4था अध्याय
ह्यालाच ज्ञान कर्म संन्यास योग असे नाव असून त्यात 42
श्लोक आहेत.
श्रीभगवानुवाच
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्।
विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्।।4.1।।
श्रीभगवानुवाच -
अहम् इमम् अव्ययम् योगम् विवस्वते प्रोक्तवान् । विवस्वान्
मनवे प्राह । मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत् ।
ह्या श्लोकात तीन महत्वपूर्ण नावे आलेली आहेत ती म्हणजे
विवस्वान
मनु
इक्ष्वांकु (वंश)
हिंदू धर्मातील समजूतीनुसार मनु ला मानव जातीचा प्रथम पुरुष मानले जाते.
प्रत्येक मनु चे वय ठरलेले असते त्याला मन्वन्तर, मनु+अन्तर असे
म्हणतात.
प्रोक्तवान् प्र +उक्तवान् वच् धातू
बोलले गेले
सांगितले
अव्ययम् योगम्
अव्यय अ +व्यय धातू खर्च होणे
अव्यय म्हणजे कधीच बदल होणार नाही असा योग. (खर्च झाला की आकडे
बदलतात)
परत एकदा व्यास मुनींचे द्रष्टेपण दिसून येते.
कधीच संपून जाणार नाही असा योग हे किती आत्मविश्वासाने सांगितले आहे.
असाच आत्मविश्वास खालील श्लोकात पण दिसतोच.
धर्मे अर्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ।
यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित् ।।
धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या संबंधी महाभारतात जे काही लिहून ठेवले
आहे, त्यानंतर आणखी काही लिहायला उरतच नाही
जे यामधे आहे हेच सर्वत्र आहे, परन्तु जे यात
नाही ते कुठेही नाही.
अव्यय म्हणजे बदल होणार नाही असा
अक्षय अ+क्षय क्षी धातू होणे (क्षय रोग) कमी कमी होत जाणे
असा अव्यय आणि अक्षय शब्दातील फरक.
अहम् मी
इमम् म्हणजे हा
प्राह प्र +अह् धातू विस्तार होणे
वैवस्वत मनु हा रघुवंशी घराण्याचा प्रथम पुरुष मानला जातो.
रघुवंश म्हणजेच इक्ष्वांकु वंश ज्यात रामाचा जन्म झाला.
आता ह्या श्लोकाचा अर्थ किती प्रगल्भ आहे ते लक्षात येईल.
श्री भगवान असे म्हणतात की हा कधीही बदल होणार नाही असा योग मी प्रथम
विवस्वान (म्हणजेच सूर्य) ला सांगितला
विवस्वाने तो मनुला सांगितला (बर्याच पुस्तकात प्राह चा अर्थ
सांगितला असे म्हटले आहे)
आणि मनुने तो इक्ष्वांकु ला सांगितला.
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप।।4.2।।
हे परन्तप! एवम् परम्परा-प्राप्तम् इमम् राजर्षयः विदुः। सः योगः
महता कालेन इह नष्टः।
(हे) परन्तप परं +तप दुसर्याला ताप देणारा म्हणजेच विजेता, अर्जुन
(व्यासांनी लढाई च्या आधीच अर्जुनाला विजेता म्हणून टाकले)
ऋषींचे 7 प्रकार सांगितले आहेत
1. महर्षि, 2. परमर्षि 3. देवर्षि,
4. ब्रह्मर्षि,
5. श्रुतर्षि,
6. राजर्षि,
8. कांडर्षि
त्यातील राजर्षी म्हणजे राजा आणि ऋषि सुद्धा. परिक्षीत हा राजर्षी
होता. परिक्षीत आणि कलीची गोष्ट माहीत आहेच.
विदुः विद् धातू जाणणे
एवम् परम्परा-प्राप्तम् असा परंपरेने प्राप्त झालेला
इमम् हा (योग)
राजर्षींना माहीत आहे.
सः योगः तो योग
महता कालेन इह दीर्घ
काळाच्या ओघात
नष्टः नष्ट झाला.
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्।।4.3।।
मे भक्तः सखा च असि इति, सः एव अयम् पुरातनः योगः अद्य मया ते
प्रोक्तः। हि एतत् उत्तमम् रहस्यम्।
रहस्यम् रहसि गुप्तता पाळणे. म्हणजे ते सर्वांना सांगू नये. (योग्य
व्यक्तिला सांगावे.)
थोडेसे विषयांतर करुन सांगते.
अथर्वशीर्ष म्हणजे अथर्ववेदाचे सार. एकूण 5 अथर्वशीर्ष
आहेत.
गणपत्यर्थशिर्षम्, शिवार्थशीर्षम्, देव्यथर्वशीर्षम्,
नारायण
अथर्वशीर्ष, सूर्याथर्वशीर्षम्.
तसे गणपती अथर्वशीर्ष सुद्धा एक रहस्य आहे असे म्हणता येईल. त्यातील 11 वा
श्लोक पहा.
इदमथर्वशीर्षंमशिष्याय न देयम् | यो यदि
मोहाद्दास्यति स पापीयान् भवति |
सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् || ११ ||
अयम् पुरातनः योगः हि एतत्
उत्तमम् रहस्यम्
प्राचीन योग हे नक्कीच श्रेष्ठ असे रहस्य आहे जे
अद्य मया ते प्रोक्तः।
अद्य आज
मया माझ्या कडून
ते प्रोक्तः तुला उलगडून सांगितले जात आहे (कारण )
मे भक्तः सखा च असि इति,
तू माझा भक्त आणि सखा सुद्धा आहेस.
तू माझा भक्त आणि सखा सुद्धा आहेस
म्हणून माझ्याकडून तुला प्राचीन असे योग शास्त्राचे श्रेष्ठ असे रहस्य उलगडून
सांगितले जात आहे.
अर्जुन उवाच
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति।।4.4।।
अर्जुन उवाच - विवस्वतः जन्म परम्, भवतः जन्म अपरम्
त्वम् आदौ एतत् प्रोक्तवान् इति कथम् विजानीयाम्(आधीच्या 3
श्लोकांचा संदर्भ घेऊन) अर्जुनाचा (तो मित्र आणि भक्त सुद्धा आहे ) श्रीकृष्णाला
अतिशय भाबडा प्रश्न,
भवतः म्हणजे आपण (प्रश्न विचारताना आपण असे संबोधले आहे)
विजानीयाम् वि +जानीयाम् ज्ञा धातू जाणून घेणे.
क्रियापद सुद्धा विधीलिडः लकार मध्ये वापरले आहे
मला ज्ञान व्हावे (अशी इच्छा आहे)
परम् अपरम् आधीचा आणि नंतरचा
विवस्वतः जन्म परम्,
विवस्वत
चा जन्म आधीचा
भवतः जन्म अपरम् आपला जन्म नंतरचा (अर्जुनाला कृष्ण जन्माची कथा
माहीत होतीच)
प्रोक्तवान् प्र +उक्तवान् सांगितले शिकवले
त्वम् आदौ एतत् प्रोक्तवान्
कथम् इति? मग हे तुम्ही आधीच ( विवस्वत ला) कसे
सांगितले?
हा प्रश्न वरवर खूपच साधा वाटला तरी
त्याच्या उत्तरात महान गर्भित अर्थ दडलेला आहे.
श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप।।4.5।।
श्रीभगवानुवाच - अर्जुन मे तव च बहूनि जन्मानि व्यतीतानि; हे
परन्तप! तानि सर्वाणि त्वम् न वेत्थ अहम् वेद ।
त्वं न वेत्थ
अहम् वेद (विद् धातू) म्हणजे तुला माहीत नाही पण मला माहित आहे.
काय?
मे तव च मी आणि तू सुद्धा
हे परन्तप (अर्जुनाचे विशेषण)
बहुनि जन्मानि व्यतीतानि
आपले बरेच जन्म झाले आहेत..
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया।।4.6।।
अजः अव्यय-आत्मा सन् अपि, भूतानाम् ईश्वरः सन् अपि, स्वाम्
प्रकृतिम् अधिष्ठाय, आत्म-मायया सम्भवामि।
जन् जायते उत्पन्न होणे
अजः जन्म न झालेला
अव्यय ज्याचा व्यय होत नाही असा
सन् सत् प्रातिपदिक प्र. एकवचन
भूतानाम् ईश्वरः सर्व भूतांचा (जीवांचा) ईश्वर
स्वाम् प्रकृतिम् स्व स्वतः ची नैसर्गिक प्रवृत्ती
अधिष्ठाय अधि +स्था
स्था उभे असणे
अधि +स्था आरुढ होणे, अधिकार प्राप्त होणे
आत्म-मायया स्वतः ची शक्ति
सम्भवामि भू धातू अस्तित्व
असणे
सम् +भू उत्पन्न होणे
मी जरी जन्मलेला नसलो (माझे अस्तित्व दिसत नसले)
मी अविनाशी असलो
सर्व जीवांचा ईश्वर असलो
तरी माझ्या नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे
स्वतः च्या शक्तिनुसार पुन्हा प्रगट होऊ शकतो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम्।।4.7।।
हे भारत! यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति, अधर्मस्य
अभ्युत्थानम्, तदा हि अहम् आत्मानम् सृजामि।
हे भारत.. भरत राजाच्या वंशाची कहाणी म्हणजे महाभारत.
यदा यदा जेव्हा जेव्हा
धर्मस्य ग्लानि भवति ग्लै
धातू थकून जाणे इथे अधोगती होणे असा अर्थ
इथे धर्म म्हणजे आपले कर्तव्य.
हिंदू मुस्लिम जैन वगैरे धर्माचा काहीही संबंध नाही.
18 व्या अध्यायातील 66 व्या श्लोका मध्ये हे सर्व स्पष्ट
होते.
अभ्युत्थानम् उत् +स्था म्हणजे उभे राहणे
अभि +उत् +स्था वाढ होणे
अधर्मस्य अभ्युत्थानम् अधर्माची वाढ होणे
अहम् आत्मानम् सृजामि सृज धातू निर्माण करणे
तदा त्यावेळी
आपण आपल्या आयुष्यात बर्याच भूमिका निभावत असतो, त्यामागे
आपली बरीच कर्तव्ये असतात.
जेव्हा जेव्हा अशा धर्माची अधोगती होते
आणि अधर्म बळावतो त्या त्या वेळी माझा अवतार होतो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।
साधूनाम् परित्राणाय, दुष्कृताम् विनाशाय, धर्म-संस्थापन-अर्थाय
च, (अहं) युगे युगे सम्भवामि ।
साधूनाम् ष बहु वचन चांगल्या लोकांचे
परि उपसर्ग सर्व ह्या अर्थी
त्रै धातू रक्षण करणे.
दुष्कृताम् विनाशाय वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी
धर्म-संस्थापन-अर्थाय धर्माची स्थापना करण्यासाठी
(अहं) सम्भवामि सम् +भू धातू उत्पन्न होणे
युगे युगे प्रत्येक युगात
7व्या श्लोकाला जोडून घ्यायचे
धर्म हे एक पवित्र सत्य आहे, त्याचे पालन केलेच पाहिजे.
चांगल्या लोकांचे रक्षण व्हावे आणि
वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी (मी) प्रत्येक
युगात जन्म घेतो.
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन।।4.9।।
हे अर्जुन! एवम् यः मे दिव्यम् जन्म कर्म च तत्त्वतः वेत्ति,
सः
देहम् त्यक्त्वा, पुनः न एति, माम् एति।
विद् वेत्ति समजणे
एति इ धातू म्हणजे जाणे
त्यक्त्वा त्याग करणे
दिव्यम् दिव्य दिव् धातू तेजस्वी असणे, चमकणे
(आधीच्या श्लोकांचे संदर्भ घेऊन) व्यासांनी ह्या श्लोकात अचानक विषय
बदलला आहे असे वाटते आहे त्याचा संदर्भ पुढे लागेल.
हे अर्जुना
यः जो
एवम (मह्म्) मे अस्मद च. ए. व.
अशाप्रकारे माझ्या
दिव्यम् जन्म कर्म च
तेजस्वी जन्मा बद्दल आणि
कामाबद्दल
तत्त्वतः तत्व, मर्म जाणतो
तो देहत्याग केल्यानंतर
पुनः न एति, पुन्हा
जन्म घेत नाही.
(तर तो ) माम् एति, माझ्याकडे
येतो.
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः।।4.10।।
वीत-राग-भय-क्रोधाः, मन्मयाः माम् उपाश्रिताः, ज्ञान-तपसा
पूताः, बहवः मद्भावम् आगताः।
वीत = वि+इत. इत हें इ (जाणें) ह्या धातुचे क्त कृदन्त.
वीत = विशेषेण इत = अगदीच गेलेला = नाहीसा झालेला
राग, भय, क्रोध
मन्मयाः पूर्णपणे माझ्यात सामावलेला
माम् उपाश्रिताः माझ्यावर अवलंबून असलेला
ज्ञान-तपसा
पूताः पू धातू पवित्र करणे
बहवः बहु
मद्भावम् मद् भावम् सात्विक भाव
आगताः आ +गताः येणे
जेव्हा भगवान् अवतार घेतात त्यावेळी ( त्यांनी घालून दिलेल्या
आदर्शामूळे सामान्य माणूस सुद्धा त्यांचे अनुकरण करतो म्हणजेच)
राग भय आणि क्रोध ह्यापासून मुक्त
झालेले माझ्या आश्रयास आलेले, माझ्यातच तल्लीन झालेले ज्ञान, कष्ट
तप ह्या मूळे पवित्र झालेले अशा बरेचजणांमधे माझीच झलक दिसते. (माझेच सात्विक भाव
त्यांच्यात आलेले असतात).
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः।।4.11।।
हे पार्थ! ये माम् यथा प्रपद्यन्ते, अहम् तान् तथा
एव भजामि। मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते।
प्रपद्यन्ते प्र +पद् आत्मने पदी प्र पु ब. व. पद् म्हणजे जाणे
प्र पद म्हणजे जवळ जाणे, शोधणे
अनुवर्तन्ते अनु +वृत् धातू म्हणजे असणे
अनु +वृत् अनुसरण करणे
वर्त्म वर्तमन् म्हणजे मार्ग
हा तसा बघायला गेलो तर खूप महत्वाचा श्लोक आहे.
गीतेमध्ये भक्तियोग सांगितला आहे, कर्मयोग
सांगितला आहे, ज्ञानयोग सांगितला आहे. त्याचेच फलित इथे थोडक्यात सांगितले आहे. जो
जशा पद्धतीने भगवानांना जोडून घेण्याचा प्रयत्न करतो त्याच प्रमाणे तो जोडला जातो.
ये यद् जो
यथा जसे
तथा तसे
तान् तद् तो
माम् मला
अहम् मी
भजामि अनुग्रह करणे
मम माझे
सर्वशः सर्व प्रकारे
भगवानांशी संवाद साधण्याचे अनेक मार्ग
आहेत. माणसे एक किंवा अनेक मार्गांनी भगवानांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील त्या
सर्वांचा मी प्रेमपूर्वक स्वीकार करतो.
काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा।।4.12।।
इह मानुषे लोके कर्मणाम् सिद्धिम् काङ्क्षन्तः देवताः यजन्ते;
हि
कर्मजा सिद्धिः क्षिप्रम् भवति।
इह मानुषे लोके ह्या माणसांच्या जगात
काङ्क्षन्तः काड्ःक्ष् धातू
इच्छा करणे
कर्मणां कर्मन्
सिद्धिम् ( कार्य) तडीस नेणे (कर्म फलाची अपेक्षा करणे)
देवताः यजन्ते यज् धातू आहुती देणे. (इथे देवता चा अर्थ इष्ट देवता
असा घ्यायचा,आपण पंचमहाभूते मानतो)
हि धातू प्रगती (नक्कीच पुढे
जाईल)
कर्मजा कर्म +जा कर्मा मूळे निर्माण झालेली
सिद्धिः
क्षिप्रम् पटकन्
भवति होते
माणसाला त्याच्या कर्माचे श्रेय लगेच
हवे असते. ते त्यांच्या इष्ट देवतांना साकडे घालतात आणि त्यांच्या कर्माचे वरवरचे
फळ त्यांना सहज मिळून जाते. (आजच्या युगात 2 मिनिट मॅगी असे
म्हणता येईल. ज्याचा फार काही उपयोग नसतो, तात्पुरते पोट भरते इतकेच).
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।।
गुण-कर्म-विभागशः मया चातुर्वर्ण्यम् सृष्टम्, तस्य
कर्तारम् अपि माम् अव्ययम् अकर्तारम् विद्धि।
तेरावा श्लोक का अर्थ बर्याच अंगांनी समजावून घेता येईल.
चातुर्वर्ण्या बद्दल इथे भाष्य केले आहे. (चातुर्वर्णा बद्दल अधिक
भाष्य 18 व्या अध्यायातील 41,42,43,44 व्या श्लोकात केले आहे)
मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी ह्यांच्यातील हा महत्त्वाचा फरक.
चातुर्वर्णात माणसांच्या गुणांना महत्व दिले आहे. आपली समाजव्यवस्था
संदिग्ध राहण्यासाठी वेगवेगळ्या गुणवत्ता असलेल्या व्यक्तींची गरज असते.
जसे युद्ध भूमीवर लढणारे पराक्रमी, निरनिराळी
यंत्रे निर्माण करणारे शास्त्रज्ञ आणि अभियांत्रिकी, व्यवस्थापक
वगैरे. बारा बलुतेदारीची व्यवस्था अशाच गरजेतून निर्माण झाली. ज्यामध्ये
माणसांच्या अंगभूत गुणांनुसार आपला व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य होते.
गीतेमध्ये माणसांचे ठळकपणे दिसून येणार्या गुणांचे सात्विक रज आणि
तामसी असे वर्गीकरण केले आहे. म्हणजे माणसांच्या ह्या वृत्ती त्या काळात मान्य
होत्या.
गुण-कर्म-विभागशः गुण आणि कामाच्या शैली प्रमाणे विभागीकरण
मया माझ्या कडून
चातुर्वर्ण्यम् चार वर्ण
सृष्टम् सृज् धातू निर्माण करणे
तस्य तद् त्याचा
कर्तारम् कर्तृ करवीता
अपि माम् मीच
अव्ययम् व्यय होत नाही असा अकर्तारम्
विद्धि विद् धातू जाणणे
भगवान् श्रीकृष्ण असे सांगतात की मीच
माणसांचे त्यांच्या गुणांप्रमाणे आणि काम करण्याच्या कुवतीनुसार चार वर्णात
वर्गीकरण केले आहे तरी सुद्धा मी अपरिवर्तनीय असून ह्या चा (वर्गीकरणाचा) करविता मी नाही, असे
समज.
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते।।4.14।।
कर्म-फले मे स्पृहा न माम् कर्माणि न लिम्पन्ति। इति यः माम्
अभिजानाति, सः कर्मभिः न बध्यते।
कर्म-फले केलेल्या कामाची पावती
मे न स्पृहा स्पृह् धातू इच्छा करणे
अहम् न स्पृहा मला अभिलाषा नाही
माम् कर्माणि
न लिम्पन्ति लिप् धातू लेप देणे
मी केलेले साधारण कामाने
माझ्यावर शिंतोडे उडत नाहीत
इति यः माम्
अभिजानाति अभि +जानाति जाणून घेणे
ह्या प्रकारे जे मला जाणतात
सः म्हणजे ते
कर्मभिः
न बध्यते बन्ध् धातू बांधून घेणे.
ते पण स्वतःला कर्माच्या
जोखडात बांधून घेत नाहीत.
हा झाला शब्दांप्रमाणे प्रत्येक शब्दाचा अर्थ
ह्यातील गर्भित अर्थ असा की
भगवानांनी आपण आपले कर्म करत असताना आपली काय भूमिका असली पाहिजे
यावर भाष्य केले आहे.
आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्याचा अट्टाहास असलाच नाही पाहिजे पण
आपले काम इतके चोख असले पाहिजे कि कार्य करताना मार्गात येणारे अडथळे पार करताना
इतरांना आपल्या हेतूबद्दल शंका उत्पन्न नाही झाली पाहिजे
जसे अग्नीला आहुति अर्पण करा किंवा केरकचरा, अग्नी आपले काम
चोख करणार. सूर्यप्रकाश सगळीकडे सारखाच पडतो. तो अपवित्र स्थानावर पडला म्हणून
त्याची महती कमी होत नाही.
हे सर्व जे जाणतात ते सुद्धा आपले काम
चोख करतात, स्वतः ला त्यामध्ये जखडून न घेता, निरपेक्ष
वृत्तीने.
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः।कुरु कर्मैव
तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्।।4.15।।
पूर्वैः मुमुक्षुभिः अपि एवम् ज्ञात्वा कर्म कृतम्। तस्मात् त्वम्
पूर्वैः पूर्वतरम् कृतम् कर्म एव कुरु।
पूर्वैः पूर्वी
मुमुक्षुभिः मुमुक्षू मुच् धातू मोक्षाची अपेक्षा करणारे
अपि एवम् ज्ञात्वा ज्ञा धातू जाणणे, माहीत असणे
मुमुक्षू ना माहीत होते (आधीच्या श्लोकांचे संदर्भ घेऊन ना मी कर्म
घडवून आणतो ना मला त्याचे श्रेय हवे असते )
कर्म कृतम् कर्म केले (मुमुक्षूंनी)
तस्मात् म्हणून
त्वम् तू
पूर्वैः पूर्वजांप्रमाणे
पूर्वतरम् पूर्वी
कृतम् कर्म (जसे) कर्म केले
एव कुरु। तसेच कर.
थोडक्यात पूर्वजांनी घालून दिलेल्या
आदर्शांचा अंगीकार कर.
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्।।4.16।।
'किम् कर्म, किम् अकर्म' इति अत्र कवयः
अपि मोहिताः। तत् कर्म ते प्रवक्ष्यामि, यत् ज्ञात्वा अशुभात् मोक्ष्यसे।
प्रवक्ष्यामि प्र +वक्ष्यामि वच् धातू बोलणे सांगणे लृट लकार
(मी) समजावून सांगेन ( प्रवचन)
काय सांगेन?
किम् कर्म, किम् अकर्म' इति काय कर्म
काय अकर्म ते
(ज्याच्या बददल)
कवयः अपि मोहिताः इथे कवि म्हणजे विद्वान असा अर्थ घेता येईल. ते
सुद्धा गोंधळलेले, संभ्रमित आहेत
तत् कर्म ते, त्या कर्मांबददल तुला (सांगेन)
यत् ज्ञात्वा ज्याची माहीती झाली की (तुला )
अशुभात् मोक्ष्यसे अपवित्र गोष्टींपासून मुक्तता मिळेल.
तसे बघायला गेले तर कर्म आणि अकर्म ह्या मध्ये फरक करणे अवघड आहे.
जसे एखादे फळ चवीला कडू असेल पण ते कोणत्या तरी विषा वर उतारा असू
शकेल.
म्हणजे हेतू महत्त्वाचा, (अंतरंग महत्त्वाचे) बाह्यरंग नाही.
ह्याबद्दल मी (श्री भगवान) तुला
(अर्जुनाला, म्हणजेच आपल्याला) सांगणार आहे.
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः।।4.17।।
कर्मणः बोद्धव्यम्, विकर्मणः च अपि बोद्धव्यम् अकर्मणः च
बोद्धव्यम्, हि कर्मणः गतिः गहना।
कर्मणः कर्मन् कर्म
विकर्मणः च विकर्म
अकर्मणः च अपि अकर्म
बोद्धव्यम् समजलेच पाहिजे
कर्मणः गतिः गहना कोणाला कोणत्या कर्माने गती मिळेल हे अनाकलनीय आहे.
ह्या श्लोकात कर्म अकर्म आणि विकर्म हे तीन महत्वपूर्ण विचार.
कर्माचे साधारण तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे
1. कायिक 2. वाचिक आणि 3. मानसिक
ह्यांचे अर्थ शब्दांप्रमाणे सहज समजून येतात.
गीतेमध्ये तीन प्रकारची कर्म सांगितली आहेत.
1. सात्विक कर्म (गीता 18.24) श्रेयाची अपेक्षा न करता केलेले कर्म
2. राजस कर्म (गीता 18.25)
कर्म जे परिश्रम घेऊन विशिष्ट संकल्प ठेवून केलेले असे
3. तामसिक कर्म (गीता 18.25) अज्ञानातून आरंभ झालेले ज्याचे परिणाम
नुकसानदायक असे
ह्याव्यतिरिक्त कर्मांचे असेही वर्गीकरण करता येईल
1. नित्य कर्म (दैनिक कार्य)।
2. नैमित्य कर्म (विशिष्ट प्रसंगानुरूप केलेले कार्य)
3. काम्य कर्म (विशिष्ट हेतूपुरस्सर केलेले कार्य)।
4. निष्काम कर्म (कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता केलेले कार्य)।
5. संचित कर्म (पूर्व जन्मी कार्यामुळे निर्माण झालेले प्रारब्ध कर्म)।
6. निषिद्ध कर्म
इतके सर्व वर्गाकरण केल्यानंतर सुद्धा चांगले कर्म कोणते आणि वाईट
कर्म कोणते हे ठरविताना गोंधळ होतोच.
जसे हत्या ही वाईटच पण एखाद्या नरभक्षक जनावराला मारणे हे लोकोपयोगी
असू शकते.
आधुनिक जगात एखादा अधिकारी आपल्या अधिकाराचा वेगवेगळ्या प्रकारे वापर
करताना दिसतात use, misuse and overuse of the power. किंवा non
use of the power. आणि अशी power of discretion कायद्याला सुद्धा मान्य आहे..
खरेच कर्म अकर्म विकर्म यांना विभागणारी रेष खूपच पुसट आहे.
तरी सुद्धा ढोबळ मानाने असे म्हणता
येईल की जे कर्म चांगला हेतू ठेवून दुसर्याच्या भल्यासाठी केले असेल तर ते चांगले
कर्म आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले कर्म ते दुष्कर्म.
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः।
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्।।4.18।।
यः कर्मणि अकर्म यः च अकर्मणि कर्म पश्येत् सः मनुष्येषु बुद्धिमान्,
सः
युक्तः, कृत्स्न-कर्म-कृत्।
कृत्स्न-कर्म-कृत् सर्व कर्म
करणारा.
यः कर्मणि अकर्म जो कर्मा मध्ये अकर्म
यः च अकर्मणि कर्म पश्येत् अकर्मा मधे कर्म पाहतो
सः मनुष्येषु बुद्धिमान्, तो बुद्धिमान मनुष्य
सः युक्तः, कृत्स्न-कर्म-कृत्। असा योगी पूर्ण
काम करणारा असतो.
ह्या श्लोकाचा अर्थ सर्वसामान्य लोकांना सहज समजेल असा नाही, त्यासाठी
थोडा वरच्या पातळीवर जाऊन विचार करावा लागेल. कारण श्लोकातच बुद्धिमान म्हणजेच
ज्ञानी मनुष्याचे वैशिष्ट्य कथन केले आहे. ह्यासाठी 5व्या अध्यायातील
काही श्लोकांचा आधार घेता येईल.
समदर्शी असा स्वयंप्रकाशित सूर्य सर्वांना सारखाच प्रकाश देतो,
मग
ते स्थान पवित्र असेल किंवा अपवित्र. प्रकाश देत असताना त्याच्या परतफेडीची काहीच
अपेक्षा नाही. प्रकाश देणे हे सूर्याचे कर्म तरी कसे म्हणायचे? कारण
सूर्य म्हणजेच प्रकाश. तर अशा या तेजस्वी सूर्यासाठी त्याचे कर्म हे अकर्म होऊ
शकते.
असा योगी जो पुर्णपणे कृष्णभक्तीमध्ये आखंड बुडाला आहे. तो आता
भगवानांशी जोडला गेला आहे, म्हणजेच श्रीभगवानांचे सर्व गुण त्याने
अंगिकारले आहेत तो कोणतेही कर्म स्वतःसाठी करतच नाही. म्हणजेच त्याचे हे अकर्म हेच
त्याचे कर्म आहे.
ज्या योगीची अशी अध्यात्मिक प्रगती
झाली आहे तो अर्थातच बुद्धिमान असा सर्वच कामांमध्ये पारंगत असा आहे.
यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः।।4.19।।
यस्य सर्वे समारम्भाः काम-सङ्कल्प-वर्जिताः, ज्ञान-अग्नि-दग्ध-कर्माणम्
तम् बुधाः पण्डितम् आहुः।
आधीच्या श्लोकात ज्ञानी पुरुषाचे वैशिष्ट्य जे त्याच्या वागणूकी मूळे
कर्म आणि अकर्म ह्यातील फरकच संपुष्टात आणून त्यापूढे जाऊन श्रीभगवान ज्ञानाचे
महत्व ह्या श्लोकात सांगत आहेत ते असे
यस्य सर्वे समारम्भाः ज्या कामांचा शुभारंभ आणि
काम-सङ्कल्प-संकल्प (हेतू)
वर्जिताः वृज धातू त्याग करणे (जळून जाणे)
कशात?
ज्ञान-अग्निदग्ध ज्ञान रुपी अग्नी (अती सखोल ज्ञान, बिनचूक
ज्ञान)
कर्माणम् कर्म
तम्
बुधाः बुध् धातू जाणणे
पण्डितम् ज्ञा धातू जाणणे
प्रज्ञा प्रज्ञित म्हणजे निपुण कुशल
आहुः ब्रू धातू बोलणे आहुः असे म्हणतात
ह्या श्लोकात बुधा आणि पण्डित अशी दोन विशेषणे वापरली आहेत. दोन्ही
चा अर्थ ज्ञानवंत पण
त्याच्या छटा वेगळ्या त्याचा नेमका अर्थ समजावून घेऊ.
पण्डित म्हणजे एखाद्या विषयाचे विशेष ज्ञान असलेला, ज्याला
वेद शास्त्र ह्याचे ज्ञान आहे असा प्रज्ञावंत
त्याच प्रमाणे गुरू चा अर्थ अंधकार (अज्ञान) नष्ट करणारा. कबीरांनी
गुरु ची चार लक्षणे सांगितली आहेत.
बुध बोधति बुद्ध ज्याला आत्मज्ञान झाले आहे. असा बुद्ध ज्याने
आपल्यातले दोष संपवले आहेत, त्याला आपल्या क्षमतांची जाणिव झाली
आहे असा. बुद्ध होणे.
कोणत्याही तंत्रज्ञानाचा विवेकी उपयोग करायचा कि अतिरेकी उपयोग
ह्याचे भान आपल्याकडे असलेले ज्ञान आणि आपली विवेकबुद्धी ह्यामुळेच येते. अणूबाँब
की अणूऊर्जा हे आपण आपल्या सदविवेकानेच ठरवतो. विवेकबुद्धी ला ज्ञानाची जोड असावीच
लागते.
आपल्या बिनचूक ज्ञानाच्या, आणि
आत्मज्ञानाच्या जोरावर जो आपले कर्म करतो त्याच्या मनात आता कसलीही शंका नाही,
(आधीच्या
श्लोकांचे संदर्भ घेऊन) जे काही करायचे आहे त्यात फक्त समर्पणाची भावना आहे अशा
ज्ञानी माणसालाच पंडित म्हणतात.
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः।।4.20।।
कर्म-फल-आसङ्गम् त्यक्त्वा निराश्रयः नित्य-तृप्तः, सः
कर्मणि अभिप्रवृत्तः अपि किञ्चित् न करोति एव।
अभिप्रवृत्तः अभि +प्रवृतः वृत् धातू ग्रहण करणे, गुंतणे
कर्म-फल-आसङ्गम् कार्याच्या श्रेयाची अपेक्षा असणारा
त्यक्त्वा त्यज् धातू त्याग करणे
निराश्रयः कसल्याही आधाराशिवाय
नित्य-तृप्तः नेहमी समाधानी
असणे
सः कर्मणि अपि असे कर्म करूनसुद्धा
किञ्चित् न करोति एव। तो काहीच करत नाही
आधुनिक काळातील शास्त्राप्रमाणे इथे duel personality किंवा
दुहेरी व्यक्तिमत्त्व असे म्हणणे आगाऊपणाचे ठरेल
कारण योगी माणसाने आपल्या
मनाची ही अवस्था महत्प्रयासाने मिळवलेली असते.
आधीच्या श्लोकाचे अर्थ मनात ठेऊन हा श्लोक वाचला कि अर्थ लगेचच समजतो
स्वतः च्या कामाच्या प्रशंसेची अपेक्षा नसलेला, फक्त
आणि फक्त ईश्वरामधे रममाण असलेला, इतर कोणत्याही गोष्टींवर अवलंबून
नसलेला असा (योगी) जरी कोणत्याही कामात गुंतलेला असला तरी प्रत्यक्षात तो काहीच
करत नसतो.
इथे ह्या गाण्याची आठवण येते
कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम...
म्हणजे भक्तिमधे कबीर इतके बुडुन गेले आहेत की शेला विणण्याचे काम जणू रामच करत
आहेत..
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्।।4.21।।
निराशीः त्यक्त-सर्व-परिग्रहः यत-चित्त-आत्मा, केवलम् शारीरम्
कर्म कुर्वन् किल्बिषम् न आप्नोति।
निराशीः नि रसः आवड इच्छा रहित
सर्व-परिग्रहः त्यक्त (परि ग्रह ग्रहण करणे)
आपली मालकी अधिकार सोडून देणे
यत-चित्त-आत्मा,यत यम संयम
ज्याचा मनावर आणि शरीरावर ताबा आहे असा
शारीरम् कर्म कुर्वन् शारीरिक कर्म करत असताना
किल्बिषम् पाप
न आप्नोति मिळत नाही
ज्याच्या आयुष्यात आता कोणत्याही इच्छा आकांक्षा शिल्लक राहिलेल्या
नाहीत.
ज्याने कसलाही संचय केलेला नाही (धन, जमीन जुमला)
सर्वांचा त्याग केला आहे. ज्याने मनावर इतका ताबा मिळवला आहे (सर्व काही सोडून
दिले आहे आणि कसली आसक्ति नाही)
जो फक्त (जीवंत राहण्यासाठी आवश्यक)
शारिरीक कर्म करतो त्याच्या वर कसलेही किल्मिष येत नाही.
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते।।4.22।।
यदृच्छा-लाभ-सन्तुष्टः द्वन्द्व-अतीतः विमत्सरः सिद्धौ असिद्धौ च समः
कृत्वा अपि न निबध्यते।
न निबध्यते बांधून घेतला जात नाही
नि बध् धातू बांधून घेणे
इष् धातू इच्छा करणे
भिक्ष् भिक्षा मागणे
यदृच्छ यत् ऋच्छा न मागता, विनासायास लाभ होणे
लाभ-सन्तुष्टः लाभामुळे आनंदी होणे
द्वन्द्व-अतीतः द्वन्द्वात्मक अनुभव
अत् धातू पुढे जात राहणे
मनात कसलेही द्वन्द्व नाही असा
विमत्सरः वि +मत्सरः ईर्ष्या नसलेला
सिद्धौ असिद्धौ च समः सिद्धि आणि असिद्धि सारखेच वाटून घेणारा
कृत्वा अपि न निबध्यते।
आधीच्या श्लोकाला जोडून ह्या श्लोकाचा अर्थ बघितला तर पुन्हा एकदा
योगी माणसाचे वर्णन करताना यदृच्छ ह्या शब्दाचा विशेष वापर केला आहे. योग्याने
सर्व काही सोडून दिले आहे धन दौलत वगैरे. तो जेमतेम स्वतः च्या शारीरिक गरजा भागवत
आहे. अशा परिस्थितीत जर अचानक कसलीही अपेक्षा नसताना, कोणतेही प्रयत्न
केले नसताना जर काही लाभ झाला तर त्यातही तो संतुष्ट आहे (असेही म्हणता येईल की
स्वतःच्या कमीतकमी गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तो काहीच प्रयत्न करत नाही पण जे
काही मिळते आहे त्यामध्ये समाधानी आहे.)
राग-लोभ, शीत-उष्ण आनंद-दुःख अशा द्वि भावनांच्या पलिकडे गेला आहे. कोणाबद्दल
मत्सर नाही. आयुष्यात काय मिळवले काय गमावले ह्याबद्दल समान भावना असणारा तो कर्म
करताना कशाशीही जोडला गेलेला नाही. (मोक्ष मिळण्याच्या वाटेवर आहे)
ईशावास्योपनिषद मधला 6वा आणि 7 वा श्लोक हेच
वर्णन करतात
यः तु सर्वाणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति । सर्वभूतेषु च आत्मानं
ततो न विजुगुप्सते ।।६ ।।
यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत्
विजानतः । तत्र को मोहः कः शोक एकत्वम् अनुपश्यतः ।।७।।
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते।।4.23।।
गत-सङ्गस्य मुक्तस्य ज्ञान-अवस्थित-चेतसः यज्ञाय आचरतः समग्रम् कर्म
प्रविलीयते।
गत-सङ्गस्य सगळेच सडःग गत
झाले भौतिक सुखापासून लांब गेलेला
मुक्तस्य मुक्त झालेला ज्ञान-अवस्थित अव +स्था प्रस्थापित होणे
चेतसः चित्त
यज्ञाय आहुती साठी
आचरतः आचरन् आचरण करत असलेला
समग्रम् कर्म संपूर्ण कर्म
प्रविलीयते प्र +वि +लि विरघळून जाणे
ह्या श्लोकात आधीच्या 5 श्लोकांचे सार सांगितले आहे असे
वाटते. कर्म आणि अकर्म ह्याचा अर्थ सांगून
झाल्यावर ज्ञानी माणसासाठी त्या दोन्हीतील फरक कसा संपुष्टात आला आहे हे स्पष्ट
करून झाल्यावर
श्रीभगवान असे म्हणतात की सर्व भौतिक सुखापासून लांब गेलेला, आता
त्याचे चित्त ज्ञान संपन्न झाले आहे, त्याचे जगणे आता फक्त ईश्वरासाठीच आहे,
त्याच्यासाठी
आता कर्म सुद्धा करण्यासाठी उरलेले नाही. थोडक्यात मुक्ति प्राप्त झाली आहे.
महर्षि व्यासांची ही संस्कृत रचना
व्याकरणाच्या दृष्टीने अतिशय योग्य आणि चपखल शब्दात मांडली गेली आहे. 'समग्रं
कर्म ' शब्दांचा वापर यज्ञाय आणि प्रविलीयते ह्या दोन्ही साठी अतिशय
चातुर्याने वापरला आहे.
ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना।।4.24।।
ब्रह्म-अर्पणं, ब्रह्म हविः, ब्रह्मणा
ब्रह्म-अग्नौ हुतम्, तेन ब्रह्म-कर्म-समाधिना ब्रह्म एव गन्तव्यम्।
ब्रह्म शब्दात आपले सर्व अस्तित्व सामावले आहे. आपल्या सृष्टिला
उत्पन्न करणारा ब्रह्म, ह्याचा मूळ शब्द ब्रह्मन्, ज्याचा मूळ धातू बृह, म्हणजे
वृद्धि होणे, बृहन, बृहत.
आपल्या तत्वज्ञानाप्रमाणे 84 लाख योनि म्हणजे इतक्या प्रकारचे जन्म,
डार्विन
चा उत्क्रांती चा सिद्धान्त दोन्ही मध्ये जैवविविधता आहेच. ह्या सर्वांची उत्पत्ती
ब्रह्मा पासून झाली असे आपण म्हणतो आणि ते तसे म्हणत नाहीत इतकाच काय तो फरक.
म्युटेशन म्हणजे उत्पारिवर्तन हे शास्त्रिय सत्य जैवविविधता निर्माण करते म्हणजेच
वृद्धि होते.
।ॐ।। ।।यो भूतं च भव्य च सर्व यश्चाधितिष्ठति।
स्वर्यस्य च केवलं तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नम:।।-अथर्ववेद 10-8-1
भावार्थ : जो भूत, भविष्य और सबमें व्यापक है, जो
दिव्यलोक का भी अधिष्ठाता है, उस ब्रह्म (परमेश्वर) को प्रणाम है।
सृष्टी फक्त निर्माण करून चालत नाही तर तिचे संगोपन करावे लागते,
नवनवीन
जीव निर्माण होतात, त्यांच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण निर्माण करावे लागते. म्हणजेच
शुद्ध हवा, निर्मळ पाणी आणि अन्नधान्य..
हाच तो यज्ञ. ह्यामध्ये कोणाचा तरी बळी जाणार, कोणीतरी हवि
पडणार.
मोठा मासा छोट्या माशाला गिळून टाकतो हे माशांच्या जगाचे तत्वज्ञान
सर्वांनाच लागू पडते. त्यातही एक समतोल आहे कारण हे ब्रह्म कर्म आहे
सर्वभूतेषु यः पश्येद्भगवद्भावमात्मनः।
भूतानि भगवत्यात्मन्येष भागवतोत्तमः।।”
सर्वामध्ये देव आहे आणि देवामधे सर्व आहेत.
यज्ञ चा मूळ धातू यज् म्हणजे आदर करणे, भक्ति करणे आहुती
देणे.
ब्रह्म-अर्पणं, ब्रह्म म्हणजेच अर्पण
ब्रह्म हविः,हवि
ब्रह्म आहे
ब्रह्मणा ब्रह्म-अग्नौ हुतम्,
ब्रह्मा
कडून ब्रहमाग्नि ला हवि दिली जाते
तेन त्याने
ब्रह्म-कर्म-समाधिना ब्रह्म कर्म समाधिन्
ब्रह्म एव गन्तव्यम्। ब्रह्म साधते
ज्या यज्ञात अर्पण हे ब्रह्म आहे,
हवि
पण ब्रह्म आहे आणि यज्ञ करणारा सुद्धा
ब्रह्म, ब्रह्मरूप अग्निमधे दिली जाणारी आहुति सुद्धा ब्रह्म च आहे , (असा ) मनुष्य
ब्रह्ममय (समाधि) झाला आहे , त्याचे
(यज्ञाचे) फळ सुद्धा ब्रह्मच आहे.
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति।।4.25।।
अपरे योगिनः दैवम् यज्ञम् एव पर्युपासते; अपरे यज्ञेन एव
ब्रह्म-अग्नौ यज्ञं उपजुह्वति।
अपरे अन्य
योगिनः योगी
दैवम् देव
यज्ञम् यज्ञ
एव फक्त
पर्युपासते; परी +उप +आस उपासना करणे
अपरे अन्य
यज्ञेन एव
ब्रह्म- परमसत्य
अग्नौ अग्नी मधे
यज्ञं
उपजुह्वति। अर्पण करणे
उप +हु धातू यज्ञ करणे
आधीच्या श्लोकात ब्रह्म ह्या शब्दाचे विस्तृत वर्णन वाचले. ब्रह्माने
निर्माण केलेले हे जग, त्यात किती ती विविधता अगदी एक माणूस सुद्धा दुसर्या माणसासारखा
नाही. प्रत्येकाच्या नैसर्गिक वृत्तीं मध्ये काही ना काही तरी फरक, तसेच
त्यांच्या समजुतींमधे, भक्तिमधे सुद्धा फरक. ज्याच्या ज्ञानाची जितकी पातळी, त्याचे
प्रतिबिंब त्याच्या भक्तीमधै दिसणार.
काही लोक आपल्या कर्मेन्द्रियांच्या
सुखासाठी ईष्ट देवतांची उपासना करतात पण काही जण ह्याच कर्मेन्द्रियांच्या
माध्यमातून ईश्वराचा शोध घेत असतात. असे लोक आपली स्वतःची आहुती (स्वतः च्या
सुखाची, स्वार्थाची) देत असतात.
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति।।4.26।।
अन्ये श्रोत्र-आदीनि इन्द्रियाणि संयम-अग्निषु जुह्वति, अन्ये
शब्द-आदीन् विषयान् इन्द्रिय-अग्निषु जुह्वति ।
अन्ये काही
श्रोत्र-आदीनि इन्द्रियाणि श्रवण आणि इतर इन्द्रिय
संयम-
अग्निषु यज्ञाच्या आहुतीत
जुह्वति, हु धातू यज्ञ करणे
अन्ये काही
शब्द-आदीन् विषयान् वाचा आणि इतर विषय
इन्द्रिय-
अग्निषु आहुती
जुह्वति ।
आपल्या मनावर निग्रहाने संयम ठेवणे म्हणजे एक प्रकारची अग्नी
परिक्षाच. एक प्रकारचा यज्ञच तो. आणि ह्यात आहुती जाणार आपल्या ठिकाणी असणाऱ्या
आसक्ती ची आणि लालसेची.
ह्या श्लोकात दोन प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत.
ऐकणे (दुसर्यांचे बोलणे) आणि बोलणे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या मनात
भावना उत्पन्न करणारी महत्त्वाची माध्यमे आहेत.
पहिल्या प्रकाराच्या यज्ञात योगी आपल्या ऐकण्याच्या क्षमतेची आहुती
देइल. (एकांतवास पत्करेल)
किंवा दुसर्या प्रकारच्या यज्ञात तो
बोलणे टाळेल. (बोलाचाली झाल्याच नाहीत तर भावनिक गुंता निर्माणच होणार नाही).
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते।।4.27।।
अपरे सर्वाणि इन्द्रिय-कर्माणि प्राण-कर्माणि च ज्ञान-दीपिते
आत्म-संयम-योग-अग्नौ जुह्वति।
अपरे बाकीचे
सर्वाणि सर्व समस्त
इन्द्रिय- अवयव
कर्माणि काम
प्राण. प्राणशक्ति
कर्माणि
च
ज्ञान-दीपिते
आत्म-संयम-योग
अग्नौ यज्ञ
जुह्वति। हू धातू अर्पण करणे
सहाव्या अध्यायाचे नाव आत्म-संयम-योग असे आहे, त्याचे सूतोवाच
ह्या श्लोकात केले आहे.
आधीच्या श्लोकात श्रवण आणि वाचा ह्याची आहुती दिली, आता
समाधि अवस्थेवर भाष्य करताना
श्रीभगवान असे म्हणतात की
काही योगी समाधी रुप यज्ञ करतात ज्यामधे आपल्या इन्द्रिय आणि प्राणशक्ति
च्या कर्मांची आहुती देतात.
इन्द्रियांचे कर्म रोखणे आपण समजू शकतो पण प्राणशक्तिचे कर्म कसे
रोखून धरायचे?
हठयोगात श्वास रोखून धरण्याला कुंभक असे म्हणतात. सरावाने श्वास
रोखून धरण्याचा काळ वाढवता येतो.
दुसर्या प्रकारात मन एकाग्र करून सुद्धा आपला श्वास मंद करता येतो
जेव्हा आपल्या इन्द्रियासुखाचा अनुभव मिळत असतो त्या स्थितीला पराग
आत्मा असे म्हणतात. पण प्रत्याग आत्मा हे आपले लक्ष्य असले पाहिजे. म्हणजेच
वैराग्य.
निर्विण्णानां ज्ञानयोगो' ।
श्रीमद्भागवतम् 11.20.7
ज्यांना वैराग्य प्राप्त झाले आहे त्यानाच ज्ञान योग प्राप्त होतो
13 व्या अध्यायात क्षेत्रज्ञ असा शब्द वापरला आहे.
तत्त्वमसि' मी तोच आहे हूँ (छान्दोग्योपनिषद-6.8.7) 'अहम् ब्रह्मास्मि' अर्थात
'मी परम सत्ता आहे (वृहदारण्यकोपनिषद-1.4.10)।
ह्या सर्वांचा अर्थ आत्म संयम योग असाच होतो.
थोडक्यात दिव्य शक्तिने प्रेरित होऊन
काही योगी आपली मन बुद्धि आणि इन्द्रियांची कर्मे आत्म संयमाच्या यज्ञात अर्पण
करतात.
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः।।4.28।।
द्रव्य-यज्ञाः तपो-यज्ञाः तथा अपरे योग-यज्ञाः संशितव्रताः यतयः च
स्वाध्याय-ज्ञान-यज्ञाः ।
द्रव्य-यज्ञाः
तपो-यज्ञाः
तथा अपरे अशा प्रकारे अन्य
योग-यज्ञाः
संशितव्रताः संशितव्रतात्मन्
दृढ संकल्प केलेला
संशित म्हणजे दृढ
सम +शी धातू तीक्ष्ण करणे
यतयः यति प्र. ब. व.
संन्यासी
च सुद्धा
स्वाध्याय-ज्ञान-यज्ञाः ।
श्रीभगवानकृष्णांनी यज्ञाचे असंख्य प्रकार सांगितले आहेत.
द्रव्य-यज्ञ द्रव्य म्हणजे फक्त अन्न धान्य, धन नसून ज्ञान
असा सुद्धा अर्थ घेता येईल. ज्ञान देणे आणि अंधकार दूर करणे, लोकोपयोगी
कामे करणे असा सुद्धा यज्ञ होऊ शकतो.
तपो-यज्ञ काही जण कठोर तपस्या करतात. बरेचदा लोक लोटांगण घालत
देवदर्शनाला जातात असे आजही बघायला मिळते.
योग यज्ञ भारतीय दर्शनात सहा प्रकारचे दर्शन शास्त्र आहेत त्यापैकी एक योग दर्शन. जैमिनी ऋषीं चे 'मीमांसा
दर्शन', वेदव्यासांचे 'वेदान्त दर्शन', गौतम ऋषींचे 'न्याय
दर्शन' कषाद ऋषींचे वैशेषिकी दर्शन और कपिल मुनि ने 'सांख्य दर्शन'
आणि
पतंजलि ऋषींचे योग दर्शन. योग दर्शनात पतंजलींनी योग च्या आठ अंगांचे वर्णन केले
आहे ज्याला अष्टांग योग असे म्हणतात
समाधिासिद्धिरीश्वर प्रणिधानात्।। (पतंजलि योग दर्शन-2.45)
योगसिद्धी प्राप्त करण्यासाठी परमेश्वराला शरण यावे लागेल.
काही जण वैदिक ग्रंथांचा अभ्यास करून ज्ञान संपादन करतात.
सा विद्या तन्मतिर्यया" (श्रीमद्भागवतम्-4.29.49) अर्थात
“खरे ज्ञान तेच आहे जे ईश्वराप्रती श्रद्धा निर्माण करेल.
तर काही जण दृढनिश्चय करताना दिसतात.
अपाने जुह्वति प्राण प्राणेऽपानं तथाऽपरे।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः।।4.29।।
अपरे प्राणायाम-परायणाः प्राण-अपान-गती रुद्ध्वा अपाने प्राणम्
जुह्वति तथा प्राणे अपानम् ।
अपरे दूसरे
प्राणायाम-परायणाः
प्राणायामात झोकून दिलेले
प्राण आयाम
परा +इ धातू जाणे अभ्यास करणे, चिंतन करणे
प्राण-अपान-गती उच्छ्वास आणि
श्वासोच्छ्वास यांच्या क्रिया
रुद्ध्वा रुध धातू थांबवणे
अपाने प्राणम् श्वास
उत्श्वास
जुह्वति हू धातू अर्पण करणे
तथा आणि
प्राणे अपानम् । उच्छ्वास मध्ये आत येणारा श्वास
4थ्या अध्यायातील 29 व्या श्लोकांत प्राणायाम संबंधी
थोडक्यात माहिती आणि पुढिल श्लोकात त्याला पूरक असलेल्या आहारा बद्दल माहिती दिली
आहे.
परमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना ‘प्राणप्रतिष्ठा’ करून आपली
मूर्ती घडविली आहे. एकदा प्राणशक्तीचे अस्तित्व समजून घेतले की ‘प्राण’ संकल्पनेसह
श्वासावर नियंत्रण व पर्यायाने मनावर नियंत्रण आणणे समजू शकते.
पाच मुख्य प्राण..
प्राण, अपान, व्यान, उदान, समान
१. प्राण :- हा वायू हृदयात राहतो व श्वासोच्छ्वास करतो.
२ अपान :- हा वायू मोठय़ा आतडय़ात राहतो व मलमूत्राचे विसर्जन करतो.
३. व्यान :- हा सर्व शरीर व्यापून राहतो.
४. उदान :- हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो.
५. समान :- हा नाभी कमलात राहतो व सर्व नाडयांना अन्नरस पुरवतो.
पाच उपप्राण आहेत..
नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय
१. नाग :- हा वायू ढेकर निर्माण करतो व शरीरातील अशुद्ध तत्त्वे
बाहेर टाकतो.
२. कूर्म :- हा वायू पापण्यांची उघडझाप करतो.
३. कृकल :- हा वायू िशक व खोकला निर्माण करतो.
४. देवदत्त :- हा वायू जांभई निर्माण करतो.
५. धनंजय :- हा वायू मृत्यूनंतर आपल्या शरीरात राहतो व वातावरणातील
पिशाच्च..
प्राणायामाच्या साधारण क्रिया अशा
पुरक श्वास घेणे
रेचक श्वास सोडणे
अन्तर कुंभक श्वास घेतल्यानंतर रोखून ठेवणे
बाह्य कुंभक श्वास सोडल्यानंतर, श्वास रोखून
धरणे.
सामान्य माणसाला पंचप्राणांची फारशी माहिती नसते पण प्राणायाम
केल्यास सर्व क्रियांवर ताबा मिळवता येतो. म्हणजे प्राणायाम करणे ही सुद्धा एक
साधनाच.
प्राणमय कोष हे आपल्या शरीराचे उर्जा
स्त्रोत आहे. प्राणायामाच्या सरावाने आपण आपल्या उर्जेवर नियंत्रण ठेवू शकतो,
त्याचा
अपव्यय टाळू शकतो.
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः।।4.30।।
अपरे नियत-आहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति। एते सर्वे अपि
यज्ञ-क्षपित-कल्मषाः यज्ञविदः ।
अपरे दूसरे
नियत-आहाराः नियमित आहार
हृ हरति हरण होणे
प्राणान् प्राण वायू
प्राणेषु जीवशक्ती
जुह्वति। अर्पण करतो
एते सर्वे हे सर्व
अपि सुद्धा
यज्ञ-क्षपित-
क्षप् धातू धुणे
कल्मषाः पाप
कर्म +सो विद्ध्वंस करणे
यज्ञविदः यज्ञ जाणतो
विद् धातू माहीत करुन घेणे.
आधीच्या श्लोकात प्राणायाम हा एक साधनेचा मार्ग आहे असे
सांगितल्यानंतर आता ह्या श्लोकात आहारा विषयी विवेचन केले आहे.
सर्व सृष्टिचे, ऋतूंचे नियम पाळून केलेला आहार म्हणजे
नियताहार.
ह्या संबंधी जास्त माहिती 17 व्या अध्यायातील 8, 9, 10
व्या श्लोकात दिलेली आहे.
उपवास हा फक्त खाण्यापिण्याशी निगडित नसून तो मनाचा निग्रह दर्शवतो.
एक प्रकारचे तपच ते..
ज्यांना यज्ञ प्रक्रियेची माहिती आहे
ते आपला आहार नियमित ठेवून आपल्या प्राणाची (समान, पंच प्राणातील
एक) आहुती देतात, आणि अशा यज्ञाने त्याचे पाप धुतले जाते. (मनाची शक्ती वाढते).
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतो़ऽन्यः कुरुसत्तम।।4.31।।
हे कुरुसत्तम! यज्ञ-शिष्ट-अमृत-भुजः सनातनम् ब्रह्म यान्ति।
अयज्ञस्य अयम् लोकः न अस्ति, अन्यः कुतः?
हे कुरुसत्तम कुरुः उत्तम
यज्ञ
शिष्ट शिष् धातू शिल्लक ठेवणे
अमृत अ+मृत नष्ट न होणारे
भुजः भुज् धातू भक्षण करणे
सनातनम् शाश्वत
ब्रह्म
यान्ति यत् धातू कार्यरत असणे
अयज्ञस्य यज्ञ न करणारा
अयम् ह्या
लोकः लोकांत
न अस्ति, असत नाही
अन्यः कुतः? दुसर्या (लोकांत) कसे?
ह्या श्लोकात ईश्वराला काही अर्पण करणे (नैवेद्य) आणि प्रसाद ग्रहण
करणे ह्या बददल चा विचार सांगितला आहे.
यज्ञ ह्या संकल्पनेविषयी आधी बरेच लिहून झाले आहे. यज्ञ म्हणजे
बलिदान, यज्ञ म्हणजे आहुती. इदं न मम असे म्हणत सर्व कर्म करायचे. ह्या
सृष्टिच्या निर्मात्या प्रती कायम मनात आदरभाव ठेवून त्याला काही अर्पण करून
त्यातील थोडा भाग स्वतः साठी ठेवायचा.
त्वयोपभुक्तस्रग्गन्धवासोऽलङ्कारचर्चिताः।
उच्छिष्टभोजिनो दासात्सव मायां जयेमहि ।
(श्रीमद्भागवतम्-11.6.46)
मी फक्त तेच खाईन, पियीन, धारण करीन,
तिथेच
राहीन, तेच करीन जे तुम्हाला अर्पण केले आहे. अशा प्रकारे जे शिल्लक आहे
त्याला आपला प्रसाद मानून त्याला ग्रहण करून मोहमाया वर सहज विजय प्राप्त करीन.
ह्या श्लोकात,
ह्या लोकात यज्ञ केला तर काय
होईल ते सांगता सांगता परलोकाचा सुद्धा उल्लेख केला आहे.
श्रीभगवान असे म्हणतात की
हे कुरू वंशातील श्रेष्ठ (अर्जुना)
यज्ञा मधे अर्पण करून झाल्यावर जो अमृतमयी शिल्लक राहिलेला प्रसाद
ग्रहण करतात त्यांना शाश्वत असे परब्रह्म प्राप्त होते. पण जे यज्ञ करत नाहीत
त्यांना ह्या (च) लोकांत सुख मिळत नाही तर त्या लोकांत काय मिळणार?
मृत्यूनंतरच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे म्हणून ह्या श्लोकाचा उल्लेख
करावासा वाटतो.
स वा एष महानज आत्माजरोऽमरोऽमृतोऽभयो ब्रह्म; अभयं वै ब्रह्म;
अभयं
हि वै ब्रह्म भवति य एवं वेद ॥ बृहदारण्यक उपनिषद 4.4.25 ॥
तो अजरामर ब्राह्मण जो नष्ट न होणारा,
अजरामर
असा आहे तो खरोखर भीती मुक्त आहे. त्याला हे समजले आहे की आता कसलीच भीती उरली
नाही.
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे।।4.32।।
एवम् बहुविधाः यज्ञाः ब्रह्मणः मुखे वितताः तान् सर्वान् कर्मजान्
विद्धि। एवम् ज्ञात्वा विमोक्ष्यसे।
एवम् म्हणून
बहुविधाः बर्याच प्रकारचे
यज्ञाः
ब्रह्मणः ब्रह्मा
मुखे मुखात
वितताः विस्तारीत
तान् ते
सर्वान् सर्व
कर्मजान् कर्माने उत्पन्न झालेले
विद्धि। माहित करुन घे
एवम् ह्या प्रकारे
ज्ञात्वा जाणून घेऊन
विमोक्ष्यसे मुच् धातू मुक्त
करणे
कर्म संन्यास योग असे नाव असलेल्या या
अध्यायात 24 - 30 ह्या श्लोकात विविध यज्ञाचे वर्णन केले आहे आणि आता श्रीभगवान असे
म्हणतात की अशा अनेक यज्ञाचे वर्णन वेदांच्या (ब्रह्म) वाणीतून विस्ताराने
सांगितले आहे. ह्या यज्ञाच्या मागे आपली नित्यकर्म आणि विशेष कर्मच आहेत हे तू
लक्षात घे आणि हेच ज्ञान तुला ह्या मोहमयी जगातून मुक्ति मिळावून देईल.
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते।।4.33।।
हे परन्तप! द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञान-यज्ञः श्रेयान्। हे पार्थ!
सर्वम् कर्म अखिलम् ज्ञाने परिसमाप्यते।
हे परन्तप!
द्रव्यमयात्
द्रव्यमय भौतिक साधने
यज्ञात् यज्ञा पेक्षा
ज्ञान-यज्ञः ज्ञानयज्ञ
श्रेयान् श्रेयस् अधिक
चांगले
हे पार्थ!
प्रथ धातू पर्थयति विस्तार होणे
सर्वम् सर्व
कर्म
अखिलम् पूर्णपणे
ज्ञाने ज्ञानाने
परिसमाप्यते व्यापून टाकले
परि +सम +आप धातू
आप धातू प्राप्त करणे
ह्या अध्यायात यज्ञाचे विविध प्रकार, त्यात पडणार्या
आहुती आणि कर्मयोग बददल सांगून झाल्यावर आता ज्ञानयज्ञ याबद्दल बोलत आहेत.
थोडक्यात कर्मकांड उपासतापास, मंत्र पठण,
तीर्थयात्रा
आणि ज्ञान मार्गाने केलेला यज्ञ ह्यांतील फरक सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
माला फेरत युग फिरा, फिरा न मन का फेर।
कर का मनका डारि के, मन का मनका फेर ।। संत कबीर
ह्या श्लोकात श्रीभगवान असे म्हणतात की
हे परन्तप! ज्ञानयुक्त होऊन केला गेलेला यज्ञ हा कोणत्याही भौतिक
साधने पेक्षा श्रेष्ठ आहे. आपली सर्व कर्म ही ज्ञानाची जोड देऊन केलेली असावी.
अशाच अर्थाचा श्लोक मुण्डकोपनिषद् मध्ये सुद्धा दिला आहे.
इष्टापूर्तम् मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः ।
नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वेमं
लोकं हीनतरं वा विशन्ति ॥मुण्डकोपनिषद् 1.2.10 ॥
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः।।4.34।।
प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तत् विद्धि तत्त्व-दर्शिनः ज्ञानिनः
ते ज्ञानम् उपदेक्ष्यन्ति ।
प्रणिपातेन प्रनि + पत् साष्टांग नमस्कार करणे
पत् धातू पडणे
परिप्रश्नेन प्रश्न विचारून
सेवया सेवा करून
तत् ते
विद्धि शिक
विद् धातू माहीत करुन घेणे
तत्त्व-दर्शिनः तत्वदर्शिन् तत्वज्ञानी
ज्ञानिनः ज्ञानीन् ज्ञानी माणूस
ते तद्
ज्ञानम् ज्ञान
उपदेक्ष्यन्ति दाखवले जाईल.
उप +दिश् धातू दाखवणे.
अध्यात्मिक ज्ञान कसे प्राप्त करावे हे ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण
अर्जुनाला सांगत आहेत जे आपल्याला रोजच्या जीवनात आचरणात आणायला हरकत नाही.
ज्ञान प्राप्त करण्याची (आणि परिक्षा पास होणे ह्यामधील फरक) पद्धत
त्या काळात जी व्यासांनी सांगितली ती आज सुद्धा लागू पडतेच.
आचार्यवान् पुरुषो वेदः। (छान्दोग्योपनिषद्-6.14.2)
केवळ गुरुंकरवी वेदांचे ज्ञान प्राप्त होईल.
श्रीभगवान असे म्हणतात की ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरूच्या चरणी
लीन होऊन (गुरू जे ज्ञान देत आहे त्यावर चिंतन मनन करून) जिज्ञासापूर्वक प्रश्न
विचारुन, गुरुची सेवा करून (ह्या मध्ये मानवी स्वभावाचा पैलू सुद्धा दिसतो.
गुरू चा योग्य आदर केला तर गुरू सुद्धा भरभरून ज्ञान देईल) ज्ञान आत्मसात करून घे.
(पुढचे वाक्य मला विशेष महत्वाचे वाटते) असा महात्मा तुम्हाला दिव्य
ज्ञान देऊ शकेल ज्याने स्वतः परम सत्याची अनुभूती घेतली आहे. (थोडक्यात गुरू कसा
असावा, गुरू कोणाला म्हणायचे ह्याबद्दल पुसटसे भाष्य केले आहे.)
तत्पादाम्बुरु हद्वन्द्व सेवा निर्मल चेतसाम्।
सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते ।। (पंचदशी-1.2)
"शुद्ध मनाने
गुरु ची सेवा करा आणि आपले शंका निवारण करा. गुरू धार्मिक ग्रंथांचे आणि विवेकाचे
ज्ञान आणि आनंद देईल.
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि।।4.35।।
हे पाण्डव! यत् ज्ञात्वा पुनः एवम् मोहम् न यास्यसि, येन
भूतानि अशेषेण आत्मनि अथो मयि द्रक्ष्यसि।
हे पाण्डव!
यत् जे
ज्ञात्वा समजून घेतल्यानंतर
ज्ञा धातू समजून घेणे
पुनः पुन्हा
एवम् ह्या प्रकारे
मोहम् मोह
न
यास्यसि, प्राप्त होणार नाही
या धातू जाणे
येन ज्या मूळे
भूतानि भूत सजीव
अशेषेण अ शेष पूर्णपणे
आत्मनि आत्मन् आत्मस्वरूप
अथो अथ +उ इथे सुद्धा
मयि माझ्यात
द्रक्ष्यसि (तू) पाहशील
दृश्य धातू बघणे
गुरूने ज्ञान दिल्यानंतर ते किती समजले आहे ह्याचे मोजमाप करता येत
नाही. (निदान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे गुण समजतात)
आश्चर्यवच्चैनमन्य: शृ्णोति
श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् || 2. 29||
काहीजण आश्चर्याने ऐकतात. पण ऐकल्यानंतर समजतेच असे काही नाही.
म्हणून ज्ञान प्राप्त झाले, म्हणजे नक्की काय समजले पाहिजे हे
सुद्धा श्रीभगवानकृष्णांनी सांगून टाकले आहे.
हे पाण्डव, असे (ज्ञान) समजून घेतल्यानंतर पुन्हा
(अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या) मोहाच्या जंजाळात तू अडकणार नाहीस.
सर्व जीवांमधे परमात्म्याचे अस्तित्व आहे (ते तुला समजेल) आणि त्या
सर्वांना तू स्वतः मधे आणि माझ्यात पाहशील.
सीय राममय सब जग जानी।
करउँ प्रणाम जोरि युग पानी।।
(रामचरितमानस)
अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि।।4.36।।
सर्वेभ्यः पापेभ्यः पाप-कृत्तमः असि चेत् अपि ज्ञान-प्लवेन एव
सर्वम् वृजिनम् सन्तरिष्यसि।
सर्वेभ्यः सर्व
पापेभ्यः पापांपेक्षा
पाप-कृत्तमः पाप करणारा
असि चेत् जरी असला
अपि तरी
ज्ञान-प्लवेन ज्ञान रूपी होडी (जहाज)
एव नक्की
सर्वम् सर्व
वृजिनम् वृजिन दुष्टता
सन्तरिष्यसि।
तृ धातू तरणे पार करणे
वाल्या कोळी चा वाल्मिकी ऋषी झाले हि गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत
आहे. एखाद्याने जर दुष्कर्म केले असेल तर ज्ञान प्राप्त होणार नाही असे नाही. हेच
ह्या श्लोकात सांगत आहेत.
अगदी हाच विचार आजच्या काळात गुन्हेगारास हाताळताना दिसतो.
प्रत्येकाला संधी मिळायलाच हवी.
विज्ञानसारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान्नरः।
सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम्।।
(कठोपनिषद्-1.3.9)
"दिव्य ज्ञानाने आपली बुद्धि चे तेज वाढू दे त्याने मनावर ताबा मिळवून ह्या संसार रूपी महासागर ला
पार करुन दिव्य लोकांत प्रवेश करावा.
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
जरी कोणी समस्त पापी पुरुषांतील महापाप
असेल तरी ज्ञान रुपी नौकेतून तो नक्कीच पापांचा समुद्र पार करून जाईल.
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा।।4.37।।
हे अर्जुन! यथा समिद्धः अग्निः एधांसि भस्मसात् कुरुते, तथा
ज्ञान-अग्निः सर्व-कर्माणि भस्मसात् कुरुते।
हे अर्जुन!
यथा जसे
समिद्धः समिधा
अग्निः अग्नी
एधांसि इंधन
भस्मसात्
कुरुते,
तथा तसे
ज्ञान-अग्निः ज्ञानाचा अग्नी
सर्व-कर्माणि सर्व कर्मांचे
भस्मसात् कुरुते।
प्रखर ज्ञानाची तुलना ह्या श्लोकात अग्नी शी केली आहे.
उभे उहैवैन एते तरती अमृतम साध्व-आसाधिनी:
बृहदारण्यक 4.4. 22
एक व्यक्ति पवित्र आणि अपवित्र कामावर विजय प्राप्त करतो.
ॐ तदधिगम उत्तरपूर्वाघयोरश्लेषविनाशौ
तद्व्यपदेशात् ॐ ॥ ४.१.१३॥ब्रह्म सूत्र
ज्या प्रकारे अग्नि सर्व ज्वलनशील पदार्थ जाळून टाकतो त्याप्रमाणे
ज्ञान रूपी अग्नि आपल्या सर्व कर्म फळांना जाळून टाकतो.
कर्म फळे दोन्ही प्रकारची चांगली आणि वाईट.
म्हणजे कदाचित ज्ञानामुळे झालेला
पश्चात्ताप वाईट कर्म फळ जाळून टाकतो असेही असेल आणि चांगल्या कर्म फळाची अपेक्षा
ठेवू नये असे आधीच सांगून झाले आहे.
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति।।4.38।।
इह ज्ञानेन सदृशम् पवित्रम्
हि न विद्यते। कालेन योग-संसिद्धः स्वयं आत्मनि तत् विन्दति।
इह ह्या लोकांत
ज्ञानेन ज्ञाना सारखे
सदृशम् दिसणारे
पवित्रम् पवित्र
हि नक्की
न विद्यते।
विद् धातू अस्तित्व असणे
कालेन काळानुरूप
योग-संसिद्धः योगाने सुसज्ज
स्वयं स्वतः
आत्मनि आत्मन्
तत् ते
विन्दति। विद् धातू
घोड्याला पाण्याजवळ नेता येते पण तहान भागविण्यासाठी, पाणी
तर त्यालाच प्यावे लागते. असेच काहीसे ह्या श्लोकात सांगितले आहे.
श्रुतानुमानप्रज्ञाभ्यामन्यविषया विशेषार्थत्वाद् ।।
(पतंजली योग दर्शन-1.49)
आत्म अनुभूति ने प्राप्त केलेले ज्ञान हे धार्मिक ग्रंथ पठणापेक्षा
श्रेष्ठ आहे.
ह्या जगात पवित्र ज्ञानासारखे असे
दुसरे काहीच नाही. जो योगाभ्यासात पारंगत असतो त्याला काळाच्या ओघात ही शुद्धता
स्वतः मधेच अनुभवता येते.
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति।।4.39।।
श्रद्धावान्, संयत-इन्द्रियः तत्परः, ज्ञानम्
लभते। ज्ञानम् लब्ध्वा अचिरेण पराम् शान्तिम् अधिगच्छति।
श्रद्धावान्, श्रद्धायुक्त व्यक्ति
संयत-इन्द्रियः संयमित
तत्परः, तत्
पर त्यातच रमलेला
ज्ञानम् लभते। ज्ञान मिळते
ज्ञानम्
लब्ध्वा (अशाप्रकारे) ज्ञान मिळाल्या नंतर
अचिरेण विना विलंब
चिर दीर्घ
पराम् श्रेष्ठ
शान्तिम् शांती
अधिगच्छति प्राप्त होणे
अधि+ गम् धातू जाणे.
ह्या श्लोकात ज्ञान मिळण्यासाठी आवश्यक असलेले गुण सांगितले आहेत.
ज्ञान कोणाला मिळू शकेल तर जो श्रद्धावान आहे असा. येथे श्रद्धा आणि
अंधश्रद्धा ह्यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे.
जगद्गुरु शंकराचार्यानी श्रद्धा ची व्याख्या अशी सांगितली आहे.
गुरु वेदान्त वाक्येषु दृढो विश्वासः श्रद्धा।
"श्रद्धा म्हणजेच आपल्या गुरू आणि वैदिक ग्रंथावर दृढ विश्वास असणे.
यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ।
तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः।।
(श्वेताश्वतरोपनिषद्-6.23)
ज्यांची ईश्वरावर आणि गुरूवर अपार श्रद्धा असते त्यांच्या हृदयात
महान वैदिक ज्ञानाचे प्रतिबिंब दिसते.
अशा श्रद्धावान माणसाचे मन आणि
इन्द्रियांवर संयम आहे, फक्त ज्ञानासंबंधी विचार मनात आहेत (तत् पर) त्याला लगेचच परम शांति
प्राप्त होते.
नअज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः।।4.40।।
अज्ञः अश्रद्दधानः च संशय-आत्मा च विनश्यति। संशयात्मनः न अयं लोकः
अस्ति, न परः न सुखम् ।
अज्ञः अज्ञानी
अश्रद्दधानः च अश्रदधाळू
सुध्दा
अश्रद्धः धानः
संशय-आत्मा च साशंक मन
संशयात्मन्
विनश्यति वि +नश् धातू
नाश होणे
संशयात्मनः संशयी मन
न
अयं लोकः ह्या लोकांत
अस्ति, असते
न परः न पर (लोकांत)
न सुखम् सुख नसते.
आधीच्या श्लोकात श्रद्धेचे महत्त्व सांगून झाल्यावर श्रद्धेचा अभाव
असेल तर काय घडू शकते त्या संबंधी सांगितले आहे.
जे लोक अज्ञानी आहेत आणि श्रद्धाहीन
आहेत, ज्यांचे मन संशयाने भरलेले आहे, त्यांचा विनाश
होतो. अशा संशयी लोकांना ह्या आणि परलोकांत सुद्धा सुख मिळत नाही.
योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसंछिन्नसंशयम्।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय।।4.41।।
हे धनञ्जय! ज्ञानसञ्छिन्नसंशयम् योग-संन्यस्तकर्माणं आत्मवन्तं
कर्माणि न निबध्नन्ति।
हे धनञ्जय!
ज्ञानसञ्छिन्नसंशयम् ज्ञान
सन्छिन्न संशयम्
ज्ञानाने संशयाचा छेद करणे
छिद् धातू छिन्न करणे
योग-संन्यस्तकर्माणं
योगेन सन्यस्तानि कर्माणि
योगाने कर्मांपासून संन्यास घेणे
सन् +नि +अस्
सम्यक न्यासः
आत्मवन्तं आत्म्यासारखे
आत्मन् +वतः आत्मवान
कर्माणि कर्मन्
न निबध्नन्ति। मुक्त असणे
बन्ध् धातू बांधलेले असणे
हे धनञ्जय!
कर्मयोग करणार्यां लोकांना कर्म फळाची
अपेक्षा नसते तसेच त्यांना मिळालेल्या ज्ञानाने त्यांच्या मनातील सर्व संशय दूर
झालेले असतात. परमात्म्याशी एकरुप झालेले असे लोक त्यांच्या सर्व कर्मातून मुक्त
झालेले असतात.
तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनाऽऽत्मनः।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत।।4.42।।
तस्मात् हे भारत! अज्ञान-सम्भूतम् हृत्स्थम् एनम् आत्मनः संशयम्
ज्ञान-असिना छित्त्वा योगम् आतिष्ठ, उत्तिष्ठ।
तस्मात् म्हणून
हे भारत! हे अर्जुना
अज्ञान-सम्भूतम्
अज्ञानामुळे निर्माण झालेले
सम् +भूतम् भू धातू होणे
हृत्स्थम् हृदयात असलेला
हृत् +स्था धातू
एनम् एतद् हे
आत्मनः आत्मन्
संशयम् शंका
ज्ञान-असिना ज्ञान रूपी शस्त्राने
ज्ञान +असिः.
असिः हत्यार
छित्त्वा समूळ नष्ट करून
छिद् धातू छिन्न करणे
योगम् योग कर्मयोग
आतिष्ठ, सिद्ध होणे
आ +तिष्ठ
उत्तिष्ठ ऊठ
उत् +तिष्ठ
इथे हृदय हा शब्द आपल्या भावनांशी निगडित आहे. आपल्या मनात उत्पन्न
होणाऱ्या सर्व प्रकारच्या भावना आपल्या हृदयात असतात.
ह्या अध्यायाचे नाव ज्ञान कर्म संन्यास योग.
आधीच्या सर्व श्लोकात कर्म म्हणजे काय.?
कर्म आणि अकर्म ह्यातील फरक आणि कर्म करता करता परमेश्वराला जोडून
घेण्याची प्रक्रिया आणि त्यामुळे मिळत असलेले आत्मज्ञान ह्या सर्वांचा ऊहापोह करून
झाल्यावर शेवटच्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
म्हणूनच हे अर्जुना
तुझ्या हृदयात अज्ञानामुळे ज्या काही शंका कुशंका वास करत असतील त्या
ज्ञान रुपी खडःगाने तू समूळ नष्ट करून टाक. कर्म योगने सिद्ध झालेला तू उठ (लढायला
सिद्ध हो)
अर्जुन काही उठला नाही हा भाग निराळा.
--------------------------------------------🙏🙏🙏🙏--------------------------------------------------
Divine work !
उत्तर द्याहटवाNice Anagha !!
उत्तर द्याहटवाछान ,👌👌🙏
उत्तर द्याहटवाGreat work..
उत्तर द्याहटवाछान.
उत्तर द्याहटवा