जीवन जगण्याकडे कल दिसून येतो जसे कधीही उठायचे, कधीही झोपायचे, काहीही कितीही खायचे प्यायचे. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. आजकाल साध्या साध्या गोष्टी लठ्ठपणा मुळे लोकांना करणे अवघड जाते, सहाजिकच ते कुचेष्टेचा विषय होतात. रामायणात फक्त कुंभकर्णाला अशी कुप्रसिद्धी मिळाली होती. 

थोडक्यात नियमानुसार आपला आहार विहार ठेवून, आपली कुचेष्टा होऊ देऊ नका असेच सांगायचे आहे असे वाटते.

---------------------------------------------------

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः।

तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर।।3.9।।

आपण आधीच्या भागात कर्म म्हणजे काय ते वाचले आता पुढे. 


प्रत्येक माणूस जन्माला आला की काहीना काही तरी कर्म करणारच. कालांतराने त्याला त्या कर्माचा मोह होऊ लागतो. त्या कर्माची संगत त्याला आवडायला लागते. मग अशा कर्माला यज्ञ म्हणायचे का?

कारण यज्ञ केल्यावर तर आहुती देण्याची पद्धत आहे आणि

इदं न मम असे म्हणण्याची पद्धत आहे.

मग कर्म आणि यज्ञ ह्या दोन्हीचा अर्थ कसा काय बरे समजून घ्यावा.

आपले तुकाराम महाराज त्यांच्या 12 अभंगात तर जन्मा विषयी असे म्हणतात

जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥

पापपुण्य करूनी जन्मा येतो प्राणी । नरदेही येऊनी हानी केली ॥ २ ॥.

म्हणजे आधीच्या जन्मी पाप पुण्ययाचा हिशोब पूर्ण झाला नाही म्हणून हा जन्म घ्यावा लागला. आणि माणूस कर्म बंधनात अडकला. जर आपल्याला मागचे राहिलेले दुःखच भोगायचे आहे तर मग आपण सुखाचा शोध का बरे घेतो?

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः।

यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयं कर्मबन्धनः

अन्यत्र म्हणजे ना अत्र ना तत्र, ना इथे ना तिथे.

जेथे यज्ञ चालू आहे असे कर्म बंधनकारक असत नाही.

अन्यत्र कर्म मात्र बंधनकारक असते.

एखादे कर्म काही विशिष्ट हेतू ठेवून केले असेल तर तो यज्ञ. जसे स्वातंत्र्या साठी क्रांती.

ह्या साठी स्वतः ची आहुती सुद्धा द्यावी लागेल पण ते सर्व हसत हसत करायचे कारण इदं न मम. आहुती देणे म्हणजेच स्वतः चा अहंकार जाळून टाकणे. दान दिलेल्या द्रव्यावर आपले नाव उरत नाही म्हणजेच ते बन्धन मुक्त होते.

म्हणून अर्जुना तू असे कर्म कर जे

मुक्तसडःगः समाचरः असेल

सम +आ+चर

सडःग= सज सन्ज्य म्हणजे मिळून जाणे

मुक्तसंगः म्हणजे संगत सुटणे.

म्हणजेच ह्याचा थोडक्यात अर्थ असा की

अर्जुना तू जेव्हा यज्ञ कर्म करशील तेव्हा तुझी अहंकाराची संगत संपलेली असेल असे सम्यक आचरण तू ठेव.

-------------------------------------------

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः।

अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्।।3.10।।

पुरोवाच 

पुरा +उवाच, पूर्वीच सांगितलेले

सृष्ट्वा सृज निर्माण केलेली (प्रजा)

कशी निर्माण केली? सहयज्ञाः म्हणजे यज्ञासहीत

यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ आपण पूर्वीच समजून घेतला.

यज्ञ म्हणजे विशिष्ट हेतूने केलेले कर्म. Activation of energy.

यज्ञ करताना आहुती द्यावी लागते. यज्ञ कोणी केला? 

सह यज्ञेन अनेन प्रजापतिः (विष्णू)

थोडक्यात

प्रजापती नी यज्ञ करुन सृष्टि निर्माण केली (आणि काय सांगितले?)

प्रसविष्यध्वं, अशी प्रसूती होत राहू देत.

एषः वः अस्ति इष्टकामधुक्

इष्ट इच्छति

धूक दुह धातू म्हणजे दोहन करणे दूध काढण्याची क्रिया 

कामधुक कामधेनु

प्रजोत्पादन हा यज्ञ असाच पुढे चालू राहू दे

म्हणजेच सृष्टिचे कायम अस्तित्व राहू देत.

ह्या एका वाक्यात बर्‍याच गोष्टी चा विचार मांडला आहे.

विशेषतः ह्या कोरोना काळात आपले आरोग्य, त्यासाठी आवश्यक असणारे अन्न धान्य, प्रदूषण मुक्त वातावरण, स्वच्छ पाणी आणि हवा ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असतील तरच ही सृष्टी अबाधित राहू शकते.

-------------------------------------------------------

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः।

परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ।।3.11।।

आधीच्या श्लोकातील Ecological thought पुढे नेणारा विचार ह्या श्लोकात सांगितला आहे

वरकरणी पहायला गेलो तर थोडासा गंमतीशीर विचार पण आजच्या शास्त्रीय युगात आपल्याच कर्माचा पुनः विचार करायला लावणारा. आपण जर असेच वागत राहिलो आणि भगवान आपल्या समोर अवतरले तर ते आपल्याला असेच म्हणतील.

पहा मी आधीच सांगितले होते तुम्हाला..

आपण संतांना देवासमान मानतो कारण देव म्हणजे आदर्श ( ideal) असेल तर संतांचे वागणे आदर्शवादी असते. भारतीय संस्कृति नेहमीच आपल्याला विनम्रता शिकवते. आपल्याला तारुन नेणारी पंचमहाभूते जसे पर्जन्य, पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश ह्यांच्या परी कृतज्ञता व्यक्त करताना आपण त्यांना देवता मानतो.

 देवान् भावयत भावयन्तु अनेन ते देवाः वः

भावयत, भावयन्तु, भू भाव, भावुक होणे

देव भावाचा भुकेला.

आजच्या capitalism च्या युगात आपल्याला नैसर्गिक संपत्ती ओरबाडून घेण्याची सवय झाली आहे. त्याचे परीणाम सुद्धा दिसायला लागले आहेत जसे Climate Change. वेळीअवेळी पडणारा पाऊस, बदलते हवामान. आपण निसर्गापुढे खरे तर नतमस्तक असले पाहिजे, पण आपल्या निष्ठाच बदलल्या.

ह्या श्लोकात नेमके हेच सांगितले आहे.

परस्परं भावयन्तः म्हणजे तुम्ही देवतांचा आदर करा त्यांच्या विषयी मनात भाव असू द्या.

(देव दिव धातू दिव्यत्त्व म्हणजेच ज्ञान) असा विनम्र भाव 

त्यांच्या मनात तुमच्याविषयी भावुकता ठेवतील.

आणि असे परस्परांविषयी भाव (concern) ठेवल्याने काय होइल? 

परम श्रेयः अवाप्यसथ

अव +आप आप्नोति म्हणजे मिळवणे.

आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ह्या सृष्टिचा परम (उच्च) स्तर गाठला जाईल.

म्हणजेच उच्च दर्जाचा निसर्ग आपल्याला भरभरुन (श्रेय) देईल.

--------------------------------------------------------------

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः।


तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः।।3.12।।

आधीच्या श्लोका मध्ये यज्ञ म्हणजे काय ह्या बददल लिहिले होते

भोजन हे सुद्धा एक यज्ञकर्म, त्यामागे शेतकरी दादांचे धान्य उगवण्या साठी घेतलेले कष्ट, त्यांना निसर्गाने दिलेली साथ आणि भोजन तयार करण्यासाठी केलेले प्रयत्न सर्व काही विचारात घेतले आहे.

असे विविध प्रकारचे यज्ञ आपल्याकडून केले जात असतात तेव्हा आपले आयुष्य पुढे जात राहते.

अग्नि चा शोध आणि अग्नि निर्माण करण्याची क्षमता हा मानवी आयुष्यतील मैलाचा दगड ठरला. 

यज्ञ म्हणजे activation of energy 

5 प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत

१) देवयज्ञ

2) पितृयज्ञ

3) भूतयज्ञ

4) मनुष्ययज्ञ

5) ब्रह्मयज्ञ

भोजन करण्याचा मुख्य हेतू शरीरात उर्जा निर्माण करणे म्हणजेच आपले जीवन चालू ठेवणे. 

यज्ञ म्हणजे प्रगती. आपल्या ईष्ट देवतांना (पंचमहाभूते) प्रसन्न करून घेण्याची संधी. 


येन सदनुष्ठानेन सम्पूर्णविश्वं कल्याणं भवेदाध्यात्मिकाधिदैविकाधिभौतिकतापत्रायोन्मूलनं सुकरं स्यात् तत् यज्ञपदामिधेयम्।


हे सर्व करताना आपण देवतांना काही अर्पण करत असतो. 

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।

देवाला पान फूल फळ काहीही दिले तरी आवडते 

पंचमहाभूतांनी दिलेल्या गोष्टी आपण त्यांना परत देत असतो का? तर ते तसे नाही. आपण त्यांच्या ऋणांची उतराई करत असतो. त्यामागचा भाव महत्वाचा.. 

देव भावाचा भुकेला 

दहि भाताची ऊंड़ी लावीन तुज तोंडी 

अगदी शबरीची उष्टी बोरे सुद्धा चालतात.

इष्टान् भोगान् हि वः देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः

असे देवतांकडून मिळालेले दान (ज्याच्या मूळे आपले आयुष्य सुखकर होते) ज्याचा फक्त उपभोग घेतला 


तैः दत्तान् अप्रदाय एभ्यः यः भुङ्क्ते स्तेन एव सः

अप्रदाय म्हणजे परत न करणे

स्तेन म्हणजे चोर


आणि जर त्याची काही परतफेड केली नाही तर असा तो चोर असतो.

--------------------------------------

यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः।


भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्।।3.13।।

बारावा श्लोकाचा अर्थ समजून घेतल्यानंतर 13 व्या श्लोकाचा अर्थ खूपच सोपा आहे. 

यज्ञशिष्टाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः

भुञ्जते ते तु अघं पापाः ये पचन्ति आत्मकारणात्  

देवाचा प्रसाद तर आपण आवर्जून घेतोच पण देवाला दाखवलेल्या नैवेद्याच्या ताटातील भोजन करणे हा एक मान समजतात. 

यज्ञशिष्टाशिनः यज्ञात शिष्टम आशिन 

शिष् धातू शिल्लक राहिलेले 

शिष् धातू चा अजून एक अर्थ वेगळे करणे, शिष्य 

प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार शिक्षण देणे 

अश्नाति सेवन करणे 

आशिष आशिर्वाद 

असे यज्ञशिष्ट जे सेवन करतात ते सन्त असतात. 

सत् सत्य जो सत्य वागतो तो सन्त. 

सर्वकिल्बिषैः मुच्यन्ते 

सन्त पापरहित होतात.

आत्मकारणात् म्हणजे आत्मा हेच जगण्याचे कारण 

ये पचन्ति 

आपण म्हणतो ना

खाण्यासाठी जगणे (फक्त उपभोग घेणे)

पचन्ति म्हणजे अन्न शिजवणे 

ते पापाः अघं भुन्जते

अघं म्हणजे पाप

फक्त स्वतःच्या मतलबाचा विचार करणारे असे पापी, ते पापच (प्रसाद नाही) खात असतात.

---------------------------------------------------

अन्नाद्भ‍वन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।

यज्ञा‍द्भ‍‍वति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भ‍वः ॥ 3.१४ ॥

भूतानि अन्नात्‌ भवन्ति, अन्न-सम्भवः पर्जन्यात्‌, पर्जन्यः यज्ञात्‌ भवति, यज्ञः कर्मसमुद्भवः।


ह्या अध्यायातील 10 व्या श्लोकात यज्ञाचा तात्विक अर्थ आपण पाहिला. तोच अर्थ इथे सुद्धा अभिप्रेत आहे. 11 आणि 12 व्या श्लोकांचा अर्थ मनात ठेऊन हा श्लोक वाचला कि अर्थ लगेचच समजतो.

भूतानि प्राणीमात्र

अन्नात्‌ भवन्ति अन्नामुळे होतात. (अन्नावर वाढतात)

अन्न-सम्भवः पर्जन्यात्‌ धनधान्य पावसामुळे तयार होऊ शकते

पर्जन्यः यज्ञात्‌ भवति यज् धातू प्रार्थना करणे प्रार्थनेमूळे पर्जन्यवृष्टी होते 

यज्ञः कर्मसमुद्भवः.  

सम उद्भवः उत् +भू उत्पन्न होणे यज्ञ आपल्या कर्मातून (कर्तव्यातून) निर्माण होते.

खरेतर हा श्लोक पर्यावरण शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासायला हव्या. निसर्गाचे नियमच जणू ह्या श्लोकात सांगितले आहेत. वातावरणात होणारे बदल आणि प्रदूषण टाळण्यासाठी करावे लागणारे परिश्रम ह्यांना यज्ञ मानले तर हा यज्ञ आपल्या कर्तव्यभावनेतूनच निर्माण होतो.

-------------------------------------------------------

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्।

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।।3.15।।

कर्म ब्रह्म-उद्भवं विद्धि, ब्रह्म अक्षर-समुद्भवम्‌, तस्मात्‌ सर्वगतं ब्रह्म यज्ञे नित्यं प्रतिष्ठितम्‌।

मागच्या श्लोकात यज्ञ करण्याचे प्रयोजन पाहिले, त्या बद्दल जास्तीची माहिती इथे सांगितली आहे.

आपल्या चार वेदांत माणसाची कर्तव्ये सांगितली आहेत. वेदांना अपौरुषेय मानतात. जगातील सर्वात प्राचीन वाड्मय जे ईश्वरकृत आहे 


अस्य महतो भूतस्य निश्वसितमेतद् य इग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथ्वङ्गिरस इतिहासः पुराणं विद्या उपनिषद इल्यादि । कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्।

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।।3.15।।

कर्म ब्रह्म-उद्भवं विद्धि, ब्रह्म अक्षर-समुद्भवम्‌, तस्मात्‌ सर्वगतं ब्रह्म यज्ञे नित्यं प्रतिष्ठितम्‌।

मागच्या श्लोकात यज्ञ करण्याचे प्रयोजन पाहिले, त्या बद्दल जास्तीची माहिती इथे सांगितली आहे.

आपल्या चार वेदांत माणसाची कर्तव्ये सांगितली आहेत. वेदांना अपौरुषेय मानतात. जगातील सर्वात प्राचीन वाड्मय जे ईश्वरकृत आहे 

अस्य महतो भूतस्य निश्वसितमेतद् य इग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथ्वङ्गिरस इतिहासः पुराणं विद्या उपनिषद इल्यादि ।

बृहदारण्यक उपनिषद् 4.5.11


म्हणजेच वेदांमध्ये स्वतः ईश्वरानेच माणसांसाठी यम नियम सांगितले आहेत आणि ते अशा प्रकारे सांगितले आहेत की आपला प्रापंचिक धर्म निभावता निभावता त्याची अध्यात्मिक उन्नती होईल. ह्या सर्वांचे मूर्त स्वरूप म्हणजे यज्ञ.


कर्म ब्रह्म-उद्भवं ब्रह्मा पासून निर्माण झालेले (सांगितलेले) कर्म 

विद्धि विद् धातू माहीत करुन घे 

ब्रह्म -समुद्भवम्‌, सम उद्भवम् ब्रह्मा पासून निर्माण झालेले 

अक्षर क्षी धातू नष्ट होणे अक्षर कधीही नष्ट होत नाही 

 तस्मात्‌ सर्वगतं सगळीकडे व्यापलेला 

ब्रह्म 

यज्ञे यज्ञकर्म 

नित्यं प्रतिष्ठितम्‌ शाश्वत असा स्थापन झाला आहे.


ब्रह्मा पासून निर्माण झालेले कधीच नष्ट न होणारे सर्वव्यापी यज्ञकर्म ब्रह्मा ने व्यापून टाकले आहे.

------------------------------------------------------------

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः।

अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति।।3.16।।

हे पार्थ! यः इह एवं प्रवर्तितम्‌ चक्रम्‌ न अनुवर्तयति, अघायुः इन्द्रिय-आरामः सः मोघम्‌ जीवति।

हे पार्थ

यः इह जो इथे 

प्रवर्तितम्‌ चक्रम्‌ 

प्र +वृत् धातू प्रवृत्त होणे 

प्रवर्तितम्‌ चक्रम्‌ पायंडा पडणे

न अनुवर्तयति 

अनु +वृत् अनुसरण करणे

अघायुः पापी आयुष्य 

इन्द्रिय-आरामः भोगी विलासी जीवन 

सः तो 

मोघम् मुह् मोघ बुद्धि भ्रष्ट होणे

जीवति जीव धातू जगणे

(15 व्या श्लोकात सांगितल्या प्रमाणे ईश्वराने जे काही नियम सांगितले आहेत ज्यामुळे त्याची अध्यात्मिक उन्नती होऊ शकेल)

हे अर्जुन जो मनुष्य अशा प्रकारे पायंडा घालून दिलेल्या पद्धतीचे अनुसरण करत नाही त्याचे जीवन दोषयुक्त आहे, भोगवादी आहे म्हणूनच व्यर्थ आहे.

---------------------------------------------------------------

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः।

आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते।।3.17।।

यः मानवः तु आत्म-रतिः एव, आत्म-तृप्तः च, आत्मनि एव सन्तुष्टः च स्यात्‌ तस्य कार्यम्‌ न विद्यते।

 तु यः मानवः आत्म-रतिः पण जो माणूस स्वतः मधे आनंदी असतो 

 रम् धातू आनंदी असणे

आत्म-तृप्तः च, आत्म समाधानी 

आत्मनि एव सन्तुष्टः स्वतः मधे संतुष्ट 

च 

स्यात्‌ आहे 

तस्य कार्यम्‌ त्याचे कार्य 

 न विद्यते। असत नाही 

विद् धातू अस्तित्व असणे

आधीच्या श्लोका मध्ये वेदांत सांगितलेले नियम ज्यामुळे आत्मिक उन्नति होण्यास मदत होते त्याची माहिती घेतली.

आता आत्मिक उन्नति झाली आहे. असा योगी ईश्वरामधे रममाण झाला आहे म्हणजेच त्याला आत्यंतिक सुखाची प्राप्ति झाली आहे. मग आता त्याला नियम पाळण्याची काय गरज? जसे लहान मूल शाळेत जात असते तेव्हा ते शाळेचे नियम पाळत असते. शाळेतून बाहेर पडल्यावर त्या नियमांची काही गरज नसते. असाच काहीसा प्रकार.

जो माणूस स्वतः मधेच संतुष्ट आहे, (बाहेरील जगाचा आता त्याच्यावर काही परिणाम होत नाहीये) त्याच्या साठी आता कोणतेच कर्म, कर्तव्य उरलेले नाही.

------------------------------------------------------

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन।

न चास्य सर्वभूतेषु कश्िचदर्थव्यपाश्रयः।।3.18।।

तस्य इह कृतेन न कश्चन अर्थः, न अकृतेन एव च, न अस्य सर्व-भूतेषु कश्चित्‌ अर्थ-व्यपाश्रयः।

तस्य त्याचे

इह

 कृतेन कृत कर्माने 

न कश्चन अर्थः

न अकृतेन एव च,कश्चित्‌ अर्थ-

न अस्य सर्व-भूतेषु 

व्यपाश्रयः भरवसा असणे 

व्यपा +श्री धातू , श्रयः आश्रय घेणे

वि +अप +आ

असा आत्मिक उन्नति झालेल्या माणसाला त्याचे कर्म करण्यात काही हेतू नसतो, कर्म केले नाही म्हणून सुद्धा काही फरक पडत नाही. असा माणूस (कर्म केले काय किंवा न केले काय) दुसर्‍या कोणावर अवलंबून सुद्धा नसतो.

-----------------------------------------------------------

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर।

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः।।3.19।।

तस्मात्‌ सततम्‌ असक्तः कार्यम्‌ कर्म समाचर, हि असक्तः कर्म आचरन्‌ पूरुषः परम्‌, आप्नोति

तस्मात्‌ म्हणुन

सततम्‌ सतत

असक्तः अंतर ठेवून असणे 

सञ्ज् धातू जवळीक असणे 

कार्यम्‌ कर्म

 समाचर सम आचर कार्यान्वित असणे 

 चर म्हणजे चालणे 

 कर्म आचरन्‌ काम केल्यावर 

हि असक्तः गुंतून न पडता 

पूरुषः 

परम्‌, श्रेष्ठ 

आप्नोति प्राप्त होते 

(ह्या श्लोकात काही शब्द परत परत आले आहेत. आधीच्या श्लोका पेक्षा थोडे विषयांतर पण वाटते आहे )

म्हणुनच आपले कार्य आपण त्यात गुंतून न पडता करायचे, असे अलिप्त राहून (प्रसिद्धीपासून लांब) केलेल्या कामाने मनुष्याला श्रेष्ठत्व प्राप्त होते.

---------------------------------------------------------

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः।

लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि।।3.20।।

जनक-आदयः कर्मणा एव संसिद्धिम्‌ आस्थिताः। हि लोक-संग्रहम्‌ सम्पश्यन्‌ अपि कर्तुम्‌ अर्हसि एव।

जनक-आदयः जनक आणि इतर 

कर्मणा एव कामाने सुद्धा 

कर्मन् काम

संसिद्धिम्‌ चोख काम होणे 

सिद्धि सिध् धातू सिद्ध होणे

आस्थिताः आ +स्थित स्था धातू स्थापित करणे 

हि म्हणुन 

लोक-संग्रहम्‌ लोकांचा सहभाग, पाठिंबा 

सम्पश्यन्‌ विचारात घेऊन 

अपि 

कर्तुम्‌ अर्हसि एव।

अर्ह् धातू पात्रता असणे स्वतः ला कामाने पात्र करणे

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

जनक आणि इतर राजांनी आपल्या कर्मयोगातून सिद्धि प्राप्त केली तू सुद्धा असे काम करून आदर्श निर्माण केला पाहिजेस आणि लोकांचा विश्वास प्राप्त केला पाहिजे.

----------------------------------------------------

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।3.21।।

श्रेष्ठः यत्‌ यत्‌ आचरति इतरः जनः तत्‌ तत्‌ एव । सः यत्‌ प्रमाणम्‌ कुरुते, लोकः तत्‌ अनुवर्तते।

ह्या श्लोकात नेता किंवा सामान्य माणसाने ज्याचे अनुकरण करावे अशा व्यक्ती बद्दल भाष्य केले आहे.

अर्थ अगदी सरळ सोपा आहे.

श्रेष्ठः यत्‌ यत्‌ आचरति

इतरः जनः 

तत्‌ तत्‌ एव । (आचरति) 

सः यत्‌ प्रमाणम्‌ कुरुते, 

लोकः तत्‌ अनुवर्तते।

ज्या ज्या गोष्टी (ज्याप्रमाणे) आदरणीय लोक करतात, आचरणात आणतात, त्या त्या प्रमाणे इतर लोक (सामान्य लोक) अनुकरण करत असतात. अशा प्रकारे थोर लोकांचे कर्म प्रमाण मानून लोकही तसेच करत असतात.

----------------------------------------------------

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन।

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि।।3.22।।

हे पार्थ! मे त्रिषु लोकेषु किञ्चन कर्तव्यम्‌ न अस्ति, अवाप्तव्यम्‌ अनवाप्तम्‌ न कर्मणि एव च वर्ते ।

कर्म आणि अकर्म ह्या दोन्ही मधील फरक आपण आधीच्या श्लोकात समजावून घेतला आहेच. साक्षात श्रीभगवान स्वतः च्या कर्मा बद्दल बोलत आहेत 

हे पार्थ! 

मे मला 

त्रिषु लोकेषु तिन्ही लोकांत 

किञ्चन किम् चन काहीतरी, काही

कर्तव्यम्‌ न अस्ति, जबाबदारी (बंधन) नाही 

 अवाप्तव्यम्‌ अव् धातू प्राप्त होणे

 न अनवाप्तम्‌ 

अनवाप्तव्यम् = न अवाप्तव्यम् - नञ्तत्पुरुषः

कर्मणि एव च 

वर्ते वृत् धातू व्यस्त असणे बांधून घेणे

हे पार्थ

माझ्यासाठी तिन्ही लोकांत करण्यासाठी कोणतेही कर्तव्य नाही ना मला काही (स्वतः साठी) साध्य करायचे आहे. तरीसुद्धा मी माझ्या कामात व्यस्त असतो.

हा श्लोक 4.17 आणि 7.6 असे एकत्र वाचले तर छान समजतील.

-------------------------------------------------------------

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः।

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः।।3.23।।

मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते। हे पार्थ यदि जातु अहं हि अतन्द्रितः कर्मणि न वर्तेयम्‌..

हे पार्थ अर्जुना, 

मनुष्याः सर्वशः (सर्वशस्) माणसे सर्व प्रकारे 

मम वर्त्म (वर्त्मन्) मी घालून दिलेला मार्ग 

अनुवर्तन्ते। अनुसरण करणे 

अनु +वृत् धातू प्रवृत्त होणे, 

यदि जर 

जातु कोणत्याही वेळी 

अहं हि 

अतन्द्रितः अ + तन्द्रितः अविरत 

तन्द्रित आळशी 

कर्मणि कर्तव्ये 

 न वर्तेयम्‌ न भवेयम्

ह्या श्लोकात श्रीभगवान स्वतः च्या कर्तव्यांबद्दल बोलत आहेत.

त्यांनी स्वतः मनुष्य जन्म घेऊन आपले कार्य करुन लोकांसमोर धडा घालून दिला.

ते अर्जुनाला सांगताहेत

जर मी माझ्या कामात आळशीपणा केला तर लोक सुद्धा जे मी घालून दिलेल्या मार्गावर चालतात (त्यांचे खूप नुकसान होईल)

ह्या श्लोकाचा अर्थ 24 व्या श्लोका बरोबर जोडून वाचायला लागेल

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्।

सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः।।3.24।।

अहम्‌ कर्म न कुर्याम्‌ चेत्‌ इमे लोकाः उत्सीदेयुः, सङ्करस्य कर्ता च स्याम्‌ इमाः प्रजाः उपहन्याम्‌ ।

अहम्‌ मी 

चेत्‌ जर

कर्म न कुर्याम्‌ काम केले नाही 

  इमे लोकाः सर्व लोक 

उत्सीदेयुः, उद् +सद् नाश होणे 

सद् धातू शक्तीहीन होणे 

सङ्करस्य सङ्कर मिश्रण गोंधळात टाकणारे 

कर्ता च 

स्याम्‌ अस् धातू 

इमाः प्रजाः हे लोक 

उपहन्याम्‌ उप +हन्

मी जर माझे कार्य केले नाही तर ह्या लोकांचे अपरिमित हानी होईल, लोक नष्ट भ्रष्ट होतील आणि मीच ह्यांच्या नाशाला कारणीभूत असेन.

-------------------------------------------------------------

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत।

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्िचकीर्षुर्लोकसंग्रहम्।।3.25।।

हे भारत! कर्मणि सक्ताः अविद्वांसः यथा कुर्वन्ति, असक्तः विद्वान्‌ लोक-संग्रहम्‌ चिकीर्षुः तथा कुर्यात्‌।

हे भारत! अर्जुना 

कर्मणि काम 

सक्ताः ओढ आपुलकी 

अविद्वांसः अज्ञानी लोक 

यथा कुर्वन्ति, जसे करतात 

असक्तः विद्वान्‌ 

लोक-संग्रहम्‌ 

चिकीर्षुः कर्तुमनाः (कर्तुम् इच्छुः) इच्छा असणे 

तथा कुर्यात्‌। तसेच करावे 

3.20 लोकसडःग्रह हा शब्द येऊन गेला आहे.

कर्म आणि अकर्म ह्यांच्या संकल्पना स्पष्ट आहेत.

त्यामुळे अर्थ खूपच सोपा आहे.

अर्जुना 

अज्ञानी लोक आपले काम हेतूपुरस्सर (श्रेयाची अपेक्षा ठेऊन) करतात मात्र ज्ञानी लोकांनी, लोकांचे हित मनात ठेऊन (म्हणजे लोक आपोआपच पाठिंबा देतील) निःस्वार्थीपणे आपले काम केले पाहिजे.

----------------------------------------------------------

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्।

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान् युक्तः समाचरन्।।3.26।।

युक्तः विद्वान्‌ कर्म-सङ्गिनाम्‌ अज्ञानाम्‌ बुद्धि-भेदम्‌ न जनयेत्‌ समाचरन्‌ सर्व-कर्माणि जोषयेत्‌।

युक्तः विद्वान्‌ ज्ञान युक्त असा विद्वान 

 कर्म-सङ्गिनाम्‌ कामाशी जोडला गेलेला 

जनयेत्‌ जन् धातू 

अज्ञानाम्‌ न जाणणारा 

अ +ज्ञ धातू जाणणे 

न बुद्धि-भेदम्‌ बुद्धि भेद करू नये (मनात गोंधळ निर्माण करू नये) 

समाचरन्‌ सम +आचरण 

सर्व-कर्माणि

 जोषयेत्‌ 

जुष् धातू आदर्श घालून देणारे काम करणे

आदर्श मार्गदर्शक कसा असावा ह्याचे वर्णन ह्या श्लोकात सांगितले आहे.

प्रत्येक व्यक्तिची बुद्धि, विचार करण्याची कुवत कमी जास्त असते म्हणूनच एखादा दिशा दाखवणारा असतो आणि बाकीचे त्या मार्गाने जाणारे.

अगदी युद्धात सुद्धा अर्जुनाला युद्ध करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला पण ते त्याने सैनिकांसमोर हे उघड केले असते तर त्यांच्या मनाचा गोंधळ उडाला असता.

म्हणून श्रीभगवान असे सांगत आहेत की

ज्ञानी पुरुषांनी आपल्या कामातून नेहमीच सामान्य लोकांसमोर आदर्श घालून दिला पाहिजे. त्यांच्या मनात कोणताही संशय निर्माण न करता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

------------------------------------------------------

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः।

अहङ्कारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते।।3.27।।


कर्माणि सर्वशः प्रकृतेः गुणैः क्रियमाणानि अहङ्कार-विमूढ-आत्मा 'अहम्‌' कर्ता इति मन्यते।


कर्माणि कर्म 

सर्वशः सर्व प्रकारेण 

 प्रकृतेः गुणैः प्रकृतीच्या वैशिष्ट्यानुसार 

क्रियमाणानि कृ धातू लट लकार करत असतात

 अहङ्कार-विमूढः आत्मा 

अहङ्कारेण विमूढः अहंकाराने गर्विष्ठ झालेला आत्मा 

'अहम्‌' कर्ता मीच कर्ता 

इति मन्यते मन् धातू समजणे असे समजतो 

ह्या श्लोकात श्रीभगवान माणसांच्या दुर्गुणांबद्दल विवेचन करत आहेत.

खरेतर आपापल्या प्रकृति नुसार गुणांनुसार तीन भागात वर्गीकरण केले आहे सात्विक रज आणि तामसी गुण. ह्या गुणांप्रमाणेच आपले स्वभाव विशेष, शारीरिक वैशिष्ट्ये दिसून येतात..

प्रत्येक जण आपल्या प्रकृती नुसार कर्म करत असतो पण आपल्या बुद्धि ला जडलेल्या अहंकारामुळे त्याला तो स्वतः कर्म करतो असे वाटते. (आपल्यातील प्राकृतिक गुणांना श्रेय देणे नाकारतो).

-------------------------------------------------------

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः।

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते।।3.28।।

हे महाबाहो! गुण-कर्म-विभागयोः तत्त्ववित्‌ तु 'गुणाः गुणेषु वर्तन्ते' इति मत्वा न सज्जते।

हे महाबाहो! 


तत्त्ववित्‌ तत्वम् वेत्ति 

विद् धातू जाणतो

कोणते तत्व? 

गुण-कर्म-विभागयोः गुणाः, कर्माणि च 

तु पण 

 'गुणाः गुण 

गुणेषु गुणांमध्ये 

वर्तन्ते' असतात

वृत् धातू असणे 

 इति मत्वा असे मानून

 मन् धातू समजणे 

न सज्जते सज् धातू सज सञ्ज् संग जडणे 

आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन

पराक्रमी अर्जुना! (11.46 सहस्रबाहो, 11.16 अनेकबाहो) 

ह्या उलट ज्ञानी माणसे जे सत्य जाणतात (ज्यांचा अहंकार गळून पडला आहे) 

(4.13 गुणकर्मविभागशः

अंगभूत असणारे गुण आणि कामाची विभागणी हे आपण वाचले आहे)

( त्रिगुण, मन, बुद्धि, अहंकार, पाच कर्मेंद्रिय, पाच ज्ञानेन्द्रिय ह्या सर्वांमुळे प्रकट होणारे गुण. कर्म म्हणजे ह्या सर्व घटकांनी एकत्र येऊन घडू शकते ते काम.) 

ह्या सर्व घटकांमध्येच गुण दडलेले असतात हे ज्ञानी माणसांना पक्के माहीत असते ते ह्या सर्वामध्ये अडकून पडत नाहीत. 

जो कराई सो हरी कराई.. कबीर.

----------------------------------------------------------

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु।

तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्।।3.29।।


प्रकृतेः गुण-सम्मूढाः गुण-कर्मसु सज्जन्ते, अकृत्स्नविदः तान्‌ मन्दान्‌ कृत्स्नवित्‌ न विचालयेत्‌।

कृत्स्नवित्‌ ज्ञानी 

कृत्स्नम् वेत्ति सर्वकाही जाणणारा 

अकृत्स्नविदः अज्ञानी

न विचालयेत्‌ (न भ्रमयेत्) भ्रमित करू नये 

प्रकृतेः गुण-सम्मूढाः 

प्रकृतेः नैसर्गिक 

गुण-सम्मूढाः 

सम्मूढाः सम +मूढ मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे 

गुण-कर्मसु गुणांनुसार केलेले कर्म 

सज्जन्ते सज्ज् धातू जवळीक असणे 

तान्‌ ते (लोक) 

मन्दान्‌ मन्दबुदधि, फारशी समज नसलेले 

मागील श्लोकात ज्ञानी पुरुषाचे वैशिष्ट्य सांगितल्यानंतर ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाला कसे हाताळावे ह्या बद्दल मार्गदर्शन केले आहे. 

सर्वसामान्य माणसे आपल्या अंगभूत असलेल्या गुणांमुळे जे काही कर्म करतात त्यावरच फिदा असतात,( पण ज्ञानी माणसांना मात्र त्यातील सत्य माहीत असते) (अर्धवट ज्ञान धोकादायकच) अशा लोकांना ज्ञानी माणसांनी अजिबात विचलित करू नये. (थोडक्यात त्यांच्या कलाकलाने, कुवतीनुसार त्यांना ज्ञान देत जावे असे म्हणायचे असेल).

--------------------------------------------------------

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा।

निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः।।3.30।।

अध्यात्म-चेतसा मयि सर्वाणि कर्माणि संन्न्यस्य निराशीः निर्ममः विगत-ज्वरः भूत्वा, युध्यस्व।

युध्यस्व युदध् कर 

युदध् धातू मध्यम पुरूष लोट लकार

अध्यात्म-चेतसा अध्यात्मचेतस् 

आत्मन् स्वतः शी निगडीत 

(त्वं त्यां न॑ इन्द्र देव चि॒त्रामिष॒मापो॒ न पी॑पय॒: परि॑ज्मन् । यया॑ शूर॒ प्रत्य॒स्मभ्यं॒ यंसि॒ *त्मन॒मूर्जं॒* न वि॒श्वध॒ क्षर॑ध्यै ॥ ऋग्वेद 1.63.8) 

त्मन् म्हणजे स्व, श्वास 

चित् धातू विचार करणे 

मयि मला 

सर्वाणि कर्माणि सर्व कर्म 

संन्न्यस्य आपले नाही असे 

सम +नि +अस्

 निराशीः नि रसः आवड इच्छा रहित

 निर्ममः निः मम् मी पणा गळून पडला आहे असा

विगत- लांब जाणे 

वि गत गम धातू जाणे 

ज्वरः

 भूत्वा होऊन 

 भू धातू होणे. 

मी होतो म्हणून इतके तरी करू शकलो. 

मी होते म्हणून निभावले... प्रत्येक वेळी आपण आपला ठसा उमटवायचा प्रयत्न करत असतो. ही अशी स्वतःची ओळख म्हणजेच आपला अहंकार. 28, 29 व्या श्लोकांत ज्ञानी माणसाला उमगलेले सत्य सांगून झाल्यावर श्रीभगवान तेच सत्य अर्जुनाला स्वतः मधे उतरवायला सांगत आहेत. 

तू युद्ध कर पण कसे? 

तुझ्या विवेकी बुद्धीने स्वतः चा अहंकार आणि आकांक्षा बाजूला ठेवून, मनाचे सर्व आजार बाजूला ठेवून, तुझी सर्व कर्तव्य मला अर्पण करून तू युद्ध कर. 

(मी फक्त निमित्तमात्र, कर्ता करविता तोच)

-------------------------------------------------------------------

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः।

श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः।।3.31।।


ये मानवाः अनसूयन्तः श्रद्धावन्तः मे इदम्‌ मतम्‌ नित्यम्‌ अनुतिष्ठन्ति, ते अपि कर्मभिः मुच्यन्ते।

ये मानवाः जी माणसे 

अनसूयन्तः अनसूयात् आक्षेप घेणे 

सू धातू प्रेरित करणे 

श्रद्धावन्तः श्रद्धावान 

मे मम माझे 

इदम्‌ हे

मतम्‌ मते 

नित्यम्‌ सततम् 

अनुतिष्ठन्ति, सुरू ठेवणे

अनु +स्था 

ते अपि त्यांना सुद्धा 

कर्मभिः कामापासून 

मुच्यन्ते मुच धातू मुक्ति मिळणे. 

सर्व मोहमायांपासून तटस्थ राहून अहंकार विरहित कर्म केल्यास काय घडते ते सांगणारा हा श्लोक.

ह्या श्लोकात मतम् हा शब्द महत्त्वाचा वाटतो.

प्रत्येकाला आपले स्वतःचे मत असते ते इतरांपेक्षा वेगळे असू शकते. इथे श्रीभगवान सुद्धा आपले मत (विचार) सांगत आहेत. (म्हणजे त्यांच्या मतापेक्षा वेगळे मत असू शकते हे त्यांना मान्य आहे, असा विचार करता येईल)इथे तत्व, नियम, ब्रह्मवाक्य असे शब्द महर्षि व्यासांनी वापरायचे टाळले आहेत

आधीच्या श्लोकात श्रीभगवान अर्जुनाला समर्पित भावनेने कर्म करायला सांगत आहेत, पण मग ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी काय करावे?

(गीतेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात)

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा

जे लोक श्रद्धापूर्वक, निशंक मनाने माझ्या शिकवणीचे अनुसरण करतात तेसुद्धा त्यांच्या कर्मबन्धनातून मुक्त होतात.

—-----------------------------------------------------

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्।

सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः।।3.32।।

ये तु अभ्यसूयन्तः मे एतत्‌ मतम्‌ न अनुतिष्ठन्ति, तान्‌ अचेतसः सर्व-ज्ञान-विमूढान्‌ नष्टान्‌ विद्धि।

ये तु पण जे

अभ्यसूयन्तः शंका घेणे 

 अभि + असू (असूया) 

मे माझे 

एतत्‌ हे 

मतम्‌ मत 

न अनुतिष्ठन्ति, अनुसरत नाहीत 

अनु तिष्ठन्ति स्था धातू 

तान्‌ त्यांची

अचेतसः अचेतस् बुद्धि-दरिद्री 

सर्व-ज्ञान-

विमूढान्‌ गोंधळलेला, मती भ्रष्ट

नष्टान्‌ नष्ट होणे 

 विद्धि विद् धातू जाणतो

मागील श्लोकात श्रीभगवानांनी दिलेल्या शिकवणीचे श्रद्धापूर्वक पालन करण्याचा परिणाम काय होतो ते वाचले, आता पुढे भगवान असे म्हणतात की

(माणसाने जिज्ञासू असावे, सतत ज्ञान प्राप्त करण्यासाठी धडपड करावी, पण एक वेळ अशी येते की त्याला त्याच्या मर्यादा समजतात. प्रत्येक गोष्टीचे कारण शोधून काढता येत नाही, अशा वेळी शरण जाणे हाच शहाणपणा असतो पण काही लोकांचा अहंकार इतका मोठा असतो की शरण जाण्याची कल्पना त्यांना फारशी रूचत नाही.)

जे लोक आपल्या अज्ञानामुळे, मूर्खपणामुळे मी सांगितलेला मार्ग शंकेपोटी अनुसरत नाहीत ते स्वतःच आपला विनाश ओढवून घेतात असे समज.

-----------------------------------------------------

सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि।

प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति।।3.33।।


भूतानि प्रकृतिम्‌ यान्ति। ज्ञानवान्‌ अपि स्वस्याः प्रकृतेः सदृशम्‌ चेष्टते। निग्रहः किम्‌ करिष्यति ?

भूतानि 

प्रकृतिम्‌ प्रकृती प्रमाणे 

यान्ति या धातू जाणे 

ज्ञानवान्‌ ज्ञान सम्पन्न 

अपि सुद्धा 

 स्वस्याः स्वतःचे. (स्व) 

प्रकृतेः प्रकृति 

 सदृशम्‌ स्वदृश च्याप्रमाणे 

चेष्टते चेष्ट् धातू प्रयत्न करणे 

निग्रहः मनावर ताबा 

किम्‌ करिष्यति ?

हा श्लोक ह्याच अध्यायातील 4 थ्या श्लोका चा आधार घेऊन समजून घ्यावा लागेल

जसे बुद्धिबळाच्या खेळात उंट तिरका आणि घोडा अडीच घरे चालतो तसेच माणसे कोणत्याही परिस्थितीत आपापल्या स्वभावाप्रमाणेच वागतात.

(अर्जुनाचा स्वभाव तर पराक्रमी) असे असून सुद्धा प्रत्येकालाच स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घ्यायची आहे.

म्हणून ह्या श्लोकात श्रीभगवान असे म्हणतात की

सर्व सजीव आपापल्या नैसर्गिक प्रवृत्ती प्रमाणे वागतात. ज्ञानी माणसे सुद्धा आपल्या स्वभावानुसार वागतात, मग आपल्या मनोवृत्तीला दडपून कशासाठी ठेवायचे?

--------------------------------------------------

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ।

तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ।।3.34।।


इन्द्रियस्य-अर्थे इन्द्रियस्य राग-द्वेषौ व्यवस्थितौ, तयोः वशम् न आगच्छेत् । हि तौ अस्य परिपन्थिनौ ।


इन्द्रियस्य-अर्थे इन्द्रियस्य ह्या किंवा त्या इन्द्रियाचे 

राग-द्वेषौ 

व्यवस्थितौ. स्थापन करणे 

वि+ अव + स्था 

तयोः तद् त्या दोघांचे 

वशम् वश् धातू इच्छा करणे 

न आगच्छेत् आगच्छ येणे 

 गम धातू जाणे 

हि च्या साठी 

तौ ते दोघे 

अस्य ( इदम) ह्याचा 

परिपन्थिनौ अडथळा 

 परिपन्थिन् मार्गात अडथळा आणणे

आपल्या मनात विरूद्ध भावनांचा खेळ सतत चालू असतो. एखादी गोष्ट आवडते एखादी गोष्ट अजिबात आवडत नाही. राग-लोभ, इच्छाआकांक्षा-तिरस्कार.

खाण्यापिण्याच्या बाबतीत तर आपले खूपच नखरे असतात. एखाद्या गोड खाऊ माणसासमोर कारल्याची भाजी ठेवली तर त्याला राग येऊ शकतो.

श्रीभगवान हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपल्या शरीराला आवश्यक अशा गोष्टी आपण करणे आवश्यकच आहे पण त्यामधे आपला राग-लोभ सुद्धा असतो.

(पण आता जर आपण अध्यात्मिक उन्नती च्या मार्गावर असू तर)

अशा गोष्टींचे गुलाम होऊन आपण चालणार नाही (तर आपण ह्यावर मात केली पाहिजे) कारण ह्या गोष्टी आपल्या (अध्यात्मिक) मार्गातील अडसर आहेत.

-------------------------------------------------

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्।

स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः।।3.35।।

 

स्वनुष्ठितात्‌ परधर्मात्‌ विगुणः स्वधर्मः श्रेयान्‌। स्वधर्मे निधनम्‌ श्रेयः। परधर्मः भय-आवहः।

स्वनुष्ठितात्‌ स्व अनुष्ठित

अनुष्ठित तडिस नेलेले काम 

परधर्मात्‌ अन्यधर्मात्

 विगुणः गुणरहित 

स्वधर्मः 

श्रेयान्‌ श्रेष्ठ 

स्वधर्मे 

निधनम्‌ मृत्यू 

श्रेयः उत्तम

 परधर्मः दुसर्‍याचे नियत कर्म 

भय-आवहः. भीतीदायक 

हा श्लोक वाचता वाचता सहज मनात विचार आला. आजच्या समानतेच्या जमान्यात स्त्री पुरुषांनी कितीही एकसारखे दिसण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तरी पुरुष काही बाळाला जन्म देऊ शकत नाही.

शिक्षकाचा धर्म शिकवण्याचा (पण गावातील शिक्षकांना इतर बरीच कामे करावी लागतात) 

4 थ्या आणि 33 व्या श्लोकांच्या अर्थांच्या पार्श्वभूमीवर श्रीभगवान आपल्या नियत कर्मावर भाष्य करत आहेत.

क्षत्रियाचा धर्म लढण्याचा, त्याने अहिंसेच्या मार्गाचा पुरस्कार करून चालेल का?

श्रीभगवानकृष्ण म्हणताहेत, दुसर्‍याचे नेमून दिलेले काम आपण अगदी चोख करण्यापेक्षा 

आपल्याकडून अपेक्षित असलेले काम जसे जमेल तसे केले तरी चालेल. एकवेळ मरण पत्करले तरी चालेल पण असे दुसर्‍याचे काम करणे फारच भीतीदायक आहे.

-----------------------------------------------

अर्जुन उवाच


अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः।

अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः।।3.36।।

अर्जुन उवाच - अथ हे वार्ष्णेय!

 अयं पूरुषः अनिच्छन्‌ अपि बलात्‌ नियोजितः इव केन प्रयुक्तः, पापम्‌ चरति?

अर्जुन उवाच - अर्जुनाने विचारले 

 अथ. तर मग 

 हे वार्ष्णेय! हे वार्ष्णेया 

अयं पूरुषः एखादा माणूस 

अनिच्छन्‌ अपि इच्छेविरुद्ध 

  बलात्‌ इव जसे की सक्तीने 

 नियोजितः वहावत जाणे 

प्रयुक्तः, प्रेरित 

 केन कशासाठी 

पापम्‌ चरति? वाईट कृत्य करतात? 

35 वा श्लोक ऐकल्यानंतर सहाजिकच अर्जुनाच्या मनात प्रश्न आला तो त्याने विचारला

हे वार्ष्णेया (कृष्ण यादव कुळात जन्माला आला होता ह्या गवळी समाजाचे विशेषण वार्ष्णेय जे वृषभ ह्या शब्दावरून आले,वृष्णिकुलसम्भव)

तसे बघायला गेले तर खूप महत्वाचा श्लोक, अतिशय मार्मिक प्रश्न जो आजही आपल्याला भेडसावतो. (माणसे अशी वागतातच का? ) गुन्हेगारी जगताचे विश्लेषण करताना उद्भवणारा सर्वात मुख्य प्रश्न. (आपण गरजेपोटी गुन्हा करणार्यांना तात्पुरते बाजूला ठेवू, जे लोक जाणूनबुजून गुन्हा करतात त्यांचे काय?) 

हे कृष्णा इच्छा नसताना सुद्धा एखादा माणूस कुकर्म कशासाठी करतो, असे वाटते की त्याला तसे करण्यास कोणी भाग पाडत आहे.

--------------------------------------------

श्री भगवानुवाच


काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः।

महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्।।3.37।।

 

श्रीभगवानुवाच - एषः रजः गुण-समुद्भवः एषः कामः, क्रोधः महा-अशनः महा-पाप्मा एनम्‌ इह वैरिणम्‌ विद्धि।

श्रीभगवानुवाच -

 एषः

 रजः गुण-समुद्भवः रजो गुणातून निर्माण झालेले 

समुद्भवः सम उत् भवः निर्माण होणे 

 एषः हा 

 कामः, 

क्रोधः राग 

महा-अशनः महाभोजन 

महा-पाप्मा महापाप 

 एनम्‌ ( एतद्) ह्याचा 

इह. इथे 

 वैरिणम्‌ वैरीन् शत्रू 

विद्धि. जाणून घे

श्रीभगवानांनी आता अर्जुनाने (36 व्या श्लोकात) विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

संस्कृत मध्ये काम ह्या शब्दाचे इच्छा, आकांक्षा, हाव, हवस असे अनेक अर्थ आहेत. 

रजोगुणामूळे निर्माण होणारी अभिलाषा (जी पूर्ण झाली नाही तर) त्यातून निर्माण होणाऱा क्रोध आपली सदविवेक बुद्धि गिळून टाकतो (क्रोध म्हणजे एकप्रकारचा अग्नी) आणि आपल्याला पाप करायला भाग पाडतो. (म्हणूनच, काम क्रोध) हे आपले सर्वात मोठे शत्रू आहेत असे समज. (जे आपला घात करतात. सर्व काही भस्मसात करतात) 

"अथातो ब्रह्म जिज्ञासा" चला परम सत्याचा शोध घेऊ या. (बादरायण ब्रह्मसूत्र) इच्छा अभिलाषा जरूर असाव्यात पण त्या परम सत्याचा शोध घेणार्‍या असाव्यात.

------------------------------------------------------

धूमेनाव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च।

यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्।।3.38।।


यथा धूमेन वह्निः, मलेन च आदर्शः, आव्रियते, यथा उल्बेन गर्भः आवृतः, तथा तेन इदम्‌ आवृतम्‌।

यथा धूमेन वह्निः, जसे धूरामूळे अग्नि 

मलेन च धुळीमुळे 

आदर्शः, दर्पण 

आव्रियते, अवृतः भवति 

आ+वृ धातू आच्छादन करणे

 यथा जसे 

उल्बेन उल्ब गर्भाच्या भोवती असलेले आवरण 

उच् धातू एकत्र होणे 

गर्भः

 आवृतः, झाकून टाकतात 

तथा तेन तसेच त्याने 

इदम्‌ ह्याचे 

आवृतम्‌।


ह्या श्लोका तील तेन इदम् हे शब्द महत्त्वाचे, जे आधीच्या श्लोकाशी संबंध दर्शवतात.

काम ह्या शब्दाचा अर्थ लालसा, ही लालसा क्रोधाग्नी ला जन्माला घालते ज्यामध्ये आपली सदविवेक बुद्धि जळून जाते हे तीन उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

पहिली दोन उदाहरणे आपल्याला सहज दृष्टीस पडतात पण तिसरे उदाहरण का दिले असावे बरे असा प्रश्न पडतो.

धूरामूळे अग्नि पूर्ण दृष्टिस पडत नाही पण तो आतल्या आत धुमसत असतो. म्हणजे इथे लालसा कमी प्रमाणात असून सदविवेक बुद्धि शाबूत आहे असे म्हणायचे असावे.

आरशावर जेव्हा धूळ साठते तेव्हा आरशाचा काहीच उपयोग नाही. (आपली सदविवेक बुद्धि पार झाकोळून जाते) आणि ही धूळ सहज उडून जात नाही, त्यासाठी फडके घेऊन पुसण्याचे कष्ट घ्यावे लागतात.

गर्भाभोवती जे आवरण असते त्याला भेदून बाहेर पडण्यासाठी (आईला) बाळाला कष्ट तर होतातच पण विशिष्ट काळ सुद्धा द्यावा लागतो. ही प्रक्रिया इतकी सहज सोपी नाही.

---------------------------------------

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा।

कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च।।3.39।।

हे कौन्तेय! दुष्पूरेण कामरूपेण अनलेन नित्यवैरिणा एतेन च ज्ञानिनः ज्ञानम्‌ आवृतम्‌।

हे कौन्तेय! कुंतीसूत 

दुष्पूरेण दुष्पूर अतृप्त, आधाशी 

दुष्पूरेण + अनलेन

अनलेन अनल अग्नि 

कामरूपेण कामरुप 

नित्यवैरिणा नित्यं वैरीन्

 एतेन ह्याने 

एतद् म्हणजे हा

 ज्ञानिनः प्र. ब. व. ज्ञानी माणसे 

ज्ञानिनः ष. एकवचन ज्ञानी माणसांचे 

ज्ञानम्‌ ज्ञान 

 आवृतम्‌ म्हणजे आच्छादितम्

आता काम म्हणजे लालसा ह्याला अग्नी ची उपमा दिली आहे. अग्नी ला जितके काही अर्पण करत जाऊ तितका तो वाढत जातो. (म्हणजे कामेच्छापूर्ती हा मार्ग योग्य नाही) जे श्रीमंत असतात त्यांना अजून जास्त पैसे मिळावे असे वाटते, त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. जुगारी आपल्या हव्यासापोटी देशोधडीला लागतो.

न कहापणवस्सेन, तित्ति कामेसु विज्जति, अप्पस्सादा दुखा कामा, इति विज्ञाय पण्डितो।

(धम्मपद श्लोक-186) भगवान बुद्ध

पण हा श्लोक ज्ञानी माणसासाठी लिहीला आहे. सर्वसामान्य माणसांनी धनप्राप्ती साठी प्रयत्न करू नये असे म्हटलेले नाही. त्यांनी आपल्या आशाआकांक्षा सोडून द्याव्यात असे म्हटलेले नाही.

पण जो आता कर्मयोगाचा अंगिकार करत आहे (जो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर दुसर्यासाठी कर्म करत आहे) त्याच्या मनात लालसा असणे त्याच्या शत्रू समान आहे.

म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की

हे कुन्तीपुत्र

ज्ञानी माणसाची लालसा ही अग्नि सारखी भडकत राहते, जी कधी तृप्त होत नाही म्हणून ती त्याच्या शत्रू सारखी असते ज्याच्या मागे त्याचे ज्ञान (सदविवेकबुदधि) झाकोळून जाते.

-----------------------------------------------

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते।

एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्।।3.40।।

इन्द्रियाणि मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानम्‌ उच्यते। एषः एतैः ज्ञानम्‌ आवृत्य देहिनम्‌ विमोहयति।

इन्द्रियाणि इन्द्रिय 

मनः बुद्धिः 

अस्य ह्याचे 

इदम् हे 

अधिष्ठानम्‌ अधिष्ठान आसन निवासस्थान 

अधि + स्था 

उच्यते. म्हटले आहे 

 वच् धातू बोलणे 

 एषः एतैः हे, ह्यांच्यामुळे 

(एतद् हा) 

ज्ञानम्‌ 

आवृत्य आङ् + वृतु वृ धातू आच्छादन करणे 

देहिनम्‌ देहिन् देह

विमोहयति। मोहित करतात 

वि +मुह् धातू बुद्धि भ्रष्ट होणे

आधीच्या 3 श्लोकात ' काम ' म्हणजे लालसा, अभिलाषा, हाव हे कसे क्रोधाला आमंत्रण देतात आणि आपले शत्रू ठरतात हे वाचले.

मग हा शत्रू असतो तरी कुठे? (कुठे लपून बसलेला असतो?) ह्याबद्दल श्रीभगवान म्हणतात

आपले अवयव, मन, (भावना) बुद्धि हेच तर त्या शत्रू चे निवासस्थान आहे. वासनांच्या प्रभावामुळे आपले मन भ्रमिष्ट होते, भ्रमिष्ट मन बुद्धि पोखरून टाकते जे आपल्या ज्ञानावर पडदा टाकतात आणि हे धारण करणारा (इन्द्रिय, मन, बुद्धि) देह वासनांना बळी पडतो.

------------------------------------------

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ।

पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्।।3.41।।


तस्मात्‌ हे भरतर्षभ! त्वम्‌ आदौ इन्द्रियाणि नियम्य, ज्ञान-विज्ञान-नाशनम्‌ एनं पाप्मानम्‌ हि प्रजहि ।


 हे भरतर्षभ! भरत वंशातील ख्यातनाम, अर्जुनाचे विशेषण 

तस्मात्‌ म्हणून 

त्वम्‌ तू 

आदौ आदी सुरवातीपासून 

 इन्द्रियाणि

 नियम्य, नियंत्रित कर 

यम् धातू नियंत्रण करणे 

 ज्ञान-विज्ञान

नाशनम्‌ विनाशक 

 एनं हा 

पाप्मानम्‌ पापी

 हि नक्कीच 

प्रजहि विजय मिळविणे 

 प्र +हन् धातू मारणे 

आज आपण ज्याला विज्ञान म्हणतो, जे प्रयोगशाळेत कधीही सिद्ध करता येते तो विज्ञानाचा अर्थ इथे अपेक्षित नाही. सध्याच्या काळाप्रमाणे आपण त्याला ज्ञान , आत्मज्ञान, अंतःप्रेरणा असे म्हणू शकतो.

ह्या शब्दांचा नक्की फरक कसा करायचा?

जे ज्ञान आपल्याला उपजत असते ती अंतःप्रेरणा.

ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात, आपण जे आत्मसात करतो ते ज्ञान

आणि ज्या गोष्टी आपण अनुभवातून शिकतो ते आत्मज्ञान. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर साखर गोड असते हे ज्ञान आपल्याला असते पण गोडवा म्हणजे काय ते आपल्याला साखर खाल्यानंतरच समजते ते झाले आत्मज्ञान.

आता आपला शत्रू कुठे आहे ते समजले आहे, आता त्यावर उपाय काय? ह्यावर श्रीभगवान म्हणतात

अर्जुना!

म्हणूनच अगदी सुरवातीपासून तू आपल्या इन्द्रियांवर काबू ठेव, ह्या पापरूपी लालसेवर विजय मिळव जी आपल्या ज्ञान आणि आत्मज्ञान ह्यासाठी विनाशकारी आहे.

-------------------------------------------------------------

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः।

मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः।।3.42।।


इन्द्रियाणि पराणि आहुः, इन्द्रियेभ्यः परम्‌ मनः, मनसः तु परा बुद्धिः, बुद्धेः यः तु परतः सः।


इन्द्रियाणि इन्द्रिय 

पराणि श्रेष्ठ 

आहुः असे म्हणतात 

ब्रू धातू बोलणे 

 इन्द्रियेभ्यः इन्द्रिया पेक्षा 

परम्‌ श्रेष्ठ

मनः, 

मनसः 

तु परन्तु 

परा श्रेष्ठ 

 बुद्धिः, 

बुद्धेः 

यः यद् जो

 तु 

परतः उत्कृष्ट 

 सः तो (आत्मा) 

आधीच्या श्लोकात सांगितलेल्या शत्रू चे निवासस्थानांचे वर्गीकरण ह्या श्लोकात केले आहे. आपले शरीर जड पदार्थांपासून तयार आहे ज्यामधे पाच ज्ञानेन्द्रिय आहेत ज्यामुळे आपल्याला जाणीवा होतात जसे स्पर्श, वास, चव, आकार आणि शब्द.

ह्या इन्द्रिया पेक्षा मन श्रेष्ठ आणि मनापेक्षा बुद्धि श्रेष्ठ.. आणि आत्मा बुद्धि पेक्षा ही श्रेष्ठ.

ह्याच अर्थाचा श्लोक कठोपनिषद् मधे दिला आहे.

इन्द्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः।

मनसस्तु परा बुद्धिर्बुद्धेरात्मा महान्परः ॥ 1.3

----------------------------------------------------------------

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना।

जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्।।3.43।।

 

एवम्‌ बुद्धेः परम्‌ बुद्ध्वा आत्मना आत्मानम्‌ संस्तभ्य, हे महाबाहो!

 काम-रूपम्‌ दुरासदम्‌ शत्रुम्‌ जहि।

हे महाबाहो

एवम्‌ म्हणून 

बुद्धेः परम्‌ बुद्धि पेक्षा श्रेष्ठ 

बुद्ध्वा 

बुध् धातू समजून घेणे 

 आत्मना आत्म्याचे 

आत्मानम्‌ आत्म्याने 

आत्मन्

 संस्तभ्य निश्चल करणे 

सम् + स्तम्भ् 

काम-रूपम्‌ कामरुपी

दुरासदम्‌ दुरासद भयंकर 

शत्रुम्‌ शत्रू 

जहि कर्तरी लोट लकार 

हन् धातू मारणे 

तिसर्‍या अध्यायातील हा शेवटचा श्लोक अर्थातच निष्कर्ष सांगणारा

आपली ज्ञानेन्द्रिये आपल्या मनाच्या आदेशानुसारच काम करतात. जसे कोणी आपल्याशी बोलत आहे पण आपले लक्ष मात्र दुसरीकडे असेल तर आपल्याला ऐकू येत नाही. पटकन आपण म्हणतो, जरा परत सांग. 

म्हणून मन श्रेष्ठ. 

आपल्या बुद्धि ला जाणवत असते आज आपले मन उदास आहे किंवा आनंदी आहे. 

म्हणून बुद्धि मनापेक्षा श्रेष्ठ. 

बुद्धि पेक्षा श्रेष्ठ आत्मा. आत्मा हा तर साक्षात भगवानांचा अंश. 

ह्याच अर्थाचा कठोपनिषद् मधील श्लोक. 

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु। 

बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ।। 

इन्द्रियाणि हयानाहुर्विषयां स्तेषु गोचरान्।

आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः।। 

(कठोपनिषद्-1.3.3-4)

म्हणून श्रीभगवान असे म्हणतात

हे महाबाहो

आत्मा हा बुद्धि, मन, इन्द्रिय ह्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे समजून घे आणि ह्या आत्मज्ञानाने कामरुपी भयंकर शत्रूचा नायनाट कर आणि आपल्या ( मन, बुद्धि, इन्द्रिय) आत्म्यावर काबू ठेव.

—--------------------------------------------------------------------------                                      🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा