बुधवार, २२ नोव्हेंबर, २०२३

स्वामी अयप्पांच्या दारी (शबरीमला)

 स्वामी अयप्पांच्या दारी (शबरीमला) 

मला म्हणजे पहाड. पेरीयार च्या जंगलातील एक पहाड. 

रामायणातील शबरीची कथा इथे घडली असे येथील लोक मानतात. 

शबरीमला ची यात्रा आपल्याला सुप्रीम कोर्टात ल्या केस मुळे जास्त माहिती झाली. तसेही अय्यप्पांचा अवतार कलीयुगातील मानला जातो. शिवपार्वती ला तीन मुले

गणेश कार्तिक (मुरूगन, सुब्रमण्यम) आणि अयप्पा. तसा तो शिवा आणि विष्णू चा मुलगा. श्रीविष्णूंनी मोहिनी चे रूप धारण केले ती गोष्ट आपल्याला माहीत आहे.

महिषी ही महिषासुराची बहिण.महिषी म्हणजे म्हैस. कदाचित जंगलातील आदिवासींना नीलगायींचा उपद्रव होत असावा. म्हणून ते सुद्धा अयप्पा ना मानत असावे. जे लोक प्रथमच ही यात्रा करतात त्यांना कन्नी स्वामी म्हणतात. कन्नी स्वामींनी आदिवासींच्या रूपात यात्रा करण्याची पद्धत आहे. यात्रेसाठी बरीच तयारी करावी लागते ज्याच्या बद्दल माझ्या कानावर बरेच काही पडत होते. प्रत्यक्षात यात्रा करताना पाहिले.

बहुतेक करून दिल्ली आणि मुंबईतले तामिळ लोक एकत्र जमून यात्रेला जाणार होते. मी माझा नंबर लावून घेतला.

पूर्वी इरूमुली नावाच्या गावापासून चालत यात्रा सुरू व्हायची पण आता आणखी 10 किमी पुढे बस जाते. पण म्हणून इथे चालू होत्या त्या प्रथा बंद पडलेल्या नाहीत.

कोणत्या त्या प्रथा?

दोन अयप्पा च्या मंदिरात दर्शन घ्यायचे पण त्या पूर्वी वावर नावाच्या मशिदीत प्रार्थना करायची.वावर नावाचा अय्यप्पांचा झालेला मुस्लिम शिष्य. त्याच्या प्रती आदर.

ही यात्रा सर्वधर्मियांसाठी आणि सर्व जातीच्या लोकांसाठी खुली फक्त स्त्रीयांनी 10-50 ह्या वयात करायची नाही. काही कथांप्रमाणे अयप्पा ब्रह्मचारी आहेत पण दुसर्‍या एका कथेप्रमाणे त्यांच्या दोन बायका आणि मुलगा सुद्धा आहे तसे देऊळ सुद्धा आहे, त्याची माहिती पुढे येईलच. अयप्पांचा जन्म शिवा आणि विष्णूंमुळे झाला असल्याने वैष्णव आणि शैव ह्यांच्या मधील कटुता कमी होते असे लोकांना वाटते. 

इरूमुली पासून वाहनाने आलो कालकट्टी ला. इथून दोन मार्ग सुरू होतात.

पहिला चिन्नापाद म्हणजे छोटा मार्ग म्हणजे आपल्या वाहनाने पंबा पर्यंत जायचे आणि पुढे शबरीमला 6 किमी.

दुसरा मार्ग पंबा पर्यंत चालत जायचे अलूदा नदी ओलांडून अलूदा टाॅप, इंगीपारकोटा, मुक्कुली, करीमलाई, पंबा. नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंतच पंबा पर्यंत चालत जाण्याचा मार्ग खुला असतो. यात्रेपूर्वी जंगलात पायवाट तयार केली जाते.दोन दिवस पेरीयार च्या जंगलात मस्त फिरायचे. उन्हाचा कवडसा सुद्धा अंगावर पडत नाही.हत्तीचे droppings ठिकठिकाणी पहायला मिळतात. विचार आला, अचानक हत्ती समोर आले तर काय करायचे?पेरीयार चे जंगल म्हणावे तसे छानपैकी बघता येत नाही कारण आपल्या डोक्यावर असणारे इरूमुडी.

इरू म्हणजे 2 मुडी म्हणजे गाठी.यात्रा सुरू करायच्या आधल्या दिवशी इरूमुडी करण्याचा मोठा कार्यक्रम असतो. आधी विधीवत अयप्पा स्वामींची पुजा करतात आणि मग जितके लोक येणार असतील त्याच्या दुप्पट नारळाच्या करवंट्या काढून, एकेक डोळा फोडून त्यातील पाणी काढून टाकून त्या मध्ये तूप भरायचे. त्यावर काॅर्क चे सील वरुन अपलप पापड भिजवून चिकटवून त्यावर कापडाचा तुकडा लावायचा, वरतून विभूती दाबून बसवायची. असे दोन नारळ एका पिशवीत ठेवायचे. ती पिशवी बर्‍यापैकी लांब असते. एका बाजूला दोन नारळ आणि पूजेचे साहित्य. पिशवी ला मध्ये दोरीने गाठ मारायची. दुसर्‍या बाजूला डाळ तांदूळ, साधारण नारळाच्या वजनाइतके.(पूर्वीच्या काळी असे 2-3 दिवस जंगलातून चालताना खाण्याची काही सोय नसायची, त्यावेळी त्याची खिचडी करून खायची.)महिषी च्या नावाने साडी, बांगडी वगैरे.

जे प्रथम यात्रा करतात त्यांना कन्नी स्वामी असे म्हणण्याची पद्धत आहे. त्यांनी अलूदा नदीमधून एक छोटा दगड उचलून घ्यायचा आणि करीमुली येथे वाटेत नेऊन ठेवायचा. तसेच वरावा पाशी एक प्रतिकात्मक लाकडी बाण बरोबर घ्यायचा. पंबा नंतर पुढे जात असताना एका झाडाखाली ठेवायचा. ह्याला खूप मोठा अर्थ आहे. महिषी ला अयप्पा स्वामींशी लग्न करायची इच्छा आहे पण ते तर निरंतर ब्रह्मचारी आहेत. जेव्हा महिषी फारच त्यांची विनवणी करते तेव्हा ते म्हणाले की मी आता शबरीमला वर जाऊन बसतो. माझे भक्त मला तिकडेच भेटायला येतील. जर एखाद्या वर्षी नवीन भक्त मला भेटायला आला नाही तर मी तुझ्याशी लग्न करेन. त्यामुळे दरवर्षी महिषी यात्रे दरम्यान मोठ्या आशेने येथे येते आणि ते झाडावरचे बाण पाहून हृदय रक्तबंबाळ करून परत निघून जाते.

अयप्पा स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी 18 पायर्‍या चढून जावे लागते. ते सुद्धा प्रतिकात्मक आहे.प्रत्येक पायरीवर आपल्यातला एकेक दुर्गुण सोडून देत पुढे जायचे.

स्वामी अयप्पांचे मुख्य मंदिर अतिशय सुरेख. सोन्याच्या खांबांनी आणि सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेले. मंदिराच्या कमानीवर तत्त्वमसि हे महावाक्य लिहिलेले आहे. 

सध्याची अयप्पांची मूर्ती ही पंचलोहाची असून 1950 मध्ये त्याची प्राणप्रतिष्ठा झाली.स्वामींची मूर्ती सुद्धा नेहमीपेक्षा खूपच वेगळी. विशिष्ट योगासनात बसलेल्या अवस्थेतील हि मूर्ती मांडी न घालता पावलांवर शरीराचा भार ठेवला आहे आणि दोन्ही गुडघ्याच्या खाली पाय बांधलेल्या अवस्थेत आहेत.बांधलेल्या अवस्थेत असणारे पाय म्हणजे मनाचा निग्रह आणि एकाग्रता. हाताची अभयमुद्रा म्हणजे निर्भयता. 

मंदिराच्या आवारात गणेश आणि नागराजाचे सुद्धा मंदिर आहे. 

मंदिराच्या आवारात एक कुंड आणि एकाबाजूला दगडी भिंत दिसून येते त्यावर लोक नारळ फेकून फोडतात म्हणजे सर्व वाईट शक्तींना भिरकावून त्यांचा नायनाट करून टाकणे.

इथे फोटो काढू देत नाहीत. तसेही इथे लोकांना फोटो काढायची हौस आहे असे वाटले नाही.इथे देवळात लोक खर्या भक्तीभावाने येतात. 7-8 वर्षांच्या लहान मुली वडीलांबरोबर येतात.

यात्रेकरू यात्रा सुरू करण्यापूर्वी 40 दिवसांचे व्रत पाळतात त्यात खाण्यापिण्यावर आणि इतर बंधने असतात. यात्रा करताना काळ्या रंगांचे कपडे घातले जातात जे आयुष्यातील रंगीबेरंगी जीवन समाप्ती चे प्रतिक दाखवतात. कमालीची श्रद्धा येथे पहायला मिळते.

यात्रेच्या काळात लोकांची खूप गर्दी होते.

दोन दिवस चालण्याच्या मार्गावर सर्व सोयी उपलब्ध आहेत. जंगलखात्यातील लोकांचे चांगले लक्ष असते. साप चावला तर लगेच त्यांना मदत मिळेल अशा अर्थाचे फलक वाचायला मिळतात.

यात्रा मार्गावर आवश्यक गोष्टींची ने आण माणसे स्वतःच करतात. प्राण्यांचा वापर होत नाही. जेवणात अगदी मोजके पदार्थ उपलब्ध होते जसे कांजी, चण्याची उसळ लोणचे वगैरे जे लोक आवडीने खात होते. जोडीला कलिंगड संत्रे लेमन सोडा वगैरे.

पेरीयार हे व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र आहे. केरळ मधील जंगल भारतातील सर्वात उच्च दर्जाचे जंगल असावे.

तसे मंदिर महिन्यातील काही दिवस खुले असते त्यावेळी काही जण इथे येत असतात पण यात्रा मात्र नोव्हेंबर महिन्यात चालू होऊन मकरसंक्रांतीपर्यंत असते. त्यावेळी पंडळम, जे शबरीमला पासून जवळच आहे तेथील राजाचे वंशज पारंपरिक दागिने तलवार आणि पालखी घेऊन शबरीमला ला येतात आणि त्यानंतर ज्योत पेटवतात. अयप्पांचे बालपणच मुळी ह्या राजवाड्यात गेले. त्या संदर्भातील माहिती गूगल वर वाचायला मिळते. सध्या त्रावणकोर देवस्थानतर्फे शबरीमला ची देखरेख होते. यात्रा पूर्ण झाली की यात्रा सुरू करण्यापूर्वी मिळालेली माला काढून ठेवायची असते. आम्ही पंडळम लाच गेलो होतो माला उतरवायला. पंडळम ला जुना राजवाडा आणि अयप्पांचे सुंदर मंदिर आहे.

पंडळम मधील राजाच्या गोष्टीनुसार अयप्पा स्वामींचा जन्म 11 व्या शतकातला असे म्हणता येईल.

तसेही केरळ राज्याला देवभूमी म्हणतात, तसे ते आतून जाणवत राहते. अशा भावना बाजूला ठेवून सुद्धा विचार केला तरी स्वच्छ, सुंदर रस्ते, गावातील टुमदार घरे, घराच्या अंगणात दिसणारी निरनिराळी फुलझाडे, नारळ, असंख्य पणत्यांनी उजळून गेलेली मंदिरे सर्व काही आदर्श सभ्यता. सुंदर केरळ आणि पवित्र यात्रेचा अनुभव म्हणजे आयुष्यातील एक अनमोल आठवण.

---------------------------🙏🙏🙏-------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा