शनिवार, १५ एप्रिल, २०२३

श्रीमद्भगवद्गीता 15 वा अध्याय

 गीतेच्या 15 व्या अध्यायाचे नाव पुरूषोत्तम योग असे असून त्यामध्ये एकूण 20 श्लोक आहेत.

श्री भगवानुवाच

ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्। छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्।।15.1।।

श्रीभगवानुवाच - ऊर्ध्व-मूलम्‌ अधः-शाखम्‌ अश्वत्थम्‌ अव्ययम्‌ प्राहुः, यस्य पर्णानि छन्दांसि, यः तम्‌ वेद, सः वेदवित्‌ ।

श्रीभगवानुवाच -

ऊर्ध्व-मूलम्‌ वर मूळ असलेले ऊर्ध्वं मूलानि यस्य सः पु. द्वि. ए. व.

अधः-शाखम्‌ खाली शाखा अधः शाखाः यस्य सः द्वि. ए. व.

अश्वत्थम्‌ वटवृक्ष अश्वत्थ पु. द्वि. ए. व.

अव्ययम्‌ शाश्वत अव्यय द्वि. ए. व.

प्राहुः,(जाणकार) म्हणाले प्र +आहु ब्रू धातू बोलणे ब. व.

यस्य ज्याची यद् पु. ष. ए. व.

पर्णानि पाने पर्ण नपु. प्र. ब. व.

छन्दांसि छन्दोबद्ध छन्दस् नपु. प्र. ब. व.

यः जो यद् पु. प्र. ए. व.

तम्‌ त्याला तद् पु. द्वि. ए. व.

वेद, विद् धातू लट लकार प्र.पु.ए.व

सः तो तद् पु. प्र. ए. व.

वेदवित्‌ वेद जाणणारा वेदान् वेत्ति प्र. ए. व.

पाणिनी नी वेदांना उद्देशून छन्दांसि असा शब्द वापरला आहे, तो कदाचित ह्याच श्लोकावरून.

12 व्या अध्यायात आपण भक्तीयोग शिकलो . 14 व्या अध्यायात अव्यभिचारी भक्ताची आणि गुणातीत होण्याची कल्पना मांडली आहे. श्रीभगवानकृष्णांनी 10 व्या अध्यायातील 26 व्या श्लोकात ‘अश्‍वत्‍थ सर्व वृक्षाणाम‍्’ मी समस्त वृक्षांमधे अश्वत्थ (वड ) आहे असे म्हटले आहे.

ऊर्ध्वमूलोऽवाक्‍शाख एषोऽश्वत्थः सनातनः। तदेव शुक्रं तद् ब्रह्म तदेवामृतमुच्यते। तस्मिंल्लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन। एतद्वै तत्‌ ॥ कठोपनिषद्।।2.3.1।।

हा एक सनातन अश्वत्थ आहे ज्याची मूळे वरती आणि फांद्या खालच्या दिशेला आहेत. हे तेजोमय आहे. हेच एकमेव ब्रह्म आहे जे अमर आहे, ज्यामध्ये समस्त लोक आश्रित आहेत. त्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. आणि हेच 'ते वास्तव ' आहे.

स्वयंप्रकाशित सूर्याकडे पाहिले की हा श्लोक सहज समजून घेता येईल. सूर्य म्हणजे सर्व किरणांचे मुख्य स्रोत. त्यापासून असंख्य किरणे चोहीकडे पसरलेली आहेत. गीतेच्या 14 व्या अध्यायातील 15 व्या श्लोकात 'उर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था' म्हणजे सत्त्व-गुणी उर्ध्वलोकांत जातात असे म्हटले आहे. पुरूष ह्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला आहे. ह्या अध्यायाचे नाव पुरूषोत्तम योग आहे. अश्र्वत्थ चा अर्थ सुद्धा समजून घ्यायला हवा. अश्वत्थ म्हणजे राष्ट्र.

ऋग्वेदात 1.135.8 अश्वत्थ म्हणजे वडाचे झाड. वडाच्या झाड हे असंख्य पक्षी आणि किटकांचे आश्रयस्थान आहे. शिवाय त्याचे अनेक औषधी उपयोग चरकसंहीतेत आणि सुश्रुत संहितेत सांगितले आहेतच.

पद्मपुराणातील 7 वा भाग 12 वा अध्यायात अश्र्वत्थ चे महत्व कथन केले आहे.

मूलतः ब्रह्म रूपाय मध्यतो विष्णु रुपिणः। अग्रतः शिव रुपाय अश्वत्त्थाय नमो नमः।।

ज्याच्या मूळामधे ब्रह्म आहे , मध्यात विष्णु आणि वरच्या भागात शिव वसलेले आहेत, अशा अश्वत्थ ला माझे नमन. (स्कन्दपुराण).

ऊर्ध्वमूलम् अवाक्सशाखाम वृक्षम् यो सम्प्रति । न स जातु जहॅः श्रद्धयात्मृत्युत्युर्मा मर्यादिति

(तैत्तिरीय आरण्यक -1.11.5)

जे लोक ऊर्ध्वमूल आणि अधःशाखा असलेल्या वृक्षाचे महत्त्व जाणतात,त्यांना गाढ विश्वास असतो की मृत्यू सुद्धा त्यांचा विनाश करू शकत नाही.

वटवृक्ष पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा वृक्ष आहे.

अश्वत्थ ला अव्यय असे म्हटले आहे, जवळपास 200 वर्षांपेक्षा जास्त मोठा असा वटवृक्ष कोलकाता मध्ये पहायला मिळतो. भगवान बुद्धांचा बोधीवृक्ष सुद्धा अस्तित्वात आहेच.

वेदवित् कोणाला म्हणायचे ते ह्या श्लोकात सांगितले आहे. रामरक्षेत रामाला वेदवित् म्हटले आहे.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की उर्ध्वमूल आणि अधःशाखा असलेला शाश्वत अश्र्वत्थ, ज्याची पाने छन्दोबद्ध आहेत म्हणजेच वेद आहेत तोच वेदवित् म्हणजे वेदांचा जाणकार आहे.

-—--—------------------------------------------------------

अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः।

अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके।।15.2।।

तस्य शाखाः अधः ऊर्ध्वम्‌ च प्रसृताः गुण-प्रवृद्धाः विषय-प्रवालाः मनुष्य-लोके अधः कर्म-अनुबन्धीनि मूलानि अनुसन्ततानि च ।

तस्य त्याच्या तद् पु ष. ए. व.

शाखाः शाखा स्त्री. प्र. ब. व.

अधः खाली अव्यय

ऊर्ध्वम्‌ वर

च अव्यय

प्रसृताः पसरलेल्या प्र +सृ धातू क्त टाप् प्रत्यय प्र. ब. व.

गुण-प्रवृद्धाः गुणांमुळे वाढलेल्या गुणैः प्रवृद्धाः प्र.ब.व.

प्र+वृध् धातू वृद्धि होणे क्त प्रत्यय

विषय-प्रवालाः आसक्ती रूपी डहाळ्या

विषयः एव प्रवालाः प्र. ब. व.

मनुष्य-लोके समाजात मनुष्याणां लोकः स. ए. व.

अधः अव्यय

कर्म-अनुबन्धीनि कर्मांशी जोडलेल्या

कर्मानुबन्धिन् नपु. प्र. ब. व.

अनु त्यानुसार

मूलानि मूळे मूल नपु. प्र. ब. व.

अनुसन्ततानि पसरलेल्या अनु+सम्+तन धातू पसरणे क्त प्रत्यय अनुसंतत नपु. प्र. ब. व.

च ।

ह्या श्लोकात अश्र्वत्थ चा अर्थ दुसर्‍या अंगाने समजून घ्यायला हवा. येथे संसारवृक्षाला अश्र्वत्थ म्हटले आहे.

संस्कृत शब्दकोशात संसार म्हणजे "संसृतिति संसारः" अर्थात निरंतर परिवर्तनशील.

सम +सृ धातू (गत्यादि)+क्तिन प्रत्यय, सृ धातू जात राहणे

 "गच्छतितो जगत" अर्थात निरंतर गतिमान. म्हणजे जशी संसाराची उत्पत्ती होते तसा विनाश सुद्धा होणारच. म्हणून प्रत्येक गोष्ट अस्थायी किंवा अश्वत्थ आहे.

अ-श्र्व-त्थ म्हणजे उद्या न राहणारा. आपल्या पृथ्वीच्या इतिहासात आपण हिमयुग, प्रलय, भूकंप सर्व काही घडून गेले आहेच.

14 व्या अध्यायात आपण प्रकृती आणि त्यापासून निर्माण होणारे त्रिगुण ह्यांचा अभ्यास केला.

ब्रह्मदेवापासून सृष्टि निर्माण झाली आणि विविध प्रकारचे जीव निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तिं मधील त्रिगुणांच्या वेगवेगळ्या मात्रेतील प्रभावामुळे निरनिराळ्या प्रवृत्ती निर्माण झाल्या.

ज्याप्रमाणे झाड वाढण्यासाठी पाणी सूर्यप्रकाश आणि कार्बनडाय आक्साइड ची गरज असते, त्याप्रमाणे ह्या संसाररूपी वृक्षाच्या फांद्या त्रिगुण आणि माणसाच्या ठायी असलेल्या आसक्ती मुळे वाढलेल्या आहेत. म्हणून ह्या श्लोकात ह्या संसाररूपी वृक्षाच्या काही फांद्या वरच्या बाजूला तर काही खालच्या बाजूला वाढत आहेत असे म्हटले आहे. ज्याप्रकारे झाडांची मूळे जमिनीत खोलवर रूतलेली असतात त्याप्रमाणे आपल्या मधील कामना, लालसा समूळ नष्ट करणे कठीणच.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की ह्या संसारवृक्षाच्या गुणांमुळे वाढलेल्या ,कामनारूपी फांद्या खाली-वर फोफावल्या आहेत,आणि ह्या वृक्षाची खाली पसरलेली मूळे माणसाच्या कर्माशी जोडली गेली आहेत.

--------------------------------------------------------------

न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा।. अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा।।15.3।।

अस्य रूपम्‌ इह न उपलभ्यते। तथा न आदिः न अन्तः च, न सम्प्रतिष्ठा च। एनम्‌ सुविरूढ-मूलम्‌ अश्वत्थम्‌ दृढेन असङ्ग-शस्त्रेण छित्त्वा।।

अस्य ह्याचे इदम् पु. ष. ए. व.

रूपम्‌ रूप नपु प्र. ए. व.

इह येथे अव्यय

न अव्यय

उपलभ्यते अनुभवणे उपलब्ध असणे उप+लभ् धातू प्राप्त होणे कर्माणि लट लकार प्र.पु.ए.व.

तथा अव्यय

न आदिः आरंभ आदि प्र. ए. व.

न अन्तः अन्त प्र. ए. व.

च,

सम्प्रतिष्ठा आधारस्तंभ

सं+प्रति +स्था प्र. ए. व.

प्रति +स्था स्थिर असणे

च।

एनम्‌ हे एतद् पु. द्वि. ए. व.

सुविरूढ-मूलम्‌ विरूढ - अंकुरित

सुविरूढानि मूलानि यस्य सः

सु+वि +रूह धातू उत्पन्न होणे क्त प्रत्यय

अश्वत्थम्‌ वटवृक्ष अश्र्वत्थ द्वि. ए. व.

दृढेन दृढतेने दृढ पु. तृ. ए. व.

असङ्ग-शस्त्रेण अनासक्त असे शस्त्र

अ सङ्ग स्य शस्त्रः तृ ए. व.

छित्त्वा छेदून छिद् धातू क्त्वा प्रत्यय

ततः पदं तत्परिमार्गितव्य यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी।।15.4।।

ततः तत्‌ पदम्‌ परिमार्गितव्यं, यस्मिन्‌ गताः भूयः न निवर्तन्ति यतः पुराणी प्रवृत्तिः प्रसृता च तम्‌ आद्यम्‌ पुरुषम्‌ एव प्रपद्ये ।

ततः नंतर अव्यय

तत्‌ ते तद् पु. प्र. ए. व.

पदम्‌ पद नपु. प्र. ए. व.

परिमार्गितव्यं, शोधले पाहिजे परि+मार्ग धातू शोधणे स्वच्छ करणे तव्यत प्रत्यय

यस्मिन्‌ जेथे यद् पु. स. ए. व.

गताः जाऊन गत गम धातू क्त प्रत्यय प्र. ब. व.

भूयः पुन्हा अव्यय

निवर्तन्ति परत येतात नि+वृत् धातू बोलणे लट लकार प्र.पु.ब.व.

यतः ज्याच्या कडून अव्यय

पुराणी पुरातन स्त्री. प्र. ए. व.

प्रवृत्तिः प्रवृत्ति स्त्री प्र. ए. व.

वृत् धातू बोलणे

प्रसृता प्र+सृ धातू जात राहणे

क्त टाप् प्रत्यय प्र ए. व.

च आणि अव्यय

तम्‌ तद् पु. द्वि. ए. व.

आद्यम्‌ आद्य द्वि. ए. व.

पुरुषम्‌ पुरूष पु. द्वि. ए. व.

एव नक्की अव्यय

प्रपद्ये शरणागत होणे प्र+पद् धातू जाणे

ह्या अध्यायातील पहिल्या दोन श्लोकांत आपण अश्र्वत्थ चे दोन वेगवेगळे अर्थ समजून घेतले. पहिल्या अर्थाप्रमाणे उर्ध्वमूल हे परमेश्वराचे स्वरूप, आणि दुसर्‍या अर्थाप्रमाणे आपल्या लालसा रूपी गुणांची मूळे खोलवर पसरलेली आहेत असा वटवृक्ष.

या ह्येव पुत्रैषणा सा वित्तैषणा, या वित्तैषणा सा लोकैषणा, उभे ह्येते एषणे एव भवतः । बृहदारण्यकोपनिषत् 3.5.1।।

बृहदारण्यक उपनिषदातील हा श्लोक बराच मोठा आहे. त्यापैकी एषणा म्हणजे कामना, तीन प्रकारच्या सांगितल्या आहेत.

पुत्रैषणा म्हणजे पुत्रांची कामना

वित्तैषणा म्हणजे धनाची अभिलाषा. लोकैषणा म्हणजे मानसन्मान.

हि मूळे आपल्याला छाटून टाकायची आहेत. ह्यासाठी कोणते शस्त्र वापरावे? अनासक्ती हेच शस्त्र.

ह्या संसारवृक्षाच्या भव्यतेचा आपल्याला अंदाज करता येत नाही. कल्पना करा की आपण समुद्रात मध्यभागी आहोत. समुद्राचा आरंभ, अंत काहिही आपल्याला समजून येत नाहीये.

मनुष्याच्या ठायी फक्त अनासक्ती असणे पुरेसे नाही तर त्याच्या कडे असणारा अहंकार सुद्धा नष्ट झाला पाहिजे, त्यासाठी त्याला शरण गेले पाहिजे असे 7 व्या अध्यायातील 14 व्या श्लोकात सुद्धा सांगितले आहेच.

त्रिगुणातून निर्माण झालेले माया ही सुद्धा दैवी शक्ति आहे. आपला सर्वसाधारण समज असा असतो की केवळ अज्ञानामुळे आपण या मायावी जगाचा मोह पडतो. आणि आपले अज्ञान दूर झाले कि आपल्याला परम सत्याचा अनुभव येतो. पण इथे वेगळा अर्थ अपेक्षित आहे. हि मायाच आपल्या मनाची कसोटी घेऊ शकते. भगवानांनी आपल्याला दिलेले हे आव्हान च जणू.

जो भगवानांना शरण गेला, त्याने या मायावी जगावर सहज विजय मिळविला. नाहीतर ह्या आव्हानास पार करणे अत्यंत अवघड.

शरण जाणे म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे. जसे वाहत्या नदीत रंगीत पाण्याचा थेंब पडला तर तो बाजूला काढणे अशक्यच त्याचप्रमाणे परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

ह्या संसारवृक्षाचे रूप इथे असे प्रत्यक्ष अनुभवता येत नाही कारण त्याचा आरंभ नाही अंत सुद्धा नाही, आधारस्तंभ नाही. अशी घट्ट रुतलेली पाळेमुळे नेटाने त्यागरूपी शस्त्राने छाटून टाकली पाहिजे. त्यानंतर त्या परमात्म्याला शोधले पाहिजे, ज्याच्या मूळे अनादी काळापासून संसाराचा अखंड प्रवाह चालू आहे, त्याला शरण गेल्यास, मनुष्य (ह्या जगात) परतून येत नाही.

------------------------------------------------------------

निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः। द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञै र्गच्छन्त्यमूढाः  पदमव्ययं तत्।।15.5।।

निर्मान-मोहाः, जितसङ्गदोषाः, अध्यात्म-नित्याः, विनिवृत्त-कामाः, सुख-दुःख-संज्ञैः द्वन्द्वैः विमुक्ताः, अमूढाः, तत्‌ अव्ययं पदम्‌ गच्छन्ति।

निर्मान-मोहाः, (खोटी) प्रतिष्ठा, मोह नसलेला

निर्मान-मोह पु. प्र. ब. व.

जितसङ्गदोषाः, लालसेपोटी निर्माण झालेल्या दोषांना जिंकलेला

जितसङ्गदोष पु प्र. ब. व.

अध्यात्म-नित्याः, निरंतर अध्यात्मिक मार्गावर असलेला अध्यात्मनित्य पु. प्र. ब. व.

विनिवृत्त-कामाः,काम निवृत्त विनिवृत्तकाम पु. प्र. ब. व.

सुख-दुःख-संज्ञैः सुखदुःखसंज्ञ नपु. तृ. ब. व.

द्वन्द्वैः द्वन्द्व नपु. तृ. ब. व.

विमुक्ताः, विमुक्त पु. प्र. ब. व.

अमूढाः, ज्ञानी अमूढ पु. प्र. ब. व.

तत्‌ त्या तद् नपु द्वि. ए. व.

अव्ययं शाश्वत अ व्यय नपु. द्वि. ए. व.

पदम्‌ स्थिति पद नपु. द्वि. ए. व.

गच्छन्ति गम् धातू लट लकार प्र.पु.ब.व.

4 थ्या श्लोकात शरणागत व्हायचे, परमेश्वराशी एकरूप व्हायचे असे म्हटले आहे, त्याच प्रक्रियेचे वर्णन ह्या श्लोकात केले आहे. गीतेच्या निरनिराळ्या अध्यायातील निरनिराळ्या श्लोकात कधी भक्तांचे गुण, तर कधी सत्त्वगुण तर कधी दैवीगुण ह्यांचे वर्णन केले आहे. थोडक्यात चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती यांचेच तर वर्णन केले आहे. ज्याच्या मुळे आपल्या सर्वांनाच आपल्या कुटुंबात, समाजात कसे वागावे ह्याचे एक प्रकारे प्रशिक्षण दिले जाते आहे. सशक्त कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था अजून ती काय? जसे जसे ज्ञान प्राप्त होत जाते तसतसे व्यक्ती नम्र होत जातो, त्याच्या मधील अहंकार गळून पडतो. खोट्या प्रतिष्ठांच्या कल्पना , मोह, लालसा सर्व काही नष्ट होत जाते. आपले नित्य कर्म सुद्धा परमेश्वराला अर्पण केले जाते.

दास भूतमिदम् तस्य जगतस्थावर जंगमम्, श्रीमन्नारायण स्वामी जगतानप्रभुर्शीवरः । पद्मपुराण।

प्रभू नारायण ह्या जगताचे स्वामी आहेत आणि सर्वच चर अचर त्यांचे सेवक आहेत.

मयाऽध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्।

हेतुनाऽनेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते।।9.10।।

हि सर्व चर अचर सृष्टि माझ्याच अधिपत्याखाली परिवर्तित (प्रकट, प्रलय) असते.

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते।

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः।।10.8।।

मीच सर्व गोष्टींचे उगम स्थान आहे, माझ्या पासूनच सर्व गोष्टींचा विकास होते, हे सर्व जाणणारे बुद्धिमान माझीच अत्यंत श्रद्धापूर्वक पूजा करतात.

ज्याला हे सर्व समजले तो सुखदुःखांच्या पलिकडे गेलेला असतो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

जो प्रतिष्ठा आणि मोह ह्या पासून दूर गेला आहे, ज्याने लालसेपोटी उत्पन्न झालेल्या दोषांवर मात केली आहे, अध्यात्मात निरंतर स्थित, सर्व कामनांपासून निवृत्त, सुखदुःखांच्या द्वन्द्वापासून दूर अशा ज्ञानी व्यक्तिस ते शाश्वत पद प्राप्त होते.

-------------------------------------------------------------

न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम।।15.6।।

यत्‌ गत्वा न निवर्तन्ते तत्‌ मम परमम्‌ धाम । तत्‌ न सूर्यः भासयते न शशाङ्कः न पावकः ।

यत्‌ जेथे

गत्वा गेल्यानंतर गम धातू जाणे क्त्वा प्रत्यय

न निवर्तन्ते परत येत नाहीत नि+वृत् धातू आहे कर्तरी लट लकार प्र.पु.ब.व.

तत्‌ ते तद् नपु. द्वि. ए. व.

मम माझे अस्मद् सर्व ष. ए. व.

परमम्‌ श्रेष्ठतम परम नपु. प्र. ए. व.

धाम धामन् नपु प्र. ए. व.

तत्‌ तद् नपु. द्वि. ए. व.

न सूर्यः

भासयते भास् धातू णिजन्त लट लकार प्र.पु.ए.व.

न शशाङ्कः

न पावकः अग्नी /वीज

आधीच्या श्लोकात शाश्वत पद प्राप्त होते असे सांगितल्यानंतर त्या स्थानाचे वर्णन करत आहेत. आपल्याला पर्यावरणीय अन्न साखळी माहीत आहे. सूर्यप्रकाशामुळे वनस्पती आपले अन्न तयार करतात त्यावर झाडांमुळे आपले उदरभरण होते. आपले अस्तित्वच सूर्या अवलंबून आहे. हि पण एक वस्तुस्थिती आहेच. एखाद्या नवीन ठिकाणी जाणार असू तर त्या स्थळाची माहिती घेताना जसे आपण तेथे हवापाणी कसे आहे? ह्याची माहिती घेऊ, ह्या श्लोकात सूर्य, चंद्र वीज अग्नी यांचे अस्तित्व नाही असे गोलोक, म्हणजे श्रीभगवानकृष्णांचे निवासस्थान.

गोलोक-नामनी निज-धामनी तले च तस्य देवी महेश-हरि-धामसु तेषु तेषु, ते ते प्रभाव-निचया विहिताश चयेन गोविन्दम् आदि-पुरुषम् तम अहं भजामि (ब्रह्मसंहिता श्लोक-43)

गोलोक नावाचे श्रीभगवानकृष्णांचे निजी निवासस्थान आहे, तेथे नारायण, शिव, दुर्गा सर्वांचे वास्तव्य आहे. मी त्या परमात्म्याची आराधना करतो ज्याच्या प्रभावाने हे निर्माण झाले आहे.

याचे वर्णन कठोपनिषदात सुद्धा आढळून येते.

न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः।

तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥कठोपनिषद् 2.2.15।।

तेथे सूर्य प्रकाशत नाही, न चन्द्रतारका न वीजा चमकतात न अग्नी चा उजेड असतो. जो काही प्रकाश दिसतो ते सर्व त्याच्या तेजाचा प्रतिभास दिसतो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

त्या ठिकाणी सूर्य चंद्र वीज अग्नी काहीच प्रकाशत नाही, ते परमधाम, जे प्राप्त झाले की तेथून कोणी परत येत नाही.

--------------------------------------------------------------

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।।15.7।।

जीव-लोके मम सनातनः अंशः एव जीव-भूतः प्रकृति-स्थानि मनः-षष्ठानि-इन्द्रियाणि कर्षति।

जीव-लोके जीवलोक पु. स. ए. व.

मम माझे अस्मद् ष. ए. व.

सनातनः सनातन पु. प्र. ए. व.

अंशः अंश पु. प्र. ए. व.

एव अव्यय

जीव-भूतः बद्ध जीव जीवभूत पु. प्र. ए. व.

प्रकृति-स्थानि प्रकृतिस्थ नपु. द्वि. ब. व.

मनः-षष्ठानि मनषष्ठ नपु. द्वि. ब. व.

मनासहित सहा इन्द्रिये

इन्द्रियाणि इन्द्रिय नपु. द्वि ब. व.

कर्षति संघर्ष करतो कृष् धातू जोतणे लट लकार प्र.पु.ए.व.

ह्या श्लोकात दोन मुद्द्यांवर कथन केले आहे.

पहिला म्हणजे प्रत्येक जीवात परमेश्वरी अंश आहे आणि दुसरे म्हणजे पुरूष आणि प्रकृति च्या संयोगाने निर्माण झालेली प्रकृती ची रूपे.

ह्या श्लोकातील सनातन आणि मम अंश हे दोन शब्द महत्त्वाचे. सनातन शब्दाचे अनेक अर्थ आहेत. शाश्वत, दृढ, प्राचीन, कधीही न संपणारा. ह्याचा अर्थ आपल्यामध्ये असणारा परमेश्वराचा अंश कधीच न संपणारा म्हणजे त्याचा गुणाकार होत राहणारा असा आहे. त्याचे विभाजन होऊन तो कमी कधीच होणार नाहीये. येथे महर्षि व्यासांनी योजलेल्या चपखल शब्दांची दाद द्यावीशी वाटते. लोकसंख्या वाढतच राहिली तर आत्मे संपून जाणार नाही का अशा निरर्थक प्रश्नांचे हे उत्तर आहे असे वाटते.

एको ह वै नारायण आसीत्।

न ब्रह्मा न ईशानो नापो नाग्निः न वायुः नेमे द्यावापृथिवी न नक्षत्राणि न सूर्यः। स एकाकी नर एव। चतुर्वेदोपनिषद्। 1।

चतुर्वेदोपनिषदातील पहिला श्लोक बराच मोठा आहे जो हेच सांगतो की सृष्टि मध्ये सर्वप्रथम एकमात्र नारायणच अस्तित्वात होते.

श्री नारद पञ्चरात्र मधे असलेल्या श्लोकानुसार

यत् तटस्थं तु चिद्रूपं स्वसंवेद्याद् विनिर्गतम्। रञ्जितं गुणरागेण सजीव इति कथ्यते ॥

“तटस्थ शक्ति जी मूळ स्वभावाप्रमाणे आध्यात्मिक आहे, चेतना शक्ती पासून उत्पन्न झाली पण भौतिक गुणांशी जोडली गेल्याने कलुषित झाली ज्यालाच आपण सजीव असे म्हणतो.

इतकेच नाही तर वराह पुराणातील श्लोकाप्रमाणे ब्रह्मा आणि शिव सुद्धा भगवान नारायणांपासून निर्माण झाले. श्रीभगवानकृष्ण सर्व उत्पत्तींचा स्त्रोत आहेत.

नारायणः परो देवस्तस्माज्जातश्र्चतुर्मुखः |

तस्माद्र रुद्रोSभवद्देवः स च सर्वज्ञतां गतः ||

परमेश्वराच्या अंशाचे दोन प्रकार आहेत. स्वांश आणि विभिन्नांश.

वराह पुराणातील श्लोकाप्रमाणे

स्वांशश्चाथ विभिन्नांश इति द्विधा श इष्यते। अंशिनो यत्तु सामर्थ्यं यत्स्वरूपं यथा स्थिति: ॥

तदेव नाणुमात्रोऽपि भेदं स्वांशांशिनो: क्वचित्।

विभिन्नांशोऽल्पशक्ति: स्यात् किञ्चित् सामर्थ्यमात्रयुक् ॥

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की परमेश्वराचे स्वांश रूप म्हणजे त्याचे निरनिराळे अवतार जसे राम, कृष्ण वगैरे. हे परमेश्वराच्या मूळ स्वरूपा पेक्षा वेगळे नसतात. मात्र विभिन्नांश, अल्प शक्ती असतात कारण परमेश्वराचा फक्त अंश ह्यांचा मध्ये असतो.

सजीवांमधे सुद्धा दोन अवस्था आहेत.

बद्ध आणि मुक्त. नावाप्रमाणेच बद्ध जीव म्हणजे मोहपाशात अडकलेला.

एकस्यैव ममांशस्य जीवस्यैव महामते ।

बन्धोऽस्याविद्ययानादिर्विद्यया च तथेतर: ॥ श्रीमद्भागवतम् 11.11.4॥

हे उद्धव! जीव माझा भिन्नांश आहे. अज्ञानामुळे तो अनादी काळापासून भौतिक बंधनात जखडून राहिला आहे. मात्र ज्ञान प्राप्त झाले की तो परत मुक्त होऊ शकतो.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

ह्या संसारातील प्रत्येक जीवात्मा माझाच सनातन अंश आहे. पण तो प्रकृति स्थित मनासकट सहा इन्द्रियांकडे आकर्षित होतो.

----------------------------------------------------------------

शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्।।15.8।।

वायुः आशयात्‌ गन्धान्‌ इव, ईश्वरः अपि यत्‌ शरीरम्‌ उत्क्रामति यत्‌ अवाप्नोति च, एतानि गृहीत्वा संयाति।

वायुः वायु पु. प्र. ए. व.

आशयात्‌ स्थानापासून आशय पु. पं. ए. व.

गन्धान्‌ सुगंधाला गन्ध पु. द्वि. ब. व.

इव, प्रमाणे

ईश्वरः ईश्वर पु. प्र. ए. व.

अपि सुद्धा अव्यय

यत्‌ ज्या यद् नपु. द्वि. ए. व.

शरीरम्‌ शरीर नपु. द्वि. ए. व.

उत्क्रामति त्याग करतो उद् क्रम धातू जाणे, रक्षण करणे लट लकार प्र.पु.ए.व.

यत्‌ ज्याप्रमाणे यद् नपु. द्वि. ए. व.

अवाप्नोति प्राप्त करतो अव +आप् धातू व्याप्त होणे लट लकार प्र.पु.ए.व.

च,

एतानि हे सर्व एतद् नपु. द्वि. ब. व.

गृहीत्वा धारण करून ग्रह् धातू स्वीकार करणे क्त्वा प्रत्यय

संयाति जातो सं+या धातू जाणे लट लकार प्र.पु.ए.व.

2र्या अध्यायातील 22 व्या श्लोकात जीवात्मा जुने शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो असे सांगितले आहेच, आता ह्या श्लोकात थोडेसे पुनर्जन्मावर भाष्य केले आहे असे वाटते.

शरीरातून प्राण निघून गेला म्हणजे आत्मा शरीराच्या बाहेर पडला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्राण आणि आत्मा एकच असे म्हणता येईल.

प्राण प्र +अन् धातू श्वास घेणे.

आत्मा अत् धातू जात राहणे.

प्राण ह्या शब्दाला वायू शब्द जोडून प्राणवायू असे म्हणतात.

मग आत्मा कसा आहे? तो सुद्धा वायू रूप आहे का? असा प्रश्न पडतो. तसा पुसटसा उल्लेख आधीच्या अध्यायात आला आहे.

आत्मा वा अरे दृषटव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितत्यो मैत्रेयी |

बृहदारण्यक उपनिषद,अध्याय-4, ब्राह्मण-5, सूत्र-6 ।।

आत्म्याचे श्रवण करा, मनन करा, ध्यान करा, आत्म्याचे विज्ञान जाणून घेतल्यावर पुन्हा पुन्हा चिंतन केल्याने सर्व काही ज्ञात होईल.

2 र्या अध्यायातील 28 व्या श्लोकात अविनाशी आत्मा आणि नश्वर शरीर ह्यावर भाष्य केले आहे आणि पुनर्जन्माची संकल्पना मांडली आहे. तशाच प्रकारचा श्लोक

नारद मुनींनी श्रीमद्भागवतम् मध्ये युधिष्ठिराला उपदेश देताना असे सांगितले की

यन्मन्यसे ध्रुवं लोकमध्रुवं वा न चोभयम् । सर्वथा न हि शोच्यास्ते स्नेहादन्यत्र मोहजात्।।

(श्रीमद्भागवतम्-1.13.43)

जर तू स्वतः ला अविनाशी आत्मा आणि नश्वर शरीर ह्यांचे मिलन मानतोस तर मग तुला कसल्याही प्रकारचे दुःख नाही झाले पाहिजे. शोक ग्रस्त होण्याचे मुख्य कारणच मुळी आसक्ति आहे जी मोहामुळे उत्पन्न होते.

2र्या अध्यायातील 28 व्या श्लोकात तर स्पष्टच म्हटले आहे की जन्मापूर्वी अव्यक्त स्वरुपात असलेले सर्व सजीव जन्माला आले की प्रगट होतात आणि परत मृत्यू नंतर अव्यक्त स्वरुपात असतात, हे सर्व कसे होते ते सांगणारा हा श्लोक. आधीच्या श्लोकात जीव मूर्त स्वरूपात कसा येतो ते सांगितले, आता मृत्यू नंतर त्याचे पुढे काय होते ते ह्या श्लोकात सांगितले आहे. एतानि ह्या शब्दाचा अर्थ आधीच्या श्लोकात दिलेल्या मनासहीत सहा इन्द्रिये असा घ्यायचा आहे. ह्या श्लोकात आपल्या शरीराचा स्वामी म्हणजे आपला जीव, म्हणून त्याला ईश्वर म्हटले आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

ज्या प्रकारे हवेच्या माध्यमातून सुगंध एका स्थानापासून दुसर्‍या स्थानी पोहोचतो त्याप्रमाणेच आत्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करताना हे सर्व बरोबर घेऊन जातो.

----------------------------------------------------------------

श्रोत्रं चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च। अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते।।15.9।।

अयम्‌ श्रोत्रम्‌ चक्षुः च स्पर्शनम्‌, रसनम्‌ च घ्राणम्‌ मनः च अधिष्ठाय एव विषयान्‌ उपसेवते ।

अयम्‌ हा इदम् पु. प्र. ए. व.

श्रोत्रम्‌ कान श्रोत्र नपु द्वि. ए. व.

चक्षुः नेत्र चक्षुस् नपु द्वि. ए. व.

च आणि

स्पर्शनम्‌, स्पर्शन् नपु द्वि. ए. व.

रसनम्‌ जीभ रसन नपु द्वि. ए. व.

च सुद्धा

घ्राणम्‌ नाक घ्राण पु द्वि. ए. व.

मनः मनस् नपु द्वि ए. व.

अधिष्ठाय स्थित होऊन अधि+स्था+य अव्यय

एव सुद्धा

विषयान्‌ विषय पु. द्वि ब. व.

उपसेवते उपभोग घेतो उप+सेव धातू सेवा करणे लट लकार प्र.पु.ए.व.

मृत्यू समयी आपण जे कर्म करत असतो त्याप्रमाणे आपल्याला पुढचा जन्म मिळतो असे आपण वाचले आहे. मागील श्लोकात जीवात्मा आपल्या बरोबर मनासहीत 6 इन्द्रिये बरोबर घेऊन दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो हे सुद्धा वाचले. आत्म्याला स्वतः च्या अशा कामना, लालसा नसतात, जेव्हा प्रकृती शी त्याचा मिलाफ होतो त्यावेळी तो मायाजालात अडकतो असेही आपण वाचले. एका शरीरातून बाहेर पडल्यावर दुसर्‍या शरीरात प्रवेश करेपर्यंत काही काळ जात असावा. मग मधल्या काळात आत्मा कुठे असतो? भूत आणि अतृप्त आत्मा अस्तित्वात असतात असे म्हणता येईल पण सर्व साधारणपणे आपल्या डोक्यात जशा कल्पना आहेत त्याप्रमाणे नव्हे तर कैवल्याची प्राप्ती होईपर्यंत देहविरहीत असा तो आत्मा अतृप्त आहे आणि एका योनीतून दुसर्‍या योनींमधे भटकत आहे असे म्हणायला वाव आहे. हे सर्व विचार भूतयोनी अस्तित्वात असण्याच्या कल्पनेला पुष्टी देते. हा एक मुद्दा झाला.

पुढचा जन्म नक्की कोणता असेल ह्याचे काही ठोकताळे असावे का? प्रत्येक प्राण्यांची स्वतः ची अशी व्यक्तीमत्वांची वैशिष्ट्ये आहेत, जी वर्षानुवर्षे तशीच आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि स्वभावात अजूनतरी बदल झालेला नाही. एखादा पापी मनुष्य पुढच्या जन्मी इमानदार कुत्रा होऊ शकतो का? असो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

हा (जीवात्मा दुसरे शरीर धारण करून) कान, डोळे, त्वचा, जिव्हा, नाक आणि मनाचा आधार घेऊन त्या त्या विषयांचा उपभोग घेतो.

----------------------------------------------------------------

उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितम्। विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः।।15.10।।

उत्क्रामन्तम्‌ स्थितम्‌ वा, भुञ्जानम्‌ गुण-अन्वितम्‌ वा अपि विमूढाः न अनुपश्यन्ति, ज्ञान-चक्षुषः पश्यन्ति।

उत्क्रामन्तम्‌ (शरीराचा) त्याग करत असताना

उतक्रमत् उत् +क्रम् धातू जाणे रक्षण करणे शतृ प्रत्यय पुं. द्वि. ए. व.

स्थितम्‌ (शरीरामधे) स्थित असताना

स्थित स्था धातू क्त प्रत्यय नपु. द्वि. ए. व.

वा, अथवा अव्यय

भुञ्जानम्‌ उपभोग घेत असताना भुन्ज् धातू शतृ प्रत्यय पु. द्वि. ए. व.

गुण-अन्वितम्‌ गुणांनी युक्त गुण अन्वित पु. द्वि. ए. व.

वा अथवा अव्यय

अपि सुद्धा अव्यय

विमूढाः मूर्ख विमूढ पु. प्र. ब. व.

न अव्यय

अनुपश्यन्ति,पाहू शकतात अनु+दृश् धातू लट लकार प्र.पु.ब.व.

ज्ञान-चक्षुषः ज्ञान रूपी नेत्र ज्ञानचक्षुस् पु. प्र. ब. व.

पश्यन्ति पाहतात दृश् धातू पाहणे लट लकार प्र.पु.ब.व.

आधीच्या 3 श्लोकांचा सारांश ह्या श्लोकात सांगितला आहे.

डोळ्यांनी आपण पाहू शकतो आणि ज्ञानामुळे दृष्टी मिळते. एखाद्या गोष्टीचे आकलन करून घेण्यासाठी ज्ञानाची जोड द्यावीच लागते. काच आणि हिर्‍यातील फरक सर्वांनाच समजत नाही.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

जीव आपल्या देहाचा कसा त्याग करतो आणि शरीरात असताना प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली उपभोग घेत असलेला आत्मा, मूर्ख लोक पाहू शकत नाहीत मात्र ज्ञानी व्यक्ती हे पाहू शकतात.

----------------------------------------------------------------

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्।यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः।।15.11।।

यतन्तः योगिनः च आत्मनि अवस्थितम्‌ एनम्‌ पश्यन्ति, अकृत-आत्मानः अचेतसः यतन्तः अपि एनम्‌ न पश्यन्ति।

यतन्तः प्रयत्नशील यतत शतृ प्रत्यय पु. प्र. ब. व.

यत् धातू प्रयत्न करणे

योगिनः योगिन् पु. प्र. ब. व.

आत्मनि स्वतःमध्ये आत्मन् पु स. ए. व.

अवस्थितम्‌ स्थित अव +स्था धातू क्त प्रत्यय नपु द्वि. ए. व.

एनम्‌ हे इदम् पु. द्वि. ए. व.

पश्यन्ति, पाहतात दृश् धातू पाहणे लट लकार प्र.पु.ब.व.

अकृत-आत्मानः आत्म साक्षात्कार रहीत न कृत आत्मन् पु. प्र. ब. व.

अचेतसः अविवेकी न चेतस् नपु. प्र. ब. व.

यतन्तः प्रयत्न करून यतत शतृ प्रत्यय पु. प्र. ब. व.

यत् धातू प्रयत्न करणे

अपि सुद्धा अव्यय

एनम्‌ हे इदम् पु. द्वि. ए. व.

न पश्यन्ति पाहत नाहीत दृश् धातू पाहणे लट लकार प्र.पु.ब.व.

आधीच्या श्लोकात ज्ञानचक्षू असा शब्द वापरल्यानंतर आता महर्षी व्यास स्वतः च्या अंतःकरणात पहायला सांगत आहेत. डोळ्यांनी इतर गोष्टी पाहता येतात, पण स्वतः चे डोळे आपल्याच डोळ्यांनी पाहता येत नाही. जो सर्व काही जाणतो त्याला कसे पहावे?

विज्ञातारमरे केन विजानीयात्। बृहदारण्यक0 2। 4। 14

खरा भक्त होण्यासाठी आपल्या व्यक्तीमत्वात अनेक बदल घडवून आणले पाहिजेत ज्याच्या बद्दल सांगून झाले आहेच. सूर्य चंद्र वीज अग्नी हे सुद्धा प्रभावहीन ठरतात अशा परमात्म्याचे रूप आपल्या आत मध्येच बघायचे आहे. किती कठीण आहे हे सर्व. भगवे कपडे घातले म्हणजे कोणी योगी होत नाही. हा विचार महर्षी व्यासांना त्या काळात का बरे सांगावासा वाटला असेल?

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की योगीजन प्रयत्नपूर्वक आपल्या मधील परम तत्व पाहू शकतात पण ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेलाच नाही असे अविवेकी लोक प्रयत्न करून सुद्धा काहीही पाहू शकत नाहीत.

----------------------------------------------------------------

यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्। यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्।।15.12।।

आदित्य-गतं यत्‌ तेजः अखिलम्‌ जगत्‌ भासयते, यत्‌ चन्द्रमसि च, यत्‌ अग्नौ च तत्‌ तेजः मामकम्‌ विद्धि।

आदित्य-गतं सूर्या पासून आदित्यगत नपु. प्र. ए. व.

यत्‌ जो यद् अव्यय

तेजः तेजस् नपु. प्र. ए. व.

अखिलम्‌ संपूर्ण अ+खिल नपु. द्वि. ए. व.

जगत्‌ जगत्‌ नपु. द्वि. ए. व.

भासयते, प्रकाशित करतो भास् धातू चमकणे णिजन्त लट लकार प्र.पु.ए.व

यत्‌ जो यद् अव्यय

चन्द्रमसि चन्द्रामधे चन्द्रमस् पु. स. ए. व.

च, अव्यय

यत्‌ जो यद् अव्यय

अग्नौ अग्नी मध्ये अग्नी पु. स. ए. व.

च अव्यय

तत्‌ ते तद् नपु. द्वि. ए. व.

तेजः तेजस् नपु द्वि. ए. व.

मामकम्‌ माझ्यापासून मामक पु. द्वि. ए. व.

विद्धि जाण विद् धातू माहीत करुन घेणे लोट लकार म. पु. ए. व.

शास्त्र आपल्याला एखादी गोष्ट कशी घडते ते सांगू शकते पण एखादी गोष्ट मुळात का घडते ते नाही सांगता येत. एखादे बाळ, मुलगा किंवा मुलगी कसे होतात ते गुणसूत्रांच्या आधारे सांगतील पण मुलगीच/मुलगाच का जन्माला आला ते नाही सांगता येत. आपल्या सूर्यमालेतील सूर्य, त्याची बरीच माहिती उपलब्ध आहे पण कोणीही सूर्याजवळ जाऊ शकलेले नाही. आणि सूर्यमाला का तयार झाली, हे पण नाही सांगता येत. कुठेतरी आपले ज्ञान तोकडे आहे आणि आपण निसर्गावर मात करू शकत नाही हे मान्य करावेच लागते.

ह्याच अध्यायातील 3र्या आणि 4 थ्या श्लोकात संसारवृक्षाचे रूप प्रत्यक्ष अनुभवता येत नाही कारण त्याचा आरंभ नाही अंत सुद्धा नाही असे म्हटले आहेच

स एष पूर्वेषामपि गुरु: कालेनानवच्छेदात् ।। पतंजली योगसूत्र 1.26 ।।

हा ईश्वर काळाच्या बंधनाच्या पलिकडे असून आधीच्या सर्व गुरूंचा तो गुरू आहे.

गीतेच्या 10 व्या अध्यायात, ज्याचे नाव विभूतीयोग आहे त्यामध्ये श्रीभगवानकृष्णांच्या विविध रूपांचे विस्तृत वर्णन आपण वाचले आहेच,विशेषतः 21 व्या श्लोकात सूर्य आणि चंद्राचे वर्णन केले आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

सूर्यापासून येणारे तेज समस्त जगाला प्रकाश देते तसेच जे तेज चन्द्राकडे आणि अग्नी चे आहे ते सर्व माझेच आहे हे (तू) समजून घे.

----------------------------------------------------------------

गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा। पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः।।15.13।।

अहम्‌ गाम्‌ आविश्य ओजसा भूतानि धारयामि च। रसात्मकः सोमः भूत्वा च सर्वाः ओषधीः पुष्णामि।।

अहम्‌ मी अस्मद् प्र. ए. व.

गाम्‌ गो स्त्री. द्वि. ए. व.

आविश्य प्रवेश करून आ +विश् धातू ल्यप प्रत्यय

ओजसा आपल्या शक्तीने ओजस् नपु. तृ. ए. व.

भूतानि भूत नपु. द्वि. ब. व.

धारयामि धारण करत धृ धातू णिजन्त लट लकार उ. पु. ए. व.

च अव्यय

रसात्मकः रसस्वरूप रस+आत्मक पु. प्र. ए. व.

सोमः चन्द्र सोम पु. प्र. ए. व.

भूत्वा होऊन भू धातू होणे क्त्वा प्रत्यय

च आणि अव्यय

सर्वाः संपूर्ण सर्वा स्त्री द्वि. ब. व.

ओषधीः ओषधी स्त्री द्वि. ए. व.

पुष्णामि पुष् धातू पोषण करणे लट लकार उ. पु. ए. व.

गीतेच्या 10 व्या अध्यायात विस्ताराने श्रीभगवानकृष्णांच्या विविध रूपांचे वर्णन आपण वाचले आहेच. ह्या श्लोकात चन्द्राच्या उपयुक्ततेबाबत सांगितले आहे. आयुर्वेद आणि होमिओपॅथी औषधे चन्द्रप्रकाशात ठेवून तयार करण्यात येतात. वाढत्या चन्द्रप्रकाशाचा झाडांच्या वाढीवर चांगला परीणाम होतो असे आढळून आले आहे. ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

मी पृथ्वीवर प्रवेश करून माझ्या सामर्थ्याने सर्व भूतांना आपल्याला कक्षेत ठेवतो आणि मीच चंद्रप्रकाशाद्वारे औषधि वनस्पतींना रसद पुरवून पोषण करतो.

----------------------------------------------------------------

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्।।15.14।।

अहम्‌ वैश्वानरः भूत्वा प्राणिनाम्‌ देहम्‌ आश्रितः प्राण-अपान-समायुक्तः चतुर्विधम्‌ अन्नम्‌ पचामि।

अहम्‌ मी अस्मद् प्र. ए. व.

वैश्वानरः अग्नीरूप वैश्वानर पु. प्र. ए. व.

भूत्वा होऊन भू धातू होणे क्त्वा प्रत्यय

प्राणिनाम्‌ सजीवांचे प्राणिन् पु. ष. ब. व.

देहम्‌ शरीरात देह नपु. द्वि. ए. व.

आश्रितः आ+श्रि धातू सेवा करणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

प्राण-अपान-समायुक्तः सम+युज् धातू जोडणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

प्र+आ+अन् धातू श्वास घेणे

चतुर्विधम्‌ चार प्रकारचे चतुर+विध नपु. द्वि. ए. व.

अन्नम्‌ अन्नाचे अन्न नपु. द्वि. ए. व.

पचामि पच् धातू लट लकार उ. पु. ए. व.

बृहदारण्यक उपनिषदात वैश्वानर चा अर्थ सांगितला आहे.

अयमाग्निर्वैश्वानरो योऽयमन्तः पुरुषे येनेदमन्नं पच्यते।बृहदारण्यकोपनिषत् 5.9.1।।

माणसांच्या आत मध्ये असलेला अग्नी जो अन्नाचे पचन करतो तो वैश्वानर.

जठराग्नी हा शब्द माहित आहेच.

आजच्या भाषेत उर्जा हा शब्द जास्त योग्य आहे.

आपल्या शरीराला कोणतेही काम करण्यासाठी उर्जेची गरज असते, अर्थात त्यातून उष्णता निर्माण होते. माणूस मृत झाला की त्याचे शरीर थंड पडते.

चार प्रकारचे अन्न आपण खातो.

भक्ष्य म्हणजे चावून खाणे, भोज्य म्हणजे पिणे, लेह्य म्हणजे चाटणे,

चोष्य म्हणजे चोखणे.

ह्या श्लोकात प्राण आणि अपान यांचा समतोल असा उल्लेख आहे. खरे तर हे शब्द श्वासोच्छवासाशी निगडित. आपण जर बारकाईने विचार केला तर फक्त श्वासच नाही तर अन्न आणि पाणी सुद्धा जरूरीप्रमाणे आत घेतो आणि अनावश्यक भाग बाहेर टाकून देतो.

शास्त्रांमध्ये पाच प्रकारचे प्राण सांगितले आहेत. जसे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे शरीरात निरनिराळ्या भागांत व्यापलेले असतात आणि निरनिराळी कार्य करण्यास मदत करतात.

हृदि प्राणो गुदेऽपानः समानो नाभिमध्यगः । उदानः कण्ठदेशे तु व्यानः सर्वशरीरगः ॥

हृदयात प्राण, गुदद्वारात अपान, नाभि मंडलात समान, कण्ठात व्यान आणि उदानवायु सर्व शरीरात संचारत असतात.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

मीच समस्त प्राणीमात्रांच्या देहात वैश्वानर अग्नी रूपात राहून, प्राण-अपान चा समतोल साधून चार प्रकारचे अन्न पचवतो.

----------------------------------------------------------------

सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च। वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।15.15।।

अहम्‌ सर्वस्य हृदि सन्निविष्टः, मत्तः स्मृतिः ज्ञानम्‌ अपोहनम्‌ च। अहम्‌ सर्वैः वेदैः एव वेद्यः च, अहम्‌ एव वेद-वित्‌ च वेदान्त-कृत्‌ च ।

अहम्‌ मी अस्मद् प्र. ए. व.

सर्वस्य सर्व प्राणीमात्रांचा सर्व पु. ष. ए. व.

हृदि हृदयात हृद् नपु. स. ए. व.

सन्निविष्टः, स्थित सम+नि+विष् व्याप्त असणे धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

मत्तः माझ्या पासून मत्त मत् +तासिल प्रत्यय

स्मृतिः स्मृति स्त्री प्र. ए. व.

ज्ञानम्‌ ज्ञान नपु प्र. ए. व.

अपोहनम्‌ अपोहन नपु. प्र. ए. व.

अप+वह् धातू वाहणे

च।

अहम्‌ मी अस्मद् प्र. ए. व.

सर्वैः सर्व पु. तृ. ब. व.

वेदैः वेदांद्वारे वेद पु. तृ. ब. व.

एव

वेद्यः जाणण्यायोग्य विद् धातू ण्यत् प्रत्यय

च,

अहम्‌ मी अस्मद् प्र ए. व.

एव

वेद-वित्‌ वेद जाणणारा वेदविद् पु. प्र. ए. व.

वेदान्त-कृत्‌ वेदांचा संकलक वेदान्तकृत् पु. प्र. ए. व.

च ।

ह्या अध्यायातील पहिल्या श्लोकात वेदवित् म्हणजे वेदांचा जाणकार असा अश्वत्थ असे म्हटले आहे आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण स्वतः लाच वेदवित् म्हणत आहेत. मागच्या श्लोकात आपण अपान शब्दाचा अर्थ समजून घेतला. अनावश्यक अन्न, पाणी बाहेर टाकून देणे म्हणजे अपान. ह्या श्लोकात अनावश्यक वाईट स्मृतींना मनातून काढून टाकण्या बद्दल लिहिले आहे. संशय भ्रम विपर्यास तर्क वितर्क इत्यादी दोष नाहीसे होणे म्हणजे अपोहन. योग्य वेळी वाईट विचार नष्ट न होणे, गैरसमज दूर न होणे हेच तर आपल्या कामातील मोठे अडथळे. 2र्या अध्यायातील 53 व्या श्लोकात स्थिर बुद्धि असण्याचा फायदा सांगितला आहेच. खरे तर हा श्लोक म्हणजे आतापर्यंत वाचलेल्या गीतेतील श्लोकांचा गोषवारा आहे असे वाटते.

मत्तः परतरं नान्यत्किञ्चिदस्ति धनञ्जय।7.7।। माझ्या पेक्षा श्रेष्ठ ह्या जगात कोणीच नाही.

अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन।।9.19।। अमृत, मृत्यु, सत्, असत् सर्व काही मीच आहे.

त्वत्तो ज्ञानं हि जीवानां प्रमोषस्तेऽत्र शक्तितः

(श्रीमदभागवतम्-11.22.28)

केवळ तुमच्या मुळे जीव ज्ञानी होतात आणि आपल्याच शक्तिने ज्ञान लोप पावते.

तत्तु समन्वयात्। ब्रह्म सूत्र 1.1.4

वेदांचा उद्देश्य च परमात्म्याची जाणिव करून देण्याचा आहे.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

सर्व प्राण्यांच्या हृदयात मी वसलेला आहे. माझ्या मुळेच स्मृती, ज्ञान आणि अपोहन शक्य आहे. वेदांच्या माध्यमातून मला जाणून घेता येईल. वेदांतील तत्व मीच साकारलेली आहेत आणि मीच वेदवित् आहे.

----------------------------------------------------------------

द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च। क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते।।15.16।।

लोके क्षरः अक्षरः च इमौ द्वौ पुरुषौ एव। सर्वाणि भूतानि क्षरः, कूटस्थः च अक्षरः उच्यते।

लोके जगात लोक पु. स. ए. व.

क्षरः नाशवंत क्षर पु. प्र. ए. व.

अक्षरः शाश्वत अ+क्षरः, न क्षरः

क्षर धातू वाहणे

इमौ हे पु. द्वि. द्वि. व.

द्वौ दोन द्वि. पु. प्र. द्वि. व.

पुरुषौ पुरूष पु. प्र. द्वि. व.

एव अव्यय

सर्वाणि सर्व नपु. प्र. ब. व.

भूतानि सजीव भूत नपु. प्र. ब. व.

क्षरः,

कूटस्थः निश्चल कूटस्थ पु. प्र. ए. व.

अक्षरः न क्षरः

उच्यते म्हणतात वच् धातू बोलणे कर्मणि प्र. पु. ए. व.

ह्या श्लोकाचा अर्थ लिहीताना सत्ता आणि पैशामुळे निर्माण झालेली नाती आणि आपल्या सुहृदांचे निखळ प्रेम अशी उपमा द्यावीशी वाटते. व्यावसायिक नाती तात्पुरती असतात. प्रकृती आणि पुरूष ह्यांच्या संयोगाने निर्माण झालेले हे जग, मोहमायेच्या अंमलाखाली रंगीबेरंगी दिसत असले तरी ते सर्व कधीनाकधी संपणार असते.

नष्ट होत नाही तो पुरूष.

अणोरणीयान् महतो महीयान्

आत्मा गुहायां निहितोऽस्य जन्तोः॥ - श्वेताश्वतरोपनिषत् 3.20।।

तो सूक्ष्म पेक्षा ही अती सूक्ष्म आणि सर्वात मोठा, परमात्मा ह्या जीवाच्या हृदयरूपी गुहेत वसला आहे.

बृहदारण्यक उपनिषदातील 3.8.8 श्लोकात परमात्म्याचे विस्तृत वर्णन केले आहे.

च्युत अच्युत, क्षर अक्षर, परा-अपरा, क्षेत्र क्षेत्रज्ञ, नश्वर-शाश्वत हे सर्व शब्द आपण आतापर्यंत वाचले, समजून घेतले. कूटस्थ शब्दाचा अर्थ 12 व्या अध्यायातील 3र्या श्लोकात आपण वाचला. 14 व्या अध्यायातील 3र्या श्लोकात प्रकृति ला महद्ब्रह्म असे म्हटले आहे. 8 व्या अध्यायातील 3र्या श्लोकात अक्षरं ब्रह्म परमं म्हणजे अविनाशी असे परम तत्व ब्रह्म आहे असे म्हटले आहे. तसाच आणखी एक श्लोक

अक्षरं परमं ब्रह्म ज्योतीरूपं सनातनम् ।

गुणातीतं निराकारं स्वेच्छामयमनन्तजम् ॥१॥ श्रीकृष्णस्तोत्रं इन्द्ररचितम्

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

ह्या जगात दोन प्रकारचे पुरूष आहेत शाश्वत आणि नश्वर.

सर्व जीव हे क्षर आहेत आणि अपरिवर्तनीय असा अक्षर आहे.

----------------------------------------------------------------

उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः। यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः।।15.17।।

परम्‌-आत्मा इति उदाहृतः उत्तमः पुरुषः अन्यः तु यः अव्ययः ईश्वरः लोक-त्रयम्‌ आविश्य बिभर्ति ।।

परम्‌-आत्मा परम आत्मन् पु. प्र. ए. व.

इति अव्यय

उदाहृतः म्हटले जाते उत+आ+हृ धातू क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

उदाहृ म्हणजे दाखला देणे (उदाहरण)

उत्तमः उत्तम पु. प्र. ए. व.

पुरुषः पुरूष पु. प्र. ए. व.

अन्यः अन्य पु. प्र. ए. व.

तु अव्यय

यः जो यद् पु. प्र. ए. व.

अव्ययः अविनाशी अव्यय पु. प्र. ए. व.

ईश्वरः ईश्वर पु. प्र. ए. व.

लोक-त्रयम्‌ तीन लोक लोकत्रय नपु. द्वि. ए. व.

आविश्य प्रवेश करून आ+विश् धातू प्रवेश करणे ल्यप प्रत्यय

बिभर्ति भरण पोषण करतो भृ धातू धारण करणे कर्तरी लट लकार प्र.पु.ए.व.

क्षर काय, अक्षर काय आहे ते आधीच्या श्लोकात स्पष्ट करून झाल्यावर आता ह्या श्लोकात उदाहृ म्हणजे दाखला देणे. पुरूषांतील उत्तम म्हणजे परमात्मा असा दाखला दिला आहे.

असे दाखले उपनिषदात सुद्धा सापडतात.

नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानामेको बहूनां यो विदधाति कामान्।।(श्वेताश्वतरोपनिषद् 6/13)

नित्योऽनित्यानां चेतनश्चेतनानामेको बहूनां यो विदधाति कामान्‌। तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीरास्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम्‌ ॥ कठोपनिषद् 2.2.13

अनेक अनित्य मधे एक नित्य, अनेक चेतना पैकी एकमेव तत्व जो अनेकांच्या कामना पूर्ति करतो, तोच एकमात्र मूळ स्वरूप आहे जे सांख्यवाद आणि योगदर्शन आपल्याला सांगतात, जर तू हे समजून घेतलेस तर तू सर्व बंधनातून मुक्त होशील.

ह्या श्लोकाचा अर्थ माण्डूक्य उपनिषदातील वर्णन केलेल्या आत्म्याच्या चार अवस्थांच्या माध्यमातून सुद्धा सांगता येईल. लोकत्रय म्हणजे जाग्रत, स्वप्न, सुषुप्ति आणि अक्षर म्हणजे तुरीया अवस्था असे पण म्हणता येईल. माण्डूक्य उपनिषदात जागृत अवस्थेला वैश्वानर म्हटले आहे, तो ॐ अक्षरातील 'अ' मानला जातो. ज्याचा संदर्भ आपण 14 व्या श्लोकात वाचला.

दुसरे अक्षर 'उ' म्हणजे स्वप्नावस्था.

सुषुप्त अवस्था म्हणजे 'म'.

तुरीया अवस्था म्हणजे ॐ.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

परन्तु (आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन, दोन पुरुषां व्यतिरिक्त) उत्तम पुरुष हा कोणी दुसराच आहे जो अविनाशी असा तिन्ही लोकांत प्रवेश करून त्यांचे भरणपोषण करतो तो परमात्मा आहे.

----------------------------------------------------------------

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः। अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः।।15.18।।

यस्मात्‌ अहम्‌ क्षरम्‌ अतीतः, अक्षरात्‌ अपि उत्तमः च, अतः लोके वेदे च पुरुषोत्तमः प्रथितः अस्मि।

यस्मात्‌ कारण अव्यय

अहम्‌ मी अस्मद् प्र. ए. व.

क्षरम्‌ नाशवान क्षर पु. द्वि. ए. व.

अतीतः, (पलिकडे) जाणे अतीत पु. प्र. ए. व. अत+इ धातू जाणे क्त प्रत्यय

अक्षरात्‌ शाश्वत अक्षर नपु. पं. ए. व.

अपि सुद्धा

उत्तमः उत्तम पु. प्र. ए. व.

च, आणि

अतः म्हणून अव्यय

लोके लोकात लोक पु. स. ए. व.

वेदे वेद पु. स. ए. व.

च आणि

पुरुषोत्तमः पुरुष उत्तम पु. प्र. ए. व.

प्रथितः प्रसिद्ध प्रथित प्रथ धातू विस्तार होणे क्त प्रत्यय पु. प्र. ए. व.

अस्मि आहे अस् धातू लट लकार उ.पु.ए.व.

ह्या श्लोकात सर्व संज्ञांचा उहापोह करून झाल्यावर पुरूषांमधील उत्तम म्हणजे पुरूषोत्तम म्हणजे काय ते सांगितले आहे.

3र्या अध्यायातील 42 व्या श्लोकात सर्व नश्वर गोष्टींमध्ये आत्मा श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे.

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः। मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः।।3.42।।

शरीरापेक्षा इन्द्रिय श्रेष्ठ, इन्दरियांपेक्षा मन, मनाहून श्रेष्ठ बुद्धि आणि बुद्धि पेक्षा श्रेष्ठ आत्मा.

पण ह्या जीवात्म्याला मोहमायेचे आकर्षण आहे. मात्र परमात्मा सर्वोत्तम आहे.

माणसांमधेच काही जण इतके शुद्ध आणि सात्विक असतात की त्यांना देवत्व प्राप्त होते जसे आपले संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज वगैरे. काही जणांना महात्मा अशी उपाधी बहाल होते. कारण 4 थ्या अध्यायातील 6व्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी स्वतः च म्हटले आहे.

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्। प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया।।4.6।।

मी जरी जन्मलेला नसलो, अविनाशी असलो, सर्व जीवांचा ईश्वर असलो तरी माझ्या योगसामर्थ्याने जन्म घेऊ शकतो.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

कारण मी नाशवंत गोष्टींच्या पलिकडचा आहे, शाश्वत गोष्टींमधे उत्तम आहे, म्हणून जगात आणि वेदांत परमेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.

----------------------------------------------------------------

यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्। स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत।।15.19।।

हे भारत ! यः असम्मूढः पुरुषोत्तमम्‌ माम्‌ एवम्‌ जानाति, सः सर्व-वित्‌ सर्व-भावेन माम्‌ भजति।

हे भारत !

यः जो यद् पु प्र. ए. व.

असम्मूढः ज्ञानी न सम्मूढः पु. प्र. ए. व.

पुरुषोत्तमम्‌ पुरूष उत्तम पु. द्वि. ए. व.

माम्‌ मला अस्मद् सर्व द्वि. ए. व.

एवम्‌ असे अव्यय

जानाति, जाणतो ज्ञा धातू समजून घेणे कर्तरी लट लकार प्र.पु.ए.व.

सः तो तद् पु. प्र. ए. व.

सर्व-वित्‌ सर्वज्ञ सर्व-विद् पु. प्र. ए. व.

सर्व-भावेन सर्व-भाव पु. तृ. ए. व.

माम्‌ मला अस्मद् सर्व द्वि. ए. व.

भजति भजतात भज् धातू लट लकार प्र.पु.ए.व.

ह्या श्लोकात ज्ञानी व्यक्ती आणि सर्वविद असे दोन्ही शब्द वापरले आहेत. ह्यातून व्यास महर्षींना काय सुचवायचे आहे?

जो ज्ञानी आहे तो सर्वविद आहे आणि त्याला श्रीभगवानकृष्णांच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती आली आहे. अशी प्रचिती येण्यासाठी शिक्षणाची अशी कोणतीच अट नाही. ज्याला परमात्म्याची ओळख पटली तो खरा भक्त. ह्या श्लोकातील सर्व-भावेन हा शब्द सुद्धा महत्वपूर्ण. परमेश्वराला सर्वस्व अर्पण करून ज्ञानी लोकांनी भक्ती करणे अपेक्षित आहे. तुकारामांनी त्यांच्या अभंगात असेच वर्णन केले आहे.

सर्वभावें आलों तुजचि शरण । कायावाचामनसहित देवा ॥689.1॥ आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥689.2।।

माझिये जीवींचेकांहीं जडभारी । तुजविण वारी कोण दुजे ॥689.3॥ तुझे आम्ही दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥689.4॥ तुका म्हणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देई ॥689.5॥

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की

हे भारत! अशाप्रकारे जो मोहपाशातून मुक्त झालेला असा (ज्ञानी) मला पुरूषोत्तम असे जाणतो तो सर्वज्ञ सर्व भावाने माझेच भजन करतो.

----------------------------------------------------------------

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयाऽनघ। एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत।।15.20।।

अनघ ! भारत ! इति इदम्‌ गुह्यतमम्‌ शास्त्रम्‌ मया उक्तम्‌। एतत्‌ बुद्ध्वा बुद्धिमान्‌ कृतकृत्यः च स्यात् ।

अनघ ! निष्पाप अन+अघ सं. ए. व.

भारत

इति असे अव्यय

इदम्‌ हे इदम् नपु. प्र. ए. व.

गुह्यतमम्‌ रहस्यमय गुह्यतम नपु. प्र. ए. व.

गुह् धातू झाकून ठेवणे

शास्त्रम्‌ शास्त्र नपु. प्र. ए. व.

शास् धातू बोध करून देणे, आज्ञा करणे.

मया माझ्या कडून अस्मद् तृ. ए. व.

उक्तम्‌ सांगितले गेले वच् धातू क्त प्रत्यय नपु. प्र. ए. व.

एतत्‌ हे एतद् नपु. द्वि. ए. व.

बुद्ध्वा बुध् धातू क्त्वा प्रत्यय

बुध् धातू जाणणे

बुद्धिमान्‌ बुदधिमत् पु. प्र. ए. व.

कृतकृत्यः कृतार्थ कृतकृत्य पु. प्र. ए. व.

च अव्यय

स्यात् अस् धातू असणे विधिलिडः लकार प्र.पु.ए.व.

ह्या अध्यायातील शेवटचा श्लोक. येथे अर्जुनाला अनघ म्हणजे निष्पाप असे संबोधले आहे. आपल्या मधून पापी वृत्ती नष्ट होण्याची प्रक्रिया म्हणजेच खरा भक्त होण्याची सुरवात. 12 व्या अध्यायातील 13,14,15 ह्या तीन श्लोकात भक्ताचे गुण सांगितले आहेतच.

आधीच्या श्लोकात 'सर्वभावेन' असा शब्दप्रयोग वाचल्यानंतर 2 र्या अध्यायातील 41 व्या श्लोकाचा उल्लेख करावासा वाटतो.

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन। बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्।।2.41।।

निश्चयात्मक बुद्धिने काम करणाऱ्या व्यक्तींचे एकच ध्येय असते, मात्र संकल्पहीन व्यक्तींची बुद्धि इकडे तिकडे भिरभिरत असते.

गीतेच्या ह्या श्लोकात आपण लक्ष्यकेंन्द्रित असावे असा संदेश मिळतो.

ह्या श्लोकातील गुह्यतमं शास्त्रं ह्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायला हवे. 'हितानुशासनं ग्रन्थः' असे म्हणता येईल.

योग्य व्यक्तीलाच ज्ञान प्रदान करावे असा संकेत आहे. अथर्वशीर्षात सुद्धा तसा उल्लेख आहे. पहिलीतल्या मुलाला दहावी चा अभ्यास सांगून काहीच उपयोग नाही. असा सरळ विचार करून पुढील श्लोक समजून घेता येईल.

एतद् हि जन्मसाफल्यं ब्राह्मणस्य विशेषतः ।प्राप्यैतत् कृतकृत्यो हि द्विजो भवति नान्यथा ॥ 12.93 मनुस्मृति ॥

(जो वेदवित् आहे असा ) ब्राह्मण जन्माने कृतकृत्य होतो जो दुसरा जन्म मानला जातो, त्या जन्माचे विशेषकरून सार्थक होते.

आता परत 12 व्या अध्यायातील 12 वा श्लोकात काय सांगितले आहे ते पाहू.

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्धयानं विशिष्यते ।

ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ॥12.12॥ अभ्यासापेक्षा (भक्ती पेक्षा) ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ,आणि ध्यानापेक्षा कर्मफलांचा त्याग. असा त्याग केल्याने लगेचच शांती प्राप्त होते.

कर्मफलांचा त्याग केल्यावर माणूस पापरहीत होणारच.

ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की

हे निष्पाप भारतवंशी अर्जुना, अशा पद्धतीने गोपनीय शास्त्र माझ्या कडून सांगितले आहे, ते समजून घेतल्याने लोक ज्ञानवंत आणि कृतार्थ होतात.

--------------------------------🙏🙏🙏🙏------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा